Wednesday, June 19, 2024

जैनांच्या योगदानाचा वाचनीय धांडोळा

 

प्राचीन मराठी भाषेतील जैनांच्या योगदानाचा वाचनीय धांडोळा

- डॉ. महावीर अक्कोळे

इतिहास, संस्कृती, धर्म आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक श्री. संजय सोनवणी यांचे ‌‘जैनांचे मराठी भाषेतील योगदान' हे नवे पुस्तक चिनार पब्लिशर्स पुणे व ‌‘सरहद इंटरनॅशनल स्कूल ऑफ जैनिझम' यांनी प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठापासूनच हे पुस्तक लक्षवेधी आहे. श्रवणबेळगोळ येथील शुध्द मराठीतला प्राचीन शिलालेख आणि अक्षी इथला महाराष्ट्री प्राकृतातला त्याही आधीचा शिलालेख आणि मध्ये भगवान गोमटेश्वराच्या भव्य मूर्तीचा सुंदर चेहरा असे हे मुखपृष्ठ लक्ष वेधून घेण्याबरोबर कुतुहलही जागृत करते.

मूलत: सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या व बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या संजय सोनवणी यांच्या प्रत्येक पुस्तकात ज्ञानाचा प्रचंड साठा खजिनाच वाचकाला मिळत असतो तसा तो याही पुस्तकात आहेच!

अतिशय सुबोध आणि रसाळ शैलीत सोनवणी यांनी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या जैनांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचा व ती लिहिणाऱ्या लेखकांचा परिचय करून दिला आहे. त्यांच्या लेखनातून मानवी संस्कृतीची एकात्मता कुठलाही अभिनिवेष न बाळगता प्रकट होताना दिसते. त्यांना असणारे प्राचीन संस्कृती आणि त्यामधली चकित करणारी जीवनरहस्ये यासंबंधीचे अपार कुतुहल आणि त्यातून सुरू झालेली संशोधनयात्रा यातून हे पुस्तक आकाराला आलेले आहे. वाचकाच्या मनातसुद्धा हे छोटेखानी पुस्तक तेवढेच कुतुहल-जिज्ञासा निर्माण करते हे त्यांच्या लेखनाचे सामर्थ्य आहे.

भाषा, लिपी व ग्रंथनिर्मिती याबाबतीत प्रस्थापितांकडून आजवर नकळत वा मुद्दाम रूजविल्या गेलेल्या व आपणसुद्धा लहानपणापासून शिकलेल्या अनेक (गैर) समजांना दूर करीत संजय सोनवणी यांनी काही धक्कादायक वास्तवे पुराव्यासह या पुस्तकात नोंदवली आहेत.

वर्तमान परिस्थितीत मराठीला ‌‘अभिजात भाषे' चा दर्जा मिळावा यासाठी मराठी साहित्य जगताचा, मराठी भाषातज्ञांचा आणि मराठी राज्यकर्त्यांचा आटापिटा चाललेला आपण गेली अनेक वर्षे बघतो आहोत. सोनवणी असे ठामपणे सुचवितात की ‌‘प्राचीन काळी जैनांनी लिहिलेल्या श्रेष्ठ दर्जाच्या साहित्य कृती पाहिल्या तर मराठी अभिजात आहे याची खात्री कोणालाही पटेल.' पुढे ते अशी तक्रार करतात की, ‌‘तथापि आजच्या मराठी अभ्यासकांनी या साहित्याकडे दुर्लक्षच केले आहे.' माझ्या मते तर जैन मराठी अभ्यासकांनीही या प्रांताकडे दुर्लक्षच केले आहे. डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे, डॉ. विद्याधर जोहरापूरकर, माधव रणदिवे अशा काही मोजक्या जैन संशोधकानंतर प्रा.डॉ.गोमटेश्वर पाटील यांच्याशिवाय या विषयात फारसे स्वारस्य कुणी घेतलेले आढळत नाही. नव्या जैन अभ्यासक संशोधकांनी पुढे यायला हवे.

संस्कृत ही सर्वात प्राचीन भाषा असून तीच सर्व भाषांची जननी आहे असे आपण सर्वजणच लहानपणापासून ऐकत-शिकत आलेलो आहोत. पण भाषेच्या संशोधनातून पुढे आलेले निखळ सत्य असे आहे की संस्कृत भाषा ही प्राचीन मराठीच्या उगमानंतर कितीतरी उशीरा निर्माण झालेली भाषा असून तिच्यापासून मराठीच काय जगातील कोणतीही भाषा निर्माण झाली नाही हे आता जगातले जवळपास सगळे भाषातज्ञ मान्य करतात हे सोनवणी यांनी पुराव्यासह दाखवून दिलेले आहे. उलट प्राचीन प्राकृतातूनच संस्कृत भाषेची निर्मिती केली गेली असावी असे मानण्यास जागा आहे असे ते म्हणतात.

आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सोनवणी अगदी ठामपणे मांडतात ती ही की भारतातले तमाम सनातनी हिंदू आग्रहाने प्रतिपादन करीत असतात व आपणही लहानपणापासून शिकत आलो की वाल्मिकी रामायण हे पहिले (आद्य) रामायण आहे व बाकीची त्यानंतरची आहेत'- असे नसून प्राचीन ‌‘महाराष्ट्री प्राकृता' त लिहिले गेलेले जैन महाकवी विमलसुरी यांचे ‌‘पउमचरिय' हे महाकाव्यच आद्य राममहाकाव्य आहे. वाल्मिकी रामायण इसवीसन तिसरे ते पाचवे शतक या दरम्यान लिहिले गेले आहे तर विमल सुरींचे ‌‘पउमचरिय' हे रामहाकाव्य त्या आधी तीनशे ते पाचशे वर्षे म्हणजे इसवीसनाच्या चार साली लिहिलेले आहे. हे आश्चर्यकारक तथ्य सोनवणी संशोधकांच्या व भाषातज्ञांच्या संशोधनातून आलेल्या पुराव्यांच्या आधारे ठामपणे मांडतात. ‌‘अयोध्या' नगरीचे मुळ नाव ‌‘विनिय' वा ‌‘विनिता' हे होते व या नगरीची स्थापना प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ यानीच केली. पुढे हे नाव ‌‘इक्ख्खागु' झाले व नंतर इसपू. सहाव्या शतकापूर्वी आयोध्येचे नाव ‌‘साकेत' (सागेय-साएय) हे कायम झाले. पुढे गुप्तकाळात साकेत हे नाव व्यवहारातून पूर्णपणे बाद होऊन ‌‘योध्या' हे नाव रूढ झाले ही माहिती आपल्याला आश्चर्यचकित करते.

या छोटेखानी ग्रंथात संजय सोनवणी आपल्याला आद्य राममहाकाव्य ‌‘पउमचरिय' बरोबरच पादलिप्ताचार्यकृत ‌‘तरंगवई', अज्ञात जैन लेखकाने लिहिलेल्या ‌‘अंगविज्जा', संघदासविरचित ‌‘वासुदेवहिंडी', आचार्य हरिभद्र विरचित ‌‘समरादित्यकथा' ‌‘धुर्ताख्यान', उद्योतनसुरि विरचित ‌‘कुवलयमाला' आणि कौतुहल विरचित ‌‘लीलावई' अशा प्राचीन मराठीत लिहिलेल्या एकाहून एक सरस साहित्यकृतींचा कथासूत्रासहित, वैशिष्ट्यांसहित अत्यंत रंजक परिचय करून दिला आहे.

खरे तर सोनवणी संस्कृतच्या प्रभावाखाली तयार झालेल्या प्राचीन मराठीच्या ‌‘महाराष्ट्री प्राकृत' या संज्ञेलाही मान्यता देत नाहीत. प्राचीन मराठीचे खरे आद्य नाव ‌‘मरहठ्ठी पाइय' वा ‌‘महारठी पाअड' असेच आहे असे ते दाखवून देतात.

एकंदरीत भाषेच्या अभ्यासकांसाठी, रामायणाच्या संशोधकांसाठी, खरा इतिहास जाणण्याची आस असणाऱ्यांसाठी आणि प्राचीन मराठी जैन वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी संजय सोनवणींचे हे पुस्तक खूप महत्वाचे आहे. शेवटी एका अजैन इतिहास संशोधकाने प्राचीन मराठी भाषेतील जैनांच्या योगदानाचा साधार पुराव्यासहित घेतलेला हा वाचनीय धांडोळा निदान वाचनाची आवड असणाऱ्या सर्व जैनांनी तरी आवर्जून वाचावा असाच आहे.

 

जैनांचे मराठी भाषेतील योगदान

लेखक : श्री. संजय सोनवणी

प्रकाशक : चिनार पल्बिशर्स, पुणे व

सरहद इंटरनॅशनल स्कूल ऑफ जैनिझम

पृष्ठे- 104, एप्रिल 2024

किंमत : 200/-

संपर्क : 8805530259

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...