Thursday, July 4, 2024

सम्राट चंद्रगुप्ताने ग्रीकांना असे शरण आणले!

 

बलाढ्य अकेमेनिड साम्राज्याचा अस्त घडवून आणणा-या अलेक्झांडरचा भारतातून परत येत असताना अकाली मृत्यू झाला तो परतीच्या प्रवासात चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली पश्चिमोत्तर राज्यांतील काही गणराज्यानी केलेल्या संघर्षामुळे आणि त्याला वाळवंटातून हाल-अपेष्टा आणि अन्नपाण्याचे दुर्भिक्ष सहन करून परत जावे लागल्यामुळे. अलेक्झांडरची भारत मोहीम तशी अवघ्या तीन वर्षात संपली. तरीही तक्षशिलेचा अंभी आणि पंजाबमधील पोरस हे मात्र त्याचे मांडलिकच राहिले. तसेही ते पूर्वापार अकेमेनिड साम्राज्याचे मांडलिक होतेच त्यामुळे त्यांना हे मांडलिकत्व जाचणारे नव्हते. परत जातांना अलेक्झांडरने युडेमस याला पंजाब व तक्षशिलेच्या (गांधार) राजांवर देखरेख करायला क्षत्रप म्हणून तर मृत्यूआधी आपला सेनापती सेल्युकस निकेटर याला उत्तराधिकारी नेमले होते. अलेक्झांडरच्या मृत्युनंतर झालेल्या सत्तासंघर्षात त्याचे साम्राज्य विखंडीत झाले आणि सेल्युकस निकेटर हा इराणच्या बहुतेक भागाचा शासक बनला व सेल्युसिड साम्राज्याचे संस्थापना केली.

भारतात या आक्रमणामुळे खूप मोठी राजकीय उलथापालथ झाली. ग्रीकांचे आक्रमण होऊनही आणि एवढी बलाढ्य सेना असताना सम्राट धनानंद मात्र स्वस्थ बसला या बाबीचा चंद्रगुप्ताला रोष वाटणे स्वाभाविक होते. पश्चीमोतर सीमा सुरक्षित केल्या नाहीत तर अशी आक्रमणे होताच राहणार हे लक्षात येणारा तो पहिला भारतीय होय. शिवाय पंजाब आणि तक्षशीलेचे राजे आपले मांडलिकत्व झुगारून द्यायला तयार नव्हते. सर्व देशाला कवेत घेईल असे साम्राज्य निर्माण करण्याची आवश्यकता त्याला तीव्रतेने जाणवणे स्वाभाविक होते. पण नंद घराणे आहे त्या साम्राज्याला सांभाळण्यात धन्यता मानत होते. ही परिस्थिती बदलणे आवश्यक होते.

खरे तर नंद घराण्याने पश्चिमेला आर्यावर्त प्रांतापर्यंत भाग आपल्या ताब्यात घेतला होता. आर्यावर्तात केंद्रित झालेल्या वैदिकांना तो भाग सोडायला भाग पाडले होते. त्यामुळे पुराणांत नंद घराणे क्षत्रियांचे विनाशक अशी नोंद त्यांनी तर केलीच आणि आता भारतात पुढे फक्त शुद्र (म्हणजे हिंदू) राजेच राज्य करतील अशी शापवाणीही उच्चारली. पण आर्यावर्त सोडले तर अन्य कोठे वैदिकांची राज्येही नव्हती आणि क्षत्रीय हे वैदिक धर्माच्चाच भाग असल्याने अन्य भारतीय सत्तांवर या तळातळाटाचा काही परिणाम होणेही शक्य नव्हते.

नंद घराण्यात एकंदरीत नऊ राजे होऊन गेले. धनानंद हा अखेरचा. याचे मूळ नांव चंद्रमास असावे व अलोट संपत्तीमुळे त्याला धनानंद हे टोपणनांव त्याला मिळाले असावे. याच्याकडॆ ८० कोटीं सुवर्णमुद्रांची संपत्ती होती. त्याच्या धनाढ्य़पणाची किर्ती तमिळनाडूपर्यंत पोहोचली होती. संगम साहित्यातील प्राचीन कवितेत धनानंदाचा उल्लेख "गंगा नदीच्या पुराप्रमाणे संपत्ती असलेला" असे वर्णन केले आहे. असे असले तरी धनानंद दानशाळांच्या मार्फत अलोट दानही करत असे. अलेक्झांडरच्या वापसीचे कारण चंद्रगुप्त आणि पश्चिमोत्तर प्रजेने केलेले बंड हे असले तरी धनानंदाची सैनिकी शक्ती अपार होती याची नोंद ग्रीक इतिहासकार करायला विसरले नाहीत. ग्रीक इतिहासकार प्लुटार्क नोंदवतो कि नंदांकडे दोन लाखांचे पायदळ, ८० हजारांचे घोडदळ, ८ हजार रथदळ आणि सहा हजारांचे हत्तीदळ होते. यात काही आतिशयोक्ती जरी असली तरी लष्करीदृष्ट्या मगधाची शक्ती तत्कालीन जगात मोठी होती असे मान्य करावे लागेल. आणि एवढी शक्ती असूनही, पश्चिमोत्तर भागात आक्रमण झाले आहे हे माहित असूनही धनानंदाने आपले सैन्य पाठवले नाही ही बाब खटकणारी होती. त्यामुळे स्वत:च साम्राज्य स्थापन करण्याचा निर्णय चंद्रगुप्ताने घेतला. अर्थात हे कार्य नंदाचा पराभव केल्याशिवाय शक्य नव्हते. जसा ग्रीकांशी चंद्रगुप्ताने कसा लढा दिला याची नोंद भारतातील वैदिक धर्माश्रयी पुराणकारांनी ठेवली नाही तशीच नंदांशी चंद्रगुप्ताने कसा लढा दिला याचीही नीटशी नोंद नाही. दंतकथांतुन हाही इतिहास शोधावा लागतो. चंद्रगुप्ताने मगधाच्या सीमेवर हल्ले करत पाटलीपुत्रापर्यंत पोहोचायची आधी चाल खेळली. पण त्यात सुरुवातीला त्याला अपयशे आली. पण त्याने चिवटपणे लढा सुरु ठेवत, नंद साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्रपर्यंत धडक मारली व राजधानीला वेढा घातला. नंद सेनेने शस्त्र खाली ठेवले.. धनानंदाने पराजय मान्य केला. आता त्याच्याकडे ना सैन्यही उरले होते कि बळ अथवा धनही. हरलेल्या शत्रुला मारण्याची तशीही भारतीय परंपरा नाही. धनानंद ठार मारावा असा दुष्टही नव्हता. माहिती मिळते ती अशी- धनानंदाला पाटलीपुत्रातुन निष्कासित करण्यात आले. त्याला सोबत त्याच्या दोन्ही पत्नी आणी त्याच्या रथात बसेल एवढे धन घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली. इसपू ३२१ मध्ये ही घटना घडली. त्यानंतर लगेच चंद्रगुप्ताने राज्याभिषेक करून स्वत:च्या नावाची द्वाही फिरवली.

राज्यकारभाराची नव्याने घडी बसवताच त्याने पश्चिमोत्तर भारतावर लक्ष केंद्रित केले. इसपू ३१६ मध्ये त्याने ग्रीक क्षत्रप युडेमस व पेथोनला सेनेसह भारत सोडायला भाग पाडले आणि पश्चिमोत्तर भारत मौर्य साम्राज्याच्या अधीन आणला. पोरसचा मृत्यू तत्पूर्वीच झाला होता कि चंद्रगुप्ताशी झालेल्या युद्धात याची मात्र इतिहासात नोंद नाही. असे असले तरी ग्रीक क्षत्रपाच्या माघारीमुळे सेल्युकस निकेटर चिंतेत पडणे स्वाभाविक होते कारण हे क्षत्रप आता त्याच्या अधिपत्याखाली भारतातील सत्ता सांभाळत होते. आपली सत्ता पुन्हा निर्माण करण्यासाठी तोही मोठी सेना घेऊन निघाला. चंद्रगुप्ताने त्याला सिंधू नदीच्या खो-यात अडवले. या धमासान युद्धात चंद्रगुप्ताचा विजय झाला. शरण आलेल्या सेल्युकसने पूर्व इराण (आजचा अफगाणिस्तान) मधील हिंदूकुश पर्वतापर्यंतचा विस्तीर्ण भाग चंद्रगुप्ताला गमावला. या तहाप्रीत्यर्थ चंद्रगुप्ताने पाचशे हत्ती सेल्युकसला दिले आणि त्याची कन्या हेलनशी विवाह करून सेल्युसिड साम्राज्याशी दूरदृष्टीने नातेसंबंधही जोडले. या विजयी तहाने पश्चीमोत्तर सीमा तर सुरक्षित झाल्याच पण भारतीय उपखंडात एकछत्री अंमल बसवण्याचा मार्गही मोकळा झाला. भारताबाहेर सीमा नेणारा आणि देशाला एक अखंड मानचित्र बहाल करणारा चंद्रगुप्त हा ज्ञात इतिहासातील पहिला सम्राट. अत्यंत सामान्य स्थितीतून आलेला पण कमालीची प्रतिभा आणि शौर्य असलेला हा सम्राट. या सीमा अजूनही पुढे वाढवल्या त्या सम्राट अशोकाने. चंद्रगुप्त हा जैन तर अशोक आधी जैन व नंतर बौद्ध. असे असूनही भारताचे शस्त्रतेज देशासाठी तळपत राहिले याचे काही लोकांना आश्चर्य वाटते. पण आक्रमकांविरुद्ध युद्ध करू नये अशी धर्माज्ञा ना जैनांची ना बौद्धांची. इतिहासातील खोडसाळ लोकांनी उठवलेली ही एक गप्प आहे. अलेक्झांडरच्या आक्रमणातून हा महानायक निर्माण झाला. विपरीत परिस्थिती इतिहासनिर्माते घडवण्यासाठी कसे कार्य करते याचे हे उदाहरण आहे.

ग्रीक आक्रमणाने भारतात ज्ञान व कलाक्षेत्रातही मोठी क्रांती झाली. पाश्चिमात्य तत्वज्ञान, खगोलशास्त्र व वास्तुशास्त्राशी परिचय झाला. त्याबद्दल अधिक पुढील लेखात.

-संजय सोनवणी 


No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...