Thursday, March 22, 2012

तुमचा शोध असाच सुरु राहो...

मी तसा अट्टल माणुसघाना माणुस आहे. मी सहसा कोणाला भेटायला जात नाही तसेच माझ्याकडेही सहसा कोणी आलेले मला चालत नाही. अगदी माझ्या क्लायंट्स्नाही प्रत्यक्ष भेटायलाही मी टाळाटाळ करतो. हे माझ्या नातेवाईकांबाबतही लागु आहे. भावा-बहीणींनाही वर्षातुन एक-दोनदा सोडले तर मी भेटत नाही. प्रत्यक्ष भेटींतले माझे मित्र हाताच्या बोटावर मोजता येतील असे...तेही क्वचित. हा माझ्या स्वभावातील मोठा दोष आहे. परंतु परवाचा दिवस अपवाद ठरला. फोनवरुन मैत्र निर्माण झालेले नवशक्तीचे संपादक श्री. सचीन परब यांना का नकळे भेटल्याशिवाय राहवेना. (तसे मी त्यांनाही ’भेटायला येतो’ सांगत २-३ वेळा चकमा दिला होताच.) प्रत्यक्ष भेटलो आणि आनंदाचे जे क्षण लाभले ते नोंदवल्याखेरीज राहवले नाही म्हणुन हा लेख.

नवशक्तीचे संपादक म्हनजे ब-यापैकी वयस्कर असतील असा माझा समज होता. पहिली बाब म्हणजे तो साफ धुळीला मिळाला...म्हणजे चक्क ते माझ्यापेक्षाही तरुण निघाले...वय वर्ष ३५. असले दणके सहजी सहन होत नाहीत. माझ्यासारख्या स्वत:ला तरुणांहुन तरुण समजणा-या अहंका-याला तर मुळीच नाही. त्यामुळे मी पांढ-या होवू लागलेल्या मिशांना झाकायचा प्रयत्न करत, संकोचत त्यांच्याशी संवाद साधला. संवाद कसला....पत्रकाराशी भेट म्हनजे आपण उत्तरे द्यायलाच बसलेलो परिक्षार्थी असतो याचीही जाण झाली. त्यांनी मलाच बोलते ठेवले. माझा जवळपास इतिहास खोदुन काढला. परंतु त्यांच्याशी त्या एक-दोन तासाच्या ( कि अधिक? वेळ कसा गेला हेच समजले नाही.) भेटीत त्यांच्यातील प्रखर जिद्न्यासा, आत्मविश्वास, नवनिर्मितीची ओढ आणि घटनांकडे पाहण्याचा समतोल द्रुष्टीकोन याची मात्र जाणीव झाली. आणि या सा-यात होता तो प्रसन्नतेचा, आत्मीयतेचा एरवी दुर्लभ असनारा शिडकावा.

खरे तर मी या भेटीपर्यंत त्यांचे काही वाचलेले नव्हते. त्यामुळे माझ्यावर त्या भेटीपर्यंत तरी कसलेही पुर्वग्रह सुद्धा नव्हते. परंतु ते ब्लोग लिहितात हे समजल्यावर मात्र मी शोधुन त्यांचा ब्लोग वाचायला घेतला. वाचकांनीही तो अवश्य वाचावा... http://parabsachin.blogspot.in/ "माझं आभाळ" हे या ब्लोगचं शिर्षक. आभाळासारखेच विचार त्यांनी तरुणाईच्या भाषेत मांडले आहेत. तुकाराम, शिवाजी महाराज, नामदेव यांच्याबाबत लिहितांना त्यांनी जो समतोल द्रुष्टीकोन बाळगत असतांनाही जे परखड विवेचन केले आहे ते वाचुन मला एक समानधर्मा भेटल्याचा आनंद झाला. (कदाचित असे म्हणने थोडे अयोग्यही असेल...मी कधी कधी फारच आक्रमक होतो...पण विचारप्रक्रिया समान असे मात्र नक्की म्हणता येईल.) चंद्रकांत वानखेडे यांच्या सत्कारानिमित्त त्यांनी जो "वेड्यांचा सत्कार होतो आहे." हा जो लेख लिहिला आहे ती शैली शि. म. परांजपेंच्या शैलीला प्रतिशैली असे म्हणता येईल. वाचकांनी प्रत्यक्ष ब्लोग वाचावा व आपले मत बनवावे.

त्यांच्या ब्लोग्स वरील अनेक प्रतिक्रिया मी वाचल्या. अनेकांनी त्यांनाही ब्राह्मण विरोधक ठरवण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्वच्छ दिसले. मला ब्राह्मण बांधवांची नेमकी मानसीक समस्या काय आहे हेच नीट समजलेले नाही. मीही गेली दहा-बारा वर्ष याच मानसिकतेचा सामना करत आहे त्यामुळे परबांना नाही म्हटले तरी भावनीक त्रास होत असनार याची मला खात्री आहे. पुराव्यानिशी सत्य सांगणे हा या देशात गुन्हा झाला आहे कि काय असे वाटावे अशी दुर्दैवी स्थिती आहे. रामदासांना अतिभव्य करण्याच्या नादात आपण इतिहासाचा चेंदा-मेंदा करत आहोत याचे भान रामदासभक्तांना जसे नाही तसे ते पत्रकारितेलाही उरलेले नाही हे त्यांनी अत्यंत निर्भिडपणे मांडले आहे आणि ते सत्यही आहे. अनुयायीच नेत्यांचा अंतत: पराभव करतात हे सत्य रामदासांच्या बाबतीतही पहायला मिळते ते केवळ यामुळेच. त्यामुळे रामदासांची खरी तत्कालीन महत्ता मात्र झाकोळली जाते याचे भान या मुढांना नाही. त्यांची फक्त कीव करावी लागते. शिवाजी महाराजांवरील परबांचा लेख हा परखड वास्तवाची जाण करुन देनारा. महाराजांना हिंदुत्ववाद्यांनी मगरमीठी घालत त्यांच्या चरित्राची धुळधान उडवुन दिलेली आहेच. गोटिये नामक नव-ब्राह्मण शिवाजी महाराजांचे चक्क मंदिर बांधता झाला. मी डीएनए आणि लोकमत ते चित्रलेखातुन त्या अश्लाघ्य प्रयत्नांविर्रुद्ध लिहिले. काय झाले? मंदिर झाले...उद्घाटनही झाले. सचीनसाहेबांनीही महाराजांच्या तथाकथित गोब्राह्मनप्रतिपालक आणि मुस्लिम-विरोध ही हिंदुत्ववाद्यांना प्रिय असना-या चुकीच्या संकल्पनांबाबत स्पष्ट लिहिले तर ते ब्राह्मण विरोधक कसे होतात? ब्राह्मण बांधवांनी त्यांचे मस्तक तपासुन पाहण्याची गरज आहे. ज्यांचे ताळ्यावर आहे त्यांनी आपल्या वाट चुकलेल्या बांधवांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे.

आणि एखाद्या ब्राह्मणाची चिकित्सा केली तर ती सर्वच ब्राह्मनांची निंदा असते या अहंवादी भावनेतुन बाहेर या ही विनंती आहे. जेंव्हा तुम्ही एखाद्या ब्राह्मनाची चिकित्सा केले कि चिकित्सा करणारा ब्राह्मण विरोधी अस्तो हे ठरवता तेंव्हा मग तुम्हाला नक्कीच काहीतरी लपवायचे आहे असा निश्कर्ष निघणे स्वाभाविक आहे. सत्याचा सामना तुम्ही जेवड्या निर्धाराने कराल आणि सत्यशोधनात सहभागी व्हाल तेवढेच अखिल समाजावर उपकार होतील. अन्यथा तुमच्या दुगाण्या झेलण्यास आम्ही समर्थ आहोत याबाबत शंका बालगण्याचे कारण नाही!

असो.

या भेटीत माझा लाडका भाऊ वैभव छाया तर भेटलाच पण श्रीरंग गायकवाड यांचीही मनस्वी भेट झाली. हा दिवसच मला अनोखा होता. कारण परततांना माझी लाडकी बहिणाबाई म्हणजे प्रगती बानखेले तर म.टा. च्या कार्यालयात तर भेटल्याच पण ज्यांच्याशी मी नेहमी फोनवरच बोलायचो ते मुकुंद कुळेही भेटले. त्यांच्याशीही अल्प काळात मस्त गप्पा झाल्या...

आणि एक त्या दिवशी न ठरलेली अत्यंत अनपेक्षीत अशी एक भेटही झाली...पराग पाटील साहेबांशी...पण त्याबद्दल सविस्तर नंतर...कारण ती भेटही एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

सचीनजी, तुमच्यातील उर्जा, साहस आणि चिकित्सकता अशीच कायम ठेवा. याचीच आजच्या जगाला गरज आहे. तुमच्यापेक्षा मी १४ वर्षांनी मोठा आहे (हे सांगायला जरा लाजतोय हेही खरे आहे...) पण वयाने अक्कल येत नसते तर ती येते फक्त अथक जिद्न्यासेतुन आणि सत्याच्या अविरत शोधातुन. तुमचा शोध असाच सुरु राहो ही शुभेच्छा!

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...