पंढरीची वारी हा वारक-यांसाठी एक आनंदसोहोळा असतो. त्या आनंदामागील कारणे ही फक्त भाविक असतील अथवा नसतील. पण ही एक परंपरा आहे हे तर नक्कीच आहे. वारकरी मंडळी द्न्यानेश्वरांना वारकरी संप्रदायाचे आद्य संत मानतात. किंबहुना "द्न्यानदेवे रचीला पाया...तुका झालासे कळस" अशीच आपली मान्यता आहे. या मान्यतेचे दोन अर्थ होतात...एक म्हणजे द्न्यानरायांपुर्वी वारीची प्रथाच नव्हती. दुसरा अर्थ होतो तो हा कि नामदेवांचा या संप्रदायाच्या उभारणीत कोणताही आद्य हातभार नाही. यातुन अजून निर्माण होणारा प्रश्न म्हणजे चोखोबाचा. एकाच समकालात गोरोबा, चोखोबा, जनाई असे अनेक बहुजनीय संत जर नामदेवाच्या मांदियाळीत येतात तेथे द्न्यानेश्वरांचा नेमका संबंध काय?
द्न्यानेश्वर हे कट्टर नाथपंथीय होते. योग हा त्यांचा साधनामार्ग होता. अमृतानुभव या त्यांच्या महनीय तत्वद्न्यानाने मंडित ग्रंथात शैव तत्वद्न्यान ठासुन भरलेले आहे. द्न्यानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिला. या ग्रंथात एकाही ठिकाणी द्न्यानेश्वरांनी विट्ठलाचा साधा उल्लेखही केलेला नाही. अगदी आद्य नमनातही.
राहिली द्न्यानेश्वरांच्या अभंगांची बाब. द्न्यानेश्वर एक कि किमान तीन याबाबत विद्वानांत वाद आहेच. पण त्या जंजाळात न जाता मी येथे एवढेच नमुद करतो कि द्न्यानेश्वरांचे म्हणुन जे अभंग आहेत त्यांचा समारोप "बाप रखमादेवू वरु विट्ठल" असा असतो. आता हे सर्वांना माहितच आहे कि द्न्यानेश्वरांच्या माता-पित्यांचे नांव रखुमाई- विट्ठल असेच होते. मी याबाबत द्न्यानेश्वरांचे महाराष्ट्रातील गाढे अभ्यासक डा. द.भि. कुलकर्णी यांना एक प्रश्न विचारला होता...तो असा...
"द्न्यानेश्वरांनी आपल्या अभंगांची समाप्ती आपल्या माता-पित्यांना उद्देशुन का केली नसेल? कारण एकाही अभंगात द्न्यानेश्वर समाप्ति वगळता विट्ठल भक्तीचा उल्लेख करत नाहीत."
यावर दभि म्हणाले होते..."तुझा तर्क योग्य आहे. पण तो सिद्ध करता येणे आज अशक्य आहे."
माझे म्हणने आहे कि हाच तर्क सिद्ध होतो कि द्न्यानेश्वर हे कधीही वारकरी संप्रदायाशी निगडीत नव्हते तर ते नाथ संप्रदायाचे अखेरपर्यंत अनुयायी होते. त्यांनी व त्यांच्या भावंडांनीही ज्या समाध्या घेतल्या त्या अगदी नाथ संप्रदायाला साजेशा. वारकरी संप्रदायात खरे तर समाधीची पद्धतच नाही. ती असुही शकत नाही.
उलट नामदेव लहानपनापासुन पंढरीच्या विठुरायाला परंपरेने नैवद्य देत होते. कारण नैवद्याचा अधिकार त्यांच्याच घराण्याकडे होता. याचा दुसरा अर्थ असा कि तेंव्हा विट्ठल मंदिरावर बडव्यांचा अधिकारच नव्हता. किंबहुना विट्ठल हा अखिल महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणुन तोवर उदयाला आलेलाच नव्हता. आला असला तरी तो एखाद्या विशिष्ट मानवी समुदायांपर्यंतच मर्यादित होता. द्न्यानेश्वर जर वारकरी संप्रदायाचे असते तर द्न्यानेश्वर आणि नामदेवांची भेट पंढरपुरलाच खुप आधी झाली असती, पण दंतकथा सांगतात कि द्न्यानेश्वरांची किर्ती ऐकुन नामदेव द्न्यानेश्वरांना भेटायला आळंदीला गेले. म्हणजे दोन वेगळ्या संप्रदायांची तत्कालीन महनीये एकमेकांना भेटली. आणि याचाच दुसरा अर्थ असा कि द्न्यानदेवांचा वारकरी संप्रदायाशी काहीएक संबंध नव्हता. असता तर किमान वारीच्या निमित्ताने त्यांची भेट पंढरीलाच झाली असती.
आता द्न्यानेश्वर जर वारकरी संप्रदायाचे मुळात नव्हतेच तर त्यांनी नामदेवांबरोबर उत्तर भारतात एकदा प्रवास केला ही कथा खोटी ठरते. उपलब्ध पुराव्यांनुसार उत्तर भारतातील द्न्यानदेवांच्या यात्रेचा एकही पुरावा उपलब्ध नाही, नामदेवांचे म्हणावे तर त्यांची उत्तर भारतात असंख्य मंदिरे आहेत. द्न्यानेश्वरांचे एकही नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या तत्वद्न्यानाचा गौरव खुद्द नामदेवही करतांना दिसत नाहीत. याचे कारण द्न्यानदेव हे निकृष्ठ होते म्हणुन नव्हे तर नाथपंथीय तत्वद्न्यान आणि वारकरी समुदायाचे तत्वद्न्यान हेच विभिन्न होते. नाथ संप्रदायाही तसा जातीभेदातीत...पण द्न्यानेश्वर हे वर्णपद्धतीचे समर्थकच होते. नामदेवांना अखिल भारताने स्वीकारले...इतके कि त्यांच्या नांवाची जातच बनली. उतरेपासुन दक्षीणेपर्यंत नामदेव अवघा आकाशची झाला.
आता विट्ठल हा पौंड्र वंशीय पशुपालक, धनगर कुरुबांचा पुरातन राजा होता हे फक्त मीच नव्हे तर डा. रा. चिं. ढेरे सुद्धा सांगतात. पौंड्रंक विट्ठल म्हणजेच पांडुरंग विट्ठल हे पुन्हा सांगायलाच हवे काय?
आता विट्ठलाची वारी. ही परंपरा पुरातन अगदी जेंव्हा पौंड्रपुर तथा पंढरपुर पशुपालक धनगर-कुरुबांची राजधानी बनली तेंव्हापासुन पंढरीची वारी सुरु झाली. कधी? जेंव्हा या महाराष्ट्रात पशुपालन हाच महत्वाचा उद्योग होता आणि आपल्या राजांना दायभाग आणि कृतद्न्यता व्यअक्त करण्यासाठी हे धनगर-कुरुब-गवळी पंढरीची वाट चालत असत. पुढे सम्राट देव बनला. पण ती वाट थांबली नाही. आजही पंढरपुर जेथे स्थित आहे त्या सोलापुर जिल्ह्यात आणि सीमावर्ती कर्नाटकी प्रदेशात धनगर-कुरुबच बहुसंख्येत आहेत. नंतर जे कुणबी (शेतकरी) झाले तेही या पंढरीच्या रायाची...त्यांच्या प्राचीन सम्राटाची भक्ति आजही त्याच निष्ठेने करत असतात.
वारी पुरातन आहे. आज वारी स्वार्थी झाली असली तरी वारीच्या उद्देश्य एकच तो म्हणजे पंढरीच्या सम्राटाला आपले भागध्येय वाहणे.
नामदेवांनी या परंपरेला भक्तीचे अनावर अधिष्ठाण दिले. नामदेव कारण मुळचे अहिर होते. शिंपी जात ही भारतात सर्वात उशीरा जन्माला आलेली जात. त्यामुळे नामदेवांचे नांव घेत काही जातीय संघटना बनल्यात. पण नामदेव हे एकमेव राष्ट्रीय व्यक्तिमत्व आणि त्याची साक्ष अवघा देशच देत असतो.
नामदेवे रचिला पाया...हेच काय ते सत्य आहे.