Wednesday, February 8, 2012

"मराठ्यांनो षंढ झाला आहात काय?" - डा. बालाजी जाधव




मी डा. बालाजी जाधव यांचे "मराठ्यांनो षंढ झाला आहात काय?" ही पुस्तिका वाचली. डा. जाधव बहुदा तरुण असावेत आणि तरुणांमद्धे जो एक स्वाभाविक उद्रेक आणि संताप असतो त्याचे दर्शन त्यांचा या पुस्तिकेत दिसते. परंतु असे लेखन करत असतांना आपणच आपल्या मुळ विचारांशी प्रतारणा करत जातो याचे भान उद्रेकी तरुणांनी ठेवले पाहिजे असे वाटले म्हणुन हे परिक्षणवजा विचारमंथन मी मांडत आहे. उदाहरनार्थ जाधवांना धर्मवीर ही संद्न्या नको आहे...पण क्षात्रवीर म्हटलेले चालते. (प्रुष्ठ २९-३०). याचा अर्थ ते नकळत चातुर्वर्ण्य मान्य करतात. संभाजी महाराज हे ना क्षात्रवीर होते, ना धर्मवीर...ते राष्ट्रवीर होते असे म्हणणे अधिक संयुक्तिक राहील. परंतु यात लेखकाची चुक नसुन जे संस्कार जाणीवपुर्वक काही हिंदुत्ववादी संघटना घडवत आले आहेत त्याची ही अन्याय्य परिणती आहे.

तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाले नसुन त्यांची हत्त्या झाली असे डा. जाधव म्हणतात आणि ते तार्किकद्रुष्ट्या बरोबरही आहे. किंबहुना मी एकमेव चित्रकार आहे ज्याने तुकारामांच्या खुनाचे चित्र काढले आहे. परंतु याच तुकारामांचे दशावतारी स्वरुपात जेंव्हा देहुत शिल्पे उभारली जातात तेंव्हा मात्र मराठावादी संघटना काय करतात हा प्रश्न आहे. "मराठा ही एक लढवैय्यी जात आहे..." असे ते आपल्या पहिल्याच प्रकरणात लिहितात. ते खरे असेल एके काळी, परंतु सध्या तरी मराठा ही सत्तेसठी हपापलेली आणि स्व-बांधवांना, स्वजातेयांना वापरुन घेत त्यांना पायतळी तुडवत वाट्टेल त्या तडजोडी करत स्वनाशाकडे वाटचाल करणारे जात बनली आहे हे दुर्दैवाने नमुद करावे लागते.

दुसरे असे कि गोतिये नामक रास्ववादी, जन्माने फ्रेंच माणसाने अलीकडेच पुण्यात लोहगांवात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले. मी त्या विरोधात तीन महिन्यांपुर्वी एकामागोमाग तीन लेख लिहिले. निवडनुक आचारसंहिता वगैरे त्या मधल्या दोन महिन्यांच्या काळातही एकाहे मराठा संघटनेने त्या दैवत्वीकरणाचा निषेध केला नाही. उलट अलीकडेच या मंदिराचे उद्घाटन झाले. त्या महान कार्यक्रमात राष्ज्ट्रवादीच्या महान नेत्याची पत्नी सुहास्य हजर होती...हे राजकारण आहे असा युक्तिवाद मला नंतर याच चळवळीतल्याच काही मराठा बांधवांनी ऐकवला. परंतु तुम्ही करता ते राजकारण...बाकी मात्र ब्राह्मणांचे हस्तक असा युक्तिवाद करतांना आपणच आपली घोर फसवणुक करुन घेत आहोत याचे भान असायला नको काय? राजकारण जेंव्हा समाजकारणापेक्षा श्रेष्ठ आहे असा आभास होवु लागतो त्यातच त्या-त्या समाजाच्या अवमुल्यणाची बीजे रोवली गेलेली असतात हे भान मराठ्यांनी करुन घ्यायला हवे असे मला या पुस्तकाच्या निमिताने वाटते.

मराठा समाज हा एका दलदलीत अडकला आहे. सत्ताकारणाचा हव्यास हा मराठा समाजाचा मुलमंत्र बनला आहे. सर्वसामान्य मराठे या वातावरणात एवढे मश्गुल आहेत कि स्वत:ची लाजीरवाणी स्थिती त्यांच्या लक्षातच येत नाहीय. म्हणुन ते इतिहासाचे मुडदे उखडण्याच्या मागे लावले गेले आहेत. इतिहास हा अफुची गोळी बनवला जात आहे. इतिहासाचे तटस्थ विश्लेषन करणे व त्या इतिहासापासुन शिकणे व चुका दुरुस्त करणे हे वेगळे, परंतु प्रतिइतिहास लिहिण्याच्या नादात आपण वर्तमानाच्या बेड्या मात्र घट्ट करत नेत आहोत याचे भान यायला हवे. खरे तर ब्राह्मणांनी गतकालात जी पापे केली असतील ती केली, परंतु वर्तमानात मात्र
प्रत्यक्षात मराठा नेतेच त्यांचे पाय-पंख कापत चालले आहेत याचे भान त्यांना नाही. मराठे आणि ब्राह्मण समाज यांचे साटेलोटे आजचे नाही. कार्यकर्त्यांना ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात अदकावुन द्यायचे आणि नेत्यांनी मात्र ब्राह्मनी संस्था-पक्षांशी आतुन सौदेबाजी करायची ही बाब या भाबड्या मराठा तरुणांच्या लक्षात येत नाही हे एक दुर्दैव आहे. राष्ट्रवादीने अक्षरश: वेदाचार्य (म्हणजे सध्या तरी एवढा कर्मठ माणुस सापडणार नाही) मोरेश्वरशास्त्री घैसासांच्या पत्नीला तिकिट दिले याचा निषेध या मराठ्यांनी (म्हणजे मराठावादी संघटनांनी) का केला नाही याचे उत्तर जर "राजकारण" हे असेल तर मराठा हे षंढ आहेत हे बालाजी जाधव यांचे मत योग्य आहे असे नाईलाजाने म्हणावे लागेल.

ब्राह्मणशाही कि मराठाशाही यात कोणाला निवडायचे हा प्रश्न आता उद्भवु लागला आहे याचे कारण मराठा राजकारणात आहे. गोतिये शिवाजी महाराजांचे मंदिर बनवतोय...वाईट वाटते...पण मतदार राजा दुखवायचा नाही...मग असुद्यात कि ते...काय बिघडले...हे मराठेच म्हणनार...मग लेखकाच्या पुस्तकाचे शिर्षक योग्यच आहे असे म्हणने भाग आहे.

म्हनजे शिवाजी महाराजांचे दैवतीकरण कसल्याही स्थितीत होता कामा नये यासाठी संघर्ष करणारे, नवे नवे शत्रु अंगावर ओढुन घेणारे आम्ही मर्द महामुर्खच कि!

शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे नांव घेत वारंवार ब्राह्मणी कथा जशा येतात तशा विरोधी अर्थाने नव्या बनवत आणि प्रचार करत समाज एकत्र येईल आणि मराठ्यांचे नव सांस्क्रुतीक वर्चस्व स्वीकारेल असा भ्रम या नव-विचारवंतांना झाला आहे कि काय असा प्रश्न उपस्थित होतो. डा. बालाजी जाधव हे एन्याय्य व्यवस्थेविरुद्ध पोटतिडिकेने लिहितात, परंतु अभ्यास आणि अधिक चिंतनाची आवश्यकता आहे. मराठा समाजात वानवा आहे ती तटस्थ चिंतकांची. रा.स्व.वाद्यांनी मुस्लिमांना टार्गेट करायचे, पण घातपातांसाठी त्यांचीच मदत घ्यायची हे नाटक देशपातळीवर जसे सुरु आहे तसेच येथे ब्राह्मनांना जाहीरपणे शिव्या द्यायच्या आणि आतुन त्यांचीच मदत घ्यायची आणि बहुजनांना ठकवायचे हा उद्योग तरुणांच्या तरी ध्यानी यायला हवा. "प्रुथ्वी नि:ब्राह्मण करा..." असे डा. जाधव एका प्रकरणात (प्रुष्ठ २१) म्हणतात. रा.स्व. वाले मुस्लिमांच्या कत्तलीची भाषा करतात तसेच हे विधान आहे. मुस्लिम विरोध केला तर हिंदु एकत्र येतील आणि ब्राह्मण विरोध केला तर मराठेतर बहुजन मराठ्यांच्या मागे येतील हे समजने हे सत्ताकेंद्रित भावनेपोटीचे राजकारण आहे. रास्ववाद्यांना या घोषणेचा फायदा जसा झाला नाही तसाच तो मराठावादी संघटना व पक्षालाही होत नाही. द्वेषाच्या पायावर कोनतेही राजकारण किमान या देशात तरी यशस्वी होत नाही...होनार नाही हा बोध किमान विचारवंतांनी तरी घ्यावा ही या लेखामागील तळमळ आहे.

बरे इतिहासाचे पुनर्लेखन करतांना शिवाजी महाराजांपुर्वीचा इतिहास आणि संभाजी महाराजांनंतरचा इतिहास सांगायला का टाळाटाळ केली जाते? ताराराणी, राजाराम महाराज यांबाबत किती लेखन आहे बरे? शिवपुर्व काळातील इतिहासाबद्दल का लेखन होत नाही? याचे कारण आहे जिजाऊ, शिवाजी व संभाजी यांच्या नांवाचा वर्तमानात राजकारंणासाठी, भावना पेटवण्यासाठी उपयोग सहजी करता येतो म्हणुन कि काय?

संत तुकारामांबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण मराठ्यांना तो अलीकडेच वाटु लागला. तोही केंव्हा तर मराठा हे कुणबी आहेत असा जावईशोध त्यांनी लावला तेंव्हा. तुकोबा हे कुणबी होते आणि त्यांनी त्यांच्या अभंगात अभिमानाने म्हटलेच आहे. परंतु तुकोबांनी कोठेही आपण मराठा असल्याचा उल्लेख केलेला नाही हे का विसरले जाते? मराठा आणि कुणबी या सर्वस्वी वेगळ्या जाती आहेत. अभिप्रायार्थचे हे पुस्तक सरळ मराठा जातीबद्दल असल्याने मी हे स्पष्ट करत आहे. काही मराठा संघटना आपण बहुजनवादी आहोत असा आव आणत होत्या परंतु आरक्षणाच्या लढाईत उतरत त्यांनी आपला खरा चेहरा दाखवला यावरही व्यापक चिंतन व्हायला हवे. मराठ्यांनी आपले हित पाहु नये कि काय? मी म्हणतो अवश्य पाहिलेच पाहिजे, त्यासाठी बहुजनवादी बुरखा घेण्याची मुळीच आवश्यकता नाही.

बालाजी जाधव यांच्या लेखनात मराठ्यांच्या हलाखीची वर्णने आहेत. ती खरीच आहेत. मी सहमत आहे. महाराष्ट्रातील दीड-दोनशे मराठा घराणी सोडली तर उर्वरीत मराठे हे पुर्ण-ते अर्धवेळ बेरोजगार आहेत. राजकारण्यांच्या-राजकारणाच्या नादी लागत कसलीही सर्जनात्मकता (अपवाद आहेत) न दाखवता, स्व प्रगतीचे मार्ग न धुंडाळता आपापली आयुष्ये सत्तेच्या स्वप्नात वाया घालवत आहेत. परंतु प्रत्येक राजकीय घराण्यांनी (यात मराठाच नव्हे तर अन्यही आले) त्यांची भावी पिढ्यांचीही सोय लावुन ठेवली आहे. अशा स्थितीत इतरांना तर सोडाच खुद्द मराठा नव-नेत्यांना हुजरेगिरी केल्याखेरीज संधी नाही हे उघड आहे. आणि ही हुजरेगिरी म्हणजे समाजाला अलेली षंढता आहे हेच जाधवांचे म्हणने खरे करते.

त्याच वेळीस जेथे जमेनींचे भाव चढे आहेत तेथे बापजाद्यांच्या जमीनी गुंठेवारीत विकुन रातोरात कोट्याधीष होत तेच पैसे वारांगणांवर, वारुणीवर ते लगोलग नगरसेवक ते ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी तयार आहेतच! भिकारी व्हायला किती वेळ लागतो? मग हेच "भुमीपुत्र" म्हणत ज्या जमीनी कारखान्यांना विकल्या तेथे ठिय्या मांडुन नोक-यांची भीक मागायला तयारच कि! लग्नावळेंवरचा मराठा समाजातील खर्च हा अचाट वाढला आहे. जेथे स्वत: खर्च करने शक्य नाही तेथे खोटी कर्जे काढत हे उद्योग पार पाडले जातात, हे काय मराठा तरुणांना समजत नाही? मी मला स्वत:लाच माहित असलेली शेकडा उदाहरने तरी देवु शकतो. शिक्षण, द्न्यान, उद्यमशीलता आणि कष्ट यांना प्रतिष्ठा देत प्रगती साध्य करण्या ऐवजी मराठा तरुनांना दास करण्याचे या नव-सरंजामदारी नेत्यांचे लांगुलचालन करण्यात जर मराठा तरुणांना धन्यता वाटत असेल तर शिवशंकर त्यांचे भले करो एवढेच मी म्हणु शकतो.

हे प्रबोधन कोणतीही मराठा संघट्ना करत नाही. उलट मराठ्यांना आरक्षणाचे गाजर दाखवत आपल्या स्वार्थासाठे पुढे रेटत नेतात आणि हे मेंढरांसारखे त्याच वावटळीत आपले भविष्य शोधतात. शेवटी त्यांचा कडेलोट अपरिहार्यपणे होतो हे वास्तव डा. जाधवांसारख्या तरुणांनी मांडायला हवे असे मला कळकळीने वाटते.

मी "मराठ्यांनो षंढ झालात काय?" या पुस्तिकेतुन मी जो अन्वयार्थ काढतो तो असा कि अरे मराठ्यांनो षंढ होवु नका. राजकारणापेक्षा ख-या अर्थकारणाकडे अधिक लक्ष द्या. सत्ता ही सर्वांना मिळु शकत नाही. ज्या घराण्यांच्या , मग ते कोणत्याही जातीचे असोत, ताब्यात ती आहे ते अन्य कोणाला शक्यतो त्यात प्रवेशु देनार नाहीत. सत्ता ते आपल्याच आणि फक्त आपल्याच भावी पिढ्यांसाठी आरक्षित करुन ठेवनार. मराठ्यांना आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल...पण त्याची वाट पाहण्यात स्वत:चीच ससेहोलपट आहे हे लक्षात घ्यावे लागेल. हे सरंजामदार तुमचा वापरच करुन घेणार. आणि जे आपला वापर करु देतात ते षंढच असतात याबाबत शंका असण्याचे काहीएक कारण नाही. मराठ्यांनी मराठ्यांचे अहितच केले आहे हे तरी समजावुन घ्या. तुमचे नेते...मग ते सामाजिक असोत कि राजकीय...त्यांची युती धर्मसत्तेच्या प्रतिनिधींशी...बळकट होत चालली आहे...मग तुमच्या या ब्राह्मण द्वेषाला काडीइतकाही अर्थ रहात नाही.

उलट आज आपण काय घालवत चाललो आहोत यावर विचार करायला हवा. बालाजी जाधवांचा संतप्त उद्गार हा बंव्हंशी अन्यायाच्या जाणीवेपोटी आहे...पण अन्यायाची रुपे सर्वांगीनपणे त्यांनी पहावीत तरच त्यांचा विचार हा खरा स्वागतार्ह ठरेल. त्यांचे पुढील लेखन हे अधिक व्यापक सामाजिक विचारांवर आधारित असेल आणि ते समाजाला पुढे नेण्यासाठी अधिक विचार मांडतील अशी अपेक्षा त्यांच्याकडुन ठेवावी असेच त्यांचे मुलभुत विचार आहेत.

मराठ्यांनो षंढ झालात काय?
लेखक: डा. बालाजी जाधव
प्रकाशक: पंचफुला प्रकाशन, औरंगाबाद
मुल्य: रु.३०/-

एस.एस. रामदास: एक शोकांतिका

  एस . एस . रामदास : एक शोकांतिका - संजय सोनवणी               शेख सुलेमान इब्राहिमची आजची पहाट घरातल्या कटकटीनेच उगवली . त्याची मनोरुग...