Monday, May 7, 2012

माझी वाघ्याबाबतची भुमिका






वाघ्यावर खरे तर भरपुर लिहुन झाले. एक लेख तर मीच डिलीट करून टाकला. म्हटलो पुरे झाले. कशाला वारंवार त्यावर लिहायचे? तो काही एवढ्या महत्वाचा विषय नाही. परंतू अनेक ठिकाणांवरुन मला अनेक फोन, काही ख-या नांवानी तर काही खोट्या नांवांनी सतत येत आहेत. त्यांचा मुख्य उद्देश असतो तो हा कि माझी नेमकी भुमिका काय आहे व का आहे, त्यामुळे मला माझी भुमिका मांडणारा हा लेख लिहिणे अपरिहार्य असेच झाले आहे.



१. माझा काही संभाजी ब्रिगेडशी वाद असल्याने मी वाघ्याविरोधात भुमिका घेत आहे काय? हा प्रश्न अत्यंत हास्यास्पद असाच आहे. मी कधीही या ब्रिगेडचा सदस्य वा समर्थक नव्हतो. माझ्या काही संशोधनांचा (उदा. दादोजी कोंडदेव) त्यांना उपयोग झाला व त्याबद्दल त्यांच्या पदाधिका-यांनी माझे आभारच मानले आहेत. ब्राह्मणांच्या कत्तली वगैरे भागाबाबत मी जाहीर विरोध केला आहे व त्याबद्दल शिव्या व धमक्यांच्या लाखोल्याही खाल्ल्या आहेत. मी स्तुती अथवा निंदेची कधीही पर्वा केली नव्हती व करणार नाही. मला जे सत्य वाटते तेच मी मांडले आहे.



२. मला धनगर विरुद्ध मराठा हा वाद पेटवायचा आहे काय? हा प्रश्न तर अत्यंत मुर्खपणाचा आहे. मला मराठा समाजाबद्दल कसलाही द्वेषभाव नाही वा धनगरांबाबत असायला हवी तेवढी आत्मियता नक्कीच आहे. माझा विरोध हा बहुजनवादी म्हणत मराठा अजेंडा पुढे रेटणा-या प्रव्रुत्तींबाबत आहे. माझ्या अनेक व्याख्यानांतुन मी धनगर समाजावरही सकारात्मक टीका केलेली आहे व करत राहील. किंबहुना सर्वच समाजघटक जोवत तारतम्याने वागतात तोवर मी त्यांचा समर्थकच असतो परंतु जेंव्हा कोणीही सरसकट द्वेष-तिरस्काराची भुमिका घेतो तेंव्हा तेंव्हा मी विरोधच केला आहे व करत राहील. अशा स्थितीत दोन समाजांत वाद पेटवण्यासाठी मी वाघ्याबाबत लिहितो हे म्हणणे तर्कदुष्ट आहे. वाघ्याबाबतचा वाद संभाजी ब्रिगेडने उकरुन काढला होता. मी नव्हे. यंदाही काही कारण नसतांना हा वाद उकरला गेला आहे. याबाबत मी लिहिणारच याची जाण या मंडळीला नसेल असे मला वाटत नाही.

३. वाघ्याचा पुतळा हा मुळात तुकोजीराजे होळकरांचाच अवमान आहे, असे विधान केले जाते. यामागील कथा अशी आहे कि जेंव्हा ग.वि. केतकर वगैरे मंडळी शिवस्मारकाच्या कामाला वित्त कमी पडु लागले तेंव्हा इंदोरला गेले परंतु तुकोजीराजे कशी त्यांची भेट टाळत होते, राणीसाहेबांचा लाडका कुत्रा मेल्याच्या सुतकाचे कसे निमित्त सांगत होते व शेवटी इंग्रज रागावतील म्हणुन शिवस्मारकासाठी म्हणुन न देता कुत्र्याच्या स्मारकासाठी म्हणुन त्यांनी पाच हजारांची मदत केली व शिवस्मारकाचे काम झाल्यानंतर उर्वरीत पैशांतुन कुत्र्याचा पुतळा बांधा असे सांगुन त्यांनी पलवाट काढली. ही कथा ज्याही कोणी महामुर्खाने लिहिली ती सरळ सरळ तुकोजीराजांचा अवमान करनारी आहे यात शंका नाही. तुकोजीराजेंनी जेंव्हा तत्पुर्वीच केळुस्कर गुरुजींच्या आद्य शिवचरित्राला तत्कालीन २४ हजार रुपयांची मदत केली व कर्जमुक्त केले, पुण्यातील शिवाजी महाराजांच्या नांवे नुसते मिलिटरी स्कुल काढले नाही तर जगातील पहिला भव्य पुतळा ज्यांनी उभारला ते इंग्रजांची पर्वा करत होते असे लिहिणा-याच्या अक्कलेचे दिवाळे निघाले होते हे सत्यच आहे. पण वास्तव हेच आहे कि वाघ्याचेही स्मारक शिवस्मारकाचे काम पुर्ण झाल्यानंतरच उर्वरित पैशांत केले गेले. आता एका लेखकाने लिहिलेली विकृत कथा आणि वाघ्याचे स्मारक यात तुकोजीराजेंचा अवमान कोठे दिसतो? ही सरळ सरळ धनगरांना बनवण्यासाठीची सारवासारवी आहे.

४. मी भटांचा दलाल आहे काय? मस्त प्रश्न आहे. बुद्धी नाठल्यानंतरच असले प्रश्न निर्माण होवू शकतात. शिवाजी महाराजांचे स्मारक ब्राह्मनांनी केले ही खरी पोटदुखी आहे. हे स्मारक शोधले मुळात ते महात्मा फुले यांनी, हीही पोटदुखी आहे. मी भटांचा दलाल असल्याने वाघ्या ही त्यांनी निर्माण केलेल्या विकृतीचे समर्थन करत आहे असा त्यांचा (फोनकर्त्यांचा) दावा आहे. एवढा ब्राह्मणद्वेष बरा नव्हे हे त्यांना समजण्याची शक्यता नाही. यांनाच समाजात तेढ हवी आहे म्हणुन ते असले तोडफोड-जाळपोळ उपक्रम हिरिरीने पुढे रेटत असतात, विरोध करणा-यांना भटांचे दलाल ठरवले कि झाले. पण लोक एवढे मुर्ख नसतात हे द्न्यान होण्याची शक्यता दिसत नाही.

५. वाघ्याच्या स्मारकाच्या जागी राजघराण्यातील अन्य कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीची समाधी असली पाहिजे...असाही दावा माख्याकडे केला गेलेला आहे. माझे उत्त्र आधीही अनेकदा आले आहे. पण पुन्हा पुन्हा विचारतात म्हणुन पुन्हा सांगतो.अंदाजांवर इतिहास चालत नाही. तेथे सईबाईंची समाधी असु शकत नाही कारण ती राजगडावर आहेच. सईबाई महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत जीवित होत्या या दाव्याला इतिहास संशोधन म्हणायचे असेल तर खुशाल म्हणा. बरे सईबाईंची नसेल तर पुतळाबाईंची असेल...अहो पण त्या सती गेल्या होत्या...सतीचे वृंदावन अथवा स्मारकशिळा असते. तशी स्मारकशिळा रायगडावर आहे. नाही? मग ती जागा सोयराबाईंची असेल...वा! काय अजब तर्क आहेत! सोयराबाईंना संभाजीराजांनी भिंतीत चिणुन मारले कि त्यांचा मृत्यु कैदेत झाला याबाबतच मुळात इतिहासकारांत मतैक्य नाही. तो मृत्यु कसाही झाला असला तरी संभाजी महाराज त्यांचे स्मारक करण्याची शक्यता शुण्य आहे. याबाबतचे कसलेही पुरावेही नाहीत. अगदी बखरींतही येत नाहीत. असे असतांना केवळ अंदाज बांधत वाघ्या ही गडकरींच्या विकृत प्रतिभेची उपज आहे हा दावा
कशासाठी?  परंतु गडकरींनी आपले नाटक लिहिण्यापुर्वीच १९०५ ला प्रसिद्ध झालेल्या चिं.ग. गोगटेंच्या पुस्तकात जी वाघ्याचीच दंतकथा आलेली आहे ती मात्र भिरकावुन द्यायची...हा मात्र अजब न्याय आहे. ज्याबाबतीत कसलाही पुरावा उपलब्ध नाही तो घोष करायचा आणि दंतकथेच्या स्वरुपात का होईना जी बाब जनमानसात रुढ होती तिल मात्र सरळ सरळ धुत्कारुन लावायचे याला काय म्हणावे? ब्राह्मनांनी जर शिवरायांचा अवमान करण्यासाठी वाघ्या बसवला तर मुळात त्यांना शिवस्मारकच उभारायची काय गरज होती?



असो. मी या फोनकर्त्यांना, ते खरे असोत कि खोटे, खालील पर्याय दिले आहेत...



१. शिवस्मारक ब्राह्मणांनी बांधले म्हणुन वाद असेल तर सर्वप्रथम ते आताचे ब्राह्मणी स्मारक सरळ उतरवा. नवीन हवे तसे बांधा.

२. वाघ्याचे स्मारक हे अनैतिहासिक असून तेथे जर महाराजांच्या कोणत्याही राणीची वा अन्य राजपुरुषाची समाधी होती हे म्हणायचे असेल तर प्रथम वाघ्याच्या चबुत-याखाली तिरका छेद घेत कुपनलिका पद्धतीचे उत्खनन करा व प्राप्त अवशेषांची डी.एन.ए. टेस्ट करा व कार्बन डेटींगही करा.

यातुन सत्य काय ते सामोरे येईल व ते सत्य नाकारण्याची हिम्मत सुबुद्ध मराठी माणुस करणार नाही याबाबत मला तरी विश्वास आहे.

या माझ्या उत्तरावर ते निरुत्तर होतात ही वस्तुस्थिती असली तरी ते वाघ्याला उध्वस्त करणारच नाहीत या भ्रमात कोणीही शिवप्रेमींनी राहु नये.



माझ्या मते वाघ्याचे ते यथोचित स्मारक आहे व एका इमानी कुत्र्याचे स्मारक महाराष्ट्रात एका पवित्र स्थळी असावे याचा प्रत्येकाला अभिमानच वाटला पाहिजे. ते उध्वस्त करणे म्हणजे शिकारी वृत्तीच्या हिंसक मंडळीच्या प्राणिद्वेषाची परिसीमा असेल असे मला तीव्रतेने वाटते. बाकी महाराष्ट्रीय सुद्न्य आहेतच.

धन्यवाद.

भवितव्यातील धोके

सध्या ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवास करते आहे तो वेग असाच भूमिती श्रेणीने वाढत राहीला तर ज्ञानाच्या क्षेत्रात मक्तेदारीची स्थि...