मी लिहिलेली कल्की ही कादंबरी मराठीत प्रकाशित
होऊन अनेक दशके झालीत. नंतरही खूप आवृत्त्या झाल्यात. मध्यप्रदेशात स्थायिक
प्रसिद्ध लेखक व कवी विश्वनाथ शिरढोणकर यांनी या कादंबरीचा हिंदीत अनुवाद केला आणि
तो २०२१ साली रवीना प्रकाशनाने प्रसिद्धही केला. मी या अनुवादाबद्दल कधी लिहिले
नाही,
कल्की कादंबरीचा इतिहासच तसा आहे.
ही कादंबरी मराठीत जेंव्हा प्रकाशित झाली
त्यावेळेस सामना वृत्तपत्राने व सकाळने सिंगल कॉलम समिक्षणात त्यावर टीकेची झोड
उठवली होती.
२००४ किंवा २००५ साली सुनील मोझर यांनी या
कादंबरीचे नाट्य रुपांतर करून हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर केले. कृपाल
देशपांडे आणि अन्य कलाकारांनी हा प्रयोग स्पर्धेत सादर केला. भरत नाट्य मंदिर, पुणे
येथे. कृपालसहित सर्व कलाकारांनी प्रयोगात जीव ओतला. मी हा प्रयोग पाहिला. आपल्या
कादंबरीचे असे अफलातून नाट्यरुपांतर होऊ शकते यावर माझाच विश्वास बसला नव्हता.
कृपालने तर अभिनयात कमाल केली होती.
प्रयोग झाल्यानंतर सामना पेपरमध्ये या नाटकाचे
अर्धे पान परीक्षण आले. ते लिहिले होते मंगेश तेंडुलकर यांनी.
परिक्षण विरोधात होते हे ठीक आहे, पण
गम्मत म्हणजे अवघ्या परीक्षणात तेंडुलकरानी त्या दोन हजार शब्दांच्या परीक्षणात ना
लेखकाचे नाव लिहिले ना कलाकार-दिग्दर्शकाचे नाव लिहिले. असे कोणतेही परीक्षण
आजतागायत माझ्या वाचनात आलेले नाही.
या नाटकाला कोंकणातील एका स्पर्धेत मात्र
पारितोषिक मिळाले. तेवढेच दिग्दर्शक-कलावंतांना समाधान.
कल्की ही कादंबरी तथाकथित हिंदूच नव्हे तर सर्व
धर्मियांना समूळ हादरवून टाकणारी होती. विश्वनाथ शिरढोणकरांना तिचा अनुवाद का
करावा वाटला हे मी समजू शकतो. भविष्यात हिचे असंख्य भाषांत अनुवाद होतील ही
अपेक्षा जरी असली तरी माझ्या मायभाषेत तिची अवहेलना केली गेली याचे शल्य कायम
राहील. म्हणून मी या अनुवादाबद्दलही, तो
उत्कृष्ठ आणि मुळाशी प्रामाणिक असूनही आजवर लिहिले नाही. आज
वाटले म्हणून लिहिले एवढेच!
-संजय
सोनवणी
No comments:
Post a Comment