Saturday, January 31, 2026
जीवन सुसह्य करणारा कातडी कमावण्याचा शोध!
शेतीचा शोध लागत असताना मानवाने जेवणाला उपयुक्त असे काही महत्वाचे शोधही लावले. शेतेच्या शोधाने या जुन्या शोधांची त्यातील उपयुक्तता लक्षात घेऊन त्याच्यात प्रचंड विकासही करण्यात आला. शेतीने माणसाला स्थिर केले असले तरी शेतीला उपयुक्त अशी अवजारेही शोधणे आवश्यक होते. अतिरिक्त अन्न-धान्य साठवणुकीसाठी व वाहतुकीसाठी नव्या व्यवस्थाही शोधणे आवश्यक होते. हा प्रवास अर्थात फारसा सोपा नव्हता. पण माणसाने आपली बुद्धी वापरत उपयुक्त शोध लावत आपले जीएन सुखकर करण्यात यश मिळवले.
यातील महत्वाचा आणि शेतीसाठीही उपयुक्त ठरलेला शोध म्हणजे कातडी कमावून तिला टिकावू बनवून वापरयोग्य बनवण्याचा. खरे तर हा मानवी इतिहासातील पहिला जीव-रसायनशास्त्रीय शोध होय. या शोधाने माणसाच्या युद्धशास्त्रापासून ते शेतीशास्त्रात आमुलाग्र बदल घडवायला मदत केली.
जेंव्हा जवळपास दीड लाख वर्षांपुर्वी मानव हा शिकारी मानव होता, भटका होता, जवळपास नग्न रहात होता, त्या काळातच मानवाला शिकार केलेल्या प्राण्यांच्या कातड्याची उपयुक्तता लक्षात आली. थंडी-पावसापासुन रक्षण करण्यासाठी, पांघरण्यासाठी व कृत्रीम निवारे बनवण्यासाठी आपण कातडे वापरु शकतो हे त्याच्या लक्षात आले. मग त्याने शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी सोलून काढायला सुरुवात केली. पण असे कच्चे कातडे टिकावू नसे आणि फारसे उपयुक्तही. वातावरणाच्या प्रभावामुळे कातडे फार काळ टिकत नाही हे लक्षात आल्यानंतर माणसाने आपली प्रतिभा कामाला लावुन कातडे टिकावु कसे करता येईल यासाठी शोध सुरु केला.
मानव सुरुवातीची हजारो वर्ष प्रथम जनावराचीच चरबी चोळुन कातड्याला मऊ व टिकावु ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्या काळी विपुल शिकार उपलब्ध असल्याने तशी कातड्याची कमतरताही नव्हती. शिवाय तत्कालीन मानव सतत शिकारीच्या वा चरावु कुरणांच्या शोधात सतत भटकता असल्याने प्रक्रिया पद्धती शोधणे वा प्रक्रिया करत बसणे यासाठी त्याच्याकडे वेळही नव्हता. पण मनुष्य जसा शेतीचा शोध लागल्यावर स्थिरावु लागला, त्याची शिकार कमी होत गेल्याने कातड्याची एरवी असलेली मुबलकता कमी झाली तेंव्हा मात्र कातड्यावर प्रक्रिया केली तरच कातडे दीर्घकाळ टिकावू करता येईल हे त्याच्या लक्षात आले. त्यासाठी त्याने आपली शोधक बुद्धी वापरली. असंख्य प्रयोग केले. आणि शेवटी इसवी सनाच्या सुमारे दहा हजार वर्षांपुर्वी, त्याने नैसर्गिक वनस्पतीजन्य पदार्थ वापरत अभिनव पद्धती शोधुन काढली...व ती म्हणजे कातडी कमावण्याची कला.
जगभर थोड्याफार अंतराने हा शोध लागला. पण प्रत्येक ठिकाणची नैसर्गिक परिस्थिती व हवामान वेगळे असल्याने, आणि प्राणीसृष्टीही वेगळी असल्याने प्रत्येक ठिकाणची प्रक्रिया पद्धती बदलली. पण लाभ हा झाला की मानवाला जगणे सुखकर करण्याचे एक नवे साधन मिळाले.
भारतात बाभुळ, खैर अशा झाडांच्या साली, चुना, मीठ व अन्य तेलादि रंजक द्रव्ये वापरत कातडी कमावण्याची, रंगवण्याची पद्धत इसवी सनापुर्वी दहा-एक हजार वर्षांपुर्वीच शोधण्यात आली. ती सर्व प्रचारित होवून ती भारतभर एक-दोन शतकातच देशभर पसरत वापरात आली. सर्व प्राण्यांचे कातडे कमवायची वेगवेगळी पद्धतही शोधण्यात आली. युरोपात मात्र ओक वृक्षाची साल कातडी कमावण्यासाठी वापरली जाई व त्यापासून कमावलेले कातडे तेवढे टिकावुही नसे. प्रक्रिया पद्धतीही वेगळी असल्याने कातड्याच्या दर्जातही फरक पडे. पण मग त्यापासून वस्त्रे, चामडी जोडे, शिरस्त्राणे, ढाली ते चामड्यांच्या मजबूत वाद्यांनी दोन वस्तू घट्टपणे बांधता येऊन शेतीची अवजारे, हातकुर्हाडी, पाण्याच्या पखाली ते मद्याचे बुधले अशा अनेक वस्तू बनत गेल्या. चामडे कमावणे हा एक प्रतिष्ठेचा आणि फायद्याचा व्यवसाय बनला.
कातडी कमावणे हे अत्यंत शिस्तबद्ध रासायनिक प्रक्रियांची एक विशिष्ट श्रुंखला असलेले किचकट व कष्टदायी काम आहे. आज या उद्योगात अनेक प्रक्रिया यांत्रिकीकरणाने होत असल्या तरी प्राथमिक प्रक्रिया आजही या मानवी श्रम-सहभागाशिवाय होत नाहीत. प्राचीन काळचा विचार केला तर मग हे काम एके वेळीस रासायनिक प्रक्रिया वेळोवेळी क्रमाने करण्याची, रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी नैसर्गिक जैव सामग्री गोळा करण्याची व अंतत: त्याला अंतिम उत्पादनाचे रुप देण्याची कारागिरी करण्यास किती सायास पडत असतील याची आपण कल्पना करुनच थक्क होतो.
जनावराचे कातडे सोलुन काढले कि ते वाहुन आपल्या उद्योगस्थळापर्यंत वाहुन नेण्याचा, स्वच्छ करण्याचा...वरकरणी तसा घाण वाटनारा हा उद्योग. मग एवढ्या रसायनी प्रक्रिया करतांना येणारा उग्र व घाणेरडा वास, चुन्याची-मीठाची प्रक्रिया करतांना हात-पायांवर होणारे विपरीत परिणाम...हे सारे माणूस सहन करत का केला? याचे महत्वाचे कारण म्हणजे शेतीच्या शोधणे स्थिर झालेल्या मानवी समाजाची कातडी वस्तुंची निर्माण झालेली अपरिहार्य गरज. त्यामुळेच या व्यवसायात पुर्वी प्रचंड सुबत्ताही होती. समाजात या व्यवसायाला एक हजार वर्षांपुर्वीपर्यंत सन्मानही होता. ऋग्वेदातही चर्मकारांबद्दल आदरार्थीच उल्लेख मिळतात. जवळपास आठव्या शतकापर्यंत हा व्यवसाय करणा-यांच्या श्रेण्या होत्या. भारतीय कमावलेले चर्म व त्यापासून बनलेल्या वस्तू निर्यात होत. देशांतर्गत व्यापारातही त्याचे स्थान मोठे होते. त्यामुळे यांच्या श्रेण्यांना राजदरबारीही मान असे हे आपल्याला काही शिलालेख व ताम्रपटांवरून कळते.
कातडी कमावल्यामुळे पादत्राणे, घॊड्यांचे जीन, लगाम, बैलगाड्यांसाठी बैलांच्या टिकावु व मजबुत वाद्या बनवता आल्या. सैनिकांसाठी शिरस्त्राने, हस्त-बचावक, चामडी चिलखते, ढाली, धनुष्याच्या वादीच्या दो-या बनवता येवू लागल्या व युद्धतंत्रात मोठा बदल झाला. लिखित संदेश पाठवण्यासाठी व अगदी ग्रंथ लेखनासाठीही चामड्याचा वापर होवू शकला. अशा हजारो चामड्यावर लिहिलेल्या ज्युंच्या धार्मिक लेखनाच्या गुंडाळ्या तेल अमार्ना येथे सापडल्या आहेत. एके काळी तर चामड्याचे तुकडे हेही चलन म्हणुनही वापरात होते. शेतीसाठीची अनेक अवजारे ते जलस्त्रोतासाठी लागणा-या मोटी चामड्यापासुन बनु लागल्या. पाण्याच्या पखाली, तेलाचे बुधलेही बनू लागले. द्रव वस्तूंची हाताळणी, साठवणूक आणि वाहतूकही सुलभ झाली. त्यामुळे शेती उत्पादन वाढायला मदत झाली. फ्यशनमद्धे आजही कातडी वस्तु प्रचंड मागणीत असतात. अगदी ग्रंथांच्या बांधणीतही कातड्याचा उपयोग अगदी अलीकडेपर्यंत केला जात असे. पाण्याच्या पखाली, तेलाचे, मद्याचे कमावलेल्या चामड्यापासुनच बनत होते. गृहसजावटीतही विविध प्राण्यांच्या चामडी वस्तुंना प्राधान्य मिळाले.
थोडक्यात कातडी कमावण्याचा शोध हा असंख्य कातडी वस्तू बनवण्याच्या उद्योगांना यामुळे वेग मिळाला. चर्मोद्योगाने मानवी जीवनाला सुसह्य व उच्चभ्रु बनवण्यात मोलाचा हातभार लावला. एवढेच नाही तर पर्यावरणाचे संतुलन साधायलाही हातभार लावला. पण भारतात मात्र चर्म-वस्तुंचा सर्रास उपयोग करणा-यांनी मात्र ज्यांनी मुळात हे बनवले त्यांना मात्र अस्पृष्य ठरवले. हा भारतीय समाजशास्त्रीय इतिहासावर असलेला कलंक होय. पण कातडी कमावण्याचा शोध हा मानवी इतिहासाला कलाटणी देणारा ठरला हे निश्चित.
-संजय सोनवणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
जीवन सुसह्य करणारा कातडी कमावण्याचा शोध!
शेतीचा शोध लागत असताना मानवाने जेवणाला उपयुक्त असे काही महत्वाचे शोधही लावले. शेतेच्या शोधाने या जुन्या शोधांची त्यातील उपयुक्तता लक्षा...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भ...
No comments:
Post a Comment