Wednesday, April 3, 2024

उध्वस्त व्यक्तिमत्वाचे राज्य...महाराष्ट्र राज्य!


जसे माणसाला एक व्यक्तिमत्व असते तसेच व्यक्तिमत्व राज्य आणि राष्ट्राचेही असते. व्यक्तीचे जीवनाचे अनुभव, अर्जित केलेले ज्ञान आणि त्याचा उपयोग करत समाजाला वा परिवाराला दिलेले योगदान, एकुणातील वागणे इ. बाबीवरून त्याचे व्यक्तिमत्व ठरते. स्वत:ला जाणवणारे व्यक्तिमत्व आणि इतरांना भासणारे अथवा वाटणारे व्यक्तिमत्व यात जुळणारे सांधे असतातच असे नाही. तरीही एकुणात व्यक्तिमत्व ही बाब मानवी जीवनात महत्व घेऊन बसते. व्यक्तीला मिळणारा सन्मान अथवा त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष यामागे त्याचे एकुणातील व्यक्तिमत्व जबाबदार असते. राष्ट्र आणि राष्ट्रातील राज्यांचेही तसेच आहे. त्यांनाही व्यक्तिमत्व असते. हे व्यक्तिमत्व त्या राज्याचा अथवा राष्ट्राचा इतिहास, ज्ञानात्मक व संस्कृतीविषयक झालेल्या घडामोडीविषयकचे आकलन, एकुणातील विचारसरणी, भाषा  आणि एकंदरीत सामाजिक मानसिकता यांचा समुच्चय म्हणजे राज्याचे व्यक्तिमत्व असे म्हणता येईल. यात अजूनही काही बाबींचा समावेश प्रत्येकजन आपापल्या मगदुराप्रमाणे करू शकतो. पण आपल्या देशातल्या कोणत्याही राज्याचे नाव घेतले तर आपल्या मनात एक प्रतिमा उभी राहते. कोणत्याही राष्ट्राचे नाव आले कि मनात त्यांचेही एक विशिष्ट चित्र उभे राहते. हे चित्र किंवा प्रतिमा म्हणजेच ढोबळमानाने त्या त्या राज्याचे किंवा राष्ट्राचे व्यक्तिमत्व म्हणता येईल.

आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. मराठी माणूस म्हणून आपली ठळक वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये आपण परकीय वा परराज्यातल्या लोकांच्या दृष्टीकोनातून पाहिली तर आपले व्यक्तिमत्व काय आहे याचा अंदाज येऊ शकेल. कारण अनेकदा आपल्यालाच आपले व्यक्तिमत्व उलगडलेले नसते. एकाच ढाच्यातल्या व्यक्तींसोबत राहतांना आपणा सर्वांचे मिळून काय व्यक्तित्व बनले आहे याची सहसा जाणीव होत नाही. पण परराज्यातल्या किंवा विदेशी व्यक्तींना मात्र हे सामुहिक वेगळेपण सहज जाणवू शकते. आपण जेव्हा परराज्यात किंवा विदेशात जातो तेव्हा तेथील सामुहिक व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आपल्या नजरेत लगेच भरते आणि आपण त्यांच्याबद्दल भलेबुरे मत बनवतो. दुस-यांबाबत मत बनवणे सोपे असले तरी स्वत:बाबत ते बनवता येणे अशक्य होत असते. अनेकदा आपण आपल्याबद्दल गैरसमज बाळगत त्या आधारावर एक ढोंगी व्यक्तित्व बनवत जातो आणि या घोर फसवणुकीतून एक भलतेच व्यक्तिमत्व तयार होते. तेव्हा महाराष्ट्राचे एकंदरीत व्यक्तिमत्व काय आहे आणि काय दाखवले जाते याचा निरपेक्ष दृष्टीने सारासार विचार करणेही तेवढ्याच गरजेचे बनून जाते. माणसाचे व्यक्तित्व कालसापेक्ष जसे बदलत जाते तसेच राज्य आणि राष्ट्राचेही कसे बदलते हेही पाहणे रोचक ठरते.

युवान श्वांग हा चीनी प्रवासी सातव्या शतकात महाराष्ट्रात आला होता. त्याने तेलंगनातून महाराष्ट्रात प्रवेश केला होता. या प्रवासाच्या दरम्यान त्याने जे अनुभवले अथवा पाहिले ते त्याने लिहून ठेवले. तो म्हणतो, “येथिल लोक स्वभावाने साधे आणि प्रामाणिक आहे. शरीरयष्टी उंच (चीनी लोकांच्या तुलनेत) असून शिस्तप्रिय आणि अन्यायविरूद्ध चटकन पेटून उठणारे आहेत. चांगल्याशी चांगूलपणाने वागतात, वाईट वागणाऱ्याची खोड जिरवतात. त्यांचा कोणी अपमान केला तर स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता प्रतिशोध घेतात. गरजूने मदत मागितली तर स्वकामे बाजूला सारून मदत करतात. जर काही वाद झाला, तर प्रथम शत्रुला ताकीद देतात, मग दोन्ही जण लढाईस तयार झाले की भाल्याने द्वंद्व करतात. समोरचा पळून जात असेल तर त्याचा पाठलाग करतात, पण शरणागतास अभय असते. योद्धा हरला तर त्याला कठोर दंड न देता, स्त्री-वस्त्रे दिली जातात,तो लज्जेनेच मरतो. येथे शेकडो योद्ध्यांचे शासनाकडून संगोपन केले जाते. कलहापुर्वी हे योद्धे दारू पितात आणि मग दशसहस्त्र योद्ध्यांसमोर भाला घेऊन त्यांना द्वंद्वासाठी आवाहन करतात. या द्वंद्वात कोणी मृत्यु पावल्यास समोरच्याला शासनाकडून कोणतीही शिक्षा होत नाही (तसा कायदा नाही). युद्धापुर्वी ढोलांचा गजर होतो. शेकडो हत्तींस नशा केली जाते, हत्तीस्वार स्वतःही दारू पितात आणि मग हत्तीसमोर येईल त्या शत्रुला तुडवले जाते. त्यामुळे विरोधात उभे राहण्याची शत्रुची बिशादच होत नाही. ह्या सर्व त्यांच्यासवयी पण, येथिल माणसांना अध्ययनाची आवड आहे. ते रूढीनुसार चालत आलेल्या आणि धार्मिक अशा दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास करतात.” आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीबद्दल तो म्हणतो कि “सद्य परिस्थितीत, महाराज शिलादीत्य (हर्षवर्धन) यांनी पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत (पंजाबपासून-बंगालपर्यंत) संपुर्ण प्रदेशावर ताबा मिळवलाय. अगदी दुर्गम भागही सोडले नाहीत. फक्त ह्या महाराष्ट्र देशातील लोकांनीच हर्षवर्धनापुढे शरणागती पत्करलेली नाही. ह्यांचा बिमोड करायला, महाराज हर्षवर्धनांनी पाचही नद्यांच्या प्रदेशांतून सैन्य गोळा केलेय, देशोदेशीच्या उत्तम योद्ध्यांना बोलावणे पाठवलेय. स्वतः सैन्याचे नेतृत्त्व पत्कारलेय. पण ईतके सगळे करूनही, अजून तरी महाराष्ट्राच्या सैन्याने हत्यारे टाकलेली नाहीत.”

परकीय प्रवाशाने केलेले हे सध्या उपलब्ध असलेले सर्वात जुने महाराष्ट्री समाजाचे वर्णन. हे वर्णन परिपूर्ण असेल असे नाही पण महाराष्ट्राचे जे व्यक्तिमत्व त्याच्या डोळ्यात भरले ते त्याने लिहून ठेवले. आठव्या शतकात उद्योतन सुरी या परराज्यातील जैन मुनीनेही महाराष्ट्राचे थोडक्यात वर्णन केले आहे. तो कुवलयमाला या प्राकृत काव्यात म्हणतो,

“दढमह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य I

दिन्नले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे II

म्हणजे “बळकट, ठेंगण्या, धटमुट, काळ्यासावळ्या रंगाच्या दिले, घेतले असे बोलणा-या मऱ्हाट माणसाला त्याने पाहिले.”

दहाव्या शतकात अल मसुदी नामक एक अरबी प्रवासी भारतात आला होता व त्याने चौल, कल्याण या कोकण किनारपट्टीवरील बंदरांना भेट दिली होती. तत्कालीन कोकणातील काही विचित्र चाली-रीतीबद्दलही त्याने लिहिलेले आहे. राजा वा कोणी धनिक मेल्यानंतर त्याचे जवळचे मित्रही स्वत:ला समारंभपूर्वक जाळून घेत असल्याचे त्याने लिहिले आहे. तो झंझ राजाच्या कारकिर्दीत चेउल यथे आला होता. चेउल बंदरावर हजारो बैलांवर माल लादून आणला जात होता व पुढे व्यापारासाठी जहाजे भरून पाठवली जात असल्याचा आणि कोकणातील अनेक विद्वानांना भेटी दिल्याचा उल्लेखही तो करतो.

पंधराव्या शतकात अफानासी निकितीन हा रशियन प्रवासी भारतभेटीच्या दरम्यान चेउल येथे आला होता. तो आपल्या वृत्तांन्तात त्याने तेथील लोकजीवनाचे उत्तम वर्णन त्याने केले आहे. येथील माणसे खूप कमी कपडे घालतात, पुरुष आणि स्त्रियांचा वर्ण काळा आहे, येथील लोकांना गोऱ्या माणसांबद्दल खूप कुतूहल वाटते, येथील श्रीमंत व्यक्ती डोक्याला कापड बांधतात, खांद्यावरून कापड घेतात आणि दुसरे एक कापड कमरेभोवती गुंडाळतात; येथील स्त्रिया फक्त कमरेला कापड गुंडाळतात, असे वर्णन त्याने केलेले दिसून येते. चौलहून आठ दिवसांचा जमिनीवरील प्रवास करून निकितीन पाली येथे पोहोचला. पाली ते जुन्नर या प्रवासाला त्याला सोळा दिवस लागले व चौल ते जुन्नर हे अंतर एकशे तीस मैल असल्याचे त्याने लिहून ठेवले आहे. जुन्नर येथे तेव्हा बहमनी सरदार असदखान होता व तो तेथील हिंदू लोकांबरोबर गेली वीस वर्षे युद्ध करत होता, तसेच त्याच्याजवळ उत्तम प्रतीचे अनेक घोडे आणि हत्ती असून त्याचे सैनिक खुरासन, अरेबिया व तुर्कस्तान येथील आहेत, असे तो म्हणतो.

हे झाली परकी प्रवाशांची निरीक्षणे. युवान श्वांग आणि उद्योतन सुरी ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे त्यांना भासलेले व्यक्तिमत्व ठळकपणे सांगतात तसे इतर प्रवासी करत नसले तरी त्यांच्या लोकजीवनाच्या वर्णनावरून आपण काही अंदाज निश्चित बांधू शकतो. सातव्या शतकात शिक्षण सार्वत्रिक होते हा अंदाज आपण युवान श्वांगच्या म्हणण्यानुसार काढू शकतो. मराठे माणसे भांडखोर आहेत व रोखठोक शब्दात व्यक्त होतात हे निरीक्षण उद्योतन सुरीने नोंदवले आहे तर कोकण किनारपट्टीवर संपूर्ण महाराष्ट्रातून झाजार्पो बैलांवर माल लादून खिंडरस्त्याने बंदरापर्यंत आणला जात होता हे निरीक्षण मसुदी नोंदवतो. मुस्लीम सत्ता प्रस्थापित झालेल्या काळात आलेला रशियन प्रवासी बहामनी सरदार असदखान हा हिंदूंशी वीस वर्ष युद्ध करूनही जुन्नर भागात त्याला शांतता लाभली नाही हेही निरीक्षण महत्वाचे आहे. त्याचे सैनिक खुरासन, अरेबिया व तुर्कस्तान अशा दूरच्या भागातून आणि वेगळ्या संस्कृतीतून आल्यामुळे त्या संस्कृतीचा परिचयही मराठी माणसास झाला असणार असाही अंदाज आपण बांधू शकतो. सातवे शतक ते पंधरावे शतक या काळात येऊन गेलेल्या प्रवाशांच्या वर्णनात भिन्नता वाटली तरी मराठी माणूस संघर्षशील आहे, प्रेमळ आहे, स्वातंत्र्यप्रिय आहे, शत्रुत्व केले तर तो टोकाला जाऊ शकतो, त्याची भाषा राकट आहे, असे व्यक्तिमत्व विशेष आपण सहज नोंदवू शकतो. आणि विचार केला तर कोणाही मराठी माणसाला ते सहज पटेल. पण ही झाली परकीय लोकांची निरीक्षणे. यापार जाऊन आपण आपले आजचे व्यक्तिमत्व शोधले पाहिजे आणि आपले आजचे व्यक्तिमत्व असे कशामुळे बनले आहे याचेही चिंतन करणे भाग आहे.

कोणत्याही प्रदेशाचे भूशास्त्रीय वैशिष्ट्य आगळे वेगळे असते हे तर आपण सारे जाणतो. स्थानिक भूगर्भीय स्वरूपावरून त्या भागात राहणा-या लोकांची एकुणातील मानसिकता बनते आणि हीच मानसिकता भाषा व वर्तनाच्या रूपातून अभिव्यक्त होते. या अभिव्यक्तीलाच आपण संस्कृती म्हणतो. ज्वालामुखीच्या उद्रेकांनी कोट्यावधी वर्षापूर्वी सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि लाव्हा रसापासून बेसाल्ट खडकाचे पठार पसरले ते पार चंद्रपूरपर्यंत विरळ होत जात वेगळ्याच प्रकारच्या खडकांनी बनले व तेलंगणा, छत्तीसगाढ राज्यात प्रबळ होत गेले. राकट देशाकणखर देशा, दगडांच्या देशा। ही ओळख महाराष्ट्राला मिळाली ती अशी. या भौगोलिक स्थितीमुळे महाराष्ट्राचे स्वाभाविकपणे पाच भाग पडले. कोकण, घाट, खानदेश, मराठवाडा व विदर्भ असे हे ढोबळमानाने पाच भाग आहेत. महाराष्ट्र तसा कोकण आणि विदर्भ वगळता निमपावसाळी प्रदेश आहे. अर्थात नेहमीच ही स्थिती नव्हती. महाराष्ट्राचे पुरापर्यावरण पाहिले तर याच भुमीवर एके काळी महाराष्ट्रात पाणथळ जमीनी मोठ्या प्रमाणावर होत्या व पाणघोड्यासारख्या पाण्यातच हुंदडणा-या अनेक प्रजाती येथे निवास करत होत्या हे कोणाला सांगुनही खरे वाटणार नाही. प्राचीन हिमयुगात येथे हिमनद्याही होत्या याचे पुरावे मिळालेले आहेत. सर्व्हे ऑफ इंडियाच्या फ्रांसिस फेडन यांना चंद्रपूरजवळील इरई नदीच्या काठी फारसबंदी दगडांवर हिमनदीच्या  घर्षणाच्या खुणा आढळलेल्या आहेत. त्यावरून महाराष्ट्रातही एके काळे हिमनद्या होत्या या अंदाजाला पुष्टी मिळालेली आहे. पुढे ही स्थिती बदलली. इसपू १८०० च्या दरम्यान कोरडे सत्र सुरु झाले आणि महाराष्ट्र दुष्काळी परिसरात मोडू लागला. तुरळक मानवी वस्ती नद्यांच्या खो-यात विस्थापित झाली. जगण्याचे मार्ग बदलले. जंगले जाऊन माळराने मोठ्या प्रमाणावर तयार झाली. लोक मेंढपाळी ते गोपालन, पक्षीपालन याकडे वळाले. महाराष्ट्राचे दुसरे व्यक्तिमत्व या काळात तयार होऊ लागले. पशुपालक भटके असल्याने त्यांची मनोवृत्तीही संघर्षशील आणि खुल्या आभाळाखाली रहावे लागल्याने व्यापक बनली. पुढे याच पशुपालकांनी स्थानिक सत्ताही निर्माण केल्या. आपापल्या दैवतश्रद्धा आणि धर्मश्रद्धा जतन केल्या. खंडोबा, विठोबा, बिरोबा, जोतीबा, बिरोबा, मायाक्का, मरीआइ, जोखाई, अंबाबाई यासारख्या लोकदेवता या महाराष्ट्राची खरी ओळख. यांची उत्पत्तीच मुळात मराठी श्रद्धायुक्त  मानसिकतेचे प्रतिक म्हणून झाली. त्यात पूर्वजपूजेचाही भाग होताच. महाराष्ट्राच्या सीमा आजच्यासारख्या तेव्हा नसल्या तरी मराठी भाषा ही खास या भूमीचीच उपज असल्याने मराठी भाषा बोलली जाते तो भाग महाराष्ट्राचाच असे समजून चालायला हरकत नाही. अन्य प्रान्तांशी भाषिक-सांस्कृतिक आदानप्रदान झाले असले तरी घेतलेल्या सांस्कृतिक व भाषिक बाबी महाराष्ट्राने आपल्या साच्यात बसवून स्वीकारल्या.

सातवाहनांपूर्वीचा राजकीय इतिहास आपल्याला आज माहित नसला तरी या पाचही भागांवर कोणत्या ना कोणत्या स्था=निक सत्ता होत्या. सम्राट चंद्रगुप्त किंवा अशोकाने या भागाला कागदोपत्री पान्दालिक बनवले असले तरी शासक मात्र स्थानिकच असले पाहिजेत हे अनुमान आपण काढू शकतो कारण भारतीय सम्राटांची ही पूर्वापार रीत आहे. उत्तरेतील साम्राज्ये नष्ट झाल्यानंतर मात्र महाराष्ट्रात सातवाहनांचा उदय झाला. माहाराष्ट्री प्राकृताला राजभाषेचे स्थान मिळाले. महाराष्ट्रात बौद्ध आणि जैन धर्मांचेही प्राबल्य वाढू लागले. पहिल्या शतकाच्या आसपास वैदिक धर्माचाही महाराष्ट्रात प्रवेश झाला. परंपरागत हिंदू धर्माने या धर्मांपासून अनेक गोष्टी घेतल्या तसेच दिल्याही. महाराष्ट्रात बेसाल्ट खडकामुळे महाराष्ट्राचे ओळख बनलेली लेणी खोदायला सातवाहन काळातच सुरुवात झाली. डोंगरी किल्ले बांधायची सुरुवातही याच काळातील. सातवाहनांनी व्यापाराला महत्व दिल्याने नगरांची संख्या जशी वाढली तसेच चेउल. कल्याणसारखी बंदरेही तयार करण्यात आली. पेरीक्लीज ऑफ अरीथ्रीयन सी या एका ग्रीक लॉगबुकमध्ये हे बंदरे भरभराटीला आल्याची वर्णने जशी मिळतात तशीच पैठण, जुन्नर, कल्याणसारख्या व्यापार व निर्मिती केंद्रांचीही माहिती मिळते. हाल सातवाहनाने गाथा सप्तशतीमध्ये दरबारी व ग्रामीण कवी-कवयीयित्रीच्या काव्यरचना गोळा करून सातशे गाथांचा संग्रह सिद्ध केला जो जागतिक वाड्मयात स्थान प्राप्त करून बसला आहे. आजचा महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या एकत्र केला तो सातवाहनांनी. महाराष्ट्र शकांच्या तावडीत सापडला तेव्हा गौतमीपुत्र सातवाहनाने  नाशिकजवळ शक क्षत्रप नहपानाचा पराजय करून त्याची हत्या केली आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा स्वातंत्र्यदिन आपण आजही गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते तेवढ्या भागातच हा दिवस नववर्षाचा दिवस म्हणून साजरा होतो, अन्यत्र नाही. हा सन ही सातवाहनांची देणगी आहे व ती अस्सल मराठी आहे. सातवाहनांनी गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र व कर्नाटकपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला. या काळात महाराष्ट्र वैभवाच्या शिखरावर पोहोचला. केवळ सातवाहनांमुळे कुशाण आक्रमक विन्ध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत घुसू शकले नाही. संपूर्ण दक्षिण भारत त्यांच्यामुळे सुरक्षित राहिला. एवढेच नव्हे तर मराठी भाषा व संस्कृती वाढवण्याचे, घडवण्याचे मोलाचे कार्य सातवाहन करू शकले याचे कारण इसपू २२० ते इस २३० अशी साडेचारशे वर्ष टिकलेली त्यांची सत्ता. महाराष्ट्राला एक राष्ट्रीय महत्व मिळाले ते या काळात. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख निर्माण झाली तीही या काळात. माहाराष्ट्री प्राकृत ही देशातील श्रेष्ठ प्राकृत मानली जाऊ लागली व अन्य प्राकृत भाषिकही मराठीलाच प्राधान्य देऊ लागले तेही याच काळात. पहिल्या शतकात, म्हणजे सातवाहनकाळात रामाच्या जीवनावरील आद्य महाकाव्य लिहिले ते विमल सुरी या जैन मुनींनी तेही माहाराष्ट्री प्राकृतात. वाल्मीकीचे रामायण तिस-या ते पाचव्या शतकात लिहिले गेले. मराठी माणसाला या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे. थोडक्यात या काळात महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रखर बुद्धिवैभव, वीरवैभव आणि ऐहिक सौख्यात प्रबळ बनलेले होते आणि तोच मराठी व्यक्तित्वाचा एक भाग बनून राहिला.

महाराष्ट्राची धार्मिक परंपरा स्वतंत्र असून दैवतश्रद्धाही स्वतंत्र आहेत. त्यावर उत्तर अथवा दक्षिणेचा विशेष प्रभाव किमान दहाव्या शतकापर्यंत नव्हता. वी. का. राजवाडे वगैरे विद्वान लिहितात तसे आर्यांचे येथे कधीही आगमन होऊन येथील समाजसंस्कृतीवर लक्षणीय फरक पडलेला नाही हे समाज-ऐतिहासिक वास्तव आहे. कारण येथील राजकीय सत्ता नेहमीच महाराष्ट्री लोकांच्या हातात होती. अगदी राष्ट्रकुट, होयसळ सारख्या दक्षिणेतील राजवटीनी महाराष्ट्रावर सत्ता स्थापित केली असली तरी ती सत्ता राबवली गेली ती येथील मांडलिक सत्तांच्या मार्फत. यादव घरानेही आधी राष्ट्रकुटांचे मांडलीकच होते. त्यामुळे यादवांचे सुरुवातीचे शिलालेखही दक्षिणी भाषेतील आहेत. त्यामुळे यादव घराणे दक्षिणेतील असावे असे समज निर्माण झाले होते. पण ते मुळचे सिन्नर येथीलच हे आता ऐतिहासिक दृष्ट्या सिद्ध झालेले आहे. पाचव्या भिल्लम यादवाने कलचुरीचा पराभव करून सार्वभौमत्व घोषित करून राज्याभिषेक करून घेतला. कोकणात शिलाहार वंशाची सत्ता होती. हे सारे महाराष्ट्रीय उत्पत्तीचे राजे होते. कोणते राजघराणे मुळचे कोठले याची चर्चा अनेक इतिहासकार करतात व ही राजघराणी उत्तरेतून अथवा दक्षिणेतून आली असे दाखवायचा प्रयत्न करत असतात. पण असे करणे निष्फळ आहे. या संदर्भात पु.ग. सहस्त्रबुद्धे म्हणतात, “त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाचा निश्चय करताना हे राजवंश मुळात कोठून आले, त्यांचे अगदी प्राचीन पूर्वज कोणत्या वर्णाचे होते ही चिकित्सा पंडित करतात. ऐतिहासिक जिज्ञासेच्या दृष्टीने व इतिहासलेखनाच्या परिपूर्तीसाठी हा शोध करणे अवश्य आहे. पण एकतर ही चिकित्सा बव्हंशी निष्फळ होते. कोणत्याही घराण्याच्या मूलस्थाना- विषयी निश्चित असा पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही आणि येथून पुढे होण्याची फारशी आशा नाही. शिवाय ऐश्वर्यप्राप्ती झाल्यानंतर आपल्या घराण्याचा संबंध चंद्र, सूर्य या प्राचीन वंशांशी जोडून देण्याची प्रत्येक राजघराण्याची प्रवृत्ती असल्यामुळे शिलालेख किंवा ताम्रपट यांचा पुरावाही या दृष्टीने विश्वसनीय मानता येत नाही. चालुक्य आपल्याला कधी चंद्रवंशीय तर कधी सूर्यवंशीयही म्हणवितात. राष्ट्रकूट यदुवंशी म्हणवून कधी श्रीकृष्ण तर कधी सात्यकी हा आपला मूळपुरुष असे सांगतात. यामुळे अर्थातच मथुरा, अयोध्या ही त्यांची मूळस्थाने ठरतात. या विधानांना इतिहासात स्थान देणे कठीण आहे.” थोडक्यात महाराष्ट्रातील मांडलिक असोत कि सार्वभौम राजघराणी ही महाराष्ट्रीयच होती. इतिहासात एखाद्या प्रदेशाचे राजकीय महत्व कधी वाढते तर कधी कमी होते व त्याचे सांस्कृतिक परिणामही होत असले तरी अस्सलपणाला कोणताही बाध येत नाही हेच काय ते खरे.

दहाव्या शतकानंतर महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक व आर्थिक घडामोडी घडल्या. सन १०२२ पासून प्रलयंकारी दुष्काळांचे सत्र सुरु झाले. सन १०२२, १०३३ व १०५२ असे सलग तीन भिषण राष्ट्रव्यापी दु:ष्काळ भारतात पडल्याची नोंद आहे. महाराष्ट्र मुळात निमापावसाळी भूभाग असल्याने या दुष्काळाचा फटका महाराष्ट्रालाही बसने स्वाभाविक होते. या दु:ष्काळाने अन्न-पाण्याच्या शोधात फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तर झालेच परंतु लक्षावधी माणसे व जनावरे मरण पावली. मुख्य उत्पादन अन्नधान्याचे...तेही पुरते ठप्प झाले. मोठ्या प्रमाणात पशू संहार झाल्याने धनगर-गोपालही अवनतीला पोहोचले. अन्य उत्पादनांची मागणीही अर्थातच पुरती घटली. अन्न विकत घ्यायला पैसा नाही, पैसे असले तरी अन्न उपलब्ध नाही तेथे अन्य उत्पादनांना कोण विचारतो? त्यामुळे उत्पादनकेंद्रेही ओस पडणे स्वाभाविक होते.

 

दुष्काळांचे सत्र येथेच थांबले नाही. बारावे शतक ते १६३० पर्यंत जवळपास २५० पेक्षा अधिक प्रदेशनिहाय दुष्काळ भारतात पडले याची नोंद डच व्यापारी व्हॅन ट्विस्टने करुन ठेवली आहे. मृत प्राणी...कधी मृत माणसेही खावून जगायची वेळ या दुष्काळांनी आणली होती. त्यात १३९६ ते १४०७ या काळात महाराष्ट्रात पडलेल्या दुर्गादेवीच्या भयंकर दुष्काळाची नोंद जागतीक पातळीवर घेतली गेली, एवढा तो प्रलयंकारी होता. समग्र अर्थव्यवस्था भुईसपाट करणा-या या दुष्काळाने निर्माणकर्त्यांना रस्त्यावर आणुन सोडले नसले तरच नवल! या काळात बलुतेदारी पद्धती उदयाला आली. याच काळात व्यवसायाधीश्ठीत सैल जातीव्यवस्था बंदिस्त होत कठोर झाली. उत्पादन केंद्रे बंद पडून सारे कारागीर गावांच्या आश्रयाला आले. बाजारपेठा आकुंचित झाल्या. व्यावासायांच्याच जाती बनू लागल्या. याच काळात वैदिक धर्माने महाराष्ट्रात आपले स्थान भक्कम करत नेले. इह्वादाकडून दैववादाकडे प्रवास सुरु झाला. वर्णव्यवस्थेचे स्तोम वाढले. त्याची लागण व्यवसायाधीश्ठीत जातीन्नाही झाली. कर्मविपाक सिद्धांताने जनसामान्यांची मनोभूमिका व्यापली गेली. राष्ट्रकुट काळात महाराष्ट्रात भरभराटीला आलेला जैन धर्मही या काळात मर्यादित होत गेला. बौद्ध धर्माचे नामोनिशाण उरले नाही. महाराष्ट्रीय दैवतांवर उत्तरेतील दैवतांचे आरोपण करत त्यांना कोठे विष्णूचे वा कृष्णाचे तर कोठे लक्ष्मीचे वा रुक्मिणीचे रूप ठरवण्यात आले. उत्तरेचे सांस्कृतिक आक्रमण व्हायला वैदिक धर्म कारणीभूत ठरला तो असा. त्यातूनच अनेक सामाजिक बंधनांचा उद्रेक झाला. गाथा सप्तशतीतील खुला आणि मनमोकळा समाज संकुचित होत प्रसंगी जातीधीश्ठीत क्रूरही होत गेला. यादवांचा प्रधान हेमाद्री पंडिताने चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहून साडेचार हजार व्रतांची निर्मिती केली. समाज इह्वादापेक्षा व्रतवैकल्याच्या मागे लागत गेला. त्यात चवदाव्या शतकात इस्लामी सत्तेने महाराष्ट्रात पाय रोवायला सुरुवात केली. या सा-या राजकीय, सास्न्कृतीक, आर्थिक आणि प्राकृतिक घडामोडीनी महाराष्ट्राची कंबर तोडली. महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व उत्तरेच्या धार्मिक आणि राजकीय वर्चस्वाने झाकोळले गेले.

 

आजचा महाराष्ट्र संतांनी घडवला असा आपला भावनिक समज असतो. तो खराही आहे. पण संतांनी महाराष्ट्राचे नेमकी कोणत्या प्रकारची मानसिकता घडवण्यात हातभार लावला याची चिकित्सा सहसा केली जात नाही. महाराष्ट्राला दैववादाकडे नेण्यात संतांने मोठी भूमिका बजावली हे कटू असले तरी सत्य आहे. इहवादापेक्षा परलोकवाद महत्वाचा असे लोकांना वाटू लागले असेल तर ते संतांच्या दैववादी भूमिकेमुळे. विठ्ठल, रखुमाई, खंडोबा या अस्सल मराठी दैवतांना उत्तरेतील देवतांशी जोडून घेण्याच्या प्रक्रियेला संतांनी हातभार लावला. तत्वद्न्यानाच्या क्षेत्रातही “ज्ञानेश्वरी”च्या रूपाने हे घडले. संतांच्या भावभक्तीविषयी व मानवतावादी भुमिकेविषयी यत्किंचितही संशय घेता येत नसला तरी मराठी माणसाच्या व्यक्तीमत्वात फार मोठा बदल घडवण्यात संतांनी हातभार लावला. तो इष्ट कि अनिष्ट यावर वेगळी चर्चा व्हायला हवी. शिवाजी महाराज मात्र या भावभक्तीच्या लाटांपासून अलिप्त राहू शकले आणि म्हणूनच संपूर्ण नसल्या तरी महाराष्ट्राच्या मोठ्या भागावर पुन्हा एकदा स्वातंत्र्यसूर्य उगवला असे म्हणता येईल. महाराष्ट्राचे अन्य भाग मात्र या क्रांतीपासून दूरच राहीले किंवा ठेवले गेले असे म्हणावे लागेल.

 

पेशवाईचा उदय ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अपरिहार्य घटना होती. या काळात मराठी सेनांनी उर्त्तर व दक्षिण भारत व्यापला. पण तो लष्करी बळावर खंडण्या वसूल करण्यासाठी, महाराष्ट्री लोकांनी आपली सत्ता मात्र प्रस्थापित करणे टाळले. त्यामुळे इंदोर, उज्जैन, धार इ. मराठी संस्थाने निर्माण झाली असली तरी दिल्लीचे तख्त ताब्यात घेण्याचे धाडस कोणी पेशवा अथवा सरदाराने दाखवले नाही आणि याचे कारण पहिल्या शाहू महाराजांनीच तसे बंधन घातले होते असे एकूण इतिहासावरून दिसते. मोगल पातशहांचे धोरणही याला कारणीभूत ठरले. सनदा द्यायच्या पण ते प्रांत मराठ्यांनी जिंकूनच वसुल्या करायच्या असा एक विचित्र खेळ बनला. राजपूत, जाट, आणि छोटे-मोठे मुस्लीम सरदार या चौथाई प्रकाराने मराठ्यांचे कधीच चांगले मित्र बनू शकले नाहीत. पानिपतप्रकरणी उत्तरेतील एकही सत्ता मराठ्यांच्या सहाय्याला आली नाही हे या स्थितीचेच फलित होते. गुजरात असो कि राजपुताना, अवध असो कि दोआब...बंगाल असो कि कर्नाटक....मराठा सरदारांची ओळख लुटारू अशी बनत गेली. मराठा आक्रमणापासून बचाव करण्यासाठी गावांभोवती कोट उभारण्याची सुरुवात झाली आणि बंगालात खंदक खोदून मराठा सैन्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न सुरु झाला. इंदोर संस्थान वगळता अन्यत्र कोठेही स्थिर शासन देता आले नाही. महाराष्ट्रात उद्योग-व्यवसाय वाढवत बाजारपेठा विस्तारित करण्याचे कसलेही धोरण आखले गेले नाही. मुलुखगिरी आणि शेती हेच मुख्य व्यवसाय राहिले आणि त्या गरजापूर्तीसाठी निर्माणकर्ते अल्प मोबदला अथवा बलुत्यावर राबू लागले. उद्योगाला प्रोत्साहनच संपल्यामुळे त्यात वाढ करावी असे वाटण्याचा कोणाला प्रश्नच नव्हता. दहाव्या शतकानंतर जी मानसिकता “ठेविले अनंते तैसेची रहावे” बनत गेल्याने ते स्वाभाविकच म्हणावे लागेल. एके काळी उद्योग-व्यापारात आघाडी घेणारा महाराष्ट्र मागे पडला. विलायती वस्तूंना टक्कर घेणे तर शक्यच नव्हते कारण औद्योगीकरण म्हणजे काय हे समजण्याची कुवतही उरलेली नव्हती. कोणताही सामाजिक व आर्थिक विचारवंत महाराष्ट्राला जन्माला घालता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्वाच धूसर होत गेले असे म्हणता येईल.  

 

१८१८ नंतर इंग्रज शासन आले. महाराष्ट्र आपले खरे व्यक्तिमत्व तोवर हरवून बसला होता.  मुंबईचे बंदर व्यापारासाठी वापरायला सुरुवात झाली. तशी दुर्लक्षित राहिलेली मुंबई नावारुपाला यायला लागली. पण त्यात मराठी माणसाचा वाटा फारसा नव्हता. आधुनिक जगाशी जोडून घेण्याचे भान नसल्याने इंग्रज देतील आणि पचेल ते शिक्षण घेण्याकडे आणि सरकारी नोक-या मिळवण्याकडे आणि तेही शक्य नसेल तर रेल्वे किंवा अन्य बांधकामांवर किवा मिल्समध्ये कामगार म्हणून काम करून आर्थिक उत्थान करून घेण्याकडे कल राहिला. सामाजिक सुधारणावादी चळवळी या काळात सुरु झाल्या त्या इंग्रजी शिक्षणाने आणि पाश्चात्य जगाशी होत असलेल्या परीचयामुळे.  त्यामुळे एतद्देशीय धर्म आणि समाजव्यवस्थेतील दोष प्रकर्षाने जाणवू लागले. असे असले तरी देशे उद्योगधंदे उभे करण्यासाठे प्रेरणा देणारा भक्कम विचारवंत याही काळात महाराष्ट्रात जन्माला आला नाही. तंत्रशिक्षणाची चळवळ उभी करण्यात अपयश आले. उदा. मुंबई चेंबर ऑफ कॉमर्स सुरु झाली तेंव्हा तिचे चार इंग्रज आणि तीन पारशी एवढेच चेंबरचे सदस्य होते. एकही मराठी माणूस तेथवर जायचा विचारही करू शकला नाही. आजही या अवस्थेत बदल घडू शकलेला नाही. इंग्रजांची शिक्षणपद्धती सुरु झाल्यानंतर दादाभाई नवरोजी, नवरोजी बैयरामजी, जमशेदजी टाटा या तशा मध्यमवर्गीय अवस्थेतुनच येत शिकलेल्या तरुणांनी जागतीक बाजारात/उद्योगात तरुण वयात पाय ठेवला. तसे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या मराठी (व राष्ट्रीय सुद्धा) हिंदू विद्यार्थ्यांबाबत घडलेले दिसत नाही. उलट ते सुरक्षीत नोक-यांतच घुसतांना आणि काही अपवादात्मक तरुण पत्रकारिता/प्रकाशन/समाजकार्य अशा कार्याला लागलेले दिसतात. म. फुले यांनी शेतक-यांचा आसूड व गुलामगिरी हे ग्रंथ लिहून अर्थविचारांचा पाया घातला पण ते कार्य पुढे न्यायला अन्य कोणी समोर आले नाही.

 

ख-या अर्थाने महाराष्ट्रात प्रबोधनाचे पर्व आलेच नाही. इंग्रजांशी स्वातंत्र्याचा लढा देण्यासाठी महाराष्ट्राने जीवाचे रान केले. लाल-बाल-पाल अशी एक घोषणा लो. टिळकांमुळे बनली. ते राष्ट्राय कॉंग्रेसचे प्रभावशाली अध्यक्षही होते. महाराष्ट्राचा प्रभाव राष्ट्रीय राजकारणावर पडायला सुरुवात झाली. शिवाजी महाराज स्वातंत्र्य लढ्याचे एक आयडॉल बनले. इतके कि रवीन्द्रनाथ टागोरांनी त्यांच्यावर प्रदीर्घ कविताही लिहिली. पण गांधीजींचा राष्ट्रीय पटलावर उदय झाला आणि महाराष्ट्र अनुयायांच्या भूमिकेत गेला. महाराष्ट्राने राष्ट्रीय प्रसिद्धी मिळवली ती नथुराम गोडसे या कुकर्मी मराठी माणसाने गांधीजींची हत्या केल्यामुळे. सावरकर क्रांतीकारकांचे मुकुटमणी म्हणून प्रसिद्धीस आले असले तरी महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आवश्यक असे सर्जक कार्य किंवा सामाजिक उत्थानासाठी प्रेरक तत्वज्ञान लिहिण्याचे कार्य त्यांच्याकडून होऊ शकले नाही. ते तशा निरुपयोगी हिंदुत्ववादासारख्या संकल्पनेशीच अखेरपर्यंत नुसते चिकटून राहिले नाही तर त्यासाठे प्रसंगी राष्ट्राचे विखंदन होईल अशा राजकीय भूमिका घेतल्या. त्यामुळे सावरकर हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तिमत्व राहिले. महाराष्ट्रीय प्रजेला ऐहिक उत्थानासाठी त्यांचाही उपयोग होऊ शकला नाही.

 

रा.स्व. संघाचे स्थापना मराठी माणसाने महाराष्ट्रात केली आणि ही संस्था मात्र अनेक अडथळे सहन करत जोमाने राष्ट्रीय पातळीवर वाढली. भाजप हे तसे संघाचे अपत्य. देशावर आज सत्ता भाजपची असली तरी ती मराठी माणसांची अल्पांशानेच राहिलेली आहे. आजवर मराठी माणसांना पंतप्रधानाच्या शर्यतीत राहूनही त्या पदाने हुलकावणी दिलेले आहे. राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकू शकतील असे नेते महाराष्ट्राने किती दिले हा प्रश्न विचारला तर उत्तर नकारार्थी येते. मराठी भाषेला साधा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करवून घेता आला नाही यावरून महाराष्ट्राची दिल्लीत किती पत आहे हे लक्षात येईल. महाराष्ट्र हा सर्वाधिक कर भरणारे राज्य आहे. राज्यात असंख्य उद्योग जोमाने वाढत आहेत. अनेक उद्योग पळवलेही जात आहेत, पण मराठी माणसाचे त्यात उद्योग किती या प्रश्नाचे उत्तर दोन-पाच टक्के एवढेच येईल. मराठी माणूस नोक-या माह्गान्यात आघाडीवर आहे. आरक्षणासाठी काळाचे सरंजामदारही उग्र आंदोलने करत शासनाला वेठेस धरत आहेत. नोकरी प्राप्त करणे हेच मराठी तरुणांचे स्वप्न बनून गेलेले आहे. कॉर्पोरेट संस्कृती तर मराठीच काय भारतीय माणसालाही अजून नीट अंगीकारता आलेली नाही. सारी उद्योग संस्थाने ही एखादा अपवाद वगळता कौटुंबिक मालमत्ता आहे. मराठी माणसाला तर तेही अद्याप जमलेले नाही. शेतीचे बदहाली आणि शेतक-यांच्या आत्महत्या याचा मात्र सुकाळ आहे. महाराष्ट्रीय मानसिकता ही गतानुगतिक झाली आहे. याला कारण मराठी राजकारणी जेवढे जबाबदार आहेत त्यापेक्षा जास्त सामाजिक विचारवंत आणि सहित्यिक जबाबदार आहेत कारण मराठी माणसाला त्याच्या ख-या व्यक्तीमत्वाची जाणीव करून देत त्याला इहवादी बनवण्यासाठी जे प्रेरक विचार आणि साहित्य देण्यात त्यांना अपयश आले आहे. तत्वाद्न्य तर महाराष्ट्राने गेल्या एक हजार वर्षात एकही पैदा केलेला नाही.

 

महाराष्ट्राचे राष्ट्रीय राजकारणात विशेष स्थान नाही याचे कारण सतराव्या शतकापासून मराठी माणसांनी जी उत्तर व दक्षिणेत आपली प्रतिमा बनवून ठेवली आहे त्यात आहे. ही प्रय्तीमा बदलण्यासाठी सक्षम नेतृत्व सामोरे यायला हवे होते व मराठी माणसाबद्दल आस्था आणि विश्वास वाटेल असे वातावरण निर्माण करण्यासाठे कसोशीने प्रयत्न करायला हवे होते पण तसे दुर्दैवाने झालेले नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला घ्यायचे एखादे संजय नहार ठरवतात तर अखिल भारतीय म्हणवणा-यांचे पाय लटपटतात अशी मराठी प्रवृत्ती बनली आहे. एके काळी मुलुखगिरीसाठी का होईना सारा भारत पायतळी तुडवणारे मराठी लोक महाराष्ट्र-कोंबडे झाले आहेत. आणि पराराज्यातले लोक येथे येऊन मराठी माणसे जे काम करतच नाहेत ते काम करू लागले कि त्यांना हाकलायचे राजकारण खेळणारे कूपमंडूक नेते मात्र महाराष्ट्राने पैदा केले आणि लोकांच्या गळ्यातले ताईत ते हृदयसम्राट वगैरे बनले. मग महाराष्ट्राची राष्ट्रीय प्रतिमा काय असणार? कोणते व्यक्तिमत्व देश आणि जगासमोर उभे राहणार?

आज महाराष्ट्र उध्वस्त व्यक्तिमत्वाचे राज्य बनलेला आहे. महाराष्ट्राचे गरजणे हे आपल्या गल्लीपुरतेच सीमित राहिलेले आहे. दिल्ली खरेच दूर राहिलेली आहे. इतकी दूर कि महाराष्ट्राची दखलपात्र राज्य ही अवस्था बनलेली असेल तर ती केवळ येथल्या ४८ जागांमुळे. त्यातला किती वाटा मिळवायचा यावर राष्ट्रीय व स्थानिक पक्ष झगडतात, पण महाराष्ट्राच्या पदरी हे निवडून आणलेले ४८ लोक काय आणतात? हे लोक राष्ट्रीय स्तरावर आपली व राज्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी काय करतात? हे सारे प्रश्नच आहेत. या प्रश्नांना भिडणा-या मराठी नेत्यांची आज जास्त गरज भासते आहे. आणि मराठी जनतेने स्वाभिमानाने उठून नोक-यांत भविष्य शोधण्यापेक्षा नोक-या निर्माण करण्यासाठी झटू लागणे हे काळाची गरज आहे. ज्ञानसत्ता संपादन करून अर्थसत्ता प्राप्त करण्याची गरज आहे. तरच “गर्जा महाराष्ट्र माझा...” म्हणण्यात काही अर्थ राहील, नाहीतर आहेच आपले...”बिकट वाट वहिवाट यशाची, धोपट मार्गा सोडू नको....”

 

-संजय सोनवणी

 *साहित्य चपराक, एप्रिल २०२४ अंकात प्रसिद्ध.)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...