आज आपण ज्या आधुनिक, कृत्रिम प्रकाशाने उज्वल झालेल्या प्रकाशमान आणि डिजिटल तंत्रज्ञानाने वेढलेल्या जगात जगत आहोत, त्या जगाची पायाभरणी एका अशा माणसाने केली होती, ज्याला आपल्या हयातीत केवळ उपेक्षा, दारिद्र्य आणि विश्वासघात सहन करावा लागला. तो महामानव आणि जग बदलवणारा महान संशोधक म्हणजे निकोला टेस्ला! विज्ञानाच्या इतिहासात असा दुसरा शास्त्रज्ञ शोधून सापडणार नाही, ज्याच्या डोक्यातील कल्पना काळाच्या इतक्या पुढे होत्या की तत्कालीन जगाला त्या 'जादूटोणा' किंवा 'वेडेपणा' वाटल्या. टेस्ला हा एक असा प्रतिभाशाली पण दुर्दैवी संशोधक होता, ज्याने जगाला उजळवून टाकले, पण स्वतःचे आयुष्य मात्र अंधारात आणि एकाकीपणात घालवले. त्याने लावलेले शोध आजाह्या आणि भविष्याच्या जगाचा पाया घालणारे ठरले पण त्याला हयातीत श्रेय मात्र मिळाले नाही. काही आज महान मानल्या गेलेल्या शास्त्रज्ञांनी तर त्यांच्याच कल्पना चोरल्या आणि प्रसिद्धी तर मिळवलीच पण एकाने ट चक्क नोबेल प्राईझही पटकावले
निकोला टेस्ला यांचा जन्म १० जुलै १८५६ रोजी सध्याच्या क्रोएशियामधील 'स्मिल्जान' या गावात एका सर्बियन कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्याकडे विलक्षण कल्पनाशक्ती आणि तल्लख स्मरणशक्ती होती. ते कोणतेही संकल्पित यंत्राचे आराखडे किंवा वैद्न्यानिक प्रयोग मनातल्या मनात अचूक रचू शकत असत आणि प्रत्यक्ष उभारणी न करताही त्या यंत्रणेतील त्रुटी शोधून दुरुस्त्याही करत असत!
शिक्षण पूर्ण केल्यानंतर टेस्ला सण १८८४ मध्ये खिशात मोजके पैसे आणि प्रसिद्ध संशोधक थॉमस एडिसन यांच्या नावाने शिफारसपत्र घेऊन अमेरिकेत पोहोचले. एडिसन यांनी टेस्ला यांना आपल्या कंपनीत काम दिले. परंतु, एडिसन आणि टेस्ला यांच्यातील वैचारिक तफावत लवकरच समोर आली.
त्या काळात थॉमस एडिसन यांनी विजेसाठी शोधलेला 'डायरेक्ट करंट' वापरला जात असे. परंतु या DC करंट प्रणालीमध्ये वीज केवळ एक-दोन किलोमीटर अंतरापर्यंतच पाठवता येत असे आणि ती खूप महागडी होती. टेस्ला यांनी यावर उपाय म्हणून 'अल्टरनेटिंग करंट' ही अत्यंत स्वस्त, सुरक्षित आणि हजारो मैल लांब सहज वीज वाहून नेता येईल अशी प्रणाली विकसित केली. हे फार मोठे यश होते पण ती प्रणाली प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना पैसे लागत होते.
जेव्हा टेस्ला यांनी एडिसन यांच्या डीसी मोटर्स दुरुस्त करून दिल्या तेव्हा एडिसन यांनी टेस्लाला ५० हजार डॉलरचे बक्षीस देण्याचे आश्वासन दिले होते. पण जेव्हा टेस्ला यांनी आपल्या शोधाला व्यवहारात आणण्यासाठी आपले बक्षीस मागितले तेव्हा टेस्लावर जळत असलेले एडिसन उपहासाने हसून म्हणाले, "टेस्ला, तुम्हाला आमचा अमेरिकन विनोद समजत नाही कि काय?" ही घोर फसवणूक होती आणि तीही एडिसन यांच्यासारख्या महान शास्त्रद्न्याने केलेली. या फसवणुकीमुळे टेस्लांनी एडिसनची कंपनी सोडली.
पुढे एडिसनने सूडबुद्धीने टेस्लाच्या एसी करंटला बदनाम करण्यासाठी प्राण्यांना विजेचा झटका देऊन मारण्याचे क्रूर सार्वजनिक प्रयोग केले. परंतु सुदैवाने उद्योजक जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांच्या मदतीने टेस्ला यांची एसी प्रणालीच जगात श्रेष्ठ ठरली. आज आपल्या घरात येणारा वीजपुरवठा हा निकोला टेस्ला यांच्या याच एसी सिद्धांतावर चालतो.
टेस्ला यांनी त्यांच्या आयुष्यात ३०० पेक्षा जास्त पेटंट्सची नोंद केली. त्यांच्या प्रमुख शोधांनी आजच्या अनेक आधुनिक तंत्रज्ञानांचा पाया रचला. उदा. टेस्ला कॉईल हे उच्च दाबाची आणि उच्च वारंवारितेची (High Frequency) बिनतारी वीज तयार करणारे हे उपकरण आज रेडिओ, टीव्ही आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा पाया आहे. दुसरे इंडक्शन मोटर ही चुंबकीय क्षेत्राच्या फिरण्यावर चालणारी मोटर आजही औद्योगिक क्षेत्रातील सर्व लहान-मोठ्या यंत्रांचे हृदय मानली जाते.
रिमोट कंट्रोल व रोबोटिक्सचे ते जनक आहेत. १८९८ मध्ये टेस्लानी न्यू यॉर्कमध्ये रेडिओ लहरींवर चालणारी एक छोटी नाव चालवून दाखवली. आधुनिक रिमोट कंट्रोल आणि रोबोटिक्सचा हाच पहिला पाया होता, पण दुर्दैव बघा त्या काळी अडाणी लोकांनी 'या बोटीत नाविक लपला आहे' असे समजून त्याची टवाळी केली होती. असे असले तरी नाउमेद न होता ते रात्रंदिवस नित्य नव्या संशोधनात व्यस्त राहिले. विशेष म्हणजे नायगारा धबधब्यावर जगातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र टेस्लाच्या डिझाइननुसारच उभारले गेले.
टेस्ला यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे शोकांतिका म्हणजे त्यांच्या शोधांचे श्रेय इतरांनी लाटणे! टेस्लानी १८९५ मध्येच बिनतारी संदेशवहनाचे सर्व तंत्रज्ञान आणि पेटंट तयार केले होते. परंतु दुर्दैवाने त्यांच्या प्रयोगशाळेला लागलेल्या आगीत सर्व साधने आणि कागदपत्रे जळून खाक झाली. याच संधीचा फायदा घेऊन गुग्लिएल्मो मार्कोनीने यांनी टेस्ला यांच्या संशोधनाचा वापर केला आणि १९०१ मध्ये पहिला अटलांटिकपार रेडिओ संदेश पाठवला. जगाने मार्कोनी यांना रेडिओचे जनक मानले आणि नोबेल पुरस्कारही दिला! टेस्ला यांच्या १९४३ मध्ये मृत्यूनंतर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की, रेडिओचे मूळ पेटंट मार्कोनींचे नसून निकोला टेस्ला यांचेच होते. पण आजही लोक रेडीओचे श्रेय मार्कोनी यांनाच देतात!
व्हिल्हेल्म रॉन्टजेन यांनी एक्स-रेचा शोध जाहीर करण्याच्या आधीच टेस्ला यांनी 'शॅडोग्राफी' नावाने मानवी शरीराच्या हाडांची चित्रे घेणारे तंत्रज्ञान विकसित केले होते. पण प्रयोगशाळेतील आगीमुळे त्यांचे हेही संशोधन नष्ट झाले आणि श्रेय रॉन्टजेन यांना मिळाले.
टेस्ला यांचे सर्वात अद्भूत आणि स्वप्नवत संशोधन म्हणजे 'वॉर्डनक्लिफ टॉवर'! पृथ्वीच्या नैसर्गिक लहरींचा आणि वातावरणाचा वापर करून संपूर्ण जगाला मोफत आणि बिनतारी वीज पुरवणे हे त्यांचे स्वप्न होते. या प्रकल्पासाठी प्रसिद्ध उद्योगपती जे. पी. मोर्गन यांनी सुरुवातीला निधी दिला. नंतर मोर्गन यांच्या लक्षात आले की, जर वीज हवेतून मोफत मिळणार असेल, तर तिच्यावर मीटर कसे बसवायचे आणि पैसे कसे कमवायचे? या व्यावसायिक स्वार्थापोटी त्यांनी टेस्ला यांचा निधी रोखला. निधीअभावी हा प्रकल्प अर्धवट राहिला आणि पुढे तो टॉवर भंगारात विकावा लागला. हा टेस्ला यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा मानसिक धक्का होता. आजही हा शोध एक रहस्यच बनून बसला आहे.
आयुष्याच्या शेवटच्या काळात टेस्ला यांच्याकडे स्वतःचे घरही नव्हते. न्यू यॉर्कमधील एका हॉटेलच्या खोलीत ते एकटेच राहत असत आणि रस्त्यावरील कबुतरांना खाऊ घालण्यात आनंद शोधत असत. त्यांनी आयुष्यात कधी लग्न केले नाही तर संशोधन हीच त्यांची पत्नी बनली. ७ जानेवारी १९४३ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी या महान वैज्ञानिकाचा अत्यंत कफल्लक आणि एकाकी अवस्थेत मृत्यू झाला.
निकोला शुद्ध वैज्ञानिक होते. पैशांपेक्षा आणि प्रसिद्धीपेक्षा मानवी कल्याणासाठी तंत्रज्ञान वापरणे हेच त्यांचे ध्येय होते. आज आपण वापरत असलेले स्मार्टफोन, वाय-फाय, एसी वीज, रिमोट कंट्रोल आणि इलेक्ट्रिक गाड्या (ज्या 'टेस्ला' कंपनीच्या नावाने ओळखल्या जातात) या सर्वांमागे या एकाच महामानवाची दृष्टी होती. ते एकदा म्हणाले होते, "वर्तमान त्यांचा असू द्या, पण ज्या भविष्यासाठी मी काम केले आहे, ते भविष्य माझेच असेल!" आजचे २१ वे शतक पाहिल्यावर लक्षात येते की, टेस्ला यांचे ते शब्द १००% खरे ठरले आहेत!
-संजय सोनवणी
(आज दैनिक पुण्यनगरी मध्ये प्रसिद्ध झालेला लेख)
No comments:
Post a Comment