Thursday, June 20, 2024

जगज्जेता म्हणवणा-या अलेक्झांडरचा करूण अंत!


 


मल्ल जमातीच्या लोकांनी अलेक्झांडरचा चिवट प्रतिकार करून त्यालाच प्राणांतिक जखमी केल्यामुळे मल्ली व अन्य जमातींचे मानसिक धैर्य वाढणे स्वाभाविक होते. त्याच्यासोबत आलेले ग्रीक सैन्यही आता बंड करण्याच्या मन:स्थितीत आलेले होते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे धैर्य गळू लागले होते. नंद साम्राज्याच्या बलाढ्य सेनेची कीर्ती ऐकल्यामुळे ग्रीक सैन्याने पुढे जायचे नाकारले ही ग्रीक इतिहासकारांनी केलेली सारवासारव आहे, कारण नंद साम्राज्यापेक्षा विस्तीर्ण आणि शक्तीशाली अकेमेनिड साम्राज्याचा ग्रीक सैन्याने पराजय केलेला होता आणि आता तर अंभी आणि पोरससारखे भारतीय युद्धपद्धतीशी परिचित राजेही ग्रीकांसोबत होते. त्यामुळे नंद सैन्यशक्तीला घाबरून ते मागे फिरले या मतात तथ्य दिसून येत नाही. खरे कारण होते चंद्रगुप्त मौर्याच्या प्रेरणेने आणि नेतृत्वाखाली जे उठाव होत होते त्यांनीच ग्रीक सैन्य हादरून गेलेले होते. इतके कि आल्या मार्गाने परत जाणेही आता शक्य होणार नाही याची अलेक्झांडरला जाणीव झाली, कारण चंद्रगुप्ताने त्या भागातील जमातींना एकत्र करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे त्याने सिंधू नदीतुन अरबी समुद्रात प्रवेश करून मायदेशापर्यंत प्रवास करण्याचे आधी ठरवले खरे पण सिंधू काठच्या लोकांनाही सहज जिंकणे त्याला शक्य होईनासे झाले. त्यात सिंधू नदीच्या त्रिभुज प्रदेशातून समुद्रात प्रवेश केला तरी पर्शियन आखातातून ब्यबीलॉन पर्यंत कसा प्रवास करता येईल हेही त्याला माहित नसल्याने त्याने समुद्रमार्गे प्रवास रद्द केला. त्याने आपले सैन्य दोन भागात विभागले. निआर्कुस या दर्यावर्द्याच्या नेतृत्वाखाली त्याने अर्धी सेना सूसा या बंदराच्या दिशेने पाठवली. या निमित्ताने पर्शियन खाडी मार्गाचेही अन्वेषण होईल अशी त्याची कल्पना होती.

 

निआर्कुसने पट्टाला (आजचे ब्राह्मणाबाद) येथून झेलम नदीकाठीच तयार केलेल्या जहाजांतून अर्धे ऐन्य सोबत घेऊन जलप्रवास सुरु केला. पण प्रतिकूल हवामानामुळे त्याला त्रिभुज प्रदेशातील एका नदीप्रवाहावर अडकून पडावे लागले. पण त्याचे दुर्दैव असे कि तेथील मच्छिमार जमातींनी अजिंक्य ग्रीक सैन्याला भयंकर त्रस्त केले. शेवटी निआर्कुसला आपल्यासोबत आलेल्या सैन्याचा बचाव करण्यासाठी तटबंद्या बांधून जीव वाचवावे लागले. तेथे महिनाभर घालवल्यानंतर निआर्कुस कसाबसा आजच्या कराची बंदरापर्यंत पोहोचला. पण सैन्याला आता अन्नाची ददात पडू लागली होती. शेवटी त्याच्या एका सेनाधिका-याने लुटपाट करून अन्न गोळा केले आणि पुढील प्रवास किना-या-किना-याने सुरु केला. तरीही त्यांना आपण पर्शियन आखातापर्यंत पोहोचू शकू याचा विश्वास वाटेना. शेवटी मकरान किना-यावरील एका दर्यावर्द्याने त्याला मार्गदर्शन केले त्यामुळे ग्वादार बंदरापर्यंत त्यांना पोचता आले. निआर्कुसने अरेबिया जिंकावा अशी अलेक्झांडरची इच्छा असली तरी ती मात्र पूर्ण होऊ शकली नाही. त्याचा जलप्रवास सूसा (दक्षिण इराण) येथे संपला. पण त्याच्यासोबतच्या सैन्याचे पुष्कळ हानी झालेली होती.

 

अलेक्झांडर उर्वरीत सैन्य घेऊन मकरान वाळवंटातून (सध्याचे बलोचीस्थान) निघाला. हा मार्ग त्याने का निवडला असावा याबाबत अनेक तर्क-वितर्क झालेले आहेत. येताना तो खैबर खिंडीतून आला होता तर परत जातांना बोलन खिंडीचा मार्ग त्याने निवडला यामागे कारण हेच होते कि वाळवंटी प्रदेशातून जाताना तेथील विरळ लोकसंख्येमुळे आपल्याला विशेष प्रतिकार होणार नाही अशी त्याची कल्पना होती. ते थोडे खरे असले तरी निसर्ग हाच त्याचा शत्रू बनू शकेल अशी कल्पनाही त्याने केली नाही. बलोची लोक आणि मकरान किना-यावरील मच्छीमार लोकांनी ग्रीक सैन्याला पराकोटीचे त्रस्त केले. त्यात ग्रीक सैन्याची अपार हानी झाली. या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष हा ग्रीकांचा मोठा शत्रू बनला. पाणी जपून वापरावे लागत असल्याने स्वत: अलेक्झांडरही सैनिकांना मिळते तेवढेच पाणी पिऊ लागला. सैन्याचे मनोधैर्य टिकवणे महत्वाचे होते पण त्यात यश मिळवणेही शक्य नव्हते. अन्नाचेही दुर्भिक्ष जाणवू लागल्याने हजारो सैनिक भुकेने मेले. कशीबशी बोलन खिंड त्याने उरल्या-सुरल्या सैन्यासह पार केली खरी पण त्यानंतर सुरु झाले इराणमधील गेड्रोशियन वाळवंट. त्याने अलेक्झांडर आणि त्याचे सैन्य अक्षरश: मेटाकुटीला आले. आपण परत मायदेशी पोहोचू शकणार कि नाही या भयाने अनेक सैनिकांना पीडले. काही आत्महत्याही झाल्या. स्वत: अलेक्झांडर या प्रवासात आजारी पडला.

 

या प्रवासात त्याने कल्याण नामक दिगंबर जैन साधूला सोबत घेतले होते. या प्रवासादरम्यान कल्याणने अलेक्झांडरला त्याच्या हताश मन:स्थितीबाबत जन्म-मृत्यूचे रहस्य सांगत विजय-पराजय हे कसे मानवी जीवनातील व्यर्थ भावना होत हे सांगत असे. एकदा त्यांचा तात्विक वाद झाल्यानंतर कल्याणने आपल्यासाठी चिता रचण्यास सांगितले. अलेक्झांडर हे ऐकून हादरून गेला. कल्याण त्याला म्हणाला कि मृत्यूचे स्वागत कसे करायचे हे मी तुला दाखवून देतो. अलेक्झांडरने त्याला परावृत्त करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण कल्याण बधला नाही. सूसा  येथे असताना अलेक्झांडरचा सेनानी टोलेमीने कल्याणच्या आग्रहास्तव चिता रचली. भडकत्या अग्नीज्वाळात कल्याणने उडी घेतली अलेक्झांडरला म्हणाला कि “आपण ब्याबिलोनला भेटू!” आणि कसलाही आक्रोश न करता भस्मसात झाला. ही घटना इसपू. ३२३ मध्ये घडली. सर्व ग्रीक इतिहासकारांनी या घटनेचे वर्णन केले आहे. या घटनेमुळे तो तरुण वयातच मृत्यूबद्दल तो उदासीन झाला असावा असा अंदाज आपण बांधू शकतो.

 

यानंतर अलेक्झांडरचे आजारपण बळावत गेले आणि त्याचा ब्यबिलोन येथे पोचल्यानंतर इसपू ११ जून ३२३ रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यावेळेस तो अवघ्या बत्तीस वर्षाचा होता. जगज्जेता म्हणवला गेलेला अलेक्झांडर भारतातून पराजित होऊन अशी दुर्दशा होऊन मृत्यू पावला. आज त्याच्याबद्दल ज्या गौरवशाली कथा प्रचलित आहेत त्या बव्हंशी वदंता आणि त्याने सोबत नेलेल्या इतिहासकारांनी अर्थातच त्याच्या बाजूने लिहिलेल्या इतिहासामुळे. तो महान नव्हता हे खरे असले तरी तो एक योद्धा होता आणि त्याने अकेमेनिड साम्राज्य नष्ट केले हे त्याचे कर्तुत्व आहेच हे निर्विवाद आहे. भारताने मात्र त्याच्या नाकी नउ आणले आणि त्याचा प्रणेता होता चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्ताची ही बाजू दुर्दैवाने लोकांना माहित नाही कारण भारतीय पुराणांनी त्याचा आणि ग्रीक आक्रमणाबद्दल अवाक्षरही काढलेले नाही.

 

अलेक्झांडरला भारताबाहेर हाकलल्यानंतर चंद्रगुप्त मौर्य नंद साम्राज्याकडे वळाला. परकीय आक्रमण होऊनही नंद सम्राट पुढे आला नाही हे शल्य अर्थात होते. भारताला एका अशा साम्राज्याची गरज होती जे परकीय आक्रमण परतवून लावेल. नंद सम्राटाला पराजित केल्याखेरीज ते शक्य नाही हे ओळखून गणराज्यांतील लढाऊ लोकांची मदत घेऊन त्याने अजून नवा संघर्ष सुरु केला! त्याबाबत पुढील लेखात.

 

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...