Sunday, April 7, 2024

अकेमेनिड साम्राज्याचा भारतातील विस्तार!


भारतात झालेल्या वैदिक आर्यांच्या शरणार्थी म्हणून झालेल्या विस्थापनाचा आणि त्यांच्या येथील आजही स्वतंत्र ठेवलेल्या वैदिक धर्माच्या भल्या-बु-या परिणामांची चर्चा आपण मागील लेखांत केली. त्यांच्यानंतर किमान पाचशे वर्ष कोणतीही स्थलांतरे अथवा आक्रमणे झालीच नसतील असे नाही, पण एक तर ते प्रमाण नगण्य असावे किंवा विस्थापित येथीलच संस्कृतीत मिसळून गेल्याने त्यांचे स्वतंत्र अस्तित्व दाखवून देता येत नाही असेही असेल. पण दुसरे ज्ञात आक्रमण व वायव्य भारतात सत्ता स्थापन करणारे पर्शियातील अकेमेनिड घराण्याच्या पहिल्या सायरसचे होय. या घराण्याने जवळपास इसपू ५१८ मध्येच गांधार व सिंध प्रांतावर स्वारी करून स्वात खो-यासह बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतला. पुढे इसपू ३३४ पर्यंत, म्हणजे अलेक्झांडरच्या आक्रमणापर्यंत, पंजाबपर्यंत विस्तारलेली अकेमेनिड सत्ता या भागात टिकून राहिली. गंधार प्रांताची राजधानी पुष्कलावती ही होती तर तक्षशिला ही हिंदुश प्रांताची प्रांतिक राजधानी होती व तेथील क्षत्रपातर्फे या भागातील कारभार बघितला. अवाढव्य एकेमेनिड साम्राज्य तेव्हा २३ भागांत वाटले गेलेले होते, व त्यातील विसावा भाग “हिंदुश” (सिंधू नदीचे खोरे) होता. सर्वात जास्त उत्पन्न या भागातून येत असे व तेही दरवर्षी साडेआठ टन सोन्याच्या स्वरूपात. किंबहुना या समृद्धीसाठीच सायरस व नंतर दारियस (पहिला) यांनी या भागावर ताबा मिळवला असेच दिसते. शिवाय या पर्शियन घराण्याची सत्ता जरी भारताच्या पश्चिमोत्तर भागापर्यंतच सीमित असली तरी तिचा सांस्कृतिक प्रभाव संपूर्ण भारतावर पडला जो आजही शेष आहे.

आज इराण-अफगाणिस्तान नावांनी परिचित असलेला हा प्रदेश पर्शिया या व्यापक नावाने ओळखला जात होता. या प्रदेशाची ऐतिहासिक माहिती मिळायला सुरुवात होते ती अकेमेनिड साम्राज्याच्या काळापासून, म्हणजे इसपू ५५० पासून. या साम्राज्याची निर्मिती झाग्रोस पर्वतराजीच्या परिसरातील भटक्या पर्शियन टोळ्यांनी केली. प्राचीन इराणमधील हे पहिले ऐतिहासिक साम्राज्य मानले जाते. सायरस द ग्रेट या साम्राज्याचा संस्थापक होय. त्याने अकेमीनस या सायरसच्या मुळ पुरुषाने सनपूर्व सातव्या शतकात स्थापन केलेल्या छोट्या राज्याचे साम्राज्यात रुपांतर केल्याने त्याच्या नावावरून या साम्राज्याला अकेमेनिड साम्राज्य ही ओळख मिळाली.  या साम्राज्याचा विस्तार अफाट होता. या साम्राज्याची व्याप्ती सिंधू नदीच्या खो-यापासून ते इजिप्तपर्यंत पसरली होती.  सायरस हा एक महायोद्धा व धुरंधर राजानितीद्न्य होता. त्याने आपण जिंकलेल्या प्रांतांवर सुनियोजित शासन करण्यासाठी सत्रपी (गव्हर्नर) नेमले. दारियस(पहिला) याने सर्वप्रथम बाल्ख, अरिया, अराकोशिया (आजच्या अफगाणिस्तानातील प्रांत) जिंकून आपल्या साम्राज्याला जोडले आणि प्रत्येक प्रांतावर सत्रपाची नियुक्ती केली. बहुतेक सत्रप राजघराण्याशी संबंधित असत. हे साम्राज्य राजवंशातील सत्तासंघर्षाने दुबळे होत गेले आणि शेवटी इसपू ३३४ मध्ये अलेक्झांडर द ग्रेटने या साम्राज्याचा अस्त केला.

भारताचा विदेश व्यापार सिंधू संस्कृतीच्या काळापासून सुरु होता. किंबहुना सुमेर, इजिप्त सारक्या देशांशी व्यापार करणा-या भारतीय व्यापा-यांना पर्शिया (प्राचीन इराण) मार्गानेच प्रवास करावा लागे. त्यामुळे पर्शियन टोळ्यांशी त्यांचा आधीपासूनच परिचय होता. व्यापारामुळे सिंधू नदीचे खोरे भरभराटीला आलेले होते. तक्षशिला हे व्यापारी मार्गांचे जंक्शन असून हे व्यापारी व उत्पादक श्रेण्यांचे पूर्वापार केंद्र होते. तक्षशिला विद्यापीठही चालवले जाई ते या श्रेण्यांनी दिलेल्या दानातून. येथे अन्य धार्मिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक व व्यापारी शिक्षणही दिले जात असे. तक्षशिला शहर एका अर्थाने पश्चिम भारताची आर्थिक राजधानी होती असे म्हणायला हरकत नाही. त्या मानाने पर्शियाचा प्रदेश प्रतिकूल हवामानाचा. तेथेही व्यापारी केंद्रे असली तरी उत्पादनात हा प्रदेश पुढारलेला नव्हता. त्याला पूर्व व पश्चीमेतून येणा-या उत्पादनांवर बव्हंशी अवलंबून रहावे लागे. साम्राज्याची स्थापना करताना व्यापारी मार्ग व उत्पादनाची केंद्रेही आपल्या कब्जात ठेवणे सायरसला वाटणे स्वाभाविक होते. अन्यथा सैन्याला पोसणे व युद्धमोहीमा काढणे शक्य झाले नसते. किंबहुना व्यापारी मार्गांवर ज्यांचे स्वामित्व त्यांचेच साम्राज्य अशी व्यवस्था निर्माण होऊ लागण्याचा हा काळ होता.  बव्हंशी युद्धेही व्यापारी मार्गांवरील स्वामित्वासाठीच झाली हाहे एक महत्वाचा इतिहास आहे. महत्वाकांक्षी अकेमेनिड साम्राज्याचे लक्ष तक्षशिला आणि त्या भागातील देवलसारख्या प्राचीन बंदरांकडे गेले नसते तरच नवल होते. आणे ते गेलेही. प्रथम त्यांनी गांधार प्रांत ताब्यात घेत सिंधू नदीच्या खो-यापर्यंत विस्तार केला आणि पुढे पंजाबपर्यंत सत्तेचा विस्तार केला.

तक्षशिला विद्यापीठ हे तेव्हाही जगविख्यात होते. पर्शियन, ग्रीक, मध्य आशियातील विद्यार्थीही तेथे शिक्षणासाठी येत असत. तत्कालीन जगातील तत्वज्ञान तेथे हिरीरीने चर्चा केले जात असे. त्याच बरोबर वैद्यकीय ते अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमही तेथे शिकवले जात असल्याने या विद्यापीठाची ख्याती मोठी होती. अकेमेनिड साम्राज्याने तक्षशिला ही आपल्या हिंदुश प्रांताची राजधानी म्हणून कायम केली. तक्षशिला येथे झालेल्या उत्खननात तत्कालीन अवशेष मिळालेले आहेत. विशेष बाब म्हणजे अकेमेनिड सैन्यात भारतीयांचाही मोठा सहभाग होता आणि ते झेरेक्सेस या अकेमेनिड सम्राटाच्या काळात (इसपू ४८०) ग्रीसवर केलेल्या आक्रमणात सहभागी झाले होते अशी नोंद ग्रीक इतिहासकार हिरोडोटसने करून ठेवली आहे. त्याने भारतीय सैनिकांच्या वेशभूषा आणि शास्त्रांचीही नोंद करून ठेवलेली असून त्या सैन्यातील सामील भारतीय सैनिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमाही विविध उत्खननात सापडलेल्या आहेत. एरियन आणि कर्टीयस या इतिहासकारांनीही नंतरच्या काळात झालेल्या पश्चिम आशियातील युद्धातील भारतीय सानिकांच्या उपस्थितीची नोंद घेतलेली आहे.

अकेमेनिड साम्राज्याने पश्चिमोत्तर भारतावर आधिपत्य मिळवल्याचा हा तो काळ होता जेव्हा पूर्व भारतात महावीर आणि गौतम बुद्ध उदयाला आले होते आणि नव्या धर्मांचा उपोद्घात करत होते. या काळात तक्षशिला आणि सिंधू नदीच्या खो-यात मात्र पारशी धर्माचे वर्चस्व वाढलेले होते. पारशी धर्माच्या वर्चास्वामुलेच अफगाणिस्तान सोडावा लागणा-या वैदिकांच्या दृष्टीने याच काळात पंजाब आणि गांधार त्याज्य व तिरस्करणीय झाला याचे कारण या ऐतिहासिक घटनेत असण्याची शक्यता आहे, कारण पारशी धर्मीय वैदिकांच्या दृष्टीने परंपरागत हाडवैरी होते. या भागातील त्यांच्या दीर्घकालीन वर्चस्वामुळे हा भागच त्यांच्या दृष्टीने त्याज्ज्य झाला असल्यास नवल नाही. अर्थात या भागातील अरण्यात राहणा-या ब्राह्मणांकडून पहिल्या दारियसचा पिता हिस्तास्फेस बरेच काही शिकला आणि त्याने आपल्या धर्मातील यज्ञयागात व मागी तत्वज्ञानात भर घातली असे इसपू चवथ्या शतकातील रोमन इतिहासकार अम्मिनुस मार्सेलिअस याने नोंदवून ठेवले आहे. त्यामुळे पर्शियन मात्र ज्ञानाच्या देवानघेवाणीस महत्व देत होते असे दिसते.

दोन शतके टिकलेल्या या साम्राज्याच्या पश्चिमोत्तर भारताच्या आधीपत्याने भारतीय विचारविश्वातही खळबळ निर्माण केली, त्याबद्दल पुढे.

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...