Monday, February 24, 2025

 ए-आय: बौद्धिक मक्तेदारीच्या दिशेने?

 

गेल्या काही दशकांत जगातील अधिकाधिक लोकांची बुद्धी घटते आहे, बुद्धीचे विषम वितरण गतिमान झालेले आहे असे दिसते. ज्याप्रमाणे संपत्ती मुठभर लोकांकडे केंद्रित होत आहे त्याच प्रमाणे बुद्धीचेही संकलन मर्यादित लोकांकडे होऊ लागलेले आहे आणि ही प्रक्रिया गतिमान झालेली आहे. ज्याप्रमाणे अधिकाधिक लोकांच्या संपत्तीला वित्तसंस्थांच्या मार्फत मोठीमोठी कर्जे घेऊन वा समभाग किंवा कर्जरोखे याचे वितरण करत एकाच कोणत्या ना कोणत्या कॉर्पोरेशनमध्ये भांडवल गोळा करत त्यावर आधारित उद्योगांवर जगातील आर्थिक गाडा चाललेला आहे त्याच प्रमाणे हीच कॉर्पोरेशन्स व सरकारेही विखुरलेल्या बुद्धिमत्तेचे एआयसारख्या साधनांमार्फत एकत्रीकरण करत त्याचा प्रभावी वापर करत जनतेवरच ज्ञान-स्वामित्व गाजवण्याचा उद्योग करत आहेत असे आज आपल्याला दिसून येईल. तुम्ही म्हणाल, भांडवलाचे एकत्रीकरण करता येईल, पण बुद्धिमत्तेचे भांडवलशाही किंवा मक्तेदारी कशी निर्माण होणार?

 खरे तर हे आपण अनेक उदाहरणातून पाहू शकतो. पण कृत्रिम बुद्धीमत्तेचेच एक उदाहरण घेऊयात. साधन  कोणतेही असो, त्याचा पाया असंख्य माणसांनी निर्माण केलेल्या माहिती आणि ज्ञानाने निर्माण झालेला आहे. त्यात सुसंगती आणत त्यातल्या त्यात मुद्देसूद पद्धतीने सादर करण्याचे तंत्रही असंख्य तंत्रज्ञांनी विकसित केलेले आहे व ते भविष्यातही अजून कोणते नवे तंत्रज्ञान येईपर्यंत करत राहणार आहेत. पण हे तंत्रज्ञ समग्र प्रकल्पातील एखाद्या तुकड्यावर कार्य करत असतात. समग्र चित्र पुन्हा मोजक्या लोकांच्या हातात असते. तेच हे तुकड्या तुकड्याने असंख्य तंत्रज्ञाकडून विकसित केले गेलेले घटक एकत्र जुळवत अंतिम उत्पादन तयार करत असतात. पुन्हा हेच तंत्रज्ञान सामान्य लोकांसमोर ठेवत असतात. कारखान्यातील उत्पादन पद्धती ते अंतिम उत्पादनासाठी आवश्यक मशीन लर्निंगसारखी साधने ही उत्पादन केंद्रित असल्याने त्यांचा सामान्य लोकांना थेट उपयोग होत नसला तरी या बुद्धीमत्तेचा उत्पादनकेंद्रीत उपयोग असला तरी केंत्याचा उपयोग उद्योगांना होऊन एकुणातील उत्पादन क्षमता व दर्जा वाढवण्याचा उपयोग उद्योगांना होतो तसाच तो सामान्य माणसांनाही अप्रत्यक्षरित्या होणार असतो. ही कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करणारे मानवच असतात. पण तेही त्या सर्व उत्पादन प्रक्रियेतील तज्ञ नसल्याने व त्याची आवश्यकता नसल्याने अनेकांची वेगवेगळ्या क्षेत्रातील बुद्धी त्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या निर्मितीसाठी खर्च होत असते.  म्हणजेच एक साधन निर्माण करण्यासाठी अनेकांची बुद्धी एकत्र आलेली असते. पण प्रत्येकाने वापरलेली बुद्धी ही एका विशिष्ठ पद्धतीच्या साच्यात वापरावी लागत असल्याने त्यात सहभागी तज्ञही साचेबद्ध होत जातात. पण बुद्धीच्या एकत्रीक्ररणाची साचेबद्ध प्रक्रिया सुरूच राहते. साधनाचे उद्देश्य बदलले की प्रक्रिया बदलायची आवश्यकता निर्माण होते. ती प्रक्रिया ठरवणारे घटक मर्यादित असतात. पण त्या साधनाच्या असंख्य घटकांवर काम करणार्यांची संख्या मात्र सहसा कमी होत नाही. सोपे कोडींग लिहिणाऱ्या प्रणाल्या आज अस्तित्वात असल्या तरी साधन (टूल्स) चे उद्देश्य ठरवत त्याचा आराखडा करत त्यांचे शिस्तबद्ध विकास करण्यासाठी वितरण करत अंतिम परिणाम जसा कल्पिला होता तसाच निर्माण होण्यासाठी आपोआप कोडींग करणारे साधन आज तरी मानवी प्रतिभेच्या कक्षात आलेले नाही. त्यामुळे सध्याची कृत्रिम बुद्धीमत्ता मानवालंबी आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत मानवी बुद्धीचे केंद्रीकरण होते आहे. आणि ही साधने वापरणारे घटक पुन्हा मर्यादित आहेत. आर्थिक भांडवलाप्रमाणे बुद्धीचे एकत्रीकरण करणे आणि तिचा समग्र कार्यासाठी वापर करण्याच्या दिशेने सुरु असलेली ही वाटचाल आहे. यातून ज्ञानाचीही मक्तेदारी निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण हे “उपयुक्त” ज्ञान आहे. हे उपयुक्त ज्ञान असणारे मर्यादित परिप्रेक्षात जीवनमान उंचावू शकतात. पण ते आपले ज्ञानात्मक भांडवल विकून. या ज्ञानाची उपयुक्तता संपली की भविष्यात मुळात व्यक्तीला ज्ञानाची आवश्यकताच राहणार नाही कारण ते ज्ञान आपसूक पुरवणारे साधन हाताशी उपलब्ध असेल.

मुळात कृत्रिम बुद्द्धीमत्तेचा उद्देशच माणसांना विचारक्षम करणे हा आहे काय की कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर एकुणातील ज्ञानाला व त्याच्या विकासाला सीमित करण्याचा हेतू त्यामागे आहे? कृत्रिम बुद्धीमत्ता एक प्रकारे ज्ञानाची मक्तेदारी निर्माण करण्याच्या उद्देशाने तर निर्माण करण्याचा प्रयत्न होत नाहीय ना यावरही गंभीर विचार करण्याची गरज आहे. भांडवलाचे एकत्रीकरण आणि ज्ञानाचे एकत्रीकरण यात तसा फरक नाही. पण ज्ञानपरंपरेचे बहुमुखी विकसन यामुळे थांबण्याचा जो धोका आहे त्यावर मात्र विचार केला गेला पाहिजे. स्वत: कसलेही विशेष  कष्ट न घेता बसल्या जागी एका क्षणात कोणालाही “ज्ञानवंत” बनवू शकणारी ही कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने एकुणातील मानवाने आजवर केलेल्या ज्ञानाच्या प्रगतीतील मोठा अडसर बनू लागली असतील तर ती माणसाच्या मुलभूत आळशी प्रवृतीमुळे असे म्हटले तरी फारसे आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही.

आपले जीवन सोपे व्हावे यासाठीच आदिम काळापासून माणसाने अनेक शोध लावले. दैनंदिन कष्टाच्या कामापासून मुक्ती मिळून जास्त व्यापक कार्ये करता यावीत यासाठी त्याने शोध लावले. सुखसुविधा निर्माण केल्या. त्यात भांडवलशाहीची बीजे असली तरी त्याचे प्रमाण सर्वभक्षी नव्हते. पण वर्तमानात मक्तेदारीयुक्त भांडवलशाही आल्यामुळे आणि तिचा हेतू मानवी बुद्धीचा विकास हे नसल्याने बुद्धीही एक उत्पादन (कमोडीटी) मानत तिलाही मक्तेदारीमध्ये बदलवले जाणार असेल तर मात्र मानवजातीने चिंता करावी अशी स्थिती आहे.

मी नुकताच एका  कॉलेजच्या रिसर्च पेपर्सच्या प्रेझेन्टेशन कार्यक्रमाला हजेरी लावली. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी आपले रिसर्च पेपर्स व प्रेझेन्टेशंस चॅट-जीपीटीतून  उचललेले होते. त्यात जे आहे ते सर्वच बरोबर आहे असा त्यांचा ठाम विश्वास असावा कारण त्याने पुरवलेल्या रचेनेतील ढोबळ चुकाही त्यांनी दुरुस्त करण्याचे बौद्धिक कष्ट घेतलेले नव्हते. हे सार्वत्रिक असावे असे दिसते. मी गेल्या लेखात म्हटले होते की कृत्रिम बुद्धीमत्ता हे सांगकाम्या मदतनिसासारखे आहे. त्याला स्वत:चे डोके नाही. विश्लेषन क्षमता नाही. त्यात अगणित लोकांनी दिलेल्या माहितीला स्वत:चे डोके न वापरता त्यातल्या त्यात दिलेल्या पद्धतीने मांडण्याचे कौशल्य असले तरी ते शेवटी कृत्रिम साधन आहे. प्रत्येकाने आपापली बुद्धी वापरत त्याचा कितपत उपयोग करून घ्यायचा हे ठरवले पाहिजे. पण तसे होत नाही. हा वेग वाढला तर बौध्दिक मक्तेदारी निर्माण होईल व तशी ती होतही आहे. ही मक्तेदारी समग्र मानव जातीची बौद्धिक अधोगती करत नेत आहे. यातून बौद्धिक साम्राज्यवाद निर्माण होण्याचा धोका आहे आणि तो राजकीय, आर्थिक साम्राज्यवादापेक्षा अधिक विनाशक असणार आहे. स्वबुद्धीविकासासाठी मदतनिस म्हणून ही साधने वापरणे वेगळे आणि बुद्धीच्या बाबतीत परावलंबी होणे वेगळे.

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

  ए-आय: बौद्धिक मक्तेदारीच्या दिशेने?   गेल्या काही दशकांत जगातील अधिकाधिक लोकांची बुद्धी घटते आहे, बुद्धीचे विषम वितरण गतिमान झालेले आह...