Monday, February 6, 2012

दादोजी कोंडदेव...पुन्हा-पुन्हा...निरर्थक!

गजानन भास्कर मेहंदळे यांनी म.टा. ला दिलेल्या मुलाखतीत दादोजी कोंडदेवांची भलावन करणारी व त्यांचा पुतळा उखडण्याबद्दलचा रोष व्यक्त करणारी काही विधाने प्रसिद्ध झाली होती. खरे तर हा प्रकार म्हनजे शिळ्या कढीला उत आनण्याचा प्रकार होता. त्याचा प्रतिरोध म्हणुन मी खालील व्यापक भुमिका मांडली होती जी म.टा. ने प्रसिद्ध केली. ती अशी...



इतिहाससंशोधन विश्वसनीय कसे होणार?
1 Jan 2012, 0000 hrs IST

संजय सोनवणी

इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्त्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे, यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबून असले तरी सामान्य माणसांवर प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा वदंतांचा अधिक प्रभाव असतो. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणाऱ्यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे की, इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पूर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषण इतिहासकारपरत्वे बदलत असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्या संशोधनामुळे सामाजिक पूर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तांेड द्यावे लागते आणि त्यातून जी वादळे निर्माण होतात त्यामुळे पूर्वग्रहविरहित, संपूर्ण ज्ञान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खीळ बसते.

खरे तर सातत्याने इतिहास संशोधने यासाठीच व्हायला हवीत की कोणावरही अकारण अन्याय होऊ नये, तसेच कोणाचे अकारण उदात्तीकरण झाले असेल तर तेही लोकांसमोर यावे. पण मूळ इतिहास हा वर्चस्ववादी भूमिकेतून लिहिला गेला असल्याने, कोणाचे उदात्तीकरण करायचे, कोणाला बदनाम करून ठेवायचे आणि कोणाला गडप करून टाकायचे ही एकाअर्थाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणत त्याप्रमाणे 'इतिहासविघातक प्रवृत्ती' होती आणि आजही ती शेष असावी हे एक महाराष्ट्राचे दुदैर्र्व आहे.

शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणला जात असताना, ज्येष्ठ-श्रेष्ठ आणि रात्रंदिवस राबून अनमोल कार्य केलेले संशोधकही दुदैर्र्वाने या इतिहासविघातक दृष्टीपासून मुक्त राहिले नाहीत. खरेतर आज इतिहास अधिकाधिक नि:पक्षपाती होत जाण्याची गरज आहे. परंतु अशा उज्ज्वल इतिहासात आपल्याही जातीघटकाचे वर्चस्व कोणत्या ना कोणत्या रूपात असले पाहिजे, या भावनेतून प्रत्यक्षाप्रत्यक्षरित्या संत रामदास आणि दादोजी कांेडदेवांबाबतचे समज गतशतकापासून जोपासले जात आहेत. दादोजी हे बालपणीचे गुरु तर रामदास हे मोठेपणीचे गुरु अशी ही मांडणी आहे. ते खरे असते आणि निविर्वाद पुराव्यांनी सिद्ध झाले असते तर ते मान्य करायलाही कोणाचीही हरकत नव्हती. पूवीर् न. र. फाटकांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे सत्य खणखणीतपणे मांडले होते. पण अजूनही अनेक इतिहासकार वारंवार तिय्यम दर्जाच्या बनावट साधनांचा आधार घेत वारंवार शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत असतात. ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहंदळे यांनी 'शिवाजी : हिज लाइफ अॅण्ड पिरियड' या नव्या चरित्रात्मक ग्रंथाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत (१७ डिसेंबर २०११), शिवाजी महाराजांचे कोणीच गुरु नव्हते असे म्हटले आहे. ते म्हणतात, 'शिवकालाविषयी जे अस्सल पुरावे आहेत त्यात कोठेही दादोजी कांेडदेव हे शिवरायांचे गुरु होते असे म्हटलेले नाही. तसा उल्लेखही कोठे सापडत नाही, हे मी ३० वर्षांपूवीर्च लिहून ठेवले आहे. परंतु त्याचबरोबर माझे असेही म्हणणे आहे की, दादोजी हे चांगले गृहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयी शिफारस करणारी शिवाजी महाराजांची स्वत:ची चार पत्रे उपलब्ध आहेत. म्हणजे तो माणूस नालायक तर नव्हता? शिवाजीराजे किंवा शहाजीराजे यांनी जी कामगिरी सोपवली ती सुविहितपणे पार पाडली होती. मग इतिहासात होऊन गेलेल्या त्या व्यक्तीसाठी एवढा गहजब का?'

इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे मात्र जवळपास तीच इतिहासाची साधने वापरत दादोजी कांेडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक होते, दादोजींबद्दल शिवाजी महाराजांना पराकोटीचा आदर होता व दादोजींच्या निधनानंतर त्यांना खूप शोक झाला, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

दादोजी हे आजीवन आदिलशहाचे कांेडाणा व दौंड प्रांताचे सुभेदार होते. या सुभेदारीच्या प्रदेशातच शहाजी महाराजांची पुणे व ३६ गावांची जहागिरी होती. दादोजी जे वतन/जमीनींच्या वादांबाबत निवाडे करत ते आदिलशहाचा सुभेदार या नात्याने, त्याच्या सुभेदारीच्या क्षेत्रात. तेही मलिक अंबरने घालून दिलेल्या महसुल पद्धतीनुसार. मलिक अंबरची ही महसुलाची पद्धत जवळपास देशभर स्वीकारली गेली होती. त्यामुळे ते प्रदेश आपल्या स्वामित्वाखाली आणल्यानंतर त्यासंबधीचे दादोजींचे निवाडे पुढेही शिवाजी महाराजांनी कायम ठेवले, एवढेच त्या चार पत्रांवरून सिद्ध होते. पण यातून त्यांनी शिवाजी महाराज वा शहाजीराजांचे सेवक या नात्याने ते निवाडे केले होते हे कोठे सिद्ध होते?

दादोजी हे आदिलशहाचे मृत्युपावेतो सुभेदार होते. महसुलाच्या हिशोबात काही गफलत झाल्याने आदिलशहाने घोरपडे सरदारांना कांेडाण्यावर चालून जायला सांगितले होते व दादोजींची हार झाल्यानंतर खरे तर देहान्त शासनच व्हायचे, परंतु ब्रह्माहत्या हे महत्पापात गणले गेले असल्याने हातावर निभावले. या संदर्भातील पुरावे दुर्लक्षिण्याचे कारण काय? ते असत्य असतील तर त्याबाबत संशोधनपर चर्चा करून त्यांचा निकाल का लावला जात नाही? 'मग इतिहासात होऊन गेलेल्या या व्यक्तीचा पुतळा उखडून फेकण्याचे कारण काय?' असा प्रश्न गजानन मेहंदळे यांनी विचारला आहे. तो समजा रास्त मानला, तर मग दादोजी व शिवाजी महाराज वा शहाजी महाराज यांचा नेमका संबंध काय, हेही अस्सल पुराव्यांनिशी सिद्ध करायला हवे. दादोजींनी आपल्या हयातीत कांेडाणा शिवाजी महाराजांना का मिळू दिला नाही यावरचेही संशोधन मांडायला हवे. दादोजींबाबत ज्यांना आदर आहे त्यांच्यासाठी त्यांचा स्वतंत्र पुतळा नक्कीच असू शकतो, परंतु ज्या इतिहासाशी त्यांचा संबंध आदिलशहाचा सुभेदार या नात्याने आहे तो बाजूला ठेवून त्यांना शिवेतिहासातील महत्त्वाची व्यक्ती कसे म्हटले जाऊ शकते?

१६३० साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. इतका की लोक मृत जनावरे आणि शेवटी तर मृत माणसांचेही मांस खाऊन जगायचा प्रयत्न करत होते. गावेच्या गावे ओस पडली होती. या दुष्काळाला थोरला दुष्काळ म्हणतात. या दुष्काळाचे हृदयदावक वर्णन व्हॅन ट्विस्ट या डच व्यापाऱ्याने लिहून ठेवले आहे. तुकाराम महाराजांनीही आपल्या अनेक अभंगांत या प्रलयंकारी दुष्काळाची वर्णने केलेली आहेत. दादोजींनी दुष्काळ ओसरल्यानंतर गावे पुन्हा वसवण्याची कामगिरी सुरू केली, ती त्या प्रांताचा सुभेदार या नात्याने. ती त्यांची जबाबदारीच होती. त्यात त्यांची कार्यक्षमता मान्य करायलाच हवी, पण शहाजीराजे आदिलशाहीत गेले ते १६३६ मध्येे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शहाजीराजांच्या आज्ञेने त्यांनी गावे वसवली हा दावा निराधार ठरतो. घटनाक्रमात अशी अदलाबदल करून काय साध्य केले जातेे? याला इतिहास संशोधन म्हणायचे का, असा प्रश्न प्रत्येक इतिहासकाराने स्वत:लाच विचारला पाहिजे.

इतिहासकाराच्या सदसद्विवेकबुद्धीवर सर्वसामान्यांचा पराकोटीचा विश्वास असतो. सारी साधने त्यांना सर्वांना अभ्यासने शक्य नसते. इतिहासकाराने इतिहासाचे केलेले मूल्यांकन त्यांच्या दृष्टिकोनात, ज्ञानात नवी भर टाकत असते. त्यातून समाजऐक्याची भावना निर्माण होत असते. आधीचज जातीय अस्मिता टोकदारच नव्हेत तर काटेरी होत आहेत, हे आपण अनुभवत असताना किमान जातीसापेक्ष अहंगंड सुखावण्यासाठी काही विधाने संबंधित पुरावे चचेर्तही न घेता केली गेली तर तो इतिहास, कितीही शिस्त असली तरी, अविश्वसनीय होणार नाही का? इतिहाससंशोधन वर्चस्ववादी मानसिकतेतून झाले तर आपण आपले भवितव्य कसे घडवणार?


खरे तर या लेखात मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यायला हवे होते ते श्री मेहंदळे यांनी. पण बहुदा त्यांना उत्तर सुचले नसावे... पण बराच वेळ घेवुन प्रत्युत्तर दिले ते श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी माझ्या वरील लेखातील मुख्य मुद्द्यांना पुर्ण बगल देत, लेनचा विक्रुत विषय जो मी टाळला होता तो करत दादोजींना त्यांच्या समाजाचे महापुरुष ठरवत अगदी विनाकारण रामदासांनाही वेठीला धरले. त्यांचा माझ्या वरील लेखाला प्रत्य्त्तर देनारा हा लेख...


वर्चस्ववादी मानसिकता
22 Jan 2012, 0000 hrs IST

SMS NEWS to 58888 for latest updates
कौस्तुभ कस्तुरे

गेल्या काही दिवसात दादोजी कोंडदेव हे मराठ्यांच्या इतिहासातलं वादग्रस्त प्रकरणं ठरलं आहे. इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी त्यांच्या मुलाखतीत दादोजी कोंडदेव यांच्या केलेल्या समर्थनाचं संजय सोनवणी यांनी जोरदार खंडन केलं होतं. सोनवणी यांच्या मतांचा प्रतिवाद करणारा हा लेख...

' इतिहास संशोधन विश्वसनीय कसे होणार?' (रविवार, दि. १ जाने.) हा संजय सोनवणी यांचा, ज्येष्ठ इतिहास-संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या प्रतिपादनाचा प्रतिवाद करणारा लेख वाचला. मेहेंदळे हे अत्यंत निरपेक्ष आणि श्रेष्ठ असे इतिहास संशोधक आहेत. त्यांनी दादोजी कोंडदेव मलठणकरांविषयी मांडलेली मतं (संवाद - १८ डिसें. २०११) योग्यच आहेत. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे उल्लेख असणारे प्रत्यक्ष पुरावे नसले तरीही, ते चांगले गृहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयी खुद्द शिवाजी महाराजांची शिफारसपत्र उपलब्ध असताना दादोजींच्या चारित्र्यावर चिखलफेक करणं हा कोणता पराक्रम? कोण कुठला तो जेम्स लेन आणि त्याने त्याच्या पुस्तकात काहीतरी मूर्खासारखं लिहिलं आणि आमच्याच सरकारने आमच्याच महापुरुषाचा पुतळा भर मध्यरात्री दिवाभीतासारखा उखडून टाकला. आजही महाराष्ट्राला संस्कृतीपेक्षाही विकृतीच जवळची वाटते हेच यावरून दिसून येतं. मेहेंदळे यांनी उपस्थित केलेला पुढचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे - 'शिवाजी महाराजांचे दादोजीच नव्हे, तर इतर कोणीच गुरू नव्हता, तसा एकही पुरावा उपलब्ध नाही!' तर मग शिवाजी महाराजांचे गुरू नसलेल्या अनेकांचे पुतळे अजूनही उभेच आहेत त्यांचं काय? देहुरोडमधील तुकाराम हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा लेखी अस्सल पुरावा आज उपलब्ध आहे का? असेल तर तो आधी सादर व्हावा!

सोनवणी म्हणतात की, मूळ इतिहास हा वर्चस्ववादी भूमिकेतून लिहिला गेला आहे आणि कोणाचे उदात्तीकरण वा कोणाला बदनाम करायचे हे आधीपासूनच ठरले होते. अर्थातच याविषयी बोलताना एका कटू पण सत्य गोष्टीकडे लक्ष वेधावे वाटते, ती गोष्ट म्हणजे अर्थात 'जातीयवाद'! दादोजी आणि समर्थ हे दोघेही ब्राह्माण असल्याने ब्राह्माण इतिहासकारांनी त्यांचे स्तोम माजवले, असा अपप्रचार केला जातो. परंतु अस्सल पुरावे मात्र वेगळंच सांगतात. महाराजांच्या समकालीन असणाऱ्या कृष्णाजी अनंत मजालसी उर्फ सभासदाच्या बखरीत किंवा खुद्द परमानंद गोविंद नेवासकरांच्या 'शिवभारता'त, जो अत्यंत विश्वसनीय पुरावा मानला जातो त्यात शहाजीराजांनी दादोजींना जिजाऊ आणि शिवाजी महाराजांसोबत कारभारी म्हणून पाठवले आणि इतकेच नव्हे तर त्यांना 'सरकारकून' म्हणजे 'मुख्य कारभारी' म्हणून नेमल्याचे उल्लेख आहेत. शिवाय भारत इतिहास संशोधक मंडळाच्या 'शिवचरित्र साहित्य खंड' यामध्ये पुणे आणि कर्यात मावळ पुन्हा वसवण्याचे काम दादोजींनी जिजाऊंच्या सल्ल्याने केल्याचा (आदिलशाही सुभेदार म्हणून नव्हे!) स्पष्ट उल्लेख आहे. 'रानातल्या जनावरांचा अन चोरांचा पंतांनी बंदोबस्त केला (संदर्भ : एक्याण्णव कलमी बखर).' इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यांच्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाच्या सतराव्या आणि अठराव्या खंडात दादोजींनी केलेले अनेक 'महजरनामे' प्रसिद्ध केले आहेत. याच्या चौथ्या खंडात महाराजांनी दादाजी नरसप्रभू गुप्ते यांना लिहिलेले एक पत्र आहे त्यात महाराज म्हणतात - 'श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारालगत स्वयंभू आहे. त्याणी आम्हांस यश दिल्हे... राजश्री दादापंतांचे विद्यमाने (दादोजी कोंडदेवांच्या मदतीने) बाबाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इमान जाहले...' म्हणजेच शिवाजी महाराजांच्या कार्याला दादोजींचा पाठिंबा होता, ते आदिलशाहीचे 'नाममात्र' सुभेदार होते हे स्पष्टच कळून येते. यातच सोनवणी यांनी उपस्थित केलेल्या 'दादोजींनी शिवाजी महाराज वा दादोजींचे सेवक या नात्याने निवाडे केले हे कोठे सिद्ध होते?' या प्रश्नाचे उत्तर सहज मिळते.

दादोजींनी १६३० ते १६३६च्या दरम्यानची अनेक कामे 'आदिलशाही सुभेदार' या नात्याने केली असतीलही, परंतु १६३६मध्ये त्यांना शहाजीराजांनी आपला कारभारी नेमल्यानंतर या म्हाताऱ्या निष्ठावंत सरकारकुनाने अखेरपर्यंत भोसले घराण्याची सेवाच केली आणि १६३६नंतरची बहुतांश कामे जिजाऊंच्या आज्ञेने केल्याचे अनेक उल्लेख सापडतात. त्यांनी केलेली सुधारणेची कामे ही दुष्काळानंतरची असण्यापेक्षाही आदिलशाही सरदारांनी पुणे प्रांतात घातलेल्या जुलूमी धुमाकूळानंतरची आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे. इतिहासलेखन हे वर्चस्ववादी भूमिकेतून झाले असे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा वरील अस्सल साधने तपासून इतिहासाचे मूल्यमापन करणेच अधिक इष्ट ठरेल.

' तथाकथित शिवप्रेमी' केवळ ब्राह्माणद्वेषाने सत्य इतिहास दडपून नवीन प्रतिइतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे 'महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळा'च्या इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील दादोजींचे उल्लेख वगळून 'शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली' झाल्याचे दाखवले आहे. हे पाहून हसावे का रडावे तेच समजेनासे झाले आहे. इ.स. १६३६च्या सुरुवातीसच शहाजीराजांची 'निजामशाही' मोंगल आणि आदिलशाहाने बुडवली. शाहजहानने आदिलशहाला बजावले की, राजांना महाराष्ट्रात न ठेवता दूर कर्नाटकात पाठवावे. त्याप्रमाणे आदिलशहाने राजांची पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरची जहागीर पूर्ववत चालू ठेवून राजांना कायमचे कर्नाटकात पाठवले. राजे दूर बंगलोरला (बंगळुरु) स्थायिक झाले व अखेरपर्यंत ते पुन्हा परत महाराष्ट्रात आल्याचे उल्लेख नाहीत; तर मग पुण्यात राहणाऱ्या बाल शिवबांचे शिक्षण त्यांच्या देखरेखीखाली कसे झाले?

सोनवणी म्हणतात की, दादोजींचा शिवैतिहासाशी संबंध नसून ते फक्त आदिलशाही सुभेदार होते. तेव्हा सोनवणी यांनी वरील पुरावे तपासून पहावेत. पेशवाईतही महादजी शिंद्यांनी दिल्लीच्या बादशहाकडून स्वत:ला 'वकील-इ-मुतालिक' ही पदवी घेतली होतीच की! परंतु म्हणून काही महादजी पेशव्यांना सोडून मोंगलांचे 'मनसबदार' झाले नव्हते. ते पद फक्त नाममात्र होते. नेमकी हीच गोष्ट दादोजींच्या बाबतीतही आहे.

सोनवणी म्हणतात ते खरे आहे- आधीच जातीय अस्मिता टोकदारच नव्हे, तर काटेरी होत आहेत. मात्र आजपर्यंतचे बहुतांश इतिहाससंशोधन हे निरपेक्षपणे झालेले आहे. म्हणायचेच झाले, तर सध्याच्या तो़डफोड करणाऱ्या शिवप्रेमींची मानसिकता पाहता इतिहासाचे 'कथित पुनलेर्खन' हे वर्चस्ववादी मानसिकतेतून होऊ लागले आहे. दादोजी कोंडदेव मलठणकर आणि रामदासस्वामी हे त्याचे पहिले बळी ठरले.


या लेखाला माझे खालील उत्तर प्रसिद्ध झाले...शक्य असतांनाही मी त्यात दादोजी खुनी कसा होता...त्याच्या हात कापण्यामागील इतिहास सांगत बसलो नाही...कारण त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्याशी मला काही घेणे-देणे नव्हते. मुख्य मुद्दे होते ते मी खालील प्रत्युत्तरात मांडले आहेत...




खरे वर्चस्ववादी कोण?
5 Feb 2012, 0000 hrs IST

SMS NEWS to 58888 for latest updates
शिवाजीमहाराजांचे गुरू मानल्या गेलेल्या दादोजी कोंडदेव यांच्याविषयी ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदेळे यांनी केलेल्या विधानांवर संजय सोनवणी यांनी आक्षेप घेतला होता. नंतर सोनवणी यांच्या लेखाचा प्रतिरोध करणारा आणि मेहेंदळे व दादोजींची बाजू मांडणारा लेख कौस्तुभ कस्तुरे यांनी लिहिला होता. आता कस्तुरे यांच्या लेखाला उत्तर देणारा संजय सोनवणी यांचा हा लेख छापून, या वादावर इथेच पडदा टाकत आहोत.

कौस्तुभ कस्तुरे यांची 'वर्चस्ववादी मानसिकता' ही गजानन भास्कर मेहंदळे यांनी दादोजी कांेडदेव यांच्या संदर्भात केलेल्या विधानांचे खंडन करणाऱ्या माझ्या 'इतिहास संशोधन विश्वसनीय कसे होणार?' या लेखावरची प्रतिक्रिया वाचली. गजानन भास्कर मेहंदळे या निरपेक्ष आणि श्रेष्ठ अशा इतिहासकाराची दादोजी कोंडदेव मलठणकरांविषयी मांडलेली मते योग्यच आहेत, असा त्यांचा अभिप्रायही वाचला. मूळ मुद्याला बगल देत कसे लेखन करावे हे कस्तुरे यांच्याकडूनच शिकायला हवे हेही पटले. परंतु त्यांनी 'नाममात्र सुभेदार' असे दादोजींचे वर्णन करताना ही 'पदवी' कोठून शोधून काढली हे ते लिहायला विसरलेले दिसतात. त्यांना मोगलकालीन प्रशासनव्यवस्थेचे काडीएवढेही ज्ञान नाही, हे त्यांनीच सिद्ध केले आहे. किंबहुना हीच लबाडी आजतागायत केली जात आहे. किमान दादोजी आदिलशहाचे सुभेदार होते (मग ते नाममात्र का म्हणेनात) हे मान्य तरी केले याबद्दल त्यांचे आभार मानलेच पाहिजेत!

पण कस्तुरेंच्या माहितीसाठी सांगतो की 'सुभेदार' हा नेहमीच केंद्रीय सत्तेचा प्रतिनिधी असे. महसुल/जमीन सीमादींचे वाद-विवाद याबाबत निवाडे करण्याचे अधिकार सर्वस्वी सुभेदाराच्या हाती असत. गावे वसवणे, ज्यायोगे महसूल वाढेल अशी अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणणे, ही कर्तव्ये सुभेदारालाच करावी लागत. कंेदीय सत्ता कधीही महत्त्वाचे किल्ले (उदा. कांेडाणा, पुरंदर) जहागीरदारांच्या नव्हे तर, आपल्यामार्फत सुभेदाराच्या अखत्यारित ठेवत असत. जहागीरदारांच्या अखत्यारित असलेच तर दुय्यम दर्जाचे किल्ले असत. जहागीरदारांना प्रशासकीय प्रक्रियेत व न्यायदानासंदर्भात कसलाही अधिकारच नव्हता. महसूल आणि न्यायदान (प्रशासकीय व्यवस्था) हेच कंेदीय सत्तेची सार्वभौमता ठरवत असते. अशा स्थितीत शहाजी महाराज (व इ.स.१६४२ नंतर स्वराज्याची स्थापना करेपर्यंत शिवाजी महाराज) जहागीरदार असल्यामुळे त्यांना न्यायदान करण्याचा अधिकारच नव्हता, तर मग त्यांचे कारभारी असलेल्या दादोजींना कसा असू शकेल, हा साधा प्रश्न या इतिहासकारांना पडला नसेल (वा माहीत असूनही ते सांगत नसतील तर) आणि 'दादोजी असले तर आदिलशहाचे नाममात्र सुभेदार', होते असे खुळचट विधान केले जात असेल तर ज्येष्ठ-श्रेष्ठ आणि निरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या इतिहासकारांचीच वर्चस्ववादी दांभिक भूमिका वारंवार स्पष्ट होते.

दादोजी कोणत्याही स्थितीत शहाजीराजांनी नियुक्त केलेले कारभारी नव्हते, असूही शकत नाहीत. कारण सुभेदाराचा दर्जा हा कारभाऱ्यापेक्षा मोठा असतो आणि दादोजी आजीवन सुभेदारपदावरच होते, हे मान्य करायला एवढे लाजायचे कारण काय? त्यांचे निवाडे स्वतंत्र झाल्यानंतरही शिवाजी महाराजांनी कायम ठेवले याचा एवढाच अर्थ निघतो की, मलिक अंबरच्या महसूल पद्धतीचे उत्तम आचरण दादोजींनी केले होते. त्याबद्दल त्यांना शाबासकी देता येते. ती देऊ, पण शिवाजीमहाराजांशी त्यांचा संबंध जोडण्याचे काय कारण?

रामदासांचा मुद्दा कस्तुरंेनी जाणीवपूर्वक घुसवला आहे. ते विसरतात की ज्ञानेश्वर, एकनाथ, चक्रधरादि ब्राह्माणांचा बहुजनांनी नेहमीच सन्मान केला आहे. मग वाद रामदासांबद्दल का? कारण भाकड कथा निर्माण करून, त्यांना येनकेनप्रकारेण शिवाजी महाराजांचा आध्यात्मिक गुरू बनवले गेले. कसलेही बनावट दुय्यम-तिय्यम दर्जाचे पुरावे फेकायचे आणि त्यांना अस्सल म्हणवत आपलेच घोडे पुढे रेटायचे हा वर्चस्ववाद कस्तुरंेना वा त्यांच्या समर्थकांना समजत नाही असे नाही. 'ते करतात ते इतिहास संशोधन आणि इतर करतात ते जुने गाडलेले मुडदे उखडणारे विवेचन' अशी त्यांची अत्यंत बालिश मांडणी आहे.

' आमच्याच सरकारने आमच्या महापुरुषाचा पुतळा भर रात्री दिवाभीतासारखा उखडून टाकला', हे कस्तुरंेचे विधान हे मेहंदळंेच्या मुलाखतीतील विधानाची पुढची आवृत्ती आहे. दादोजीसमर्थक दंगा करून शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणतील ही भीती सरकारला असल्याने त्यांनी रात्री पुतळा काढला. ही भीती रास्त होती हे कस्तुरंेनीच सिद्ध करून दाखवले आहे. त्यामागे दादोजींचे नाव काही कारण नसताना शिवचरित्राशी जोडले गेले होते, हे एक कारण तर होतेच; पण लेन नामक कथित इतिहासकाराने पुण्यातील वावड्यांचा हवाला देत ( Street Joke ) शिवाजी महाराजांच्या जैविक पितृत्वाचे श्रेय दादोजींना दिले होते. असल्या नीच मानसिकतेला लाल महालातील अनैतिहासिक पुतळा जर बळ पुरवीत असेल, तर तो तेथून हलवणे हे शासनाचे कर्तव्यच होते आणि शासनाने ते बजावले. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांच्या देहुरोड येथील पुतळ्याबदल कस्तुरंेनी विषय सोडून विधान केले आहे. तो पुतळा मुळात वादग्रस्त नाही. दादोजीहटाव प्रकरण नुसते लेनमुळे नव्हे, तर ज्या विकृती विशिष्ट समाज गेली २५-३० वर्षं खाजगीत चघळत आला आहे, त्याची अपरिहार्य परिणती होती. आजही दादोजींबद्दल खोटे पुरावे देत 'ते गुरु नव्हते, पण भले माणूस तर होते. मग त्यांचा पुतळा उखडायचे काय कारण?' असा आलाप करून जी मानसिकता दर्शवली जात आहे ती बघता लेनचे बोलवते धनी कोण हे ओळखायला मोठ्या बुद्धिमत्तेची गरज नाही. कोणाला दादोजींसारख्या भल्या माणसाचा पुतळा हवा असे वाटत असेल तर तो त्यांनी हवा तेथे उभारावा, मात्र तो जिजाऊ आणि बालशिवरायांसोबत असूच शकत नाही. कारण दादोजींचा शिवैतिहासाशी संबंध असलाच, तर आदिलशहाचा सुभेदार म्हणून आहे. दादोजींना एकाच वेळीस दोन चाकऱ्या करू द्यायला आदिलशहा नक्कीच दुधखुळा नव्हता. सुभेदार आणि सरकारकून यात मोठा कोण असतो? सुभेदाराचा सरकारकून झाला तर ती पदावनती असते, पदोन्नती नव्हे. हे ज्यांना समजत नाही त्यांनी इतिहास सांगण्याच्या फंदात पडू नये आणि आधी स्वत:च वर्चस्ववादी भावनेतून बाहेर येऊन मोकळेपणाने इतिहास स्वीकारावा. सर्वजण त्यांचे स्वागतच करतील.



वरील चर्चा वाचता सुद्न्य वाचकांच्या लक्षात येईल कि खरी कळ अकारण कोण काढत आहे? त्यामागे नेमक्या कोणत्या भावना आहेत? अशा पद्धतीने समाज गाडा द्वेषविरहीत कसा चालणार? आम्हाला खोटा इतिहास कितीवेळा कधी उघड तर कधी आडुन सांगणार? कशाला? का उगा त्या शिळ्या कढीला उत आणताय? जे खरे चांगले आहेत त्याबद्दल बोलुयात ना! कशाला दादोजींचे वस्त्रहरण करायला भाग पाडताय? तेही तुमच्याकडे कसलीही उत्तरे नसतांना? आणि कस्तुरे यांना वकील-ए-मुतालिक या पदाचा अर्थच जर माहित नाही तर उगा कशाला इतिहासाबाबत गळे काढावेत आणि दादोजींना नाममात्र सुभेदार म्हणावे? हा सारा बाष्कळपणा सुद्न्यपणे थांबवावा ही त्यांना नम्र सुचना. आजतागायत तुम्ही इतिहासाचा स्वयंपाक करुन हव्या त्या डिश आम्हाला वाढल्या...धन्यवाद...पण आम्ही कधीच या लबाड्या समजु शकणार नाही या भ्रमात राहु नका. वर्चस्ववाद सोडा...




महात्मा फुलेंचे अर्थविचार

    आधुनिक भारतात आर्थिक विचार महत्वाचा आहे याचे भान निर्माण करणारे पहिले महापुरुष म्हणून महात्मा जोतीराव फुले यांची नोंद घ्यावी तर लागत...