“संन्यस्त खड्ग” नाटकाच्या निमित्ताने-
ज्याही कोणी महाभागाने हे नाटक लिहिले त्याचा भारतीय धर्मेतीहासाचा
यत्किंचीतही अभ्यास नाही हे उघड आहे. ते असो. आपण जरा इतिहासावर दृष्टीक्षेप
टाकूयात-
१.
भारताचा पहिला ज्ञात सम्राट चंद्रगुप्त हा जैन धर्मीय
होता आणि त्याने भारताच्या सीमा बाहेरही विस्तारल्या. अशोक आही जैन व नंतर बौद्ध असला
तरी त्याने साम्राज्याचा विस्तारच केला.
२.
महाराष्ट्रात
बुद्धिझम १००% नसला तरी इ.स. पुर्व २०० ते जवळपास १३व्या शतकापर्यंत प्रभावशाली
होता. एवढा कि संतही विठ्ठ्लाला बुद्ध स्वरूपातही पहात होते. जैनंनी श्रीविठ्ठलाला
तीर्थंकर नेमीनाथांच्या रुपात पाहिले होते. (श्रीविट्ठल: एक महासमन्वय-रा. चिं.
ढेरे आणि विट्ठलाचा नवा शोध- संजय सोनवणी) यामागे खरे कारण होते पुराणांत
आठव्या शतकातच बुद्धाला विष्णूचा अवतार घोषित करण्यात आले होते त्यामुळे
लोकसमजुतीत तेच बसले. संतांनीही आपल्या श्रद्धाविश्वात विठ्ठलाला बुद्ध मानले. नेमीनाथ
हे कृष्णाचे बंधु असल्याने जैनांनीही विठ्ठलाला नेमीनाथ रुपात पाहिले. पण मुळात हा
वैदिकांचा दैवत अपहरणाचा उद्योग होता इकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.
२. बौद्ध व जैन धर्मामुळे भारताची सैनिकी शक्ती कधीच
कमी झाली नव्हती. चंद्रगुप्ताने, अशोकाने वा त्याच्या वंशजांनी वा कोणत्याही बुद्ध
राजाने सैन्यदले बरखास्त केलेली नव्हती. सुभौम, खारवेल, कुमारपाल
ते राष्ट्रकुट
व यादवांसारख्या कोणत्याही जैन सम्राटांनीही असंख्य युद्धे केलेली आहेत. जैन व
बुद्धाची अहिंसा मुळात कोणालाच समजलेली नाही. बुद्धाची वा अगदी जैनांचीही अहिंसा
ही फक्त व्यक्तिगत आदर्शवत नीतीला अनुसरुन होती.
३.
दीक्षा
घेतलेल्या भिक्षुसाठीची नितीसंकेतांची नियमावली कठोर होती पण ती सामान्य जैन अथवा
बौद्ध समाजासाठी तितकी कठोर नव्हती. उदा. जैन धर्मात साधू-साध्वीसाठी कठोर
पालनासाठी महाव्रते असतात तर श्रावकांसाठी (धर्मानुयायांसाठी) अणुव्रते असतात.
अणुव्रते सौम्य असतात.
४.
पण स्व अथवा राज्यरक्षणासाठी
वा विस्तारवादासाठी अहिंसा त्यांनी कोठेही मान्य केलेली नाही. जैन सम्राट सुभौमाने
परशुरामाची युद्धात हत्त्या केली हा इतिहास येथे लक्षात घ्यावा लागतो. खार्वेलाने
उत्तरेत दिग्विजय केला तर सम्राट कुमारपाल सोमनाथ मंदिर उभारल्यानंतर जैन झाला पण
नंतर त्याने मुलतानपर्यंत आपले राज्य विस्तारले होते.
अशोकाचा नातू ब्रुहद्रथाची हत्या पुष्य़मित्र शृंगाने
केली. हा ब्रुहद्रथाचा सेनापती होता. तो ब्राह्मण होता असा लाडका तर्क काही इतिहासकारांचा
आहे. वास्तव हे आहे कि भारतातच काय, जगातही कोणताही राजा सेनापतीपदावर आपल्या निकटच्या
नात्यातील...(भाऊ, मेव्हणा, जावई ई) व्यक्तीचीच सेनापती पदावर निवड करत असे. शिवाजीमहाराजही या
तत्वाला अपवाद नाहीत. आणि ते तर्कसुसंगतही होते. बौद्ध असलेला ब्रुहद्रथ तर
सेनापती पदावर वैधर्मी, नात्यातील नसलेल्या, त्यात ब्राह्मण असलेल्या, पुष्यमित्राची नियुक्ती करेल हे तर सर्वस्वी असंभव आहे.
दुसरे असे कि पुष्यमित्र शृंग यातील "शृंग"
हे वैदिक धर्मातील ना कोणते गोत्र आहे ना आडनांव आहे ना कुळनाम आहे. खरे तर सुग या
प्राकृत शब्दाचे ते कृत्रिम संस्कृतकरण आहे व लॉर्ड कनिंगह्याम यांनी ‘सुग’ हे
उत्तर प्रदेशातील गाव होते हे नाण्याचा इतिहास लिहितांना स्पष्ट केलेले आहे.
म्हणजे पुस्सामित सुग (हेच मुळचे नाव आहे जे त्याच्या नाण्यांवर आणि शिलालेखात
आलेले आहे) किमान वैदिक नव्हता पण हे सहा सोनेरी पाने आणि सन्यस्त खड्ग लिहिणाऱ्या
महाभागास कसे माहित व्हावे?
५.
सत्तासंघर्षात हिंसा अटळ असते आणि ती करायला बौद्ध वा
जैन धर्मीयांनी कधी कुचराई जशी केली नाही तशीच राज्यविस्तार करतांनाही सैन्यदलांचा
वापर करायलाही कुचराई केलेली इतिहासात दिसत नाही. अन्यथा मौर्यांचा वा अन्य बौद्ध
आणि जैन सम्राटांचा साम्राज्यविस्तार असंभाव्य असाच होता. पण तो झाला. याचाच अर्थ
असा कि त्यांनी "संन्यस्त खड्ग" हा सावरकरवादी विचार कधीच स्वीकारला
नव्हता.
कनिष्काने आधी शैव व नंतर बौद्ध धर्माची कास धरली.
त्याच्या कारकीर्दीत एक बौद्ध धम्म्संगती भरली, त्यानेच चीनचा पराभव करून त्याच्या राजपुत्राला ओलीस
म्हणुन काश्मीर येथे आणुन ठेवले होते हे कोणाला माहितच नसते. म्हणजे त्याने बौद्ध
होवुनही लढवैय्या बाण्याचा त्याग केलेला नव्हता.
६.
अहिंसेचे खरे तत्व ब्रुहद्रथालाही माहित होते. त्याची
हत्या कधी केली गेली? तर तो आपल्या सैन्यदलाचे निरिक्षण करायला आला होता तेंव्हा. म्हणजेच
त्यानेही सैन्यदल बरखास्त केलेले नव्हते. सावरकर सांगतात तसा तो नेभळा नव्हता. पण
सा-या पापांचे खापर बौद्धांवर थोपायचे म्हणुन त्यांनी ब्रुहद्रथाचे
"बौद्धत्व" डावाला लावले, अन्यांनी तीच री ओढली.
७.
सातवाहनांनी
बौद्ध धर्माला उदार आश्रय दिला. महाराष्ट्रातील जवळपास सर्व बौद्ध आणि जैन लेणी
त्यांच्याच काळात खोदायला सुरुवात झाली. अनेक विहार बांधायला त्यांनी देनग्या
दिल्या. पण त्याच वेळीस त्यांनी साडेचारशे वर्ष राज्य केले, साम्राज्य विस्तार केला.
म्हणजेच अहिंसा नेमकी कशी आणि कोठे वापरायची याची सद्बुद्धी त्यांना होती. जैनांच्या
छेदसूत्रात तर विपरीत स्थितीत हिंसेचा आधार घ्यायचे आदेश आहेत हेही यांना माहित
नाही.
थोडक्यात बौद्ध वा जैन धर्मामुळे भारताला अहिंसेची
चटक लागली व त्यामुळेच भारत आक्रमकांना नीट तोंड देवु शकला नाही व दास्यात गेला हा
वैदिकवाद्यांचा (विशेष करून सावरकरांचा) दावा निखालस खोटा आहे.
व्यक्तिगत नैतीकतेतील अहिंसा आणि रक्षणासाठीची वा
विस्तारवादातील त्याच अहिंसात्मक धर्माचे पाईक असुनही केली जाणारी हिंसा यातील फरक
हे नीट समजावुनही घेत नाहीत आणि सांगतही नाहीत. ते नीटपणे त्या धर्मांचे
तत्वज्ञानही समजून घेत नाहीत त्यामागे त्यांचे सांस्क्रुतीक पेच आहेत एवढेच आपण
म्हणु शकतो.
-संजय सोनवणी