Tuesday, March 1, 2011

जातीय वाद खरे कोणात आणि का?

महाराष्ट्रात गेली किमान सव्वाशे वर्ष ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद सुरु आहे. महात्मा फुले हे या वादाचे आधुनिक काळातील उद्गाते मनले जातात. पण महत्मा फुलेंचा वाद हा फारच व्यापक स्वरुपाचा होता कारण फक्त ब्राह्मणशाही वर्चस्ववादच नव्हे तर सावकारशाहीविरोधातही त्यांनी दंड थोपटले होते. ब्राह्मणवाद व सावकारशाही यांनी जनतेचे धार्मिक/आर्थिक शोषण करुन त्यांचे जीवन असह्य केले आहे हे जळजळीत दाहक वास्तव त्यांनी तेवढ्याच प्रखरतेने सामोरे आणले. ते फक्त शाब्दिक/पुस्तकी विरोध करुन थांबले नाहित तर त्याला प्रत्यक्ष क्रुतीचीही जोड दिली. त्यांचा हा वाद द्वेषावर आधारित नव्हता तर त्यामागे पिडितांच्या वेदनांमुळे निर्माण झालेल्या रचनाशील संतापाचा आधार होता. पुढे शाहु महाराजांनी समतेसाठी सत्तेने मनात आणले तर काय घडवता येवु शकते याचा एक आदर्श घालुन दिला. वेदोक्त प्रकरणामुळे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला त्यांच्याही काळात उकळी फुटली. बाबासाहेब आंबेडकरांनी परिस्थितीशी झुंजत दलितांना एक नवी अस्मिता दिली, दिशा दिली आणि स्वाभिमानाने ताठ उभे राहण्याचा आदर्श दिला.थोड्क्यात फुले-शाहु-आंबेडकर यांचा ब्राह्मणवर्चस्वविरोध हा ऐतिहासिक व वर्तमानकालीन सत्यांच्या अन्वेषनातुन आणि समतेच्या व्यापक सिद्धांतातुन आला होता असे म्हणावे लागते. तो विरोधासाठी विरोध नव्हता तर ब्राह्मणवर्गाने आधुनिक परिप्रेक्षात बदलावे आणि धर्मात काळानुरुप बदल घडवत धार्मिक पातळीवर समानता आणावी असा आग्रह त्यामागे होता. पण सनातनी ब्राह्मणांनी फुले ते आंबेड्कर यांना वाटाण्याच्याच अक्षता लावल्या. महर्षि वी. रा. शिंदे यांनी आणलेल्या अस्प्रुष्यतानिर्मुलनाच्या जाहीरनाम्यावर सनातनी टिळकांनीही सही करण्याचे नाकारले होते. बाबासाहेबांनी हे बदल घडत नाहीत हे बघुन धर्मांतराची घोषणा केली खरी, पण तरीही धर्ममार्तंड आज-ना-उद्या बदलतील या आशेवर तब्बल २० वर्ष वाट पाहुन मगच धर्मांतर केले हे येथे लक्षात ठेवायला हवे.

थोडक्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद ज्या पार्श्वभुमीवर सुरु झाला त्यात बहुजनीय भुमिका अत्यंत सकारात्मक-रचनात्मक क्रुतीशील अशी दिसते. त्यामुळे अनेक पुरोगामी ब्राह्मणही या चळवळीला बळ द्यायला पुढे आल्याचे दिसते. साने गुरुजींचे नाव येथे विसरता येणे अशक्य आहे. कारण या चळवळीला तत्वांचा आधार होता. त्यात आक्रस्ताळेपणा आल्याचे क्वचितच दिसते.

पण आज ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हा एका भिषण स्थितीशी येवुन ठेपला आहे आणि समाजशास्त्रद्न्यांनीही काळजी करावी अशी ही स्थिती उत्पन्न झाली आहे. या वादाला सध्या खालील परिमाणे मिळालेली दिसतात.

१. मराठा विरुद्ध ब्राह्मण
२. दलित विरुद्ध ब्राह्मण
३. ब्राह्मण विरुद्ध दलित आणि बहुजन

वरील परिमाणांवर नीट विचार करायला हवा. सध्या ब्राह्मणेतरांत ब्राह्मणविरुद्ध मराठा समाजाने नेत्रुत्व स्वीकारले आहे असे चित्र दिसते. त्यात खर्या अर्थाने किती बहुजन आहेत हा एक प्रश्नच आहे. मराठा समाज-नेत्रुत्वाला बहुजनीय समाजाच्या समस्यांचे कितपत आकलन आहे हा प्रश्न पडतो. त्यामुळे बहुजनीय या वादापासुन दुरच आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दलित-मराठा असे नवे समीकरण जन्माला आले आहे. त्यातुन ब्राहमणी वर्चस्वाला शह देता येइल अशी एक कल्पना दिसते. समान शत्रु आहे म्हणुन सारेच विरोधक एकत्र येतात असे नाही. कारण प्रत्येक जातीसमुहाच्या जातीय अन्यायाबाबतच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. अनुभवही वेगवेगळे आहेत. आणि "ब्राह्मणी वर्चस्व" म्हणजे आता या परिस्थितीत नेमके काय अभिप्रेत आहे आणि नेमक्या कोनत्या बाबींचा विरोध करायचा आहे याचे नीट आकलन आहे काय हाही प्रश्नच आहे.

आणि फक्त ब्राह्मणविरोध हा एकमेव अजेंडा असेल आणि त्याला पुर्वसुरींनी जशी सकारात्मक क्रुतीची जोड दिली तशी क्रुती होत नसेल तर या विरोधाला तरी काय अर्थ रहातो? त्यातुन निष्पन्न काय होणार? आणि त्या द्वेषाधारेत चळवळीला किती जणांची सहानुभुती राहणार? आणि अशा चळवळीचे भविष्य तरी काय राहणार?

सध्याचा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हा मराठा विरुद्ध ब्राह्मण असाच आहे. अन्य (काही दलीत संघटना वगळल्या तर) बहुजनांना या वादाशी काही घेणे-देणे नाही. कारण हा सामाजिक आस्तित्वाचा लढा नसुन नवी राजकीय समीकरणे जुळवण्याची धडपड तर नाही ना असा रास्त प्रश्न पडणे स्वाभावीक आहे. परंतु या वादाला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद असे नाव देवुन सर्वांना यात, त्यांचा सहभाग नसताही, त्यात खेचले गेले आहे. यामुळे एक विचित्र परिस्तिती निर्माण झाली आहे, आणि त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे.

मराठेतर बहुजनांचा ब्राह्मण समाजाविरुद्ध झगडा नाही. जो झगडा आहे तो जेही कोणी ब्राह्मणी संस्क्रुती लादु पहातात, धार्मिक असमानतेचा आजही जयघोष करतात आणि इतिहासातील सत्ये लपवत खोटा इतिहास सांगतात त्यांच्याशी आहे. ते जातीने ब्राह्मणच असतील असे नाही. हा लढा व्यक्तींशी आहे...कोणा समाजाविरुद्ध नाही. समाज विरुद्ध समाज अशी मांडणी सर्वांच्याच भविष्यासाठी घातक आहे हे लक्षात ठेवणे आवष्यक आहे.

दलित विरुद्ध ब्राह्मण असे समीकरण मांडत भारतातुन ब्राह्मण हद्दपार करण्याची भाषा करणा-या काही संघटना आहेत. त्यांच्या भाषेत पुरेपुर विखार भरलेला असतो. तो विखार दलितांवर गतकाळात झालेल्या अमानवी अन्याय-अत्याचाराच्या परिप्रेक्षात पाहीला तर त्यांनी शस्त्रेच अजुन हाती का घेतली नाहीत असा प्रश्न पडेल. परंतु मानवतेचा, करुणेचा धर्म त्यांनी स्वीकारला असल्याने तसे घडले नाही हे उच्चवर्णीयांनी अहोभाग्यच समजले पाहिजे. पण महत्वाची बाब येथे अशी आहे कि आंब्वेडकरी चळवळ म्हणजे अशा काही २-३ संघटना नव्हेत. चळवळ त्याहीपेक्षा व्यापक आहे आणि ती सामाजिक, सांस्क्रुतीक आणि आर्थिक पातळीवरील सक्षमतेच्या दिशेने प्रगती करत आहे असे आशादायक चित्रही आहे. त्यांना ब्राह्मणांशी काहीएक देणे-घेणे उरलेले नाही. गतकालीन नियतीशी जणु करार करुन नवी नियती घडण्याची जिद्द आणि स्वाभिमान त्यांनी मिळवला आहे. आणि त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी जे त्यांना भडकावत द्वेषमुलक प्रचार करत स्व-केन्द्रित अजेंडा राबवणारे नेते आहेत त्यांची सद्दी अशा स्थितीत टिकेल याची हमी स्वता: असे नेतेच देवु शकतील काय?

या पार्श्वभुमीवर ब्राह्मण विरुद्ध बहुजन असाही नवा वाद निर्माण होतो आहे आणि भविष्यात तो कोठे जाइल हे सांगता येणे अवघड आहे. श्री. ह. मो. मराठे यांनी "ब्राह्मणांना अजुन किती झोडपणार?" असा लेख (नंतर त्याची पुस्तिका) प्रसिद्ध केली होती. त्याच धरतीवर श्री. श्यामसुंदर मुळे ते डा. नी. र. वर्हाडपांडे इ. नी असंख्य लेख लिहुन बहुजनविरोधी आघाडी उघडली याला फार वर्ष झाली नाहीत. आणि या आघाडीला भरपुर कोलीते पुरवण्याचे कार्य आधीच दोन प्रकाशनसंस्थांनी करुन ठेवल्याने त्या खोट्याला नवी खोटी प्रत्युत्तरे दिली जावु लागली. मी ह.मोंच्या पुस्तिकेला मुद्देसुद उत्तरे देवुन द्वेषाधारित विद्रोह आणि वर्चस्ववादी अहंगंड यातुन विनाशच हाती येइल असे स्पष्ट केले होते. (ब्राह्मण का झोडपले जातात...ही माझी पुस्तिका.) परंतु जेंव्हा जातीय गंड शहाणपणवर मात करतात
तेंव्हा जे घडु शकते तेच घडत आहे. ब्राह्मण समाजातील छोटे-मोठे वीर हुडकुन त्यांचा जयघोष जुन्या पीढीच्या विद्वानांनी सुरु केला त्याची री तरुण पिढी ओढु लागली आहे. त्यांना फुले-आंबेडकर-शाहुं-गांधींना निरलस अर्वाच्च्य शिव्या देण्यात परमानंद होतो आहे. बहुजनातील जेही काही आहे ते त्यांनी सर्वस्वी नाकारायला सुरुवात केली आहे. या पीढीच्या हाती अत्त्याधुनिक साधने आहेत आणि "आम्हीच (किंवा आमच्या गतकालीन नेत्यांनी) शिव्या का खायच्या?" असा प्रश्नही आहे. उलट त्यांचा जेवढा करता येइल तेवढा उदो-उदो करण्याची ही नवी मानसिकता आहे. गतकाळातील चुका स्वीकारण्याची जी मधल्या काळात एक मानसिकता होती ती जवळपास नष्ट होत चालली आहे. आणि याला जबाबदार आहे ती सध्याची भरकटलेली चळवळ जी जातीचे राजकारण करत नवा वर्चस्ववाद निर्माण करत आहे. त्यामुळे समाजात मोकळा विचार मांडणे आणि तोही कोणत्याही समुदायाच्या संदर्भात अशक्य होत चालले आहे.

सांस्क्रुतिक अंत घडतो तो असा. समाजाचे वैचारिक दिवाळे निघते ते असे. इतिहासाकडे निरपेक्षपणे पाहणार्यांची व त्यवर सडेतोड लिहिणार्यांची वाताहत होते ती अशी...कारण प्रत्येक प्रत्येकाकडे संशयाने पहातो आहे आणि हे फार मोठे सामाजिक पातक घडले आहे आणि यातुन समाज-दुभंग-मानसिकतेचा शिकार होतो आहे याची जाण समाजधुरिणांना नाही याचा खेद वाटतो. उलट आहे या स्थितीचा राजकीय फायदा कसा उपटता येइल याचीच जास्त विवंचना त्यांना आहे असे दिसते. या मंडळीपासुन सावध राहणे हेच काय ते आपण करु शकतो आणि ही द्वेषमय स्थिती लवकर बदलो अशी अपेक्षा बाळगु शकतो.

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...