Thursday, March 22, 2012

तुमचा शोध असाच सुरु राहो...

मी तसा अट्टल माणुसघाना माणुस आहे. मी सहसा कोणाला भेटायला जात नाही तसेच माझ्याकडेही सहसा कोणी आलेले मला चालत नाही. अगदी माझ्या क्लायंट्स्नाही प्रत्यक्ष भेटायलाही मी टाळाटाळ करतो. हे माझ्या नातेवाईकांबाबतही लागु आहे. भावा-बहीणींनाही वर्षातुन एक-दोनदा सोडले तर मी भेटत नाही. प्रत्यक्ष भेटींतले माझे मित्र हाताच्या बोटावर मोजता येतील असे...तेही क्वचित. हा माझ्या स्वभावातील मोठा दोष आहे. परंतु परवाचा दिवस अपवाद ठरला. फोनवरुन मैत्र निर्माण झालेले नवशक्तीचे संपादक श्री. सचीन परब यांना का नकळे भेटल्याशिवाय राहवेना. (तसे मी त्यांनाही ’भेटायला येतो’ सांगत २-३ वेळा चकमा दिला होताच.) प्रत्यक्ष भेटलो आणि आनंदाचे जे क्षण लाभले ते नोंदवल्याखेरीज राहवले नाही म्हणुन हा लेख.

नवशक्तीचे संपादक म्हनजे ब-यापैकी वयस्कर असतील असा माझा समज होता. पहिली बाब म्हणजे तो साफ धुळीला मिळाला...म्हणजे चक्क ते माझ्यापेक्षाही तरुण निघाले...वय वर्ष ३५. असले दणके सहजी सहन होत नाहीत. माझ्यासारख्या स्वत:ला तरुणांहुन तरुण समजणा-या अहंका-याला तर मुळीच नाही. त्यामुळे मी पांढ-या होवू लागलेल्या मिशांना झाकायचा प्रयत्न करत, संकोचत त्यांच्याशी संवाद साधला. संवाद कसला....पत्रकाराशी भेट म्हनजे आपण उत्तरे द्यायलाच बसलेलो परिक्षार्थी असतो याचीही जाण झाली. त्यांनी मलाच बोलते ठेवले. माझा जवळपास इतिहास खोदुन काढला. परंतु त्यांच्याशी त्या एक-दोन तासाच्या ( कि अधिक? वेळ कसा गेला हेच समजले नाही.) भेटीत त्यांच्यातील प्रखर जिद्न्यासा, आत्मविश्वास, नवनिर्मितीची ओढ आणि घटनांकडे पाहण्याचा समतोल द्रुष्टीकोन याची मात्र जाणीव झाली. आणि या सा-यात होता तो प्रसन्नतेचा, आत्मीयतेचा एरवी दुर्लभ असनारा शिडकावा.

खरे तर मी या भेटीपर्यंत त्यांचे काही वाचलेले नव्हते. त्यामुळे माझ्यावर त्या भेटीपर्यंत तरी कसलेही पुर्वग्रह सुद्धा नव्हते. परंतु ते ब्लोग लिहितात हे समजल्यावर मात्र मी शोधुन त्यांचा ब्लोग वाचायला घेतला. वाचकांनीही तो अवश्य वाचावा... http://parabsachin.blogspot.in/ "माझं आभाळ" हे या ब्लोगचं शिर्षक. आभाळासारखेच विचार त्यांनी तरुणाईच्या भाषेत मांडले आहेत. तुकाराम, शिवाजी महाराज, नामदेव यांच्याबाबत लिहितांना त्यांनी जो समतोल द्रुष्टीकोन बाळगत असतांनाही जे परखड विवेचन केले आहे ते वाचुन मला एक समानधर्मा भेटल्याचा आनंद झाला. (कदाचित असे म्हणने थोडे अयोग्यही असेल...मी कधी कधी फारच आक्रमक होतो...पण विचारप्रक्रिया समान असे मात्र नक्की म्हणता येईल.) चंद्रकांत वानखेडे यांच्या सत्कारानिमित्त त्यांनी जो "वेड्यांचा सत्कार होतो आहे." हा जो लेख लिहिला आहे ती शैली शि. म. परांजपेंच्या शैलीला प्रतिशैली असे म्हणता येईल. वाचकांनी प्रत्यक्ष ब्लोग वाचावा व आपले मत बनवावे.

त्यांच्या ब्लोग्स वरील अनेक प्रतिक्रिया मी वाचल्या. अनेकांनी त्यांनाही ब्राह्मण विरोधक ठरवण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्वच्छ दिसले. मला ब्राह्मण बांधवांची नेमकी मानसीक समस्या काय आहे हेच नीट समजलेले नाही. मीही गेली दहा-बारा वर्ष याच मानसिकतेचा सामना करत आहे त्यामुळे परबांना नाही म्हटले तरी भावनीक त्रास होत असनार याची मला खात्री आहे. पुराव्यानिशी सत्य सांगणे हा या देशात गुन्हा झाला आहे कि काय असे वाटावे अशी दुर्दैवी स्थिती आहे. रामदासांना अतिभव्य करण्याच्या नादात आपण इतिहासाचा चेंदा-मेंदा करत आहोत याचे भान रामदासभक्तांना जसे नाही तसे ते पत्रकारितेलाही उरलेले नाही हे त्यांनी अत्यंत निर्भिडपणे मांडले आहे आणि ते सत्यही आहे. अनुयायीच नेत्यांचा अंतत: पराभव करतात हे सत्य रामदासांच्या बाबतीतही पहायला मिळते ते केवळ यामुळेच. त्यामुळे रामदासांची खरी तत्कालीन महत्ता मात्र झाकोळली जाते याचे भान या मुढांना नाही. त्यांची फक्त कीव करावी लागते. शिवाजी महाराजांवरील परबांचा लेख हा परखड वास्तवाची जाण करुन देनारा. महाराजांना हिंदुत्ववाद्यांनी मगरमीठी घालत त्यांच्या चरित्राची धुळधान उडवुन दिलेली आहेच. गोटिये नामक नव-ब्राह्मण शिवाजी महाराजांचे चक्क मंदिर बांधता झाला. मी डीएनए आणि लोकमत ते चित्रलेखातुन त्या अश्लाघ्य प्रयत्नांविर्रुद्ध लिहिले. काय झाले? मंदिर झाले...उद्घाटनही झाले. सचीनसाहेबांनीही महाराजांच्या तथाकथित गोब्राह्मनप्रतिपालक आणि मुस्लिम-विरोध ही हिंदुत्ववाद्यांना प्रिय असना-या चुकीच्या संकल्पनांबाबत स्पष्ट लिहिले तर ते ब्राह्मण विरोधक कसे होतात? ब्राह्मण बांधवांनी त्यांचे मस्तक तपासुन पाहण्याची गरज आहे. ज्यांचे ताळ्यावर आहे त्यांनी आपल्या वाट चुकलेल्या बांधवांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे.

आणि एखाद्या ब्राह्मणाची चिकित्सा केली तर ती सर्वच ब्राह्मनांची निंदा असते या अहंवादी भावनेतुन बाहेर या ही विनंती आहे. जेंव्हा तुम्ही एखाद्या ब्राह्मनाची चिकित्सा केले कि चिकित्सा करणारा ब्राह्मण विरोधी अस्तो हे ठरवता तेंव्हा मग तुम्हाला नक्कीच काहीतरी लपवायचे आहे असा निश्कर्ष निघणे स्वाभाविक आहे. सत्याचा सामना तुम्ही जेवड्या निर्धाराने कराल आणि सत्यशोधनात सहभागी व्हाल तेवढेच अखिल समाजावर उपकार होतील. अन्यथा तुमच्या दुगाण्या झेलण्यास आम्ही समर्थ आहोत याबाबत शंका बालगण्याचे कारण नाही!

असो.

या भेटीत माझा लाडका भाऊ वैभव छाया तर भेटलाच पण श्रीरंग गायकवाड यांचीही मनस्वी भेट झाली. हा दिवसच मला अनोखा होता. कारण परततांना माझी लाडकी बहिणाबाई म्हणजे प्रगती बानखेले तर म.टा. च्या कार्यालयात तर भेटल्याच पण ज्यांच्याशी मी नेहमी फोनवरच बोलायचो ते मुकुंद कुळेही भेटले. त्यांच्याशीही अल्प काळात मस्त गप्पा झाल्या...

आणि एक त्या दिवशी न ठरलेली अत्यंत अनपेक्षीत अशी एक भेटही झाली...पराग पाटील साहेबांशी...पण त्याबद्दल सविस्तर नंतर...कारण ती भेटही एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

सचीनजी, तुमच्यातील उर्जा, साहस आणि चिकित्सकता अशीच कायम ठेवा. याचीच आजच्या जगाला गरज आहे. तुमच्यापेक्षा मी १४ वर्षांनी मोठा आहे (हे सांगायला जरा लाजतोय हेही खरे आहे...) पण वयाने अक्कल येत नसते तर ती येते फक्त अथक जिद्न्यासेतुन आणि सत्याच्या अविरत शोधातुन. तुमचा शोध असाच सुरु राहो ही शुभेच्छा!

2 comments:

  1. प्रथम, आपण सर्वतः ब्राह्मण द्वेषाने लिहीत नाही याची मला कल्पना आहे हे स्पष्ट करतो.

    "जेंव्हा तुम्ही एखाद्या ब्राह्मनाची चिकित्सा केले कि चिकित्सा करणारा ब्राह्मण विरोधी अस्तो हे ठरवता तेंव्हा मग तुम्हाला नक्कीच काहीतरी लपवायचे आहे असा निश्कर्ष निघणे स्वाभाविक आहे."

    काय आहे, तुम्हाला कल्पना असेलच कि सध्या ब्लॉग तयार करणे आणि लिहिणे फुकट आहे त्यामुळे छपरी लोक (including बिनग्रेडी आणि त्यांचे समर्थक) काय वाट्टेल ते लिहितात आणि चिकटवतात.
    ब्राह्मण-द्वेष करणा-या अनेक संस्था कार्यरत असून ते मनोभावे समाजात दुही पसरवत असतात.
    त्यातून खूप ब्लॉग फक्त एखाद्या व्यक्तीचे ब्राह्मण आडनांव बघून त्याबद्दल वाट्टेल ते काहीही खरडत असतात, हे तुम्हा-आम्हाला नवे नाही. तुमच्याही वाचनात असे ब्लॉग आले असतीलच.
    सावरकर, पू.लं., लोकमान्य टिळक हे हि त्यातून सुटलेले नाहीत. इतिहासात मानाचे स्थान ज्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने मिळवले अश्या व्यक्तींबाबत काहींही दळभद्री लिहीत सुटायचे असे कार्य खूप लोक करत आहेत. (या व्यक्तिमत्वांचा त्या-त्या क्षेत्रातला मोठेपणा आपल्याला मान्य असावा हे गृहीत धरत आहे)
    एखादा ब्राह्मण चुकत असेलही, पण उगाच आडनाव सावरकर, गोडसे, देशपांडे, टिळक, केळकर, जोशी .... .... असे काही दिसले कि लागले बरळायला आणि पुस्तकं छापायला. जो ब्राह्मण तो चुकीचाच, असा विचार त्यामध्ये शोधावा लागत नाही, तो ठळकरित्या दिसत असतो. "त्या" आडनावाचा म्हणजे त्याने जे काही केले ते सगळे चुकीचेच कसे हे ठासून सागायचा प्रयत्न हे लोक करत असतात.
    ठीक आहे, काही लोकांची लायकी नसते सावरकर, टिळक यांना समजून घेण्याची. त्यासाठी लागणारी बौद्धिक पातळीच त्यांच्याकडे नाही हा त्यांचा दोष नाही. काही कारणाने (ब्राह्मण-द्वेष हे कारण नाही असे गृहीत धरायला काय हरकत आहे २ मिनिटं) त्यांना नसेल काही पटत या लोकांचे थोडेसे कार्य, पण लगेच त्यांना देशद्रोही म्हणण्यात कोणते कारण? ब्राह्मण-द्वेष नाही असे म्हणायला जागा आहे का?

    As specific example, have you seen (no need to open book & read text, just look at book cover) any book published by Sambhaji Briged?
    How can anyone say that those people dont bark, they just write against people (not only brahman) who did something wrong?
    No, its total clear that they wrote ONLY & ONLY against ALL brahmans!!!!
    संभाजी राजांचे नांव एवढे खराब औरंगजेबाने देखील केले नसेल. (त्यांना औरंगजेबाने मारले यामुळे तसे म्हटले आहे. सध्या संभाजी राजांना औरंगजेबाने मारले नसून, त्यांना सन्मानाने सोडून दिल्यावर ब्राह्मणांनी मारले असे कोणी तरी बडबडत असल्याचेही ऐकिवात आले आहे.)

    फार काही लिहीत नाही. तुम्हाला या सगळ्याची कल्पना नक्कीच असेल.
    त्यामुळे तुम्ही "तुम्हाला नक्कीच काहीतरी लपवायचे आहे" असा स्वाभाविकरित्या जसा निष्कर्ष काढला, तसाच ब्राह्मण लोक कोणीही एका ब्राह्मणविरोधी लिहिले तर "ब्राह्मण-द्वेष" हाच निष्कर्ष स्वाभाविकरित्याच काढणार... त्यात काय चूक? आणि का निष्कर्ष काढू नये?

    ReplyDelete
  2. मित्रा ऒंकार, आपले म्हनणे ब्रिगेडी वा बामसेफी लोकांबद्दल यथायोग्य असेच आहे. पण ते म्हणजे बहुजनसमाज नाही. काही ब्राह्मणी सनातनी संस्था या जशा भारतीय समाजाला लागलेली कीड आहे तशीच तीही एक आहे हे मी वारंवार म्हटले आहे, लिहिले आहे आणि तसे गुन्हे दाखल करण्यात पुढाकारही घेतला आहे. सचीन परबांनीही त्यांचा यथार्थ समाचार घेतलेला आहे हे त्यांच्या ब्लोगवरील लेखांतुन तुम्हाला दिसेल. सावरकर-गोडसे या मंडळींचे नांव आपण घेत त्यांचे कोणते महत्कार्य सांगत आहात हे आपल्यालाच माहित. टिळकांच्या आर्य सिद्धांतामुळे यांचे फावले व मुलनिवासी सिद्धांत जन्माला आला हे आपणास माहित नसल्याचे दिसते. टिळकांनी जेवढे ब्राह्मण समाजाचे नुकसान केले तेवढे कोणीही केले नसेल हे मी येथे स्पष्टपणे नमुद करतो. सावरकरांचे तर बोलायलाच नको. ते एक महाकवी, उत्तम भाषातद्न्य होते...पण...

    कुरुंदकर, पु. ल. (पु.लं.बद्दल कोण बोलला हे सांगा फक्त...माझ्या माहितीप्रमाणे कोणीही नाही.) साने गुरुजी, जी.ए., एस. एम. जोशी, बाबा आमटे, बंग कुटुंब...अशा अगणित ब्राह्मणांचा समाज आदरच करत आला आहे. पण तुम्ही म्हणाल टिळकांचा, सावरकरांचा किंवा गोडसेचा आदर करा तर माफ करा...ते होणार नाही. त्या पायावर तुम्ही ब्राह्मनद्वेष्टा कोण आहे आणि कोण नाही हे ठरवणार असाल तर तुम्ही चुक करत आहात.

    ब्रिगेडी वा बामसेफी साहित्य म्हणजे बहुजनीय विचारधारा नाही हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. पण त्याच वेळी सावरकरी, गोडसेवादी सनातनी विचारधारा म्हणजे सर्वच ब्राह्मनांची विचारधारा नव्हे हेही तुम्हाला माहित असायला हवे. त्यामुळे विचारधारांत वैचारिक गोंधळ नको. सावरकरवाद्यांच्या विरोधात अनेक देशस्थ ब्राह्मणांनी कठोर लिहिलेले आहे ते वाचायला हरकत नाही. आर्क्टिक होम इन वेदाज लिहुन टिळकांनी खुद्द ब्राह्मणांनाच कोणत्या सापळ्यात अडकवले हे नीट समजावून घ्यावे. वर्चर्स्ववादी विचार मांडनारे कोणीही असोत...त्यांचा धि:क्कार होनारच यात शंका बाळगु नये ही विनंती.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...