Thursday, June 9, 2011

हिंदू धर्माची सर्वमान्य व्याख्या होवू शकत नाही हे खरे नाही.

हिंदू धर्माची सर्वमान्य व्याख्या होवू शकत नाही हे खरे नाही. त्यासाठी आपण पुर्वसुरींनी काय व्याख्या केल्या आहेत त्याचा आढावा घेवू आणि त्यातील त्रुटी शोधुयात.
खालील व्याख्या मी श्री. ज.स.करंदीकर, श्री. दा.न. शिखरे, पं. महादेवशास्त्री दिवेकर व डा. रा. ना. दांडेकर यांच्या विवेचनातुन घेतल्या आहेत.

१. "ज्याचे आईबाप हिंदू असतील तो हिंदु."
या व्याख्येतील त्रुटी अशी कि अहिंदू माता-पित्यांच्या संततीला हिंदु करुन घेतले तर ती त्याला लागु होत नाही.

२. हिंदुस्तानात जन्म झाला तो हिंदू.
या व्याख्येत परदेशात जन्म झालेल्या हिंदुंना बाहेर टाकले जाते तर ज्या मुस्लिम अथव अन्य धर्मियाचा जन्म हिन्दुस्थानात झाला आहे त्यांनाही हिंदू मानावे लागते.

३. जातीभेद मानतो तो हिंदू.
असे मानल्यास लिंगायतादी जातीभेद न मानणारे संप्रदाय अहिंदु ठरतात. एवढेच नव्हे तर ही व्याख्या जातीभेदाला गंभीर रुप देते.

४. जो हिंदु कायदा मानतो तो हिंदु.
काही विद्वान ही व्याख्या मानतात. पण दत्तक, वारसा, विवाह याबाबतीत हिंदु कायदा संदिग्ध आहे.

५. सावरकरांची व्याख्या:
"आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका
पित्रुभू: पुण्यभुश्चैव स वै हिंदुरेते स्म्रुत:
अर्थात सिंधु नदीपासुन समुद्रापर्यंत पसरलेली ही भारत्भूमी ज्याला वाडवडीलांची भूमी आणि पुण्यभुमी वाटते तो हिंदू होय.

ही व्याख्या प्रादेशिक आहे आणि भावनिक आहे. राष्ट्रवादासाठी ती योग्य असली तरी ती धर्माचे दिग्दर्शन करत नाही.

६. लो. टिळक यांची व्याख्या अशी आहे:

प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाननेकता
उपास्यानामनियमं एतद्धर्मस्य लक्षणम

अर्थात: वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य नेमके कोण असावे याविषयी निश्चित नियम नसने, हे हिंदु धर्माचे लक्षण होय.

श्री. दा. न. शिखरे या व्याख्येवर आक्षेप घेतात ते असे: "वेदप्रामाण्य मान्य नसलेला चार्वाकापासून ते संतांपर्यंत एक अवाढव्य प्रवाह आहे तो या व्याख्येप्रमाणे हिंदू ठरत नाही. एवढेच नव्हे तर स्त्रीया आणि शुद्रांना मुळात वेदांचा अधिकारच नाहे. याखेरीज महत्वाचा प्रश्न असा कि वेदांच्या पुर्वीही हिंदु धर्म आस्तित्वात होताच कि! शिवाय "श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त अशीही व्याख्या करता येत नाही कारण श्रुती अनेक असून त्यात खुपच मतभिन्नता आहे. पुराणांतील मतभेदांबाबत तर बोलायलाच नको. तसेच कोणते आचार आवश्यक आहेत हेही लोकमान्यांनी स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे अव्याख्येयता हीच हिंदु धर्माची व्याख्या आहे असे म्हटले तर त्याचा व्यवहारात काही उपयोग होत नाही." ("सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म": श्री. दा.न.शिखरे)

सर्वोच्च न्यायालयाने "हिंदु हा धर्म नसून एक जीवनपद्धती आहे" अशी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात कोणताही धर्म आस्तित्वात येतो तेंव्हा एक विशिष्ट जीवनपद्धतीही आस्तित्वात येत असल्याने ही व्याख्या अत्यंत ढोबळ आणि दिशाभुल करणारी आहे हे उघड आहे.

थोडक्यात हिंदू धर्माची व्याख्या करण्यात विद्वानांना, त्यांचे प्रकांड पांडित्य मान्य करुनही, अपयश आले आहे हे अमान्य करता येत नाही.

पण तरीही हिंदू धर्माची व्याख्या करता येते. प्रत्येक धर्म हा कोणत्या तरी तत्वद्न्यान आणि कर्मकांडावर उभा असतो. तत्वद्न्यान आणि कर्मकांड हे परस्परपुरक असते. य दोहोंचा संबंध तत्वद्न्यानात्मक पातळीवर कधी परस्परसमर्थनीय वा विरोधाभासात्मकही असू शकतो. परंतू ते सर्वस्वी एकमेकांना विघातक नसतात. यासाठी आपण आधी प्रथम या धर्माची अव्यवच्छेदक कर्मकांडात्मक व तत्वद्न्यानात्मक वैशिष्ट्ये पाहुयात, जी या धर्माला अन्य धर्मांपासुन आपसूक वेगळे करतात.

१. हिंदु धर्माची निर्मिती वेदपुर्व काळातच सुफलनतायुक्त तंत्रविधीतून झालेली आहे. लिंग आणि योनीपुजा हा या धर्माचा मुळ स्थायीभाव आहे. वेदांनी या धर्माचा निषेध केला आहे. वैदिक धर्म पुरुषप्रधान व यज्ञात्मक कर्मकांड पालतो त्यामुळे हा धर्म आपसुकच वेगळा ठरतो.

२. पुजा, व्रते-वैकल्ये, योग, तप, संन्यास ही इष्ट दैवताला प्रसन्न करणे ते मोक्ष मिळवणे या धेयासाठी वापरली जाणारी, प्रत्येकाच्या आध्यात्मिक कुवतीनुसार वापरण्यास दिलेली कर्मकांडात्मक साधने आहेत. (पहा सर्वच पुराणे)

३. तत्वद्न्यानात्मक पातळीवर अद्वैत सिद्धांत हा परमोच्च सिद्धांत असून तो मनुष्य, प्राणिमात्र आणि सर्वच दैवतांत एकत्व/अभिन्नत्व पहातो. (पहा: आदी शंकराचार्य: ब्रह्मसुत्र भाष्य)

४. हे सिद्धांत सेश्वर असूनही इश्वर मानवी जीवनात कसलाही हस्तक्षेप करत नाही, तो सदय नाही कि निर्दय नाही, हे वैद्न्यानिक तत्वद्न्यान परमोच्च पातळीवर स्वीकारले गेले आहे.

५. आध्यात्मिक प्रगतिच्या पाय-या स्वयंनिर्दिष्ट असून स्थुलाकडुन सुक्ष्माकडे आणि सुक्ष्माकडुन शुन्याकडे नेणारे तत्वद्न्यान उपलब्ध आहे. (पहा-ब्रह्मसुत्रे)

६. जोवर प्राणिजात स्थुलाकडुन सुक्ष्मात आणि शेवटी शुन्यात जाणा-या पाय-या ओलांडत नाही तोवर पुनर्जन्म अटळ आहे हा एक सिद्धांत. (त्याला मी कर्मविपाक सिद्धांत म्हणत नाही. त्यावर वेगळे स्वतंत्र विवेचन मी करणार आहे.) याला खरे तर मी चढत्या प्रगतीचा सिद्धांत मानतो.

७. आत्मा हा अमर असून त्यावर कसल्याही क्रुत्याचा परिणाम होत नाही एवढा तो अलिप्त आणि निर्विकार आहे.

८. विश्वाची निर्मिती ही शिव आणि शक्ति या एकातुनच दोन अशा विभक्त झालेल्या अद्वैताचे द्वैत यातुन झालेली आहे. (अर्धनारीनटेश्वर)

थोडक्यात नाव काहीही दिले तरी वरील आठ मुद्दे या धर्माला अन्य सर्वच धर्मापासुन वेगळे करतात. धार्मिक/आध्यात्मिक आणि कर्मकांडात्मक स्वतंत्र वैषिष्ट्ये येथे विद्यमान आहेत. ही अन्य धर्मांत नाहीत. ही वैशिष्ट्ये वैदिक ते ज्यु धर्मातही आढळनार नाहीत. यामुळे हिंदु धर्माची व्याख्या करणे अशक्यप्राय बाब नव्हती हे तरी स्पष्ट व्हावे. कोणत्याही धर्मात विश्वनिर्मिती, तत्वद्न्यान आणि धार्मिक कर्मकांड हेच त्या-त्या धर्माला आस्तित्व देणारे घटक असतात.

हा मुळचा शैव प्रधान धर्म विस्कळीत होता आणि त्याला एकसुत्रात गुंफण्याचे कार्य वैदिक धर्माने केले हे माझे मित्र श्री. हर्षवर्धन देशपांडे यांचे मत मला नाईलाजाने नाकारावे लागत आहे. तत्वद्य्नात्मक पातळीवर वा कर्मकांडात्मक पातळीवर वैदिक धर्मतत्वांचा वा अगदी दैवतांचाही कसलाही प्रभाव आजच्या हिंदु धर्मावर नाही, हे वरील मुद्द्यांवरून लक्षात आले असेलच वा त्यावर अजून चर्चाही होवू शकते.

पण येथे महत्वाची बाब अशी आहे कि वैदिक वर्चस्वतावाद दहाव्या शतकानंतर वाढल्याने जातीभेद याचा या धर्मात शिरकाव होवून काही अनिष्टे घडली आहेत. पण त्यावर स्वतंत्र चर्चा करू. वैदिक वर्णभेदाची लागण व्यावसायिक जातींना झाली आणि  उच्च-नीच भाव हिंदुंत शिरला. पण ते हिंदु धर्माचे मुलचे अंग नाही.

हिंदु धर्म स्त्री-पुरुष समानतेच्या पायावर उभा आहे. वैदिक धर्मात मातृदेवता ही संकल्पनाच नाही. अनेक हिंदु ग्रंथांचे वैदिकीकरण केले गेल्याने गैरसमजातुन लोक वैदिकांनाही हिंदु समजतात. तीन वर्णाचे वेदाधिकार असलेले लोकच केवळ वैदिक असून बाकी सारे हिंदू आहेत.


जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...