सामान्यपणे सामान्य हे सहसा दांभिक असतात असा आपला समज असतो. राजकारण्यांबाबत तर बोलायलाच नको कारण दांभिक असणे हे त्यांच्या पेशाचे एक व्यवच्छेदक लक्षणच आहे. परंतु साहित्त्यिक-विचारवंत म्हणवणारे जेंव्हा दांभिक बनतात, वागतात, आचरण करतात तेंव्हा मात्र चिंता वाटते. खाजगीत असणारा आणि जाहीर प्रतिमा बनवत तिला तडा जावू नये म्हणुन मुखवटे पांघरणा-यालाच आपण साधारणतया दांभिक म्गणतो. पण स्वत:चे विचार इतरांच्या व स्वत:च्याही सोयीसाठी हवे तेंव्हा हवे तसे वाकवणा-यांना आणि तरीही वर विचारशिरोमणी म्हनवून घेणा-यांबाबत तर दांभिकच नव्हे तर दंभ-विकृत अशीच संद्न्या शोभुन दिसेल. दुर्दैवाने असे विचा दंभ विकृत महाराष्ट्रात आहेत हे महाराष्ट्रचे दुर्दैव म्हणावे लागेल.
मी अनेक दांभिक खोटारडे लेखक पाहिले अनुभवले आहेत ते प्रकाशक या नात्याने. एकच हस्तलिखित शिर्षके बदलुन दोन-तीन प्रकाशकांना देत मानधने लाटणारे लेखक मी जसे पाहिले आहेत तसेच नवीन लेखकांच्या हातात काही रुपये टिकवून त्यांची लेखने स्वत:च्या नांवावर प्रसिद्ध करुन घेणारे लेखकही पाहिले आहेत. तो त्यांचा पोट जाळण्याच्या कसरतीतुन निर्माण झालेला उपद्व्याप आहे असे एक वेळ म्हणत त्यांना क्षमाही करता येइल, पण जे स्वत:ला विचारवंत म्हणतात, मिरवतात, ज्यांना समाजाने भरभरुन सन्मान दिले आहेत, ज्यांना गमावण्यासारखे उतार वयात उरलेले नाही, असे विचारवंतही जेंव्हा दंभ-विकृत होतात तेंव्हा चिंता वाटणे स्वाभाविक आहे.
मी अशाच एका विचारवंताचा आजतागायत तीनदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. हे विचारवंत पुण्यात एकदा बालगंधर्वच्या एका कार्यक्रमाला तत्कालीन वादांमुळे उपस्थित राहिले नव्हते. त्यांना धमक्या आल्या असल्याचा कयास होता. मी फ़ेसबुकवर तेंव्हा सक्रीय होतो. मी ती आशंका व्यक्त केली तर त्यांच्याच (वरकरणी संघटनात्मक दुरावलेल्या) तरुण कार्यकर्त्याने माझ्यावर आगपाखड केली. त्यानंतर मला या विचारवंतांचा फोन आला व त्यांनी मला सांगितले कि काहीही असले तरी मला वाद नकोत, तेंव्हा कृपया फ़ेसबुकवरील तुमची विधाने मागे घ्या. मी त्यांचा एवढा आदर करत होतो कि मी ती विधाने डीलीट केली. प्रथमच मला माझी विधाने मागे घ्यावी लागली. त्याचा खेद नाही. त्यानंतर माझ्या एका मित्राने बौद्ध धर्म आणि त्यांची मते याबाबत एक लेख त्यांच्या ब्लोगवर प्रसिद्ध केला. त्यातील भाषा अश्लाघ्य असली तरी मी त्यांचा (माझ्या मित्राचा) निषेध का केला नाही म्हणुन माझ्यावर शाब्दिक हल्ले झाले. त्यांचा आविर्भाव असा होता कि जणु काही माझे मित्र माझे ऐकुन लिहितात...किंवा त्यांना जे गैरसोयीचे वाटते त्याचा मी निषेध केलाच पाहिजे. हे मला काय गुलाम समजतात कि काय? असो. या प्रकरणानंतर माझा या महनीय महाविचारवंतांबाबत भ्रमनिरास झाला तो झालाच. त्यांनीही नंतर सार्वजनिक जीवनात घ्यायच्या तेवढ्या वैचारिक कोलांटउड्या घ्यायच्या त्या घेतल्याच. म्हनजे एका नवीन धर्माशी आपला काही संबंध उरला नाही असेही ते जाहीरपणे म्हणालेच आणि पुन्हा त्या नवधर्मनिर्मितीच्या प्रक्रियेत सामील झाले ते झालेच. उच्चवर्णीय आणि बौद्ध धर्मीयांची नाळ जुळवण्याच्या राजकारणात ते अडकुन राहिले ते राहिलेच. त्याचे वेळी लोकायताचा आदर्शही ठेवत अजुन एका नव्या धर्माची संहिता लिहिण्याचा सन्मान त्यांनी मिळवायचा तो मिळवलाच.
हे आज लिहिण्याचे कारण म्हणजे माझे अजुन एका मित्रालाही आजच असा दंभ-दुष्टतेचा अनुभव आला. माझे मित्र त्यांना भेटायला गेले होते. चर्चेत अनेक विषय झाले. त्या चर्चेचा सारांश माझ्या मित्रांनी फ़ेसबुकवर प्रसिद्धही केला. त्यात काहीएक वावगे नव्हते. प्रसिद्ध माणसांचे जीवन हे "खाजगीपणाची" सीमा ओलांडुन बसलेले असते. पण खाजगी चर्चेतील आपल्या स्वीकृत्या आपल्या जाहीर प्रतिमेच्या विरोधात जाताहेत हे लक्षात येताच त्यांनी माझ्या मित्राला फोन करुन त्यांनी लिहिलेला मजकुर ४५ मिनिटांत उडवुन टाकायचा आदेश दिला. माझ्या मित्रासमोर दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी तो फ़ेसबुकवरुन उडवला. ही दहशतच आहे हे माझे स्पष्ट मत बनले आहे.
हे विचारवंत अत्यंत भावनीक, प्रगल्भ आणि संवेदनशील आहेत असा माझा समज होता. खरे तर मला त्यांच्याबद्दल अत्यादर एवढा होता कि माझे एक पुस्तक मी त्यांना विनम्रतापुर्वक अर्पणही केले होते. परंतु तुकारामांचा मोकला-ढाकळा विद्रोह त्यांच्या पचनी पडलेला दिसत नाही असे या व अशा अनेक अनुभवांवरुन म्हणावे लागत आहे. आपल्याच विचारांशी वारंवार प्रतारणा करणा-यांना मी विचारवंत मानुच शकत नाही. नव्या पुराव्यांच्या द्न्यानांच्या परिप्रेक्षात मते बदलतात हे मला मान्यच आहे पण मुलभुत मतेच ज्याची स्थिर नाहीत त्यांची मते ही कस्पटासमान असतात हेच काय ते खरे...अभ्यास कितीही असो. बुद्ध, तुकाराम, लोकायत तत्वद्न्यान या भुलथापा मारायच्या बाबी नव्हेत. त्या अत्यंत गंभीर आणि चिरंतन बाबी आहेत. त्यांवर विशिष्ट स्वार्थी द्रुष्टीकोन बाळगत लिहिणे हा त्या महनीयांवरील अन्याय आहे.
महाराष्ट्राची एकुणातच वैचारिक पीछेहाट होते आहे. त्याला जर स्वतंत्र प्रतिभेचे विचारवंत म्हनवनारे जर हातभार लावत असतील तर ती एक शोकांतिका आहे. खाजगीत एक आणि जाहीर दुसरे बोलणारे राजकारणी आम्हाला माहित आहेत. विचारवंतांकडुन तशी अपेक्षा नाही. जेही विचारधारा स्वीकारली आहे, ती न गोंधळता, कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, कसल्याही स्वार्थाचा, टीका-स्तुतीचा विचार न करता मांडत राहणे हे खरे श्रेय:स्कर आहे. अशांनाच मी विचारवंत मानतो, अन्यथा असे दंभ-विकृत विचारवंत जन्माला येतात जे कोणत्याही, अगदी त्यांच्याही समाजाच्या भल्याचे नसतात. माणसाचे विचार बदलु शकतात. पण त्या विचारपरिवर्तनाची अशीही एक दिशा असते...त्यामागे नवे चिंतन, नवे पुरावे वा नवा दृष्टीकोन असू शकतो. पण कोलांटउड्या घेत जे स्वत:चे शंकराचार्यपद निर्माण करु पाहतात ते कधीही टिकावू चिरंतन असे असू शकत नाही.