Saturday, July 6, 2024

प्रक्रियाउद्योगांच्या अभावात शेतक-यांची दैना!

  


भारतात शेतक-यांची दुरवस्था हा जुना चिघळत गेलेला फार जुना प्रश्न आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळणे ही जशी समस्या आहे तशीच एखादे उत्पादन कमी झाल्याने महागाई वाढली तर एकंदरीत समाजाचा होणारा रोष पाहून आयात-निर्यातीसंदर्भात जी धोरणे सातत्याने बदलली जातात त्यामुळे शेतक-यांचे हित होण्याऐवाजे अहितच झाले आहे हे आपल्या लक्षात येईल महात्मा फुले यांनी शेतक-यांचा असूद हा ग्रंथ एकोणीसाव्या शतकात लिहून शेतक-यांची परवडीवर प्रखर भाष्य केले होते. महात्मा गांधी यांनीही चंपारण्यातील शेतक-यांचे आंदोलन उभारून सत्याग्रहाची रुजुवात केली होती. स्वातंत्र्यानंतर शेतीउत्पादनात प्रचंड मोठी भर पडले असली तरी त्या प्रमाणात शेतक-यांचे हित मात्र होऊ शकलेले नाही हे एक कटू वास्तव आहे. सरकारी धोरणे याला जशी जबाबदार आहेत तशीच शेतीउत्पादन आधारित प्रक्रिया उद्योगांचा अभाव हेही या दुरवस्थेमागे फार मोठे कारण आहे हे मात्र आमच्या लोकांनी लक्षात घेतलेले नाही हेही एक दुसरे कटू वास्तव आहे.

फळे आणि भाज्यांच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. एकीकडे ही अभिमानाची बाब असली तरी यात असमाधानकारक बाब अशी कि जगात सर्वात जास्त फळे व भाज्या “वाया” जाण्यातही आपल्या देशाचा पहिला क्रमाक लागतो. आपल्या देशात जवळपास ७० हजार कोटी रुपये मूल्याच्या फळांची आणि भाज्यांची नासाडी होते. कारण आहे ते हे कि आपल्या देशात पुरेशी शीतगृहेच नाहीत. शिवाय रेफ्रिजरेटेड कंटेनर वाहतूक पुरेशी उपलब्ध नाही हेही कारण त्यात आहेच. केवळ वाहतुकीच्या दरम्यान अथवा साठवणूक न करता आल्याने नाशवंत कृषीउत्पादन वाया जाते तेच सरकारी आकडेवारी नुसार प्रतिवर्षी १३३०० कोटी रुपये मूल्याचे आहे. यात भर पडते ती एखाद्या शेतमालाचे भावच पडल्याने फेकून द्यावा लागणारा माल. याचे मुली तर मोजता येण्याच्या पलीकडचे आहे. यामुळे राष्ट्रीय संपत्तीची हानी तर होतेच पण नागवला जातो तो शेतकरी. आपला शेतकरी नेहमीच दारिद्र्यरेषेच्या थोडा वर-खाली राहतो याचे नेमके हेच कारण आहे.

यात भर पडली आहे ती म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणा-या उद्योगांची कमतरता. भारतात फक्त ३% शेतमालावर आज प्रक्रिया केली जाते. बाहेरच्या देशातले आकडे आपले डोळे विस्फारतील असे आहेत. चीनमध्ये एकूण कृषी उत्पादना पैकी २७%, अमेरिकेत ६५% तर फिलिपाइन्ससारख्या देशात एकूण कृषीउत्पादनापैकी ७८% उत्पादनावर प्रक्रिया केली जाते.   कृषीमालावर प्रक्रिया केल्याचे अनेक फायदे आहेत. कृषीमालाचे एकंदरीत आयुष्य वाढते हा झाला एक भाग, पण फळे-भाज्यांचे एकुणातील पोषणमूल्यही वाढून लोकांना आरोग्यदायी खायला मिळते हा दुसरा लाभ. प्रक्रियाकृत शेतमालाला जागातीक बाजारपेठेत मागणी असल्याने निर्यात करता येणेही सुलभ होते तसेच शेतमालावर प्रक्रिया केली कि बाजारातील रोज प्रतीक्षणी चढ-उतार होत असलेल्या भावांचीही चिंता राहत नाही. यात शेतक-यांचा व पर्यायाने देशाचाहे फायदा होतो आणि माल सडणे किंवा फेकून द्यावा लागणे या आपत्ती कोसळत नाहीत. पण दुर्दैवाने भारतीय शेतक-यांचे आणि उद्योजकांचे या प्रक्रिया उद्योगाकडे फारसे लक्ष गेलेले नाही. जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे व्यक्तिगत व्यापारी अथवा उद्योजक किती माल साठवू शकतो यावर मर्यादा असल्याने या उद्योगात पडायला उद्योजक नाखूष असतात असे एक निरीक्षण सांगते. पण याचा फटका अंतत: शेतका-यांनाच बसतो हे उघड आहे.

शेतमालावर प्रक्रिया करण्याचे अनेक मार्ग आहेत.  कॅनिंग, डीप फ्रीजिंग, निर्जलीकरण, लोणची, इत्यादी अनेक मार्ग मालाच्या स्वरूपानुसार वापरता येणे शक्य असते. निर्जलीकरण हा त्यातल्या त्यात भारतीय शेतक-यांसाठी सोपा व अगदी लहान ते अवाढव्य प्रमाणात वापरता येण्यासारखा मार्ग आहे. माशांपासून अनेक प्रकारच्या फळे व भाज्या सुकवणे ही प्रक्रिया पद्धत भारतात सिंधू कालापासून वापरात आहे. पण उघड्यावर व उन्हाच्या बेभरवशी उपलब्धतेवर ही प्रक्रिया अवलंबून असते.  सुदैवाने भारतात सुर्यप्रकाशाची कमतरता नाही. पण वेळोवेळी होणारे वातारणीय बदल, अवकाळी पावुस इ. कारणांनी केवढे फटके बसतात हे आपण दरवर्षी बघत असतो त्यामुळे वाया जाणारा माल ही राष्ट्रीय आणि व्यक्तिगत संपत्तीचा नाशच असतो. शिवाय साराच शेतमाल उन्हात वाळवता येत नाही. शिवाय उघड्यावर ही वाळवणूक केली जात असल्याने त्यात हायजिनिकपणा राहत नाही. आधुनिक निर्जलीकरण हे कृत्रिम तापमानात बंदिस्त पद्धतीने केले जाते. ज्या भाज्या उन्हात वाळवता येणे अशक्य अशा उत्पादनालाही ही आधुनिक पद्धती साथ देते. त्यामुळे आकार ते स्वच्छता यात हे पदार्थ आघाडीवर असतात. अतिरिक्त उत्पादन प्रक्रिया करण्यात जात असल्याने शेतमालाची नासाडी होणे शून्यावर येणे हा एक मोठाच फायदा आहे.

निर्जलीकरण म्हणजे नेमके काय हे आपण थोडक्यात समजावून घेऊ.

१. भाजीपाला/फळे नाशवंत असतात कारण त्यातील अतिरिक्त नैसर्गिक जल आणि जीवाणू (ब्याक्ट्रियाज). सडण्याची प्रक्रिया त्यामुळे अत्यंत वेगाने सुरु होते आणि शेतमाल अखाद्य बनतो. चक्क फेकून द्यावा लागतो. जलांश जेवढा अधिक तेवढी सडण्याचा वेग अधिक. कोथींबीर, टोम्यटो ते सर्वच पालेभाज्या या सदरात येतात. काही फळभाज्यांचे नैसर्गिक आयुष्य थोडे अधिक असते पण बाजारभाव नसला कि त्याही वाया जातात. हे वाया जाणे थांबवणे.
२. भाज्यांमधील अतिरिक्त जल अल्प प्रक्रिया करुन काढुन घेणे म्हणजे निर्जलीकरण.
३. पुर्व-प्रक्रिया ते packaging हा झाला महत्वाचा टप्पा. यात भाज्यांच्या मगदुराप्रमाणे (त्यातील जलांश व एकूनातील घनता...) यानुसार प्रक्रियापद्धत पुर्वनियोजित करणे. ती राबवने आणि त्याचे अंतिम परोक्षण करून packaging करने.

ही झाली थोडक्यातील प्रक्रिया. डीप फ्रीजिंग, कॅनिंग अशा प्रक्रियांसाठी मोठे भाद्व्ल व तंत्रज्ञानाची आवश्यकता असते, तसे निर्जलीकरण प्रक्रियेचे नाही. शेतकरी स्वत:ही थोडे ज्ञान घेऊन ही प्रक्रिया करू शकतात. मोठा फायदा हा कि यामुळे शेतमाल वाया जाण्याचे प्रकार ठामू तर शकतातच पण आर्थिक उत्पन्नातही भर पडते. आज शेतकरी हलाखीत असेल तर तो केवळ ताज्या उत्पादनाच्या बाजारपेठेवर अवलंबून असल्याने. प्रक्रियेच्या अभावात नाशवंत माल फार दिवस घरात/शिवारात ठेवता येत नाही त्यामुळे मिळेल त्या भावात माल विकणे आणि जर गाडीभाडेही निघणार नाही एवढा भाव पडला अथवा पाडला गेला तर तो शेतमाल फेकून देणे एवढेच शेतक-याच्या हातात राहते. तो पुरेपूर गाळात रुतून जाणे अपरिहार्य असते. शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, शेती सोडून देण्याची मनस्थिती निर्माण झालेली आहे कारण शेती नफ्यात येणे सोडा, त्यात घातलेल्या श्रमांचाही मोबदला मिळू शकत नाही. आणि याचे कारण आहे शेतमालावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगाचा अभाव. निर्जलीकर्ण करून मात्र शेतमालाचे आयुष्य आणि किंमत वाढवता येणे सहज शक्य आहे. यातच शेतक-यांचे हित आहे.

 

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...