खरे तर या विषयावर मी पुर्वीच लिहायला हवे होते. कालच माझे परम मित्र प्रा. हरी नरके आणि शुद्धोदन आहेर यांचे डा. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंगचित्राबाबत निर्माण झालेल्या वादाबाबत १७ जानेवारीच्या नवशक्तीतील लेख वाचले आणि असे वाटले कि या विषयावर लिहायलाच हवे. प्रा. नरके यांच्या मते आंबेडकरी चळवळीच्याच समर्थकांना (पळशीकर आणि यादव) उधळुन फेकायच्या कटात आंबेडकरी जनता आपसुक सापडली आहे आणि प्रा. नरके पुढे म्हणतात..."पळशीकर ब्राह्मण आणि यादव ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर हेत्वारोप, हल्ले होणार असतील आणि सारे आंबेडकरवादी त्यावर सोयीस्कर मौन धारण करणार असतील तर ते चळवळीचंच नुकसान करणारं ठरेल. यापुढं मित्रशक्ती बाबासाहेबांवर लिहिताना ताकही फुंकून पितील."
शुद्धोदन आहेरसाहेब म्हणतात...…"जर या व्यंगचित्रातून जातिसंस्था समर्थक संदेश जात असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड ते खपवून घ्यायचे काय? हा मुद्दा चर्चेलाही न घेणारी मंडळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी आहेत काय?"
मी या दोन्ही मतांपार जात माझी निरिक्षणे नोंदवू इच्छितो...
ब्रिगेडने हल्ले केले, तोडफोड केली तर ते तालीबानी असतात...एम. एफ. हुसेनच्या चित्राविरुद्ध तोडफोड करणारे बजरंगदलीय रानटी असतात, टाईम्सच्या कार्यालयावर केवळ एखादी बातमी विरोधातील (आणि म्हणुन ती खोटीच) आली म्हणुन हल्ला करणारे अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे शतृ असतात...तर मग पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला करनारे वेगळे कसे ठरतात? आहेर साहेबांनी त्यांचा निषेधच केला आहे हे महत्वाचे आहेच. पण अन्य चळवळीतील म्हनवणा-या संघटना याबाबत मुग गिळुन का गप्प आहेत?
बाबासाहेबांचे व्यंगचित्र अभ्यासक्रमातील पुस्तकात आले. खरे तर राजकीय व्यंगचित्रे उत्तुंग व्यक्तिमत्वांवरच काढली जातात. ऐरे-गैरे हे कधीच व्यंगचित्रांचे विषय नसतात. मागे एकदा टाइम्सने रतन टाटांचे एक व्यंगचित्र प्रकाशित केले होते. टाटांनी त्या व्यंगचित्राचा व टाइम्सचा निषेध केला होता. टाइम्सने त्यांचे पत्र चक्क वाचकांच्या पत्रव्यवहारात छापुन त्यांना त्यांची जागा दाखवुन दिली आणि मुख्य पानावर ते व्यंगचित्र पुन्हा प्रसिद्ध करुन टाटांना सुनावले कि आम्ही गांधीजींची, नेहरुंचीही व्यंगचित्रे ते प्रसिद्धीच्या कळसावर असतांनाही प्रसिद्ध केलेली आहेत. टाटांना असा झटका कोणी दिला नसेल.
खरे तर जेम्स लेन प्रकरणी जी चुक मराठा समाजाने केली तीच चुक काही वाट चुकलेल्या आंबेडकरवादी म्हणवना-यांनी केली. त्यांनी भांडारकर संस्थेवर कसलाही विवेक न वापरता, सरसकट जबाबदारी थोपवत हल्ला केला... तसाच यांनी पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला केला. फरक काय आहे? आजच्या बुद्धीवंतांना समर्थनच करायचे झाले तर मग दोन्ही हल्ल्यांचे करावे लागेल. पण एकही सुद्न्य विचारवंत तसे करनार नाही. करुही नये.
पण तरीही व्यंगचित्रात जातीयतावाद शोधणे याचा अर्थ असा होतो कि जातीयता इतरांच्या मनातुन जावो-न-जावो- ती खुद्द आमच्याच मनात जीवंत आहे. प्रत्येक बाबीकडे आम्ही निखळ दृष्टीकोनातुन पाहुच शकत नाही. आम्हीच जातीयवादी आहोत, मग जातीय-अंताची लढाई आम्ही खरेच लढत आहोत काय हाही प्रश्न आम्हाला स्वत:ला विचारावा लागणार आहे.
आम्ही भारतीय नको तिथे भावनाशील असतो आणि हवे तेथे षंढ असतो. हा आमचा हिजडेपणा शतकानुशतके आम्हाला गलितगात्र करत आला आहे. बाबासाहेबांनी या देशाला, या अखिल समाजाला एक नवी दृष्टी देण्याचा अविरत प्रयत्न केला. त्यांच्या अनुयायांनीच बाबासाहेबांना धाब्यावर बसवावे, त्यांची तत्वे पायतळे तुडवावीत...जे महनीय उदात्त व्यक्तित्व...गोतम बुद्ध त्यांनी एक आदर्श म्हणुन स्वीकारावे त्याला कनभरही समजुन न घेता एक नवा तालीबानवाद निर्माण करावा याचे मला वैषम्य वाटते. मग प्रा. नरके म्हणतात त्याप्रमाणे......"पळशीकर ब्राह्मण आणि यादव ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर हेत्वारोप, हल्ले होणार असतील आणि सारे आंबेडकरवादी त्यावर सोयीस्कर मौन धारण करणार असतील तर ते चळवळीचंच नुकसान करणारं ठरेल. यापुढं मित्रशक्ती बाबासाहेबांवर लिहिताना ताकही फुंकून पितील."
मी सहमत आहे.
ज्यांने खरे तर समाजाचे आदर्शभुत होत नवे पायंडे पाडायचे, मोकळ्या मनांची क्षितिजे विस्तारायची. तेच जर असे दहशतवादी होणार असतील तर तेच आंबेडकरवादाचे हत्यारे ठरतील.
माझे नुकतेच "दहशतवादाची रुपे" हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यात मी दहशतवाद अपवादानेच या देशात केला आहे असा धर्म म्हणजे बौद्ध धर्म असे म्हटले होते. मला वाटते हे नवबुद्ध मला माझे विधान बदलायला भाग पाडतील. मग ब्राह्मणी दहशतवाद काय, मराठ्यांचा काय आणि आंबेडकरवाद्यांचा काय...आशय एकच असेल...कारणे वेगवेगळी असतील...परिणाम मात्र समान विघातक असतील...आणि त्याची जबाबदारी या बेजबाबदारांनाच स्वीकारावी लागेल. आपण एका सबळ, क्षमाशील आणि व्यापक विचारांच्या समाजरचनेच्या दिशेने निघालो आहोत कि केवळ गतानुगतीकतेच्या वांझ भावनांत रमत आपला भविष्यकाळ उद्ध्वस्त करणार आहोत हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि त्याचे उत्तर शोधणे आजच्या विचारकांसमोरील आव्हान आहे.
ते विशिष्ट व्यंगचित्र योग्य कि अयोग्य, संयुक्तिक कि असंयुक्तिक, जातीद्वेषाने आहे कि केवळ तत्कालीन स्थितीचे व्यंग-प्रतिबिंब आहे हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. त्यावर अगदी मनमोकळी चर्चा होवु शकते आणि ती व्हावी. गरज नसली तरी व्हावी. काळाची चौकट बदलली असली तरी व्हावी असे वाटत असेल तरी व्हावी.
व्यंगचित्रांचे तत्वद्न्यान आपल्या भारतीय समाजाल कोणीतरी शिकवायलाच हवे!
पण दहशतवाद्यांच्या व्याख्येत बसेल अशी कृती ज्यांनीही केली त्यांचा जाहीर निषेध सर्वप्रथम आंबेडकरवाद्यांनीच करायला हवा. तेच बाबासाहेबांच्या तत्वद्न्यान आणि एकंदरीत व्यक्तित्वाशी सुसंगत असेल. पण ज्याअर्थी तसे झालेले दिसत नाही त्याचाच अर्थ बाबासाहेबांचा पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला आहे असे म्हणावे लागेल.