Wednesday, November 11, 2026

धर्म आणि लैंगिकता

 

धर्म म्हटले की जीवनविषयक ऐहिक आणि पारलौकिक व्यवहारांचे काही ना काही निर्देशन, नियंत्रण, साध्ये आणि साधने यासंदर्भाने नियमांची एक चौकट उभी राहते. ही चौकट कधी सैल असते तर कधी कठोर. नैतिक आचार-विचार हे या चौकटीचे महत्वाचे अंग असले तरी नीतीनियमही कालसापेक्ष बदलते राहिले आहेत. प्रत्येक काळच्या समाजाच्या धारणा त्या त्या वेळच्या परिस्थिती, कोणत्या विचारांचे प्राबल्य आहे, सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थिती काय आहे यावर अवलंबून असतात. हिंदू धर्मात “धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष” हे चार पुरुषार्थ आवर्जून सांगितले आहेत. येथे काम म्हणजे केवळ “लैंगिकता” अभिप्रेत नसून सर्व प्रकारच्या “इच्छा” अभिप्रेत आहेत असे आपल्याला दिसेल. पण जेव्हा वात्स्यायनाचा कामसूत्र हा ग्रंथ आपल्यासमोर येतो तेव्हा येथे काम हा शब्द लैंगिक संबंधांसाठीच वापरला आहे हेही लक्षात येते. लैंगिक भावना या सार्वत्रिक असल्याने आणि धर्मही मानवानेच बनवले असल्याने त्याविषयक नीतीसिद्धांत सर्वच धर्मांनी मांडलेले आहेत.

जगातील जवळपास सर्व धर्मात शरीरसंबंधांबाबत काही निषिद्धे असल्याचे आणि त्या सर्वात बहुतांशी एकवाक्यता असल्याचेही आपल्याला दिसते. संघटीत धर्म उदयाला येण्यासाठीही) लोकधर्म अस्तित्वात होते व हिंदू धर्मासारखा लोकधर्म आजही अस्तित्वात आहेच. मानवी समाजाच्या जीवनातील अनिश्चीतता आणि नैसर्गिक प्रकोपांचे अपरंपार भय व कुतूहलातून भावनिक निकड म्हणून प्रत्येक प्रदेशात विविध देवता फार प्राचीन काळीच अस्तित्वात आल्याचेही आपल्यास दिसते. तेव्हाचे शरीरसंबंधांचे नियम मानव अद्याप टोळीमानव असल्याने टोळीअंतर्गतही अत्यंत सैल होते व निषिद्धे अजून जन्माला आलेली नव्हती असेही आपल्याला दिसून येते. हरवलेल्या टोळ्यांतील स्त्रीया न मारता भोगासाठी जिवंत ठेवल्या जात. त्यांच्यापासून झालेली संतती दासवर्गात टाकून दिली जात असे असेही आपल्याला दिसते. पुढे मात्र याही प्रथेत बदल होत गेला. म्हणजे आविर्भाव मुळचाच राहिला पण त्याला नवीन नावे व नवे नियम वापरले गेले. 

पण या नियमांमध्ये एकाएकी बदल झालेले नसून कालप्रवासात त्यात परिवर्तन होत गेल्याचे आपल्याला दिसेल. आणि धर्माने सांगितले म्हणून तसेच माणूस वागेल अशी सामाजिक वास्तवे नसल्याने त्या धर्मनियमांचा भंग करणार्याला शिक्षा ठोठावणे हेही एक धर्माचे महत्वाचे तत्व बनल्याचेही आपल्याला इतिहासातून दिसते. कोठे शिक्षा उग्र तर कोठे सौम्य एवढेच आपल्याला दिसते. देवाची भीती हे तर जगभर वापरले गेलेले नियंत्रक तत्व होते. तसेच एका धर्मात/प्रदेशात निषिद्ध असणारी शरीरसंबंधाची तत्वे दुसर्या धर्मातील आणि प्रदेशातील समाजातही निषिद्ध असतीलच असेही वास्तव कधीच नव्हते.

भारतीय उपखंडात सर्वात आधी उदयाला आलेला धर्म म्हणून ज्याला आपण आज हिंदू म्हणून ओळखतो, पण तसा कोणीही ज्ञात संस्थापक नसल्याने लोकधर्म म्हणता येईल असा हा धर्म आहे. या धर्मात लैंगिकतेविषयकच्या बदलत गेलेलेया धारणा पाहिल्या तर आपल्याला मानवाचाच सामाजिक संस्थात्मक इतिहास शोधता येईल. विवाहसंस्थेचा इतिहासच मुळात शरीरसंबंधांबाबत विशिष्ट नैतिक चौकट निर्माण करत संपत्तीच्या (जमीन, साठवलेले धन-धान्य-पशु ई.) वारसाहक्काची सोय लावणे या सामाजिक आणि व्यक्तिगत ऐहिक भावनेतून सुरु होतो. शेतीचा शोध आणि विवाहसंस्था यात फार जवळचे नाते आहे. जमीनीवर मालकी तशी स्त्रीवर मालकी व तिच्यापासून झालेली संतती आपलीच म्हणून तीच वारस या भावनेतून आद्य विवाह संस्था आकाराला आलीये असे मानववंशशास्त्र सांगते. त्याच्याशी फार नंतर दैवी अधिष्ठान, पावित्र्य, मांगल्य जोडले गेले.

शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणूस टोळ्या करून रहायचा. तो भटका असला तरी त्याचे फिरणे अनिर्बंध नसून ज्ञात प्रदेशांपुरते मर्यादित असायचे. अगदीच विपरीत स्थिती आली नाही तर माणूस ज्ञात भूगोलातच राहायचा प्रयत्न करायचा हे अगदी शेवटचे हिमयुग सरासरी वीस हजार वर्षी आले तेव्हा विस्थापित झालेला मानव हिमयुग संपल्यावर पुन्हा आपापल्या प्रदेशात परत आला होता यावरून दिसून येते.

सुरुवातीला स्त्री आणि पुरुष संबंध पशुंप्रमाणे अनिर्बंध असणे स्वाभाविक होते. ती टोळीजीवनाची गरजही नव्हती. वेदांमध्ये त्यालाच “गोधर्म” म्हटले गेलेले आहे. स्त्रीच संततीला जन्म देते हे ज्ञात असल्याने स्त्रीला टोळीत मानाचे स्थान मिळत असे. तिच्याकडे पाहण्याची दृष्टीही गुढात्मक होती. टोळी काळात संततीजन्म, मासिक धर्म याबाबत लोकांना अपार भीतीयुक्त कुतूहल असणे स्वाभाविक होते. त्यामुळे जवळपास सर्वच लोकधर्मांची सुरुवात मातृपुजेतून सुरु झालेली दिसते. भारतात याचा सर्वात जुना पुरावा इसवीसन पूर्व ९००० मधील मिळाला आहे. तो आहे मध्य प्रदेशातील सोन नदीच्या खोऱ्यात बाघोर येथे. येथे योनीची पाषाण प्रतिमा मिळाली असून या भागातील कोल, बैगा या जमाती “माई” म्हणून अगदी तशाच त्रिकोणी पाषाणात कोरलेल्या योनी प्रतिमांची आजही पूजा करत असतात. पुरावा जेथे सापडला तिथे असलेली वस्ती भटक्या माणसांची होती. जोनाथन मार्क केनोयेर आणि जे. एन. पाल  यांच्या नेतृत्वाखाली हे उत्खनन झाले. मातृपुजेचा (योनीपुजेचा) हा भारतातील आजवर मिळालेला सर्वात प्राचीन पुरावा आहे आणि तो समाजशास्त्रीय इतिहाससुद्धा सांगतो.

 

प्रजननक्षमता हा योनीचा दैवी गुण मानून प्राचीन माणसाने तिची पूजा सुरु करणे स्वाभाविक आहे. आजही शिवलिंगात लिंग आणि योनी संयुक्त रुपात असतात. हे प्राचीन लोकधर्माचे विकसित स्वरूप आहे. किंबहुना असंख्य तत्वज्ञाने व तंत्रशास्त्रे त्यातूनच उदयाला आली. लिंग तेव्हाच योनीशी जोडले गेले जेव्हा जननप्रक्रियेत पुरुषाचाही वाटा असतो हे सत्य माणसाला समजले तेव्हा. योनी-लिंग संयुक्त स्वरूपात पुजण्याचे सुरुवात इसपू ३१०० पूर्वी झाली असावी त्या काळातील आज पुजतो तसेच शिवलिंग कालीबंगन येथे सिंधू संस्कृतीत सापडलेले आहे.

लोकधर्मात म्हणजे सामान्य मानवांमध्ये लैंगिकता नातेसंबंधांबाबत निषिद्धे असली तरी समाज जीवनात ती फारशी बंधात्मक नव्हती याचे पुरावे आपल्याला गाथा सप्तशती ते अनेक प्राचीन प्राकृत ग्रंथामध्ये येणाऱ्या कथांमधून मिळतात. वात्स्यायनाचे कामसूत्र किंवा दामोदरगुप्ताचे  कुट्टनीमत या सारख्या ग्रंथांतूनही आपण हे वास्तव पाहू शकतो. लोकधर्मातूनच आलेली तंत्रशास्त्रे लैंगिकतेला उदात्त पातळीवर नेत मनुष्य आणि ईश्वरात तादात्म्य  साधण्याची एक साधना पद्धती मानली. तंत्रपरंपरा ही भारतीय धार्मिक-सांस्कृतिक इतिहासातील एक वेगळी आणि अनेकदा गैरसमजांनी वेढलेली शाखा आहे. “तंत्र = लैंगिक विधी” अशी सरसकट समजूत लोकप्रिय असली तरी ती खरी  नाही. तंत्राचा मुख्य हेतू शक्ती (ऊर्जा) जागरण, देह–मन–चेतना यांचा एकात्म अनुभव, आणि आध्यात्मिक उन्नती असा आहे; लैंगिकता हा त्यातील मर्यादित, विशिष्ट संदर्भातील घटक आहे. पण सृजनाचे मुख्य कारण म्हणून त्याचे तंत्रशास्त्रातील महत्व अपरंपार आहे.

तंत्र हे वैदिक परंपरेपासून वेगळे आणि प्राचीन काळीच सुफलनता विधीतून शिव-शक्ती तादात्म्यातून विकसित झाले. यात स्त्री आणि पुरुष समपातळीवरची असून त्यात अन्य भेदाभेदाला थारा नाही. यातील पूजा सृजन संकल्पनेशी (शिवलिंगाशी ) जोडलेली असल्याने लैंगिकतेतही उच्च कोटीचा आत्मानुभव येऊ शकतो असे तंत्रे मानतात. एके काळी जनसामान्यात तंत्रे जास्त लोकप्रिय असल्याने एक प्रकारची लैंगिक मोकळीकही दिसते आणि त्याचे दर्शन प्राकृत साहित्यात जास्त विस्ताराने दिसते.

थोडक्यात तंत्रपरंपरेत रक्ताच्या नात्यांखेरीजची लैंगिकतेतील मोकळीक ही पाप अथवा केवळ भोग मानली जात नाही  तर योग्य साधनेने रूपांतरित करता येणारी एक शक्ती मानली जाते.

भारतात वैदिक धर्म आल्यापासून नंतर मात्र क्रमाक्रमाने आधी विशिष्ट तर नंतर बहुतेक समाजात मात्र आपल्याला कामविषयक अनेक बंधने आणि नैतिक सिद्धांत उदयाला येवून लागू झाल्याचे दिसते.

वेद ते स्मृती- लैंगिकतेवरील नियंत्रणाचा प्रवास

वैदिक समाजरचना आणि त्यातील लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पुढील स्मृतीकालीन कठोर चौकटीपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळा दिसतो. ऋग्वेद आणि अथर्ववेदासारख्या ग्रंथांत लैंगिकतेचा उल्लेख आढळतो; परंतु तो उघड, नियमनात्मक किंवा दंडात्मक स्वरूपाचा नसून प्रामुख्याने प्रजनन, सृष्टीचक्र आणि दैवी-सांकेतिक संदर्भात येतो. “रेतस्”, “गर्भ”, “मिथुन” यांसारख्या संकल्पनांद्वारे स्त्री-पुरुष संयोगाचा स्वीकार दिसतो, पण त्याचे कडक सामाजिक नियमन अद्याप पूर्ण विकसित झालेले दिसत नाही.

ऋग्वेदातील यम–यमी संवाद (१०.१०) हा बंधू-भगिनी संबंधांच्या निषेधाची जाणीव दाखवतो; मात्र हा निषेध एक स्थिर सामाजिक नियम म्हणून नव्हे, तर उदयास येत असलेल्या नैतिक संकल्पनेच्या रूपात मांडलेला आहे. यावरून असे दिसते की वैदिक समाजरचना स्थिरावण्याआधी असे संबंध सर्रास असून समाज स्थिर होऊ लागला तशी लोकांच्या मनात याविषयी हळूहळू निषेधाची भावना निर्माण होऊ लागली. वैदिक समाजातही लैंगिकतेविषयीचे सर्व नियम हे एकदम तयार झालेले नसून कालौघात विकसित झाले. ऋग्वेदातील अगस्त्य-लोपामुद्रा संवाद (मंडल १, सूक्त १७९)  हे ब्रह्मचारी जीवनाबद्दल आणि तपस्या की संसारसुख याबाबत आहे. येथे तपस्या आणि शरीरसुखातील संतुलन साधायचा लोपामुद्रेचा आग्रह दिसतो जो यशस्वी झाला. पुत्रप्राप्तीशिवाय पितरांना मुक्ती नाही हा संदेश महाभारतातील जरत्कारूच्या कथेतून येतो. थोडक्यात विवाह आणि पुत्रप्राप्ती हे जीवनातील महत्वाचे अंग मानले गेले असून ब्रह्मचर्याला त्यात स्थान नव्हते या प्रकारचे वैदिक सामाजिक वातावरण होते असे दिसते.

उत्तरवैदिक काळात, विशेषतः ब्राह्मण ग्रंथ आणि गृह्यसूत्रांच्या काळात वैदिक सामाजिक संरचना अधिक संघटित होत गेली. यज्ञकेंद्रित जीवनपद्धती, वंशपरंपरा, आणि पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था यांना बळ मिळू लागले. विवाह हा केवळ दोन व्यक्तींमधील संबंध न राहता दोन कुलांमधील, तसेच धार्मिक कर्तव्यांशी निगडित असा संस्थात्मक व्यवहार बनला. या टप्प्यावर स्त्री-पुरुष संबंधांवर अधिक स्पष्ट मर्यादा आलेल्या दिसू लागतात.

या प्रक्रियेचा परिपाक आपल्याला स्मृतीग्रंथांमध्ये स्पष्टपणे दिसतो. मनुस्मृती  आणि इतर धर्मशास्त्रांमध्ये लैंगिकतेविषयी सुस्पष्ट आणि अनेकदा कठोर नियम दिलेले आहेत. विवाहबाह्य संबंध, वर्णसंकर, आणि स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्यावर कठोर निर्बंध लादले गेले. महाभारतातही वर्णसंकराची भीती ठायी ठायी व्यक्त झालेली आहे. स्त्रीच्या “पावित्र्याला” केवळ नैतिक नव्हे तर सामाजिक आणि वारसाहक्काशी निगडित मूल्य प्राप्त झाले. याउलट, पुरुषांना मात्र काही प्रमाणात अधिक स्वातंत्र्य राखून ठेवलेले दिसते—ही असमानता पितृसत्ताक रचनेचे द्योतक आहे.

वैदिक समाजातही प्राचीन काळी लैंगिक संबंध मुक्त होते असे आपल्याला श्वेतकेतुच्या महाभारतातील आदिपर्वात आलेल्या कथेवरून दिसते. (अध्याय १०४). श्वेतकेतु एकदा आपल्या आई-वडिलांसोबत बसलेला असताना एक अनोळखी ब्राह्मण त्यांच्या आईचा हात धरून घेऊन गेला. श्वेतकेतुला यावर राग आला, पण त्यांचे वडील उद्दालक ऋषींनी त्याला सांगितले की हे या समाजातील परंपरेनुसार (पशुसमान नियम) सामान्य आहे. या घटनेमुळे व्यथित झालेल्या श्वेतकेतुने यापुढे स्त्री-पुरुष संबंधात कठोर नियम असावेत असे ठरवले. त्याने असा नियम केला की स्त्री-पुरुषाने लग्नानंतर एकमेकांशीच एकनिष्ठ राहावे, विवाहित स्त्रीने दुसऱ्या पुरुषाकडे जाणे 'परदारगमन' (व्यभिचार) मानले जाईल. म्हणजे विवाहसंस्था अस्तित्वात आली असली तरी श्वेतकेतूच्या काळात लैंगिक संबंध मात्र स्वैर होते.

अगदी अतिथीला वा मित्राला पत्नी अर्पण करण्याच्या प्रथेचा उल्लेख महाभारतातील उद्योगपर्वात आलेला आहे. (अध्याय ४५, श्लोक १२-१३) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी 'विवाहसंस्थेचा इतिहास' या विषयावरील मांडणीत या श्लोकांचा आधार घेऊन, आर्षकाळी (प्राचीन काळी) मित्राला किंवा अतिथीला स्वस्त्री संभोगार्थ देण्याची पद्धत असल्याचे म्हटले आहे. अर्थात एकीकडे आपल्याला यात स्त्रियांचे स्वातंत्र्य किती बाधीत होते असे दिसते तर दुसरीकडे जेव्हा माणूस आदिम अवस्थेत होता तेव्हा त्याचे स्त्रीविषयकचे मत सैल होते असेही दिसते. पाव्हण्याला स्वपत्नी देणे ही चाल एस्किमो लोकांमध्येही शतकभरापूर्वी होती असे अनेक प्रवाशांनी नोंदवलेले आहे.

भारतात लैंगिकतेबाबतचे विचार कसे बदलत गेले याचे चित्र या पुराणकथांवरून लक्षात येते. अगदी वैदिक धर्मनियमही लैंगिकतेबाबत काळानुसार बदलत राहिले.  

महाभारतकालीन कथांमध्ये या संक्रमणाचे मध्यम स्वरूप दिसते. महाभारतामधील नियोगप्रथा, द्रौपदीचे बहुपतीत्व, किंवा श्वेतकेतूच्या कथेद्वारे विवाहसंस्थेचे नियमबद्धीकरण—हे सर्व घटक सूचित करतात की वैदिक समाजही बदलाच्या प्रक्रियेत होता. जुन्या लवचिक प्रथा आणि नव्या कठोर नियमातील संघर्ष या काळात जाणवतो.

या सर्व प्रक्रियेचा एकत्रित विचार केला, तर असे दिसते की वैदिक काळातील तुलनेने संकेतप्रधान आणि सैल लैंगिकता पुढे स्मृतीकालात येऊन अत्यंत नियमबद्ध, दंडात्मक आणि पितृसत्ताक चौकटीत रूपांतरित झाली. या बदलामागे केवळ धार्मिक तत्त्वज्ञान नव्हे, तर शेतीप्रधान अर्थव्यवस्था, संपत्तीची साठवणूक, आणि वारसाहक्काची गरज हे मूलभूत सामाजिक घटक कार्यरत होते. विवाहाचे दैवीकरण याच काळात झाले व विवाह हा एक नुसता सामाजिक नव्हे तर धार्मिक संस्कारही बनला.

कामशास्त्र विरुद्ध धर्मशास्त्र : दोन भिन्न दृष्टिकोन

भारतीय बौद्धिक परंपरेत लैंगिकतेविषयी दोन समांतर पण भिन्न प्रवाह दिसतात—एक वैदिक तर दुसरा लोकधर्मीय. वैदिक दृष्टीकोन नियमनाधारित होता तर लोकधर्मीय दृष्टीकोन वास्तविक अनुभवाधारित (कामशास्त्रीय) होता. अर्थात हे दोन्ही प्रवाह एकमेकांना पूर्णतः नाकारणारे नाहीत; परंतु त्यांच्या प्राधान्यक्रम, भाषाशैली आणि उद्दिष्टांमध्ये स्पष्ट फरक आहे.

उदाहरणच द्यायचे झाले तर मनुस्मृतीसारख्या धर्मशास्त्रीय ग्रंथांचा केंद्रबिंदू आहे सामाजिक सुव्यवस्था—वंश, वारसा, कुलशुद्धता, आणि कर्तव्य. लैंगिकता येथे नियंत्रित करावयाची शक्ती आहे , विवाह हा संस्कार असून ही लैंगिक संबंधांच्या वैधतेची अट आहे आणि नियमभंगास दंड/प्रायश्चित्त  आहे.

याउलट लोकधर्मीय दृष्टीकोन वात्स्यायनाच्या कामसूत्रमध्ये येतो जो मानवी अनुभव, आनंदशास्त्र  आणि त्यातून मोक्ष असा आहे.  वात्स्यायन म्हणतो, "काम हे शरीरधारणेस आवश्यक असल्याने आहाराशी त्याचे साधर्म्य आहे. शिवाय धर्मार्थाचे अंतिम फळ हे कामात्मकच आहे." (कामसूत्र: १.२.४६-४७) लैंगिकता ही जीवनातील एक कौशल्य/कला असून केवळ संतती नव्हे तर आनंद आणि सुसंवाद हे उद्दिष्ट आहे. भारतात मदनोत्सव (वसंतोत्सव) मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे. हा प्रेमिकांचा उत्सव. यात प्रेमिक उत्साहाने सामील होत असत. अनेक विवाह यातून जुळत. प्राचीन लौकिक साहित्यातून भारतीय समाजाचा लैंगिकतेविषयकचे मोकळे आणि उदार दृष्टीकोन स्पष्ट दिसून येतात. एवढेच नव्हे तर विवाहाआधी अनेक वर गणिकेकडे जाऊन कामशास्त्रातील धडे शिकत असत आणि त्यात कोणालाही गैर वाटत नसे. अशा अनेक कथा प्राचीन प्राकृत साहित्यात येतात. मुळात गणिका ही प्राचीन भारतात प्रतिष्ठा पावलेली संस्था होती. चौसष्ट कलांमध्ये निपुण असलेल्या सौंदर्यवती वेश्येस गणिका म्हणत. कौटल्याच्या अर्थशास्त्रात गणिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजाने गणिकाध्यक्ष पदाची निर्मिती करावी असे सुचवले आहे व त्याच्या कर्तव्यांवर एक अध्याय समर्पित आहे.

वैदिक धर्मशास्त्रात “काम” हा शब्द नियंत्रित करावयाची इच्छा म्हणून येतो. अतिरेकी काम  म्हणजे पतन आणि संयम म्हणजे सद्गुण अशी सांगड त्यात घातली गेलेली आहे. धर्माने कितीही नियम घातले अथवा निषिद्धे निर्माण केली तरी वास्तव समाज जीवनात धार्मिक निर्बंध पाळले जातातच असे नाही. उदाहणार्थ समलिंगी संबंध हे सर्वात निषिद्ध असले तरी समाजात प्रत्यक्षात तसे प्रकार होत होते हे प्राचीन साहित्यावर दृष्टी टाकली तरी लक्षात येते.

सामाजिक निषिद्धांत समलिंगी संबंध ठेवणे हे गंभीर पातक गणले गेले असले तरी भारतातील निषिद्ध संभोगाची परंपरा पुरातन आहे हे खुद्द धर्मशास्त्रे, पुराणकथा, महाकाव्ये, कामशास्त्रे, विविध शिल्पे (खजुराहो) व चित्रांमधुनही दिसून येते. निषिद्ध संभोगांत समलिंगी, अन्य-प्राणी संभोग, मुख अथवा पार्श्व-संभोग व क्लीबांशी केलेला संभोग प्रामुख्याने येतात. या सर्व प्रकारचे संबंध विपुल प्रमाणावर होते. मनुस्म्रुतीने स्त्रीने स्त्रीशी संभोग केला तर तिला चाबकाचे दहा फटके मारावेत व तिच्याकडुन दुप्पट वधुमुल्य वसुल करावे व समजा वयाने मोठ्या स्त्रीने कुमारिकेशी शरीरसंबंध ठेवला तर तात्काळ तिचे केशवपन करुन तिची गाढवावरुन धिंड काढावी आणि हाताची बोटे कापुन टाकावी असे आदेश दिलेले आहेत. नारदस्मृतीही असेच निर्देश पुरुषांबाबत देते. असे नियम स्मृतीकारांना बनवावे लागले याचा अर्थ तो समाजातील एक प्रचलित भाग होता. म्हणजेच धर्मनियम व प्रत्यक्ष सामाजिक व्यवहार हे नेहमीच हातात हात घालून चालतात असे नाही.

याउलट प्राचीन ग्रीसमध्ये समलिंगी संबंधांना प्रतिष्ठा होती पण हे संबंध केवळ आजच्या “गे” संकल्पनेसारखे मर्यादित नव्हते तर विशेषतः पुरुषांमधील समलिंगी संबंध एका विशिष्ट मर्यादेत आणि स्वरूपात समाजमान्य होते.

ग्रीकमध्ये साधारणपणे दोन प्रौढ पुरुषांमधील संबंधांऐवजी, एका प्रौढ पुरुष (erastes) आणि एका किशोरवयीन तरुण (eromenos) यांच्यातील संबंधांना सामाजिक मान्यता होती. हे संबंध केवळ लैंगिक नसून त्यात मार्गदर्शक आणि शिष्याचे नाते असायचे. लैंगिक संबंधांमध्ये आक्रमक भूमिका घेणाऱ्या पुरुषाला सामाजिक प्रतिष्ठेचे मानले जात असे, कारण तो संबंधात पुढाकार घेणारा मानला जाई. स्पार्टासारख्या नगरराज्यांमध्ये सैनिकांमधील समलिंगी संबंधांना प्रोत्साहन दिले जात असे, कारण असे मानले जायचे  की यामुळे युद्धाच्या मैदानात सैनिकांमधील बंध घट्ट होऊन ते अधिक शौर्याने लढतील.  स्त्रियांमधील समलिंगी संबंधांची फारशी चर्चा प्राचीन ग्रीक साहित्यात आढळत नाही, मात्र सफो या कवयित्रीच्या काव्यकृतींतून अशा स्त्रिया-स्त्रियांमधील संबंधाचे संकेत मिळतात.  समलिंगी संबंध समाजमान्य असले तरी, पुरुष-स्त्री विवाह आणि कुटुंबसंस्था हीच समाजाची मुख्य चौकट होती. समलिंगी संबंध हे विषमलिंगी विवाहाच्या विरोधात मानले जात नसत, तर ते त्याच्या पूरक मानले जात. 

 

माणूस भटका होता तेव्हा लैंगिक संबंध अनिर्बंध असले तरी माणूस बऱ्यापैकी स्थिर झाल्यानंतर नवे नीती नियम करू लागला हे आपल्याला ऋग्वेदामधील यम-यमी संवादात दिसते. यमी आपल्या भावाला, यमाला, वंश वाढवण्यासाठी समागमास प्रवृत्त करते. ती म्हणते की, सृष्टीच्या कल्याणासाठी आपला समागम व्हावा ही देवांची इच्छा आहे. म्हणजे त्याआधी अशा संबंधाना दैवी अधिष्ठान होते ही स्मृती जतन केली गेलेली दिसते. पण यम यास स्पष्ट नकार देतो आणि सांगतो की, एकाच रक्ताच्या भावा-बहिणीचे नाते पवित्र असते आणि त्यात पती-पत्नीचा संबंध आणणे अनैतिक (पाप) आहे. तो यमीला दुसरा पती शोधण्याचा सल्ला देतो. (ऋग्वेद-१०.१०).

 

इजिप्तमधील प्रथा मात्र सर्वस्वी वेगळी आहे. प्राचीन इजिप्तमध्ये राजघराण्यातील शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे विभाजन टाळण्यासाठी भाऊ-बहिणींचे (सख्खे किंवा सावत्र) विवाह सामान्य होते. ओसिरीस आणि इसिस बंधू-भगिनी असलेल्या परस्पर विवाह केलेल्या देवतांच्या कथेचे अनुकरण म्हणून, तसेच फॉरोची (राजाची) दैवी शक्ती कायम ठेवण्यासाठी असे विवाह केले जात. ही प्रथा प्रामुख्याने रोमन राजवट आल्यानंतरही (इ.स.पू. ३० – इ.स. ३९५) राजघराण्यात आणि काही अंशी सामान्य लोकांमध्येही प्रचलित होती. ग्रीसमध्ये लोकधर्मातील श्रेष्ठ दैवते झियस आणि हेरा हेही भाऊबहीण असूनही त्यांनी विवाह केला होता, त्यामुळे ग्रीसमध्येही भाऊ-बहिणीच्या विवाहाची प्रथा असावी पण पुढे ती  सामाजिक निषिद्धात बदलली असावी असे इतिहासकार मानतात. पण इजिप्तवर राज्य करणारे  टॉलेमी या ग्रीक घराण्याने मात्र बंधू-भगिनी विवाहाची प्रथा इजिप्शियन परंपरेप्रमाणे पाळली. यामागेही धार्मिक कारण होते. इजिप्तचे राजे (फारो) स्वतःची सत्ता आणि "दैवी रक्त" शुद्ध ठेवण्यासाठी बहिणीशी, कधीकधी मुलीशीही लग्न करत. राजा सेनवोरेट (ईसापूर्व - १९१७) याने आपल्या बहिणीशी लग्न केले होते.   क्लिओपात्रा सातवी हिनेही तिच्या भावांशी (टॉलेमी XIII आणि XIV) लग्न केले होते. रोमन काळात सामान्य लोकांमध्येही मालमत्ता कुटुंबाबाहेर जाऊ नये म्हणून अशा विवाह पद्धती प्रचलित असल्याच्या नोंदी आहेत. पण आता या प्रथा निषिद्ध आणि बेकायदेशीर मानल्या जातात.

भारतात जैन वाड्मयानुसार प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ जन्माला येईपर्यंतच्या भोगभूमीच्या काळात अपत्ये मुलगा आणि मुलगी अशी जुळी होत आणि तेच पुढे आपापसात विवाह करत असत. याला “यौगलिक काळ” असेही म्हणतात. जैन शास्त्रांनुसार भोगभूमी संपून कर्मभूमीचा काळ आला तेव्हा ही प्रथा बंद होऊन भिन्न कुळात विवाह करण्याची प्रथा सुरु झाली. अर्थात ही पुराणकथा आहे पण बंधू-भगिनी विवाहापासून अलिप्त असणारे समाज अत्यल्प होते असे अनुमान आपण काढू शकतो.

पुत्रप्राप्तीसाठी नियोग प्रथा होती हे आपल्याला माहीतच आहे. पण काही जैन कथांवरून अनेक नि:संतान राजे एखाद्या तरुण ब्रह्मचारी साधूकडूनच आपल्या राणीच्या पोटी पुत्र व्हावा अशी कामना करत. साधूला नम्रपणे बोलावून त्याने नकार दिला तर त्याला धमकी दिली जायची कि राण्यांचा भोग घे अन्यथा प्राणांना मुकशील. अशा वेळेस कामभावना न ठेवता रत झाला तरी तो साधू व्रतभंग करत नाही असे आचार्यांनी म्हटले आहे. (बृहतकल्पभाष्य व निशीथचुर्णीपीठिका)

थोडक्यात सांगायचे तर धर्मशास्त्राने कितीही कठोर निर्बंध लादले तरी व्यवहारात लैंगिकता मर्यादेत राहण्यासच मर्यादा आहेत. पुरुषसत्ता म्हणून पुरूषच अनैतिक लैंगिक संबंधात पडन्यास स्त्रीला भाग पाडतात हे विधानही अशास्त्रीय आहे कारण अनेकदा उलटेही घडत असल्याच्या घटना आपल्याला दिसतात. वासनांवर नियंत्रण ठेवावे हे म्हणणे ठीक असले तरी मानवी मानसशास्त्र कोणत्या वेळेस कसे वर्तन करेल याचे भाकीत वर्तवता येणे अशक्य आहे. समाजासमोर आदर्श ठेवण्यासोबतच शिक्षेचे भय दाखवण्याचे काम धर्मशास्त्रे व कायदे करत असले तरी समाजात नियंत्रित कामुकता अस्तित्वात आहे असे ठोस विधान आपण करू शकत नाही. शिवाय धर्मातील पुराणांतही झियस ते इंद्रादी देवांपासूनच्या स्वैर लैंगिकतेच्या असंख्य कथा असल्याने देवांना मानवी धर्म लागू पडत नाही हे विधानही अनैतिक होऊन जाते. उलट मानवाच्या किंवा विवाहसंस्थेच्या आरंभकाळी बंधू-भगिनी विवाह निषिद्ध मानले जात नसत असे म्हणता येते.

समाजाला गरज असते ती स्थैर्य आणि नियंत्रणाची पण साधने कमी पडल्याने तशी आदर्श स्थिती उत्पन्न होतेच असे नाही. पण भारतीय तंत्रशास्त्रासारख्या लोकधर्माच्या क्षेत्रात लैंगिकता ही ना पूर्णतः दडपलेली आहे, ना पूर्णतः मुक्त—ती एकाच वेळी नियंत्रित आणि अभ्यासली गेलेली मानवी आणि दैवी शक्ती आहे. पण तंत्रशास्त्रांचाही दुरुपयोग करून लैंगिक अत्याचार करणारे बुवा-बापू यांचे पीक आलेले असल्याने त्यातील लैंगिकतेतील आध्यात्मिकता आता संपत आली आहे की काय असे वाटण्यासारखी स्थिती आहे.

याच वेळेस आपल्याला ज्यू, इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मातील लैंगिक नैतिकताही तपासून पाहिली पाहिजे. या तीनही धर्मांना अब्राहमिक धर्म म्हणून ओळखले जाते. या धर्मांतील परंपरांकडे पाहिल्यास लैंगिक नैतिकतेची मांडणी नियमप्रधान, ईश्वराधिष्ठित आणि कराराधारित स्वरूपात दिसते.

ज्यूंच्या जुन्या करारानुसार लैंगिकतेसंबंधी मुख्य विचार पाहता लैंगिक संबंध हे केवळ विवाहबंधनातच योग्य मानले गेले आहेत. उत्पत्तीच्या (Genesis) पुस्तकात ईश्वराने मनुष्याला "सफल व्हा, बहुगुणित व्हा" (उत्पत्ती 1:28) अशी आज्ञा दिली आहे, ज्यामुळे लैंगिकता ही वंशवृद्धीचे साधन मानली जात होती असे दिसते.  लेवीय (Leviticus) पुस्तकात लैंगिक शुद्धतेबद्दल कडक नियम आहेत. यामध्ये व्यभिचार (दुसऱ्याच्या पत्नीशी संबंध), समलैंगिकता (लेवीय 18:22), पशुगमन आणि रक्ताच्या नात्यातील लैंगिक संबंध यांना गंभीर पाप मानले गेले आहे. प्राचीन समुदायांत (त्यात भारतीयही आले) अशा प्रकारची नंतर निषिद्ध बनलेली लैंगिकता अस्तित्वात होती याचे असे पुरावे मिळतात.

जुना करार पितृसत्ताक असून त्यात स्त्रीयांना मनुस्मृतीप्रमाणेच अत्यंत दुय्यम स्थान दिलेले आहे. स्त्रियांना अनेकदा पुरुषांच्या (पतीच्या) मालकीची किंवा त्यांच्या अधीन मानले गेले आहे. हे पितृसत्ताक पद्धती प्रबळ असल्याचे दर्शवतात. लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यावर निर्बंध होते आणि लग्नाआधी स्त्री कुमारीच असली पाहिजे यावर जास्त जोर दिला जात असे. लैंगिक नियम कडक असूनही, 'सॉरलोमनचे गीत' (Song of Solomon) सारख्या पुस्तकांमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यातील प्रेम, प्रणय आणि लैंगिक आकर्षणाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे, जे लैंगिकतेला वैवाहिक जीवनाचा आनंद मानतात. थोडक्यात, जुना करार लैंगिकतेला एक 'पवित्र' किंवा ईश्वरी आशीर्वाद मानतो, जो नैतिक मर्यादांच्या आत आणि विवाहाच्या चौकटीत राहून पाळला जावा, अशी अपेक्षा करतो.

 

कुराण आणि नवा करार (बायबल)  या दोन ग्रंथांभोवती इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मातील लैंगिकतेची चौकट उभी राहते. दोन्हींत अनेक बाबतीत समानता असली तरी दृष्टिकोनात सूक्ष्म भेदही आढळतात.

दोन्ही धर्मांत एक मूलभूत तत्त्व स्पष्ट आहे आणि ते म्हणजे लैंगिक संबंध फक्त विवाहानंतरच वैध आहेत. इस्लामप्रमाणे विवाह (निकाह) हा एक सामाजिक व परस्परसंबंधातील करार आहे. त्याला दैवी अधिष्ठान नाही. विवाहानंतर लैंगिक संबंध वैध ठरून परस्पर अधिकार आणि कर्तव्यांचा भाग बनतात तसेच विवाहाबाह्य संबंध (ज़िना) हे कठोर निषिद्ध मानले जाते. ख्रिस्ती धर्मात विवाह हा  पवित्र संस्कार असतो आणि लैंगिक संबंध दैवी संमतीने आणि प्रामुख्याने प्रजननाशी निगडित असतात. ख्रिस्ती धर्मात विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य संबंध  पाप मानले जातात.

इस्लाममध्ये व्यभिचार हा गुन्हा असून काही इस्लामी कायद्यात (शरिया) कठोर दंडांची तरतूद आहे पण पण पुराव्याचे निकष मात्र अत्यंत कडक आहेत. ख्रिस्ती धर्मात लैंगिक पापे “नैतिक अध:पतन” मानून दंडापेक्षा पश्चात्ताप आणि क्षमा यावर भर दिला जातो. इस्लामची लैंगिकतेबाबत  कायदेशीर व नैतिक चौकट महत्वाची आहे तर ख्रिस्ती धर्मात  नैतिक आणि आध्यात्मिक चौकट महत्वाची आहे.

पण हे झाले धर्म नियम. इस्लाममध्ये जेथेजेथे शरीयाची अंमलबजावणी लागू आहे तेथे लोक घाबरून का होईना लैंगिकतेबाबत धर्म आणि कायद्याची चौकट पाळतात. पती-पत्नीची लैंगिकता नैसर्गिक आणि वैध, पण नियंत्रित मानली जाते. पती-पत्नीचे परस्पर हक्क स्पष्ट असून लैंगिक आनंदालाही काही प्रमाणात मान्यता आहे. इस्लाममध्ये चार पत्नी करण्याची अनुमती आहे. इस्लामिक विद्वान आणि कुराणाच्या स्पष्टीकरणानुसार, पुरुषांमधील लैंगिक संबंध किंवा गुदद्वारासंबंधीचा संभोग निषिद्ध (हराम) मानला जातो.

ख्रिस्ती धर्मात ऐतिहासिकदृष्ट्या द्वैत असून लैंगिकता प्रजननासाठी आवश्यक मानली असली तरी विशेषतः कॅथोलिक परंपरेत ब्रह्मचर्य हे अधिक उच्च आध्यात्मिक मार्ग मानले जाते.  एकपत्नित्व हा ख्रिस्ती धर्माचा आदर्श मानला जातो.

पण हे झाले धर्माबाबत. आधीच चर्चा केल्याप्रमाणे धर्मशास्त्रे आणि सामाजिक वास्तवे वेगळी असतात हे आपण इतिहासात डोकावून पाहिले तरी लक्षात येते. वर्तमानही काही वेगळे सांगत नाही. सर्व जागतिक संघटीत धर्म (लोकधर्माचा अपवाद) प्रामुख्याने पुरुषसत्ताक प्रथा पाळतात. स्त्रियांचे स्थान (कायद्याने समान मानले तरी) वास्तवात दुय्यम असते आणि त्याविरुद्ध अनेक विदुषी आजही आवाज उठवत असतात. पण पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रीच्या लैंगिकतेवर तुलनेने अधिक बंधने असणे हे मग स्वाभाविक बनून जाते. स्त्रीचे पावित्र्य, शील, आणि निष्ठा यांना उच्च मूल्य मानले जाते खरे, प्रत्यक्षात लैंगिकतेवरचे बंधन आणि वास्तव यात पुन्हा फरक पडतो, कारण मुळात कोणातरी स्त्रीच्या सहमतीशिवाय पुरुष व्यभिचार करूच शकत नसल्यामुळे या मूल्याला वास्तव जीवनात किती स्थान द्यावे हा प्रश्न पडतो.

प्राचीन काळापासून आढावा घेतला तर जागतिक पातळीवर लैंगिकतेविषयक नीती-नियम बदलत राहिल्याचे आपल्याला दिसेल आणि यामागे बदलते समाजविचार आणि म्हणूनच बदलते धर्मविचार कारणीभूत असल्याचे लक्षात येईल. स्थिर नसणे हे नीतिशास्त्राचे मुलभूत वैशिष्ट्य आहे. वयाने लहान मुलींशी लग्न करण्याची प्रथा कोणत्या ना कोणत्या प्रमाणात बहुतेक धर्मांनी वापरल्याचेही आपल्याला दिसते, पण आता त्याकडे तत्कालीन सामाजिक, वैचारिक आणि धार्मिक स्थितीच्या नजरेतून पाहावे लागते. नैतिकता ही नेहमी समाज आणि कालसापेक्ष असते. वर्तमान युगात लोक धर्माकडे पुन्हा वळू लागलेली दिसत असली तरी धर्मशास्त्रे व त्यातील नीतीनियम सहसा कोणी पाळताना दिसत नाही. असे असले तरी लैंगिक जीवनातील मानवी वर्तन हे अद्यापही आदिम पातळीवर वावरताना दिसते.

लैंगिकतेबाबत कोणताही धर्म कठोर झाला असला तरी धर्मतत्वे निर्माण करणाऱ्या मंडळीने सामाजिक मानसशास्त्राचा कितपत विचार केला होता हा प्रश्न पडतो. आणि केला असला तरी ते त्या त्या कालमर्यादेत उपयुक्त असतीलही कदाचित पण त्यात लवचिकता आणि मानवी जाणिवांचा सतत होणारा विस्तार आणि त्यानुसार करावे लागणारे बदल याची मुभा न दिल्याने धर्मनियम (इतिहासात अनेकदा बदलले असले तरी) अपरिवर्तनीय आहेत हे ठसवण्यात त्या त्या काळातील धर्मनियंते यशस्वी झाल्याचे दिसून येते.

लैंगिकतेबाबत समाजाच्या पुरादिम काळापासून नीती-नियमांत एवढे फेरफार झालेले आहेत की अभ्यासकही अचंबित होतात तर काही भ्रमित होतात. मुळात धर्म आणि लैंगिक संबंध यात काही संबंध जोडणे हे समाजरचनेसाठी योग्य असले तरी त्यात धर्माचा हस्तक्षेप कितपत न्याय्य आहे यावरही विचार करण्याची आवश्यकता आहे. त्या त्या काळाचे नीतिशास्त्र वेगळे असू शकते हे मान्य करून निखळपणे याकडे पाहिले पाहिजे. सामाजिक मोकळेपणासहितची किमान नैतिक बंधने यावर सुयोग्य मार्ग असू शकतो अन्यथा लैंगिक गुन्हे वाढत जातात. आणि असे गुन्हे कायद्याच्या कक्षेत आले नाही तरी सामाजिक नैतिक चौकट कोसळवू शकतात हे ध्यानी घेतले पाहिजे.

 -संजय सोनवणी


(पद्मगंधा दिवाळी विशेषांक २०२६ मध्ये प्रकशित)

 

No comments:

Post a Comment

धर्म आणि लैंगिकता

  धर्म म्हटले की जीवनविषयक ऐहिक आणि पारलौकिक व्यवहारांचे काही ना काही निर्देशन, नियंत्रण, साध्ये आणि साधने यासंदर्भाने नियमांची एक चौकट उभ...