Sunday, September 14, 2025

दत्तक घ्यायची गोष्ट...

 दुस-या दिवशी “स्वीट सरेंडर” या गाण्यावर शुटींग सुरु झाले ते पाचगणीच्या टेबल टॉपवर. क्रेन, ट्रॉली असा शूटिंगला लागणारा सर्व सरंजाम होता. मिलिंद गुणाजी आणि शर्वरी जमेनीससह सारे शुटींगमध्ये व्यस्त झाले. मी काही वेळ उत्सुकतेने पहिले पण नंतर कंटाळलो. तेवढ्यात एक दहा-बारा वर्षाचा मुलगा माझ्याजवळ आला आणि माझ्याशी गप्पा मारू लागला.

तो मुलगा स्ट्रीटस्मार्ट होता. चुनचुनीत होता. त्याच्याकडे ऐकीव आणि अनुभवातले ज्ञान खूप होते. मला हा मुलगा लोकांना जोतिष सांगत किंवा या भागाचा गाईड म्हणून काम करत पोट भरतो हे काही सहन झाले नाही.
मी त्याला दत्तक घ्यायचे ठरवले.
तो अनाथ आहे, त्याला जर आसरा मिळाला, योग्य शिक्षण मिळाले तर हा मुलगा नाव काढेल याचा मला विश्वास वाटला.
आणि त्याला मी तसे सांगितलेही. तो खुश झाला. त्याच्या डोळ्यात चमकलेला आनंद मला समाधान देऊन गेला.
मग मी घोडेस्वारी करायचे ठरवले. घोड्याच्या रिकिबीत पाय ठेवून वर चढतांना मी दानकण आपटलो. अंग शेकून निघाले असले तरी माझा उत्साह कमी नव्हता. त्या लोकेशनला माझा एकच शॉट होता. तो मी प्रसन्न चेह-याने दिला. आम्ही तेथून निघालो पण त्या मुलाला मी सोबतच ठेवले.
तोवर माझा बॉडीगार्ड रवी गायकवाडही तेथे येऊन धडकला. मी त्याला चकवून आलो होतो. पण तो त्याची ड्युटी करत होता. त्याने मला गाठले आणि पाहता पाहता माझा रुबाब वाढला. आणि मला ते नको होते. त्यामुळे नकळत माझ्या स्वैर हास्य-विनोद आणि पोरकट वागण्यावर बंधन आले.
तो पोरगा रात्रीही माझ्याबरोबरच होता. त्याने मिलिंद गुणाजीला “ये आंखे झुकी झुकी” हे त्यानेच पडद्यावर गायलेले गीत गाऊन दाखवले. मिलिंद आणि शर्वरीने त्याचे कौतुकही केले. पण त्यांना त्या मुलाची या बैठकीतील उपस्थितीव खटकत होती.
शेवटी तो मुलगा माझ्या बेडवर झोपी गेला. शर्वरीने नंतर मग स्वत:च नॉनव्हेज जोक सांगायला सुरुवात करून बैठकीत जान भरायचा प्रयत्न केला.
शुटींग संपले. मी, रवी गायकवाड आणि तो मुलगा पुण्याला यायला निघालो. रवी मदान हा माझ्या सहकारीही सोबत होता. काही दिवस मी त्या मुलाची कार्यालयात सोय केली. खानावळ लावून दिली. पण दत्तक म्हणजे काही कायदेशीर बाबीही असतात हे मी विसरूनच गेलो होतो, पण रवी शेवटी पोलीस होता. त्याच्या लक्षात निर्माण होऊ शकणा-या भावी गुंतागुंती आल्या. त्याने एक दिवस मला न सांगताच स्वत:च त्याला महाबळेश्वरला नेले आणि त्याला तेथे सोडून आला.
मला हे समजल्यावर मी रवीवर खूप चिडलो. पण त्याने मला कायद्याच्या गोष्टी सांगितल्यावर माझ्या लक्षात कायदेशीर पेच काय होऊ शकतो हे लक्षात आले.
आपली मनमौजी वृत्ती येथे चालणार नाहे हे वास्तव दुखद असले तरी तेच वास्तव होते.
पुढे पाच-सहा वर्षानंतर जेव्हा मी कंगाल झालो होतो तेव्हा आता तरुण झालेला तो पोरगा माझ्या ऑफिसमध्ये मी एकटाच बसलेला असतांना मला भेटायला आला. त्याला माझ्याकडून आर्थिक मदतीचे अपेक्षा होती. फार नाही...पन्नासेक हजार रुपयांची. त्याला काही व्यवसाय सुरु करायचा होता. पण मी त्याक्षणी गलितगात्र होतो. हजार रुपयांनाही महाग होतो. मी त्याला कसा नकार दिला हे मला आजही समजत नाही एवढा मी व्याकुळ झालो होतो.
नंतर तो मला कधीच भेटला नाही.
पण हे व्हायच्या आधी, शुटींग पूर्ण करून आल्यानंतर एडिटिंग वगैरे सोपस्कार पूर्ण होण्याआधी माझ्या मनात कल्पना आली कि या अल्बमचे अनावरण तेवढ्याच विलक्षण स्थळी व्हायला पाहिजे.
कोणते स्थळ असू शकेल?
मी खूप विचार केला. संजय नहार हे माझे मित्र काश्मीरमध्ये काम करतात हे मला माहित होते. किंबहुना सरहदची स्थापना माझ्याच कार्यालयात झालेली होती. संजय नहार आता पंजाबचा उद्रेक शांत करण्यात मोलाचे योगदान देवून काश्मीर आणि उत्तरपूर्वेकडील राज्यातील उद्रेकी परिस्थितिशी शांतीच्या मार्गाने सामना करायला निघाले होते. ते माझ्या कार्यालयात आले असता त्यांनी, “तुम्ही लेहलाच हे अनावरण का करत नाही?” असा प्रश्न विचारला.
-संजय सोनवणी
(माझ्या आत्मचरित्राच्या दुस-या अप्रकाशित भागातील अंश.)

No comments:

Post a Comment

दत्तक घ्यायची गोष्ट...

  दुस-या दिवशी “स्वीट सरेंडर” या गाण्यावर शुटींग सुरु झाले ते पाचगणीच्या टेबल टॉपवर. क्रेन, ट्रॉली असा शूटिंगला लागणारा सर्व सरंजाम होता. म...