शैव धर्म हा जगातील सर्वाधिक पुरातन धर्म आहे याबाबत आता सर्वच विद्वनांत एकमत आहे. सिंधु संस्कृतीच्या काळात या धर्माने कलस गाठायला सुरुवात केली. लिंगपुजा हा या धर्माचा आद्य प्राण होय. ही एकार्थाने प्रतीक पुजा होती. निर्मितीचे...अगदी विश्वनिर्मितीचे मुळही त्या काळातील समाजाने लिंगप्रतीकात पाहिले. आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, पूजा आणि संन्यास या महत्वाच्या तत्वांवर शैवांचा पुरातन काळापासुन ते आजतागायत विश्वास आहे.
शैव सिद्धांतांत, स्वत: शिव जरी कफल्लक मानला गेला असला तरी त्याचा मित्र कुबेर हा असूर मात्र धनाढ्य मानला गेला आहे. सिंधु संस्कृती जशी व्यापार, शेती, उत्पादकतेमुळे धनाढ्य बनत गेली तसतशी सुखासीनता वाढत गेली. पंचमकार साधनादि तंत्रांकडे समाज आकर्षित होवू लागला. समाजात अशा कालात नेहमीच एक उदासीनता येते व विचारवंत नवीन तत्वधारांच्या शोधात लागतात. याच काळात (इसपु. ३२००) या प्रक्रियेला प्रतिक्रिया म्हणुन एक नवीन विचारधारा उदयाला आली व ती म्हणजे समन संस्कृती. या विचारधारेतुन निर्माण झालेला धर्म म्हणजे जैन (जिन) धर्म. ज्याने कर्मेंद्रियांवर विजय मिळवला तो जिन अशी अत्यंत साधी व्याख्या होती. शैव योग हा या तत्वधारेचा मुलाधार बनला. कारण योगाचा अर्थही कर्मेंद्रियांवर विजय असाच आहे.
कोणताही नवीन धर्म ज्या धर्मातुन तो उदयाला आला त्याची सर्वस्वी कास सोडत नाही हे आपण ज्यु धर्मातुनच उदयाला आलेल्या ख्रिस्चन आणि इस्लाममद्धे सहज पाहु शकतो. शैव आणि जैन धर्मातील साम्ये पाहुन मग आपण त्यांच्यातील विभेदही पाहुयात.
१. शैव धर्म आत्म्यावर विश्वास ठेवतो. जैनही ठेवतात.
२. आत्मा हा सर्वोपरी असुन स्वत:तच तो संपुर्ण द्न्यानी आहे, परंतु कर्मबंधांमुळे त्याला अद्न्यानाचा आभास होतो हे दोन्ही धर्मांच्या तत्वद्न्यानाचा मुळ गाभा आहे. पुनर्जन्मावर दोन्ही धर्मांची श्रद्धा आहे.
३. प्रत्येकाला मोक्षाचा अधिकार आहे. दोन्ही धर्म मुलत:जातीयता मानत नाहीत.
४. कर्मबंधातुन मुक्ती म्हनजेच मोक्ष अशी दोन्ही धर्मांची श्रद्धा आहे.
५. ओंकार हा दोन्ही धर्मांनी श्रेय:स्कर व श्रेष्ठ मंत्र मानलेला आहे.
६. ब्रह्मचर्याला दोन्ही धर्मांनी विशेष स्थान दिले आहे. शैव यती आणि जैन हे प्राय: आजन्म ब्रह्मचारीच असत.
७. शिव हा नग्नच असतो. सर्वच तिर्थंकर हेही नग्न असतात व त्यांच्या प्रतिमाही विवस्त्रच बनवल्या जातात.
८. षैव व जैन धर्म हे अवैदिक धर्म मानले जातात.
अशी अनेक महत्वाची साम्ये असतांनाच महत्वाचे विभेदही पाहिले पाहिजेत. ते असे:
१. शैव धर्मात हिंसा, बळी याला महत्व आहे. जैन धर्म हा अत्यंत टोकाची अहिंसा हे आपले मुलतत्व मानतो.
२. सत्याला व अस्तेयाला दोन्ही धर्मात महत्व असले तरी अपरिग्रह हे अत्यंत महत्वाचे तत्व जैनांनी शोधले.
३. शिव व शक्तीच्या आद्य मिलनातुन विश्वाची निर्मिती झाली अशी शैव श्रद्धा आहे, परंतु जैन मात्र विश्व हे कोणीही निर्माण केले नसुन ते आहे तसेच अनादी अनंत आहे असे मानतात. एका अर्थाने बिग ब्यंग सिद्धांत विरुद्ध स्थिर विश्व सिद्धांत यात विभेद असावा तसाच हा विभेद आहे.
हे महत्वाचे विभेद दोन धर्मांत असले तरी ते अतंर्गतत: सुसंगतच आहेत कारण जैन धर्म हा शैव धर्माची पुढची पायरी होता. आधीचे दोष दूर करत पुढे जाणे हीच मानवी समाजाची प्रागतिकता असते.
जैन धर्म आणि शैव यांतील अत्यंत महत्वाचे साम्य म्हणजे जैनांच्या चोवीसपैकी २० तीर्थंकरांच्या नांवात "नाथ" हे शिववाचक पद आहे. शिवाला आदिनाथ मानले जाते...हे आपल्याला माहितच आहे..वृषभनाथांचे पर्यायी नांव हेही आदिनाथ असेच आहे. एवढेच नव्हे तर नंदी (वृषभ) हे शिवाचे एक प्रतीक असून आद्य तीर्थंकर वृषभनाथांचे प्रतीकही वृषभच आहे. थोडक्यात जैन विचारधारा ही शैव धर्माला पर्याय म्हणुन नव्हे तर शैव सिद्धांत पुढे नेण्यासाठी झाली असे स्पष्टपणे म्हणता येते.
जैन धर्मानंतर या दोन्ही धर्मांना पर्याय म्हणुन एक नवीनच धर्म उदयाला आला व तो म्हणजे वैदिक धर्म. सरस्वती नदीच्या काठी जन्माला आलेला, वसिष्ठ ऋषीने प्रवर्तीत केलेला हा धर्म अत्यंत विरोधी तत्वद्न्यान घेवुन पुढे आला. या धर्माची महत्वाची मुलतत्वे अशी:
१. आत्मा-मोक्ष-पुनर्जन्म-प्रतीक पुजा या तत्वांवर विश्वास न ठेवता अग्नीच्या (यद्न्याच्या) माध्यमातुन हविर्द्रव्ये अर्पण करत निसर्ग-रुपकमय देवतांना प्रसन्न करुन घेणे.
२. ब्रह्मचर्य-संन्यासावर विश्वास नाही. निपुत्रिकाला कोणतीही गती नाही हा विश्वास.
३. लिंगपुजा पुर्णतया नाकारली. नागरी अवस्थाही नाही आणि पुर्ण गृहस्थी जीवनाचा त्यागही नाही अशी मध्यम जीवनव्यवस्था.
४. मुर्तीपुजा सर्वस्वी अमान्य.
५. पुरुषसत्ताक पद्धतीचा पुरस्कार.
हा धर्म इसपु १००० च्या आसपास एका परिणत अवस्थेला पोहोचला होता. परंतु त्याचा प्रचार उत्तर भारतात काही प्रमानात झाला असला तरी तो सर्वमान्य धर्म नव्हता. याचे कारण म्हणजे वैदिक धर्मात असलेली वर्णव्यवस्था. यद्न्यकर्मांतील क्लीष्टता आणि त्यामुळेच पुरोहितांचे वाढलेले स्तोम. शिवाय यद्न्य हे खर्चीकही असत. सर्वांना ते परवडणे शक्यही नव्हते. त्यामुळे पुजादि अत्यंत सोपे मार्ग सांगणारा मुर्ती/प्रतीकपुजक शैव धर्म अव्याहत वाढतच राहिला तसाच जैन धर्मही. हे दोन्ही धर्म मानवी समुदायांना मानसिक समाधान देण्यात सक्षम होते.
पण यानंतर जन्माला आला तो बौद्ध धर्म. हिंदु धर्माला आव्हान देणारा धर्म म्हणुन बौद्ध धर्माकडे आजही लोक पाहतात. पण मुलात हिंदु नामक धर्मच अस्तित्वात नसल्याने गौतम बुद्धाने मग नेमक्या कोनत्या विचारधारेच्या विरुद्ध आणि कोणत्या विचारधारेच्या समर्थनार्थ आपले तत्वद्न्यान निर्माण केले हे पाहणेही रोचक ठरेल.
त्यासाठी आधी आपण बौद्ध धर्माची मुलतत्वे पाहुयात:
१. बौद्ध धर्माला मुळात मुर्तीपुजा मान्य नव्हती.
२. बौद्ध धर्माने यद्न्यांतील पशुहिंसा नाकारली, पण यद्न्यांना विरोध केला नाही.
३. बौद्ध धर्माने इंद्र-वरुणादी वैदिक देवता स्वीकारलेल्या आहेत.
४. बौद्ध धर्माचा आत्मा-मोक्ष-पुनर्जन्मावर मुलत: विश्वास नाही. (फार उत्तरकाळात याही सद्न्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला. पण थेरवाद, जो मुळ बौद्ध धर्म आहे, तो या संकल्पनांना मान्यता देत नाही.)
५. बौद्ध धर्म हा मुलत: पुरुषप्रधान आहे. स्वत: गौतम बुद्धांनी भिक्खु संघात स्त्रीयांना प्रवेश नाकारला होता. पण त्यांचा शिष्य आनंद याच्या आग्रहाने अत्यंत खेदाने त्यांनी स्त्री प्रवेश मान्य केला.
६. बौद्ध धर्म मांसाहाराला विशिष्ट स्थितीत अनुद्न्या देतो.
७. बौद्ध धर्म कोणताही आत्यंतिक मार्ग न स्वीकारता मध्यम मार्ग स्वीकारतो.
८. विश्वनिर्मितीबाबत बुद्ध मौन आहेत. अनित्यतावाद हा बौद्ध धर्माचा पाया आहे.
थोडक्यात बौद्ध धर्म आणि वैदिक धर्म यांच्यात सुसंगती आहे. मी एका पुर्व लेखात लिहिले होते कि बौद्ध धर्म ही वैदिक धर्माची सुधारणा आहे. शैव अथवा जैन धर्माचा त्याशी ऐतिहासिक संबंध नाही. बौद्ध धर्माने जरी समन सम्स्कृतीची, सांख्य तत्वद्न्यानाची उसनवारी केली असली तरी हा धर्म म्हणजे वैदिक धर्मासाठीचा नवसुधारणावाद होता.
अर्थात तो वैदिक धर्मियांनी मान्य केला नाही. जरी बौद्ध धर्माचे सर्वाधिक अनुयायी ब्राह्मणच झाले असले तरी ब्राह्मणांनीच भारतातुन बौद्ध धर्म हद्दपार केला हा इतिहास विसरता येत नाही.
त्याउलट जैन धर्माशी शैव धर्मीयांचे कधीही वाकडे झाल्याचा इतिहास नाही. जैनांबाबत शैव नेहमीच सहिष्णु राहिले आहेत. आजतागायत भारतात जैन-हिंदु असा वाद झालेला नाही. कोणत्याही खेड्यात जैन दुकानदाराचे एखादेच कुटुंब असते...पण कोणालाही विद्वेषाने वागवले गेल्याचा इतिहास नाही. त्या धर्माचा सुधारणावादही कोणाच्याही पचनी पडलेला नाही. वैदिक धर्म हा जगातील आद्य मिशनरी धर्म. बौद्ध धर्मही मिशनरी तत्वावरच वाढला. वैदिक धर्म हा जगातील आद्य मिशनरी धर्म. बौद्ध धर्मही मिशनरी तत्वावरच वाढला. त्यांनी धर्मप्रचारक निर्माण केले. ख्रिस्ती मिशनरी त्याच चालीवर वागु लागले. सामाजिक कारणांसाठी एखाद्या मृत धर्माचे पुनरुत्थान करणे मी समजु शकतो, परंतु तसे करत असतांना आपण नेमक्या कोणत्या विचारधारेचे अंगिकरण करत आहोत हे समजणेही गरजेचे आहे. बौद्ध तत्वद्न्यान आणि वैदिक तत्वद्न्यान यात साम्ये अधिक विभेद कमी असे चित्र आहे.
परंतु शैव तत्वद्न्यान आणि जैन तत्वद्न्यान यात साम्ये अधिक आणि विभेद कमी असे चित्र आहे म्हणुनच जैन धर्म कोनताही सामाजिक विवाद निर्माण न करता अखिल समाजाच एक भाग म्हणुन अव्याहत जीवित आहे, एवढेच!