Friday, February 13, 2026
वस्त्रोद्योगात क्रांती घडवणाऱ्या हातमागाचा शोध!
पुरातन काळापासून मानवी समाजाने प्रतिकुल निसर्गाशी झुंज देण्यासाठी कल्पकता व प्रतिभा वापरत एकामागुन एक जी साधने शोधली त्याला तोड नाही. आजच्या वैज्ञानिक प्रगतीने आपण जेवढे थक्क होतो त्याहीपेक्षा अधिक, पराकोटीच्या प्रतिकुलतेत, अत्यंत वन्य अवस्थेत पुरातन मानवाने जे शोध लावले त्यामुळे चकित व्हायला होते. किंबहुना आजचे विज्ञान आपल्या पुरातन पुर्वजांच्याच अथक प्रयत्नांच्या पायावर उभे राहत आकाशाला गवसणी घालायला सज्ज आहे.
आदिम काळी, जेंव्हा मनुष्य शिकारी मानव होता, तेंव्हा शिकार केलेल्या प्राण्यांचे चर्म वा झाडांच्या साली (वल्कले) गुंडाळुन प्रतिकुल हवामानाला तोंड देत होता. हळु हळु तो काही प्राण्यांना माणसाळुन पाळुही लागला. सरासरी २० हजार वर्षांपुर्वीच मानवाला सर्वप्रथम लोकर व वनस्पतीजन्य धाग्यांपासुन वस्त्रे बनवण्याची कल्पना सुचली. पक्षांची घरटी, कोळ्यांची जाळी यांच्या सुक्ष्म निरिक्षणातुन आपणही कृत्रीमपणे नैसर्गिक धाग्यांपासुन वस्त्र बनवू शकतो ती ही अभिनव संकल्पना.
ऑस्ट्रेलिया, रशिया आणि ऑस्ट्रिया येथे नवपाषाणयुगातील (इसपु १०,०००) कातलेले धागे व विणलेल्या वस्त्रांचे अवशेष मिळाले आहेत. भारतात सिंधु संस्कृतीत हडप्पा व लोथल येथेही रंगवलेल्या सुती वस्त्रांचे अवशेष मिळालेले आहेत. एवढेच नव्हे तर सिंधू संस्कृतीत सुत कातण्याच्या चरख्याचे व चात्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. तेथेच सापडलेल्या मानवी प्रतिमांनी बेलबुट्टीदार तलम वस्त्रे नेसलेली आपल्याला पहायला मिळतात. म्हणजेच भारतात कापसापासुन वस्त्रे बनवण्याची कला सनपुर्व दहा-बारा हजार वर्षांपुर्वीपासुनच विकसीत होवू लागली होती असे म्हणता येते. ऋग्वेदात लोकरीच्या वस्त्रांचे विपुलतेने उल्लेख येतात. जगभर आद्य विणकर या स्त्रीयाच होत्या असेही आपल्याला दिसते. अर्थात सुरुवातीला विणकाम फारच क्लिष्ट असे. धागे (मग ते लोकरीचे का असेनात.) पिंजणे, कातने ते धाग्यांची शिस्तबद्ध उभी रचना करत मग आडवे धागे अत्यंत कौशल्याने गुंफत नेत वस्त्र बनवणे ही किती किचकट प्रक्रिया असायची. पण भारतात हातमागाचा शोध लागला आणि वस्त्र बनवणे तुलनेने सोपे व कमी कष्टाचे झाले. हा मानवाचा पहिला यांत्रिक शोध होता आणि तो लागला भारतातील सिंधू संस्कृतीत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
भारताने हातमागांचा शोध लावत इसपु ३२०० ते इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंत जागतीक वस्त्रोद्योगावर स्वामित्व गाजवले. इजिप्तमधील ममींना गुंडाळलेल्या जात असलेल्या वस्त्रांत भारतीय कापसाचीही वस्त्रे मिळाली आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही वस्त्रांना केंद्रस्थानी ठेवतच भरभराटीला आली. हातमागाचा भारताने लावलेला शोध म्हणजे औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेशा होता. अत्यंत मुलायम, सोपी ते क्लिष्ट संरचना, पोत आणि विण असनारी साधी ते तलम नक्षीदार वस्त्रे निर्माण करण्यात अठराव्या शतकापर्यंत भारताशी स्पर्धा करु शकणारा एकही देश नव्हता. भारतीय वस्त्रांसाठी रोमचे नागरिक एवढा पैसा (सोण्याच्या रुपात) मोजत असत कि रोमची तिजोरी रिकामी व्हायला लागली. रोमचा बादशहा अस्वस्थ झाला असे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील प्लिनी (थोरला) या इतिहासकाराने नोंदवून ठेवले आहे.
भारतीय विणकरानी हातमागांवर असंख्य पोतांची, नक्षांची, संरचनांची वस्त्रे निर्माण केली. देशाची पत जगभर वाढवली. सिंधु संस्कृतीच्या काळानंतर चेऊल, सोपारा, भडोच ई. बंदरांतुन वस्त्रांचे तागे निर्यात होत. भरतकामातही एवढी प्रगती केली कि मार्को पोलो या जगप्रसिद्ध प्रवाशाने तेराव्या शतकात आपल्या प्रवास वर्णनात या भरतकामातील अद्भुत प्रगतीबद्दल भारतीय कोष्ट्यांची/साळ्यांची मनसोक्त तारिफ केली आहे. पेरिप्लसनेही पहिल्या शतकात येथील मलमली वस्त्रांची तारीफ केलेली आहे.
विदेश व देशांतर्गत व्यापारामुळे विणकर समाजाचीही आर्थिक भरभराट होत होती. हातमागाच्या शोधामुळे हा उद्योग ख-या अर्थाने पहिला इंजिनियरिंग उद्योग बनला. कापुस व हातमाग युरोपमद्धे गेले ते अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळीस. अर्थव्यवस्थेत विणकर समाजाचा सर्वात मोठा वाटा असला तरी मात्र दुस-या शतकापासुनच विणकरांचे काम हे हलक्या प्रतीचे मानले जावू लागले हेही एक आश्चर्यच आहे. "विणकाम हे अत्यंत कष्टाचे व हलक्या दर्जाचे आहे." असा उल्लेख भीमसेन जातकात येतो. स्मृतींनी विणकरांना शूद्र घोषित करुन टाकले. नग्नांना ज्यांनी आपल्या अपार कौशल्याने व प्रतिभेने वस्त्रे दिली, नटने-थटने शिकवले, जीवनात एक अनमोल वस्त्रानंद भरला...देशाच्या तिजो-या भरल्या त्यांनाच शूद्र ठरवत सामाजिक दर्जा घसरवणा-या वैदिक स्मृती व त्यांचे पालन करू लागलेल्या तत्कालिन सर्वच समाजाला दोष द्यावा तेवढा थोडाच आहे.
असे असले तरी या समाजाचा आर्थिक दर्जा मात्र उच्च स्वरुपाचाच होता असे आपल्याला दिसते. तेराव्या शतकात एकट्या ठाण्यात पाच हजार विणकर मखमली कापड बनवत असत असा उल्लेख अरबी व्यापा-यांनी करुन ठेवला आहे. बु-हाणपुरही या काळात वस्त्रनिर्मितीचे मोठे केंद्र म्हणुन उदयाला आले होते.
अठराव्या शतकापर्यंत आपल्या विशिष्ट कौशल्याने जगभर आदराचे कारण बनुन राहिलेल्या हातमाग उद्योगाला शेवटचा झटका दिला तो औद्योगिक क्रांतीने. युरोपात यांत्रिक मागांचा शोध लागला. गरजेपेक्षा अधिक उत्पादन होऊ लागले. भारतात बस्तान बसवु पहात असणा-या इंग्रजांना येथील बाजारपेठ काबीज करायची होती. जशी त्यांची सत्ता स्थापित झाली तसा त्यांनी आपला पहिला मोर्चा विणकरांकडे वळवला. त्यांच्या कापडाचा दर्जा हीणकस असला तरी ते स्वस्ता:त उपलब्ध होते. पण तरीही आपण देशीवस्त्र उद्योगाला तोंड देवू शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी दडपसत्र आरंभले. अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी येथील उद्योग नष्ट करण्याचा चंग बांधला.
महात्मा गांधींनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यात "स्वदेशी" चा नारा दिला. "चरखा चला चला के...लेंगे स्वराज्य लेंगे" सारा देश एकसुरात गाउ लागला. देशी हातमागांना पुन्हा बरे दिवस येवू लागले. सारा देश स्वदेशीमय झाला तो गांधीजींच्या चरखा क्रांतीने. पण स्वातंत्र्य आले. स्वतंत्र भारताच्या सरकारनेही औद्योगिकरणाचाच वसा घेतला. असे करत असतांना आपण या उद्योगात जे पुरातन काळापासुन आहेत त्यांना आधुनिकिकरणाच्या प्रवाहात भांडवल पुरवत आणायला हवे याचा मात्र विसर पडला. धडाधड हातमाग बंद पडु लागले. पुर्वेचे म्यंचेस्टर म्हणुन गाजणा-या इचलकरंजीसारख्या हातमागांच्या शहरावरही ही वीज कोसळली. एवढ्या जनसंख्येला यंत्रमाग सामावून घेवू शकत नव्हते. त्यांना आता अन्यत्र रोजगार शोधण्यासाठी भटकावे लागले. थोडक्यात भारतात हातमागान्चा शोध लागला, वैभवाचे दिवस पाहिले त्याचीच पुढची तार्किक परिणती यंत्रमाग ही असायला हवी होती. पण यंत्रांचा शोध लागला युरोपात आणि यंत्रांनी भारतीय पारंपारिक कुशल व्यवसायांना संपवण्यात आघाडी घेतली हा एक दुर्दैवी इतिहास असला तरी हातमागान्च्या शोधाने भारतीय वस्त्राना किमान पाच हजार वर्ष जागतिक महत्व प्राप्त झाले होत आणि हेच या शोधाचे वैशिष्ट्य होय!
-संजय सोनवणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
वस्त्रोद्योगात क्रांती घडवणाऱ्या हातमागाचा शोध!
पुरातन काळापासून मानवी समाजाने प्रतिकुल निसर्गाशी झुंज देण्यासाठी कल्पकता व प्रतिभा वापरत एकामागुन एक जी साधने शोधली त्याला तोड नाही. आ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भ...
No comments:
Post a Comment