ग्रीक इतिहाकारांनी करून ठेवलेल्या वर्णनांमुळे चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या अलेक्झांडरच्या विरुद्ध केलेल्या उठावाची दाहकता लक्षात येते. भारतीय पुराणसाहित्याने मुळात अलेक्झांडरच्या आक्रमणाबाबत कसलाही उल्लेखच केलेला नसल्याने चंद्रगुप्ताच्या अगदी तरुण वयातील या महापराक्रमाचाही उल्लेख न केला जाणे आपण स्वाभाविक मानले पाहिजे.
अलेक्झांडरने पोरसवर विजय मिळवल्यावर शाकलवर (आताची सियालकोट) स्वारी केली. येथील कठ व आसपासच्या राज्यांतील सैनिकांनी त्याचा प्राणपणाने प्रतिकार केला पण ऐन वेळेस पोरस आपले हत्ती व पाच हजार संख्या असलेले सैन्य घेऊन मदतीस आला त्यामुळे त्यांची हार झाली. या युद्धात अलेक्झांडरच्या सैन्याचीही मोठी हानी झाली. त्यामुळे चिडलेल्या अलेक्झांडरने सारे शहर उध्वस्त करून टाकले. सिंध-पंजाब भागातील राज्यांना व शाकल प्रांताला लढ्याची प्रेरणा देणारा होता चंद्रगुप्त मौर्य. त्याच वेळेस आपण जिंकलेल्या भारतीय प्रांतातही उठाव होत आहेत हे लक्षात येताच अलेक्झांडरने अजून पुढे जाण्याचा आपला बेत बदलला व तो मागे फिरला. पण मागे फिरतांना त्याने आपण आलेला मार्ग न वापरता वेगळ्याच मार्गाने मायदेशी परत जायचे ठरवले. या परतीच्या प्रवासात चंद्रगुप्ताने उठावाची प्रेरणा दिल्याने अलेक्झांडरची काय दुर्दशा झाली याची माहिती घेण्याआधी आपण हा चंद्रगुप्त मौर्य कोण होता आणि त्याने हा लढा कसा सुरु केला याची थोडक्यात माहिती घेऊयात.
चंद्रगुप्त मौर्य हा भारतीय इतिहासातील आद्य सम्राट मानला जातो. त्याने नंद साम्राज्याचा अस्त घडवून साम्राज्य स्थापन केले असाही इतिहास आपल्याला माहित असतो. चाणक्य नावाच्या एका काल्पनिक पात्राने त्याला प्रशिक्षण देऊन सम्राटपदावर आरूढ केले ही कथा तर फारच लोकप्रिय आहे. प्रत्यक्षात चाणक्य नामक व्यक्ती अस्तित्वात असल्याचा व त्याचा चंद्रगुप्ताशी काही संबंध असल्याचा साधा उल्लेखही ना ग्रीक इतिहासकार करत ना भारतीय पुराणसाहित्य करत. चंद्रगुप्त मौर्य हा शुद्र (म्हणजे वैदिकेतर) समाजातील होता याबाबत मात्र एकमत आहे. नंदांनी क्षत्रीय कुलाचा नाश केल्याने भविष्यात सारेच राजे शुद्र (वैदिकेतर हिंदू, जैन अथवा बौद्ध) असतील अशे भविष्यवाणी साक्षात पुराणांनीच करून ठेवलेली आहे. ही भविष्यवाणी करण्याचे कारण म्हणजे वैदिकेतर हिंदू असलेल्या नंदांनी वैदिक धर्मियांचे वसतीस्थान असलेले आर्यावर्त (म्हणजे कुरु, पांचाल, मत्स्य आणि शूरसेन) जिंकून तेथील वैदिक आर्यांना पलायन करायला भाग पाडले होते. चंद्रगुप्त हा मोरिय गणात जन्माला आलेला तरुण. ग्रीक इतिहासकारही या मताला पुष्टी देतात. मोर हे ज्यांचे गणचिन्ह (देवक) ते मौर्य. याचे पुरावे खुद्द सम्राट अशोकाने आपल्या काही शिलालेखांवर व सांची येथील स्तुपावर मयुरचिन्हे कोरून आपल्यासाठी सोडले आहेत. नंदनगढच्या अशोकस्तंभाच्या पायथ्याशी मयुरप्रतिमा दिमाखात चित्रीत केलेली आहे. हे पुरावे पाहुन पुरातत्वविद सर जॉन मार्शल यांनीही मान्य केले कि मोर हे चंद्रगुप्ताच्या घराण्याचे प्रतीकचिन्ह आहे हे वास्तव या प्रतिमा घडवणा-यांनी जीवंत ठेवले आहे. मेंढपाळी व मयूरपालन हा यांचा मुख्य व्यवसाय. तत्कालीन गण जैन अथवा बौद्ध धर्माचे अनुयायी असायचे. मोरिय गण हा जैन धर्माचा पाठीराखा. चंद्रगुप्त मौर्यही जैन असल्याने त्यालाही वैदिकांनी शुद्र ही उपाधी दिली असल्यास आश्चर्य नाही.
शत्रूच्या आक्रमणामुळे मोरिय गणाला पुरुषपूर (पुष्पपूर असे दंतकथात उल्लेखलेले आहे) स्थलांतर करावे लागले. येथेच तो लहानचा मोठा झाला. तो तक्षशिला विद्यापीठात शिकला असावा असे काही दंतकथा सुचवतात. अलेक्झांडरचे आक्रमण प्रथम झाले ते तक्षशिलेवर. तेव्हा तेथे अंभी राजा राज्य करत होता. त्याने लढण्याऐवजी सरळ शरणागती पत्करल्यामुळे तरुण चंद्रगुप्ताला संताप येणे स्वाभाविक होते. छोटी राज्ये अलेक्झांडरच्या आक्रमणापुढे शरणागती पत्करू लागल्याने त्याने याच पराजित राज्यांत प्रेरणा निर्माण करून उठाव करण्याचे ठरवले. शाकलने शेजारील राज्यांच्या मदतीने केलेला तिखट प्रतिकार हे त्याचे पहिले यश होते.
महावंस सांगते पंजाबमधील स्वातंत्र्यप्रिय गणंना एकत्र करत हे सैन्य उभारले गेले. योधेय गणही यात सामील होता. ग्रीक इतिहासकार जस्टिन म्हणतो , चंद्रगुप्ताने "दरोडॆखोरांचे" सैन्य उभारले. इतिहासकार मॅकडोनेल म्हणतो कि हे दरोडेखोर म्हणजे गणराज्यांचे नागरिक होते. या सैन्यात मूषिक, किरात, बाहीक, शिबी, उदुंबर, शुद्रक, मल्ली वगैरे गणराज्यांतील नागरिकांचा समावेश होता. एरियन हा ग्रीक इतिहासकार म्हणतो कि त्या काळी पंजाब व सिंधची भुमी स्वतंत्रताप्रिय गणराज्यांच्या टोळ्यांनी भरली होती. या पराक्रमी विजिगिषू लोकांना चंद्रगुप्ताचे प्रभावी नेतृत्व लाभले व पहिला स्वातंत्र्य संग्राम सुरु झाला. स्त्रीयांनीही या युद्धात भाग घेतला.
ग्रीकंचा इतिहासकार जस्टिन म्हणतो,"या स्वातंत्र्यलढ्याचा नायक "सेंड्रोकोटस"(चंद्रगुप्त) होता. एका सामान्य कुळातला माणूस सम्राट होण्याच्या खरोखर योग्यतेचा होता. हा एक अलौकिक शक्तींनी भरलेला तरुण. याने अलेक्झांडरचाही प्रत्यक्ष भेटीत अपमान केला. त्याला मारायची आज्ञा दिली तर हा हरणाच्या पावलांच्या चपळाईने निसटला.....याने दरोडॆखोरांची फौज प्रेरित करुन जमवली अणि ग्रीकांची सत्ता उलथुन टाकले."
जस्टिन हे नि:संदिग्धपणे सांगतो कि ग्रीकांविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धाचा नायक चंद्रगुप्त होता. जस्टिन हा इसवी सनाच्या दुस-या शतकात झालेला रोमन इतिहासकार. आपला पुराणकार नव्हे. ग्रीक साधनांतुन अभ्यास करुन त्याने हा निष्कर्ष काढला आहे. राधाकुमुद बानर्जी म्हणतात, चंद्रगुप्ताने दिलेला लढा हा अलेक्झांडरच्या विजयांपेक्षाही नेत्रदिपक आहे. या लढ्यात सुरुवातीला विजय मिळाले नाही. हजारोचे सैन्य मारले गेले वा बंदी झाले. याचे कारण म्हणजे सारेच सैन्य हे प्रशिक्षित,अनुभवी नव्हते. पण चंद्रगुप्ताने हळू हळू या विखुरलेपणाला शिस्त आणली. गनीमी काव्याचा अवलंब सुरु केला.
मल्ली हे मुलतानमधील राज्य. येथे मल्ली लोकांनी तर एवढा पराक्रम गाजवला कि या युद्धात अलेक्झांडर प्राणांतिक जखमी झाला, एवहा कि तो मेला आहे असे ग्रीक सैन्याला वाटले. बरेच दिवस तो आपल्या तंबूत आणि नंतर सिंधू नदीवरील नौकेत उपचार घेत राहिला. दरम्यान चंद्रगुप्ताने आपल्या हस्तकांकरवी ग्रीक छत्रप निकानोर व फिलिप यांची हत्याही घडवून आणली.
शाकल येथून परत फिरताना अलेक्झांडरला त्याच्या तंबूत घुसून भेटायचे धाडस चंद्रगुप्ताने केले हा ग्रीकांनी लिहिलेला इतिहास तर रोचक आहे. याबाबत जस्टीन म्हणतो की ,"या स्वातंत्र्यलढ्याचा नायक "सेंड्रोकोटस"(चंद्रगुप्त) होता....हा एक अलौकिक शक्तींनी भरलेला तरुण. याने अलेक्झांडरचाही प्रत्यक्ष भेटीत अपमान केला. त्याला मारायची आज्ञा दिली तर हा हरणाच्या पावलांच्या चपळाईने निसटला..." या उठावाचा एकत्रित परिणाम म्हणजे अलेक्झांडरला आपला गाशा गुंडाळणे भाग पडले. त्याचे परत जाणेही सोपे नव्हते. त्याची व त्याच्या सैन्याची अनन्वित दुर्दशा झाली. त्याबद्दल पुढे.
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment