Saturday, April 7, 2012

...तसेही अशा मुर्खांना कोण अडवू शकतो?

मी अपघाताने रवींद्र तहकीक नामक कोणा अनाम ग्रुहस्थाचे पु. ल. देशपांडे यांच्यावर अश्लाघ्य टीका करणारे लेख वाचले. मला आधी कोणीतरी माझ्या एका लेखावर प्रतिक्रिया देतांना पु.लं.वर टीका होत असल्याबद्दल लिहिले होते, पण मला विश्वास नव्हता...पण प्रत्यक्ष हे लेख वाचुन हादराच बसला. ही नुसती टीका नव्हे तर तालीबानी हल्लाच आहे याबाबत शंका नाही.

सर्वप्रथम, पु. ल. हे विनोदी लेखक होते पण त्याचवेळीस त्यांचे सामाजिक भान कधीही सुटलेले नव्हते. त्यांनी आपल्या द्न्यातीबांधवांवर अधिक व त्यांच्या शैलीत, पण कठोर टीका केलेली आहे. गांधीजींवर त्यांनी ज्या आत्मीयतेने लिहिले आहे त्याला तोड नाही. रा.स्व. प्रणित भावभावनांना कुटील विचारांना त्यांनी नेहमीच विरोध केला. सामाजिक वैगुण्यांकडे त्यांनी नेहमीच लक्ष वेधले.

साहित्त्यिक नेमका काय असतो हे या अद्न्य बांधवांना समजावुन सांगणे अत्यावश्यक आहे. मी आजवर ५८ कादंब-या आणि ९ नाटके लिहिली. साहित्यिकाचे स्रुजन हे अत्यंत व्यक्तिगत पातळीवर असते. माझ्या कादंब-या, नाटकांचे नायक ब्राह्मण आहेत तसेच क्षत्रीयही, महार आहेत तसेच मराठेही. क्लीओपात्रासारखी इजिप्तची सम्राद्न्यि आहे तसेच ग्रीक ओडिसियसही. शीबासारखीही नायिका आहे जिचा कोणता असा स्वतंत्र धर्मही नव्हता. नायक-नायिका लेखक निवडतो तो आपल्या विषयाला अनुसरुन. त्यातील भावनिकता लक्षात घेत. त्या भावनिकतेला आपल्या कथामाध्यमातुन विस्तार करत तो आपापल्या मगदुरानुसार पात्र, कथात्मकता व मनोविश्लेषनाद्वारे प्रक्षेपित करत असतो. लेखक लिहितो तेंव्हा जातीय नसतो. (अपवाद फारफारतर ऐतिहासिक कादंबरीकारांचा असू शकतो.)

पु.ल. मुळात कादंबरीकार नव्हते. पण त्यांनी "कान्होजी आंग्रे" ही मनोहर माळगांवकरांनी लिहिलेली, एक अत्यंत आदर्श नव्य शैलीतील कादंबरी, मराठीत आवर्जुन अनुवादित केली. आंग्रे काही केल्या ब्राह्मण नव्हते. माळगांवकरांनी घोडचुक केली असे हे बिनडोक लोक सहज म्हणु शकतात. त्यांनी हेमिंग्वेच्या "Old Man & The Sea" चा मुळ लेखकालाही लाजवेल असा अनुवाद केला. चुकच केली...मराठी माणसाला एका अद्भुत साहित्यिक प्रतिभेचे उदात्त रुप दाखवायची काही गरज नव्हती...असले येडचाप-मनोविक्रुत नंतर या महाराष्ट्रात जन्माला येतील याची त्यांना कल्पनाही नसावी, म्हणुन त्यांच्याकडुन असे क्रुत्य घडले असावे...असे खेदपुर्वक म्हणावे लागते.

पु.लंचा पींड तसा विनोदी लेखनाचा. त्यांनी कमरेखालचे विनोदही केले असे या रवींद्र महोदयांचे जयश्री गडकरांच्या "पार्श्वभुमी" वर म्हणने आहे. असे अनेक काही पांचट विनोद अत्रेंच्या नांवावरही खपवले जातात...पण त्या इतरांच्या विक्रुत कल्पना आहेत...वास्तव नाही हे या मुढांना माहितही नसते. विनोदी लेखन म्हणजे नेमके काय असते, त्यातील पात्रे कोणीही असू शकतात...अगदी संत महात्मेही...त्याकडे मोकळ्या मनाने पहायची मनोव्रुत्ती लागते. पु.लं.नी रामदासांवरही कोट्या केलेल्या आहेत हे मात्र पाहिले जात नाही..."विट्ठल तो आला आला..." हे मुळात चरित्रप्रधान वा ऐतिहासिक नाटक नसुन एक विनोदी प्रहसन आहे व त्याकडे त्याच द्रुष्टीने पहात समीक्षा केली पाहिजे याचे भान या ग्रुहस्थाला नाही. असेच करायचे तर मग दादा कोंडके ते पार क्रुष्णालाही वेठीला धरत प्रहसने करणारी तमाशा मंडळे याच न्यायाने बरखास्त करायला हवीत.

मागे कोणी वेडपट राम गणेश गडकरींच्या नाटकावरही तुटुन पडत त्यांचा संभाजी उद्यानातील पुतळा तोडायच्या वार्ता करत होता. मी याच ब्लोगवर त्याला उत्तर दिले होते. माझ्या मते ज्यांना साहित्य म्हनजे नेमके काय हेच समजत नाही त्यांनी उगा आपल्या लंगड्या तंगड्या अडवत विखार माजवु नये. हो, त्यांचे लेखन वैचारिक वा इतिहास मांडणारे असते तर त्यावर टीका करण्याचा अधिकार आहे आणि असतोच. पण कलाक्रुतीवरची टीका ही कलाक्रुतीच्याच सामर्थ्य/वैगुण्ये याच आधारावर होवू शकते...जातीय नाही.

महाराष्ट्राला तसेही विनोदाचे वावडे आहे. काही जातीघटकांना तर अधिकच. अत्रे-पु.लंनी महाराष्ट्राला हसवायला शिकवले हे ऋण मान्य करायलाच हवे. उलट हे आताचे जातीय वीर मात्र दिसला ब्राह्मण कि झोड या कुव्रुत्तीचे बळी ठरत आहेत आणि त्यातच त्यांचा सांस्क्रुतिक -हास आहे.

उद्या कोणी जी. ए. कुलकर्णींवरही असलेच वाह्यात लिहू लागेल. ज्यांच्यामुळे सांस्क्रुतीक गोंधळ झाला अशांबद्दल लिहिले-बोलणे वेगळे आणि ज्यांनी संस्क्रुती व्रुद्धीत हातभारच लावला त्यांच्याबद्दल अधमपणे लिहिणे-वक्तव्य करणे वेगळे याचे भान असायला हवे. नाहीतर साहित्यिकांना आपल्या लेखण्या बाजुला ठेवुन मुक्त श्वास न घेता आल्यामुळे चक्क काढता पाय घ्यावा लागेल...आणि मग संस्क्रुती रसातळाला जायला वेळ लागणार नाही. आपापल्या जातीचे साहित्य आपणच निर्माण करायचे आणि आपणच वाचायचे असला नवा उद्योग सुरु होईल.

असेच करायचा विचार असेल तर करा...तसेही अशा मुर्खांना कोण अडवू शकतो?

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...