Thursday, February 27, 2025

विद्रोह मेला आहे!

 “पारंपारिक विचार, सिद्धांत आणि जगण्याच्या पद्धतीला आव्हान देत नवे विचार सकारात्मक परिवर्तनाच्या भावनेने जे मांडतात त्यांनाच विद्रोही म्हटले जाते. आपल्याकडील विद्रोही म्हणवणारे लोक मात्र विशिष्ट जाती धर्माला शिव्या देण्याला आणि निंदा करत राहण्याला विद्रोह मानतात. जे नवविचारांचे सैद्धांतिक सृजन करत समाज बदलवण्याला प्राधान्य देत नाहीत. त्यांना विद्रोही मानणे अथवा अशा लोकांनी स्वत:ला विद्रोही समजणे हेच मुळात विद्रोहाचा अर्थ न समजल्याचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील विद्रोह कधीच मेला आहे.” ही पोस्ट मी फेसबुकवर पाच डिसेंबर २०२४ रोजी टाकली होती. त्यावर बरीच साधक बाधक चर्चा झाली. काही लेखकांशी प्रत्यक्ष भेटीतही चर्चा झाली. अर्थात या चर्चेचे निमित्त होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे. त्याचा आणि मी लिहिलेल्या पोस्टच्या मुख्य हेतूशी त्यांचा काही संबंध नव्हता. तरीही या विषयावर विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने व्यापक विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त झाल्याने येथे विद्रोही साहित्य सम्मेलनाचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे.

 

गेला काही काळ जेथे अ. भा. मरठी साहित्य संमेलन असेल तेथे समोरच विद्रोही मराठी साहित्य संमेलन भरवण्याची प्रथा पडलेली आहे. “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात ज्यांना प्रवेश मिळालेला नसतो अशीच मंडळी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात जातात” अशीही टीका यात सहभागी होणाऱ्या लेखकांवर होत आलेली आहे. दिल्लीत होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजक  एवढ्या दूर जाणे कसे परवडेल या विवंचनेत गोंधळलेले दिसले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे या वेळचे आयोजक सरहदचे संजय नहार यांनी मात्र अत्यंत वेगळी भूमिका घेतली. दिल्लीतील साहुत्य संमेलनात मराठीतील सारे ‘आवाज’ प्रतिध्वनित व्हावे म्हणून त्यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवातच अथवा शेजारीच जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. तसे लिखित पत्रही दिले, पण विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या पदाधिकाऱ्यानी त्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. “आम्ही अ. भा. साहित्य संमेलनाविरुद्ध असल्याने तुमच्याच मांडवात आम्ही कसे येणार?” अशा स्वरूपाचा प्रश्नही विचारला गेला.

 

१९९९ साली बाबुराव बागुल या प्रख्यात साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली धारावी येथे पहिले विद्रोही साहित्य संमेलन भरले होते. तेव्हापासून या संमेलनाची परंपरा जवळपास अव्याहत आहे असे म्हटले तरी चालेल. महात्मा जोतीराव फुले यांनी पुणे येथे १८७८ साली झालेल्या पहिल्या ग्रंथकार सभेचे अध्यक्ष न्या. म. गो. रानडे यांनी दिलेल्या निमंत्रणाला उत्तर देतांना “तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवांचे हित होईल याचे बीज नाही. हे उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या घालमोडया दादांचे संमेलन आहे.” असे म्हणून या संमेलनास जाण्याचे नाकारले. हे पत्र हेच विद्रोही साहित्य संमेलनाची प्रेरणा बनले असे चळवळीतील मंडळी मानते. अर्थात त्यांना म. फुले यांच्या वरील विधानाचा सखोल अर्थ कधी नीट कळाला आहे असे जाणवत नाही. अखिल मानवांचे हित हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे व त्यापासून नुसते विद्रोहीच नव्हे तर अ. भा. साहित्य संमेलनानेही तो डोक्यावर घेत आपली भूमिका व्यापक करण्याची आवश्यकता होती पण ते दुर्दैवाने अद्याप झालेले दिसून येत नाही. या अर्थाने पाहिले तर दोन्ही संमेलने घालमोडया दादांची आहेत असे म्हणायला प्रत्यवाय नाही.

 

विद्रोह ही एक व्यापक संकल्पना आहे. गतकाळात जे झाले ते तसेच्या तसे पुढे चालवत राहतात वा तसा प्रयत्न करतात वा तेच चांगले होते असे मानतात ते प्रतिगामी असतात तर जे सतत स्वत:त आर्थिक, वैचारिक, सांस्कृतिक बदल घडवून आणतात त्यांना पुरोगामी म्हणतात. हे बदल कसे होत आहेत, त्यात अडथळे नेमके कोणते येत आहेत आणि कसा समाज घडवावा वाटतो याचे चित्रण करण्याचे काम व वर्तमान व भविष्यवेधी चिंतन-विश्लेषन करण्याचे काम विचारवंत करत असतात. त्यांना आपण पुरोगामी साहित्यिक व विचारवंत म्हणू शकतो. अखिल मानवजातीचे हित हाच सर्वांच्या चिंतनाचा, आचार-व्यवहाराचा पाया असला पाहिजे हे तर जागतिक मान्य वास्तव आहे. अर्थात त्यासाठी स्वत:त आमुलाग्र बदल घडवण्याची आणि अत्यंत संवेदनशिलतेने जगाकडे पाहण्याची आवश्यकता असते. मागील विचारवंत/साहित्य्यिक यांच्या आकलनात, सिद्धांतात, जीवनविचारांनाही आव्हान देत नव्या अभिनव कृती निर्माण करत अधिक व्यापक जीवन कवेत घेतात ते किंवा समाजविषयक पुढे नाणारे सिद्धांत व विचार जे मांडतात त्यांना विद्रोही लेखक-विचारवंत म्हणता येईल. हे अ. भा. साहित्य संमेलनालाही लागू पडते. परंतु वास्तव काय आहे? 

 

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांचेही म्हणणे आहे की ही चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी साहित्य-संस्कृती आणि विचारधारेचा पुरस्कार करते. परंतु म. फुले यांचे ग्रंथकार सभेला लिहिलेल्या पत्रापासून “प्रेरणा” घेत आजतागायत विद्रोही म्हणवणाऱ्या सहित्यिक-विचारवंतांची काय अवस्था आहे? त्यांचे विचार-साहित्य आणि त्यांचे वास्तवातील वर्तन यात किती साम्य आहे? अपवाद सोडले तर आपल्या हाती या निकषांवर चर्चा केल्यानंतर निराशाच हाती येईल. अखिल मानवांचे हित व्हावे असे तुमच्या ग्रंथांत काय आहे हा प्रश्न आजच्याही अखिल भारतीय संमेलनात सामील होणाऱ्या लेखक-कवींना विचारता येईल आणि त्याचे उत्तर आजही कोणाकडे आहे असे दिसत नाही.

 

समतावाद हा अत्त्यंत सुंदर शब्द आहे हे मान्य होण्यास प्रत्यवाय नसावा. पण हा समतावाद केवळ जातीवर आधारित आपला गोतावळा गोळा करत असेल तर त्यांना समतावादी कसे म्हणता येईल? की एखाद्या वर्गाला, जातीला किंवा धर्माला आपल्या वंचनेचे कारण मानत त्यावर सातत्याने अनाभ्यासी टीका करत वर्तमानात आणि भविष्यात समता अस्तित्वात आणण्यासाठी आणि भविष्यातील समाज कसा असावा यावर अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय अंगानेही विचार करत नवी मांडणी करता येत नसेल किंवा आजवर करता आली नसेल तर त्याला ‘विद्रोह’ हा शब्द कसा वापरता येईल. हे वंचित राहू इच्छिणाऱ्या वंचितांचेच संमेलन आहे असे का म्हणता येणार नाही?   

 

शाहू, फुले आंबेडकर हे विद्रोही व पुरोगामी म्हणवणाऱ्या मंडळीचे आराध्य आहे व त्यांच्याच विचारांचे अनुसरण करत ही मंडळी चालत असते. किंबहुना शाहू-फुले-आंबेडकरांचे हे पुरोगामी राज्य आहे असेही वारंवार, अगदी राजकीय पटलावरूनही उद्घोषित होत असते. महाराष्ट्रात सामाजिक चळवळी नव्या नाहीत. असे असूनही सामाजिक वास्तव मात्र वेगळे आहे आणि आज तर ते पार बदललेले आहे हे वास्तव स्वीकारायची आणि जबाबदारी घ्यायची यांची तयारी आहे काय? समाजातील अगदी जातीभेद मोडण्याचीही क्रांती यांना करता आली नाही. किंबहुना अगदी जातीअंताच्या चळवळी करणार्यांच्या सभांतील वक्त्यांची आधी जात सांगितली जाते. हे कसले जातीअंत करण्याचे लक्षण आहे? जाते सोडा, पोटजातीन्चेही निर्मुलन ही मंडळी करण्यात घोर अपयशी ठरली आहे. मुळात विद्रोहाचा आधारच जर जात-धर्म असेल तर दुसरे काय होणार? महात्मा फुलेंनी व नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजव्यवस्थेसाठी अर्थ-सिद्धांत बनवत वंचित समाजसापेक्ष मांडणी केली होती. शाहू महाराजांनीही शेतकी आणि औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष क्रांती केली. आर्थिक उन्नती हा मानवाच्या सांस्कृतिक स्वातंत्र्याच्या उद्गारास कारण ठरतो हे सर्वच शा.फु.आ. उद्घोष करणारे विसरून गेले. खरे तर शाहू, फुले आणि आम्बेडकरांच्या पुढे या मंडळीने एकही पाउल टाकले नाही, उलट मागे मागेच सरकत जात आपले नैतिक स्वास्थ हरपून बसल्याचे दिसून येईल. असे असतांना सर्व समाज शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा (म्हणजे समतावादी, अर्थवादी आणि भविष्यवादी) बनेल आणि या तिघांचे नाव घेतले तर आपल्या मागे येईल असा खुळचट विचार जन्माला येउच कसा शकतो.

 

हे कधी झाले असते? जर या चळवळीतील सामाविष्ट घटकांनी या तिघांना सोयीचे तेवढे न स्वीकारता त्यांच्या विचारांत आधुनिक परिप्रेक्षात भर घालून म. फुले म्हणाले त्याप्रमाणे अखिल मानवहिताची भूमिका घेत नवी साहित्य संस्कृती आणि समाज संस्कृती घडवण्यासाठी आपले विचार व लेखण्या झिजवल्या असत्या तर! केवळ अखिल भारतीय साहित्य संमेलन समाजातील एकाच विशिष्ट घटकाचे प्रतिनिधित्व करते, ते आपल्याला स्थान देत नाही म्हणून जर विद्रोही साहित्य संमेलन भरवले जात असेल तर मुळात हेतूच दांभिक असल्याने सामाजिक परिवर्तनात ते काही मोलाचा वाटा उचलू शकले असे आजवर तरी दिसले नाही. हे महात्मा फुलेंच्या अपेक्षेच्या विपरीत नाही काय? विद्रोही म्हणवणारे ग्रंथकार उदंड झाले...पखालींचे भारवाही झाले एवढेच काय ते म्हणता येईल.  

 

समाजात विद्रोहाची आवश्यकता असतेच. विद्रोह हा कोणत्या जाती-धर्म वा वंशाचा कोणत्यातरी अन्य जाती-धर्म किंवा वंशाविरुद्ध नसतो. विद्रोह आधी स्वत:विरुद्ध, आणि नंतर समाजातील जेही काही अनिष्ट आहे, कालसुसंगत वा प्रागतिक नाही त्याविरुद्ध असतो. विद्रोहाची संकल्पनाच जातीनिष्ठ करून टाकली गेल्याने काय अनर्थ झाला आहे हे कोणाच्या लक्षात येईल तो सुदिन.

 

आणि “प्रस्थापितांच्या, पुरुषवर्चस्ववादी, ब्राह्मणी, भांडवली. विषमतावादी सांस्कृतिक विचारांचा विषारी प्रचार-प्रसार करणाऱ्या संस्था, संघटना व संमेलनाच्या विरोधात भूमिका घेण्याचा फुले-आंबेडकरांचा संदेश मानून आपण विचार व संघटीत कृती केली पाहिजे.” असे आमीन शेख (राज्य कार्यकारिणी सदस्य, विद्रोही सांस्कृतिक चळवळ) हे २०२३ च्या वर्धा साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरील एका लेखात म्हणतात. त्यांच्या विवेचनातील प्रत्त्येक मुद्द्यावर स्वतंत्र तात्विक्ज प्रतिवाद करता येईल, पण पुरुषवर्चस्वतावाद किंवा भांडवली व विषमतावादी व्यवस्था जर ब्राह्मणी (म्हणजेच वैदिक) संस्कृतीची उपज असेल तर ती इतरांनी कशी स्वीकारली आणि आजही ती तशीच्या तशी का आहे, त्याविरुद्ध स्वसमाजात कोणत्या समतावादी नव्या विचारप्रेरणा रुजवल्या हाही प्रश्न विचारता येईल. किंबहुना जी स्थिती ओढवली आहे तिचे ऐतिहासिक समाजशास्त्रीय विवेचन तरी केले आहे काय हा प्रश्नही विचारता येईल. आणि भांडवली म्हणायचे तर मुळात जातीच व्यवसायांतून निर्माण झाल्या,  आपत्तीच्या काळात व्यवसाय सुरक्षित राहावेत, स्पर्धा होऊ नये म्हणून जाती बंदिस्त केल्या गेल्या. ही भांडवलशाही नव्हती काय? भांडवली व्यवस्थेविरुद्ध बोलायला साम्यवाद्यांना आवडते हे गृहीत धरले तरी साम्यवादाचे एकाधिकार भांडवली व्यवस्थेतच अंतत: रुपांतर होते हे साम्यवाद्यांच्या लक्षात येत नाही काय आणि अशी एकाधिकारशाही (म्हणजेच सरकारी) असलेली भांडवलशाही त्यांना स्वीकारार्ह आहे काय? साम्यवाद मानवी स्वातंत्र्याचे अपहरण करणारा सर्वात दुष्ट घटक आहे यावर त्यांनी कधी विचार केला आहे काय?

 

थोडक्यात विद्रोहीन्ना मुळात विद्रोहाची व्याख्या काय आहे हे समजावून घ्यावे लागेल. स्वत:च्या तत्वज्ञानाची सखोल मांडणी करावी लागेल आणि दिशा ठरवावी लागेल. अन्यथा त्याला केवळ विरोधासाठी विरोध असे रूप प्राप्त होईल आणि ते तसे होतही आहे.

 

अ.    भा. साहित्य संमेलन

 

वरील विवेचनाचा अर्थ असा मुळीच नाही कि अ. भा. मराठी साहित्य संमेलन व त्यात सहभागी होणारे साहित्यिक मराठी समाजाच्या साहित्यिक जाणीवा वाढवण्यासाठी आणि वाचकांना विचार प्रगल्भ करण्यासाठी कितपत उपयुक्त ठरले आहे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नकारार्थी येईल. गेली ९७ वर्षे सतत भरत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने वाचक व नवे साहित्यिक घडवणे, काळानुसार बदलणाऱ्या साहित्यिक प्रेरणांचे अवगाहन करत आधुनिक काळातील बदलत असलेल्या अभिव्यक्तीच्या साधनांनाही पारंपारिक साहित्य प्रवाहात सामाविष्ट करून घेणे अशी कामे तर कधीच हातात घेतली नाहीत. संमेलनाला केवळ उत्सवी व दिखाऊ रूप राहिले. तात्विक-साहित्यिक वाद-विवाद होत व्यापक विचारमंथन होण्याऐवजी हा परस्परांचे उणे-दुणे काढण्याचा सोहोळा बनला. आजवरची साहित्य संमेलने अपवाद वगळता साहित्यबाह्य कारणांमुळेच गाजलेली आहेत. समाजापुढे नव्या साहित्य संकल्पना मांडण्याऐवजी गतकाळाच्या नावाखाली स्व-गुणगान गात बसण्याची कुप्रथाच यामुळे सुरु झाली. सामाजिक प्रश्नांशी आपले काही देणे-घेणे आहे याचे भान तर कधीच आले नाही. आले तर ते केवळ ठरावांपुरते बासनात बांधून ठेवण्यासाठी.

 

 

मराठी साहित्य संस्कृतीचे बनलेले एक अविच्छिन्न लक्षण म्हणजे त्यातील जातीयवाद! या बाबतीत विद्रोही आणि अ.भा.म.सा.सं. हातात हात घालून चालतात असेच चित्र दिसून येईल. अखिल भारतीय साहित्य संमेलन कोणत्याही विचारप्रभावात होऊ नये अशी अपेक्षा असली तरी तसे होत असते. कारण मुळातच साहित्यिक या जातीय वा प्रतिगामी विचारप्रभावांचे बळी असतात असेही साधारणपणे दिसून येईल. जातीयवाद लेखकांच्या विविध कंपुंत जसा आहे तसाच तो समीक्षकांमद्ध्येही आहे. किंबहुना कोणत्याही साहित्यिकाची साहित्य समीक्षा करतांना अथवा करायला लावतांना त्यामागे जातीय संदर्भ नाहीत असे क्वचितच घडते. अनेक उत्तमोत्तम साहित्यिक केवळ जातीय पाठबळ नसल्याने अथवा कोणा कंपुंत सामील न झाल्याने हयातीतच साहित्यबहिष्कृत झाले आहेत हे आपण मराठी साहित्याचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल. साहित्यिकच मुळात बव्हंशी जातीय प्रेरणांनी ग्रसित असल्याने त्याचे प्रतिबिंब जसे त्याच्या साहित्यात पडते तसेच या सर्व साहित्यिकांच्या साहित्य संमेलनांवरही पडणे स्वाभाविक आहे. अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलनावर "हे संमेलन ब्राह्मणी आहे..." असा आरोप पुर्वीपासुन होत आला आहे. म्हणजे अध्यक्ष जरी कोणत्याही जातीचा असला (खरे तर ठरावीकच जातींचे) तरी एकुणातच संमेलनावर ज्या विषयांचा व चर्चकांचा प्रभाव राहत आला आहे हे पाहता या आरोपाला पुष्टीच मिळत आली आहे. अगदी पूर्वी होत असलेल्या संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतही उमेदवाराची "जात" हाही एक घटक छुपेपणाने कार्यरत असायचा हे गुपित राहिलेले नव्हते. आता केवळ सहानुभुती वा आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी अधुन मधुन दलित वा मुस्लिम लेखकाची अध्यक्षपदी निवड घडवून आणने किंवा नेमणे या आरोपातून कशी सुटका करायची हेही ठरवावे लागेल.

 

किंबहुना मराठी साहित्याची ब्राह्मणी, मराठा, ओबीसी व दलित अशी जातीय विभागणी झालेली आहे. मराठा समाजही त्यांचे साहित्य संमेलन स्वतंत्र आयोजित करतो. ओबीसींचेही आता, दुबळे असले तरी, स्वतंत्र साहित्य संमेलन भरु लागले आहे. ओबीसींतील काही मोठ्या जातीही साहित्य संमेलन घेत आल्या आहेत. फारशा चर्चेत राहिले नसले तरी आगरी समाजाचे साहित्य संमेलन गेली १५-१६ वर्ष भरत आले आहे. मुस्लिम, गुराखी व आदिवासींचीही साहित्यसंमेलने होतात....यामागील सामाजिक व साहित्य प्रेरणा नेमक्या कोणत्या याचा अभ्यास कधी होईल?

बरे, हे काम करणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नाही हे महामंडळाचे म्हणणे मान्य केले तरी प्रश्न हा राहतोच की किमान अशा व्यापक समाज-साहित्यिक प्रश्नांवर विचारमंथन घडून येईल असे परिसंवाद तरी ठेवता येतील की नाही? आज जागतिकीकरणाने झपाट्याने जी सामाजिक  उलथापालथ होते आहे तिचे प्रतिबिंब साहित्य संमेलनात पडणार तरी आहे की नाही? किंबहुना साहित्यिक तरी त्यात पुढाकार घेत आहेत काय?

 

 

स्वसंतुष्टता ही साहित्यिकांची प्रवृत्ती का बनते आहे? खरे म्हणजे अपवाद वगळता मराठी साहित्य ही खरेच सुमारांची जत्रा बनली आहे. आंतरराष्ट्रीय सोडा, राष्ट्रीय पातळीवरही मराठी लेखक अभावानेच तळपले आहेत. कारण यांची साहित्य दृष्टी वैश्विक नाही. यांच्या जीवनप्रेरणा मुक्त नाहीत. मानवी दु:खाचा, त्याच्या अविरत संघर्षाचा तळगर्भ पकडत त्यातून वैश्विक कलाकृती निर्माण करण्याची प्रतिभा त्यांच्या ठायी नाही. राजकारण व समाजकारण यावर प्रखर भाष्य करत समाजाला नवी दिशा, विचार व तत्त्वज्ञान देता येईल, अशी मुळात यांच्यात तशी क्षमता आहे असेच दिसत नाही. त्यामुळे समाजमनावर आज या साहित्यिकांचा कसलाही व्यापक प्रभाव नाही.

 

साहित्य संमेलन म्हणजे आपल्या जीवन विषयकच्या धारणांचा जागर असतो. समग्र मानवी जगण्याचे चित्रण करत मनुष्याला त्याचा आरसा दाखवत भविष्याचे दिशादिग्दर्शन करणे हा साहित्याचा मुख्य हेतू असतो. हेतुशिवाय लिहिले गेलेले साहित्यही अप्रत्यक्षरित्या हेच हेतुबद्ध कार्य करत असते. त्यामुळे साहित्याचे प्रयोजन काय हा प्रश्न तसा निरर्थकच ठरतो. प्रत्येक लेखकाचे साहित्य हे त्या लेखकाचे समाजविषयकचे, स्वत:बद्दलचे आकलन याचा कलात्मक आविष्कार स्वरुपात असल्याने त्यातच त्याचे साहित्य विषयकचे प्रयोजन स्वयंसिद्ध असते. त्याचा दर्जा काय हे वाचक आणि समीक्षक ठरवतील, पण प्रत्येक साहित्यकृतीचे व साहित्त्यिकाचे लेखनकार्य सूप्त अथवा जागृत स्वरुपात काही ना काही प्रयोजन घेऊनच होत असते. असे असले तरी आज मराठी साहित्याचे प्रयोजन आजच्या सहित्यातून काय दिसते हे पाहिले तर एकुणच साहित्यिकांच्या आकलन-मर्यादांची प्रकर्षाने जाणीव होते हे मान्य करावेच लागेल.

 

थोडक्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही दोषांपासून अलिप्त नाही. या संमेलनांतून काहीतरी भरीव निष्पन्न झाले आहे असा या संमेलनांचाही इतिहास नाही. मराठी साहित्य संस्कृती खुरडत चालली आहे याचे कारण नेमके यात आहे. म. फुले यांचे विधान अखिल भारतीय साहित्य साम्मेल्नानेही गांभीर्याने घेतले पाहिजे. सर्वांचे हित होईल असे आमच्या साहित्यात अद्यापही काहीच का येत नाही, तेही पुराणपंथीच का राहते आहे? भविष्यवेधी साहित्यिक उद्गार आमच्याकडे क्वचितच का उठतात? वर्तमान आमच्या साहित्यिकांच्या कवेत का येत नाही? आम,ही आजही काही विशिष्ट व्यक्तींचे साहित्यिक देव्हारे उभे करून ते म्हणजेच साहित्यिक आणि त्यांनी लिहिले तेच साहित्य असे स्वत:च्या सोयीचे मापदंड का उभे करत आहोत?  जी. ए. कुलकर्णी यांनी सांगीतलेल्या एका बोधकथेचा मतितार्थ असा होता...”आम्ही विशिष्ट झाडाची उंची हाच मापदंड बनवून त्यापेक्षा उंच झाडांचे शेंडे छाटून टाकण्यातच धन्यता मानतो.”

 

माझ्या मते अखिल भारतीय साहित्य संमेलनही असेच करत आहे. बदलाची गरज आहे. परिवर्तन हा सृष्टीचा मुख्य गुणधर्म असेल तर नक्कीच. विद्रोही आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही नाव सृजनाचा प्रोत्साहक घटक बनणार नसेल तर ती राहिली काय किंवा न राहिली काय, वाचकांना काय फरक पडतो.

 

दिल्ली येथे होत असलेले साहित्य संमेलन अनेक बाबीत बदल घडवून आणू शकते. विद्रोही साहित्य संमेलनाला स्वत: खुले निमंत्रण देऊन संजय नहार यांनी चांगला पायंडा पाडला होता. या निमंत्रणाचा स्वीकार झाला असता तर साहित्य क्षेत्रात एक नवी वाट बनू शकली असती, पण तसे हा लेख लिहीपर्यंत तरी झालेले नाही. हे संमेलन दिल्लीत होणार असल्याने याचे एक वेगळे महत्व आहे. किमान येथेतरी साहित्यिक स्वमग्नतेच्या भूमिकेतून बाहेर पडत वैश्विक जरी नाही होऊ शकले तरी किमान राष्ट्रीय दृष्टीचे होतील ही अपेक्षा!

 

-संजय सोनवणी 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

विद्रोह मेला आहे!

  “पारंपारिक विचार , सिद्धांत आणि जगण्याच्या पद्धतीला आव्हान देत नवे विचार सकारात्मक परिवर्तनाच्या भावनेने जे मांडतात त्यांनाच विद्रोही म्हट...