Friday, August 15, 2025

अब्बक्काराणी चौता

 


बलाढ्य पोर्तुगीज आरमाराला धडा शिकवणारी अब्बक्काराणी


अब्बक्काराणी चौता-   (कारकीर्द- १५२५ ते १५७०) चौता या राजघराण्यात जन्म घेतलेली अब्बका ही १५२५ मध्ये सत्तेत आली. चौता घराणे हे तुळूनाडू भागात राज्य करत होते. या घराण्याचा इतिहास बाराव्या शतकापासून सुरु होतो. तो थोडक्यात असा-

कर्नाटकाच्या आणि केरळमधील तुळूभाषिक प्रदेशाला तुळूनाडू या नावाने ओळखले जाते. कर्नाटकातील दक्षिण कॅनरा व उडपी आणि केरळ मधील कासारगोड हे जिल्हे या प्रदेशात येतात. मध्ययुगामध्ये  तुळूनाडू भागावर ज्या घराण्यांनी राज्य केले, त्यात चौता हे घराणे महत्वाचे आहे. चौता हे जैन धर्मीय होते. या घराण्याने इसवी सन ११६० ते १८६७ या काळात या भागात तब्बल ७०० वर्ष राज्य केले. चौता घराणे राज्यावर येण्याअगोदर या भागावर होयसळ घराण्यातील विष्णूवर्धन या  राजाचे राज्य होते. वास्तविक पहाता विष्णूवर्धन याची सत्ता स्थापन होण्या आधीही येथे चौतांच्या पूर्वजांचेच राज्य होते. 

विष्णूवर्धनाच्या मृत्युनंतर इसवी सन ११६० मध्ये तिरूमल राया (पहिला) याने हे राज्य परत मिळवले, आणि या भागावर चौतांची सत्ता पुन्हा स्थापन झाली. तिरूमल राया उल्लाळ जवळील सोमेश्वर या गावातून राज्य कारभार करत असे.  तो धर्माने जैन असला तरी सोमेश्वर या गावाचे ग्रामदैवत सोमनाथ हे होते. त्यामुळे या राजाने हे ग्रामदैवत आपले कुलदैवत म्हणून स्वीकारले.

तिरूमल राया (पहिला)  हा ११७९ मध्ये मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा जावई चेन्नराया (पहिला) हा गादीवर आला. चेन्नरायाचा जावई वरदैय्या हा अतिशय हुशार प्रशासक आणि पराक्रमी सेनापती होता. तो महत्वाकांक्षी होता. त्याने राज्याचा विस्तार करण्यासाठी खास सैन्य उभे करायला सुरवात केली. त्याचा हा बेत पाहून शेजारच्या बल्लाळ राजाने चौतांच्या राज्यावर आक्रमण केले. या लढाईत वरदैय्याने बल्लाळ राजाचा पराभव केला व त्याचे राज्य चौता राज्याला जोडून टाकले. या विजयाने आणखी बळ  येवून वरदैय्याने शेजारच्या दोन राज्यांवर आक्रमण करून ती जिंकली व चौता राज्याला जोडून टाकली. त्याचवेळी आता आपली पाळी  आहे हे ओळखून मिजाराचा राजा चेन्नाप्पा याने चौता राज्यावर आक्रमण करायचे ठरवले. चेन्नरायाला ही बातमी कळाली आणि त्याने मिजारावर मोठे आक्रमण केले. यात चेन्नाप्पाचा पराभव झाला. त्याचे राज्यही चौतांच्या राज्यात विलीन करण्यात आले.

अशा रीतीने चेन्नराया (पहिला) याच्या काळात त्याने आणि त्याचा जावई वरदैय्या याने बराच राज्य विस्तार केला.  राज्याचा विस्तार केल्यावर चेन्नराया पहिला याने प्रशासन, महसूल, संरक्षण व्यवस्था यात बऱ्याच सुधारणा केल्या. राज्याची संरक्षण  व्यवस्था मजबूत करण्यासाठी त्याने एक विशेष आदेश  काढला. त्या आदेशानुसार त्याने युद्धाच्या काळात राज्यातील प्रत्येक घरातून एक पुरुष सैन्यात भरती होणे सक्तीचे केले.

चेन्नराया पहिला याच्या मृत्युनंतर (इ.स. १२१९) त्याचा जावई वरदैय्या राजा झाला. राज्याभिषेकानंतर तो चौता देवराया या नावाने ओळखला जावू लागला.

चौता घराण्याच्या सातशे वर्षाच्या इतिहासात एकूण २० व्यक्तींनी राज्य केले. या घराण्याचे वैशिष्ठ्य म्हणजे हे मातृसत्ताक होते. ही मातृसत्ताक पद्धत जरा वेगळ्या प्रकारची  होती. या पद्धतीला ‘अलियासंताना’ असे म्हटले जात असे. राजाचा मुलगा हा राज्याचा वारसदार होत नसे, तर मुलीचा पती, मुलगी, सून,  भाचा, भाची यांच्यापैकी कोणीतरी राज्याचा वारसदार होत असे. सून ही सहसा भाची असे, कारण या भागात मामाच्या मुलीशी लग्न करण्याची पद्धत होती, अजूनही आहे. चौता घराण्यात गादीवर आलेल्या २० व्यक्तींपैकी ११ जण राजे तर ९ राण्या होत्या. या नऊ राण्या त्यांच्या आधी गादीवर असणाऱ्याच्या एकतर मुली होत्या, किंवा सून झालेल्या भाच्या होत्या.

 

या चौता घराण्यात सोळाव्या शतकात अब्बक्का ही पराक्रमी राणी होऊन गेली. ती तिरूमलराया तिसरा याची भाची होती. बंगा लक्ष्मप्पा आरासा (दुसरा) हा तिचा पती होय. तिरूमलरायाने तिला एखाद्या राजकुमारीला आवश्यक अशा राजनीती, धनुर्विद्या, तलवारबाजी, घोडेस्वारी वगैरे  गोष्टींमध्ये प्रशिक्षण दिले. तिरूमलरायानंतर ती सन १५२५ मध्ये चौता घराण्याची प्रमुख बनली.

 

सत्तेवर आल्यानंतर तिने उल्लाळ या बंदराचा विकास करण्याचे कार्य हाती घेतले आणि मसाल्यांचा व्यापार वाढवला. तिने अरब व्यापारी व कालिकतचा राजा झामोरीन यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले. मलबार किनाऱ्यावरील व्यापार वाढवला. समुद्रकिनाऱ्यावरील संरक्षक ठाणी मजबूत केली. स्थानिक व्यवसायांना उत्तेजन देऊन उत्पादन व व्यापार वाढवला.

 

अब्बक्का राणी सत्तेवर आली तेंव्हा पोर्तुगीजांचे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आगमन झाले होते. पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किना-यावर पाय ठेवल्यावर आपल्या बलाढ्य आरमाराच्या जोरावर सागरी मार्गावर आपले नियंत्रण स्थापित करायला सुरुवात केली. सन १५२५ मध्ये त्यांनी मंगलोर बंदरावर हल्ला चढवला. उल्लाळ हे त्या काळात भरभराटीला आलेले व्यापारी बंदर होते. तेव्हा दक्षिण भारताच्या पश्चिम किना-यावरून इराण व अरब देशांकडे मसाल्याचे पदार्थ, तांदूळ, कापूस, कापड वगैरे माल निर्यात होत असे. पोर्तुगीजांनी या निर्यातीवर बंधने घातली. पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राजे आणि व्यापारी यांना कळवले की त्यांनी हा सर्व माल पोर्तुगीजांनाच ते ठरवतील त्या भावाने विकायला पाहिजे, आणि पोर्तुगीज स्वत: हा सर्व माल निर्यात करतील.  शेतकऱ्याकडून पडेल किमतीला विकत घेवून तो खाडीतील देशांमध्ये तो प्रचंड किमतीला विकायचा आणि भरमसाठ नफा कमवायचा त्यांचा हेतू होता.  

 

ही बंधने शेतक-यांच्या दृष्टीने आणि राज्याच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने धोकादायक होती. त्यामुळे अब्बक्का राणीने ही बंधने झुगारून लावली आणि  पोर्तुगीजांना न जुमानता तिने कालीकतचा राजा झामोरीन याच्या मदतीने मसाला व इतर पदार्थ भरलेली जहाजे आखाताच्या दिशेने रवाना केली. तिच्या या कृतीने खवळलेल्या पोर्तुगीजांनी तिच्या विरोधात सन १५५५ मध्ये युद्ध पुकारले. पण पराक्रमी व धाडशी अब्बक्काने पोर्तुगीजांना चांगलाच धडा शिकवला. आपल्या कृतीमुळे पोर्तुगीज चिडतील याचा तिला अंदाज होताच. तिच्या उल्लाळ या बंदरावर हल्ला करणा-या पोर्तुगीज जहाजांना  अब्बक्काच्या आरमारी नावांनी घेरले आणि पोर्तुगीजांना शरण यायला भाग पाडले. अब्बक्काच्या आरमारी सैनिकांनी पोर्तुगीजांची चार जहाजे जप्त केली. या युद्धात तिला केळाडीचा राजा व्यंकटाप्पा नायक आणि कालीकतचा राजा झामोरीन यांनी मदत केली. पुन्हा पोर्तुगीजांनी सन १५५७ मध्ये उल्लाळ बंदरावर हल्ला केला पण तोही परास्त करण्यात राणी अब्बक्काला यश मिळाले.

 

कर्नाटकाच्या पश्चिम किनारपट्टीवरील उल्लाळ (दक्षिण कर्नाटक)  ही अब्बकाची राजधानी होती.  चिडलेल्या पोर्तुगीजांनी पुन्हा इ.स. १५६८ मध्ये उल्लाळ वर पुन्हा एकदा हल्ला केला. यावेळी पोर्तुगीज एवढ्या तयारीत होते की या मोहिमेत पोर्तुगीज जनरल जो पिक्सेतो आणि पोर्तुगीज आरमाराचा प्रमुख एडमिरल मस्कारहान्स या दोघांनी स्वत: भाग घेतला. पोर्तुगीज सैनिकांनी उल्लाळ शहर ताब्यात घेतले. त्यांनी उल्लाळमधील घरांना आगी लावल्या, मंदिरांची नासधूस केली. जनरल जो पिक्सेतो स्वत: आपल्या सैनिकांसह अब्बक्काच्या राजवाड्यात घुसला. पण अब्बक्का राणी तेथून अगोदरच शिताफीने निसटली होती. तिने राजधानी बाहेरच्या एका मशिदीमध्ये आश्रय घेतला होता. रात्रीच्या वेळी तिने आपल्या निवडक २०० सैनिकांना घेवून पुन्हा उल्लाळमध्ये प्रवेश केला आणि पोर्तुगीज सैन्यावर हल्ला केला. गनिमी पद्धतीने केलेला हा हल्ला इतका भयानक होता की या हल्ल्यात जनरल जो पिक्सेतो आणि त्याचे ७० सैनिक ठार झाले, अनेक सैनिक पळून गेले. त्याच वेळी उल्लाळमध्ये एडमिरल मस्करहान्स आणि त्याच्या नौसैनिकांवर अब्बक्काच्या सैनिकांनी जबरदस्त हल्ला केला. या हल्ल्यात एडमिरल मस्कारहान्स आणि त्याचे बहुतेक सगळे सैनिक ठार झाले. 

 

या घटनेच्या पुढच्याच वर्षी राणी अब्बक्काने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या मेंगलोर किल्ल्यावर आपल्या ६००० सैनिकांसह हल्ला केला. या वेळी पोर्तुगीजांना किल्ला सोडून पळ  काढावा लागला. 

 

त्यानंतर पुन्हा काही काळात पोर्तुगीज आरमार उल्लाळच्या समुद्र किना-यावर येवून उभे राहिले. योग्य संधी मिळताच पोर्तुगीज नौसैनिक उल्लाळवर हल्ला करणार होते. पण अब्बकाच्या चाणाक्षपणामुळे पोर्तुगीजांचा हा बेतही त्यांच्या अंगलट आला. अमावस्येच्या अंधा-या रात्री अब्बक्काचे आरमारी सैनिक आपल्या होड्यांतून पोर्तुगीज युद्धनौकांजवळ  पोहोचले. सूचना मिळताच त्यांनी त्या युद्ध नौकांवर आगीचे शेकडो गोळे फेकले. युद्धनौकांनी पेट घेतला आणि पोर्तुगीज सैनिकांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उद्या घेतल्या. अर्थातच ते अब्बक्काच्या आरमारी सैनिकांच्या तावडीत सापडले. पोर्तुगीज रेकॉर्डनुसार या हल्ल्यात पोर्तुगीजांच्या २ युद्धनौका जळून समुद्रात बुडाल्या, आणि दोनशे नौसैनिक ठार झाले. 

 

हा पोर्तुगीजांना मोठा धक्का होता. पण दुर्दैवाने अब्बक्काचा पती बंगा लक्ष्मप्पा आरासा (दुसरा) आपल्या पत्नीवर नाराज झाला आणि त्याने पोर्तुगीजांशी हातमिळवणी केली. मंगलोर आणि कुंडापूर पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. तिच्या पतीच्या मदतीने पोर्तुगीजांनी उल्लाळवर हल्ला चढवला पण अब्बक्काने युद्ध सुरूच ठेवले. झामोरीन राजाशी ठेवलेला राजकीय संबंध तिच्या कामी आला. झामोरिनचा सेनापती कुट्टी पोकर मारकर तिच्या मदतीला आला. त्याने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला मंगलोर किल्ला उध्वस्त केला पण तो स्वत: या युद्धात मारला गेला. पतीच्या विश्वासघाtताने अब्बक्काची हार झाली व तिला कैद करण्यात आले. कैदेत असताना तुरुंगातही तिने बंड केले त्यात तिचा लढतांना मृत्यू झाला. 

 

अब्बक्काचे हे सगळे पराक्रम थक्क करणारे आहेत. तिच्या पराक्रमाची चर्चा त्या काळात युरोप, अरब देश आणि इराण येथेही झाली. अब्बक्काचे सैन्य छोटे असले तरी लढाऊ आणि प्रशिक्षित होते. तिच्या आरमारी सैन्यात प्रामुख्याने मुस्लिम आणि कोळी या समाजातील सैनिक होते, तर जमिनीवरील सैन्यात जैनांसह सर्व समाजातील सैनिक होते. तिच्या शस्त्रास्त्रांमध्ये 'आग ओकणारे बाण' हे एक वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र होते असे लोककथा नमूद करतात. 

 

अब्बक्का राणी ही युरोपिअन वसाहतवाद्यांच्या विरोधात आरमारी युद्ध करणारी  पहिली भारतीय होती. तिने पोर्तुगीजांच्या राजकीय आणि व्यापारी महत्वाकांक्षेला आळा  घातला. त्यामुळे अब्बक्का असेपर्यंत पोर्तुगीजांना कर्नाटकात आपले पाय रोवता आले नाहीत.

अब्बक्काचे कार्य फक्त या राज्याच्या रक्षणापुरतेच मर्यादित नव्हते. ती प्रजावत्सल राणी होती. तिने आपल्या राज्यात शेतक-यांच्या उपयोगासाठी बंधारे बांधले. मल्लाळी (बागलकोट जिल्हा) येथील बंधाऱ्याचे कार्य तिच्या देखरेखीत पार पडले. इतरही अनेक समाजोपयोगी कामे केली.  युद्धायमान जीवन जगत असतांना तिने आपल्या राज्यातील अनेक जैन मंदिरांचा जीर्णोद्धार केला तसेच जैन धर्मसाहित्याचे तुळू भाषेत अनुवाद करून घेतले. स्थापत्य कलेचाही तिच्या कार्यकाळात विकास झाला.

आधी अब्बक्का राणीबद्दल जगाला फारशी माहिती नसली तरी कर्नाटकात ती अनेक लोककथांचा भाग बनली होती. यक्षगानातून तिचा इतिहास लोकांनी जिवंत ठेवला होता. लोककथांनुसार तिला दोन मुली होत्या व त्याही पराक्रमी होत्या.  नवीन संशोधनातून तिच्याबद्दल बरीच ऐतिहासिक माहिती उजेडात येवू लागली आहे. त्याची दखल घेवून भारताच्या तटरक्षकदलाने खाड्यांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या पाच जहाजांपैकी  पहिल्या जहाजाचे नाव ‘राणी अब्बक्का’ असे ठेवले आहे. कर्नाटकमध्ये आता दरवर्षी राणी अब्बक्का उत्सव साजरा होतो. अब्बक्का राणीच्या नावाने एक वस्तू संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. तसेच तुळू  भाषेच्या अभ्यासासाठी 'राणी अब्बक्का तुळू अध्ययन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. तिच्या नावाने पारितोषिके आणि शिष्यवृत्त्याही दिल्या जातात. उल्लाळ व बेंगळूरू येथे अब्बक्का राणीचे पुतळेही उभारण्यात आले आहेत.

 

 

 

संदर्भ-

१.      “Queen Abbakka’s triumph over western colonies”. Press Information Bureau, Govt., of India. Retrieved 25 July 2007.

२.     The intrepid Queen-Rani Abbakka Devi of Ullal”, Archived from the original on 7 August 2007. Retrieved on 09/04/2025

३.     “Freedom Fighter of the Coast, RANI Abbakka, Wordpress. 1 July 2007

४.     P.B. Desai (1970). Cultural History of Karnataka. Karnatak University. p. 357.

५.     S. Chandni (2018). Medieval Karnataka. University Press. pp. 156–158

६.     Kumar Mishra, Kailash (January 2002).”Abbakka Rani a; The Unsung Warrior Queen”, Indira Gandhi National Centre for the Arts.

 



 

 

No comments:

Post a Comment

Sanjay Nahar: A Man Who Works in India's MOST troubled zones!

  Sanjay Nahar   A Man Who Works in India's MOST troubled zones! By Sanjay Sonawani           India requires numerous socio-economic r...