प्रा. हरी नरके संपादित "डा. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र" हा ब्रुहत्खंड मुळात शासनाचे प्रकाशन वाटत नाही एवढ्या देखण्या स्वरुपात प्रसिद्ध झाला आहे. अशा अभिजात चित्र-चरित्राच्या संपादनाबद्दल व प्रकाशनाबद्दल शासनाचे आणि संपादक प्रा. हरी नरके व त्यांच्या सहका-यांचे अभिनंदन करणे भाग आहे. त्याच बरोबर डा. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचीव प्रा. दत्ता भगत आणि तत्कालीन कार्यासन अधिकारी शुद्धोदन आहेर यांच्या योगदानाबदल त्यांचेही अभिनंदन केलेच पाहिजे एवढे उच्च दर्जाचे कार्य य ग्रंथरुपाने झाले आहे हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांना दिलेली एक अभिनव विनम्र मानवंदना आहे. उण्यापु-या अत्यंत दुर्मीळ अशा अडिचशे छायाचित्रांतुन व त्यासोबत दिलेल्या बाबासाहेबांच्या बहुमोल वचनांतुन एक विलक्षण असा जीवनपट उलगडणारा हा ग्रंथ म्हनजे सर्वांसाठी एक पर्वणीच आहे. आणि अवघ्या देशातुन इंग्रजी आवृत्तीला तर महाराष्ट्रातुन मराठी आवृत्तीला एवढा प्रतिसाद लाभला आहे, इतका कि प्रथम प्रकाशनानंतर ( १४ एप्रिल २०१०) या चित्रचरित्राच्या मराठी आवृत्तीच्या तीन हजार प्रती व इंग्रजी आवृत्तीच्या दोन हजार प्रती हातोहात संपल्या आहेत.
डा. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या शोषितांसाठी अविरत संघर्षरत राहणा-या, कालांधाराला आपल्या प्रज्ञासुर्याने दूर हटवत नवे आत्मभान देणा-या महामानवाचे समग्र साहित्य, त्यांची सर्व भाषणे, पत्रव्यवहार पुढच्या पिढ्यांसाठी एक चिरंतन दीपस्तंभ म्हणुन उपलब्ध करुन देणे हे अत्यंत आवश्यक असेच होते. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी डा. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीची १५ मार्च १९७६ मद्ध्ये स्थापना केली. "डा. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे" या शिर्षकाखाली क्रमा-क्रमाने अडचणींना तोंड देत अनेक खंड प्रकाशित होत राहिले. हे सर्व होत असतांना बाबासाहेबांचे चित्रमय चरित्रही प्रकाशित झाले पाहिजे या भावनेने शासनाने १९९५ साली त्यासाठी एक उपसमिती निर्माण केली. २००२ साली या समितीची धुरा महाराष्ट्रातील आघाडीचे विचारवंत प्रा, हरी नरकेंकडे आली. तत्पुर्वी बराचसा काळ हा छायाचित्रे मिळवण्यातच व्यतीत झाला होता.
यातील अनेक छायाचित्रे ही जुनी असल्याने फिक्कट झालेली, सुरकुत्या पडलेली वा पिवळट पडलेली अशी होती. अनेक छायाचित्रे तर प्रिंटवरुन रीप्रिंट मारलेली असल्याने छापण्यास योग्यच नव्हती. अशा स्थितीत हार न मानता चित्रमय चरित्राला अग्रक्रम देण्याचे ठरवत प्रा. नरके यांनी या अंधुक/खराब झालेल्या अथवा आकार वाढवला तर धुरकट होणा-या फोटोंना जणु अलिकडेच काढलेत असे वाटावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यायचे ठरवले.
डा. बाबासाहेब लेखन आणि भाषणे या ग्रंथमालिकेतील बाविसावा खंड म्हनजे हा "डा. बाबासाहेब आंबेडकर: चित्रमय चरित्र". या चित्रमय चरित्रातील प्रक्रिया करुन अत्यंत आधुनिक छपाई तंत्रज्ञानाने छापलेली बाबासाहेबांची छायाचित्रे पाहिली तर लक्षात येते कि बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील भव्यता, प्रगल्भता आणि तेजस्वीपणा प्रत्येक छायचित्रातुन ओथंबुन वाहतो आहे. बाबासाहेबांच्या माणुसकीचा, करुणेचा आणि समतेचा हा अक्षय्य झरा पानापानातुन ओसंडुन वाहतांना दिसतो...आणि प्रत्येक छायाचित्रासोबत बाबासाहेबांचे महत्वपुर्ण विचारही दिले असल्याने ग्रंथाची उंचीही वाढतांना दिसते. छायाचित्रांवर तांत्रिक संस्कार करणारे श्री. संजु हिंगे आणि चित्रमय चरित्रासाठीचे लेखन करणा-या संगिता पवार यांच्याही कार्याला या निमित्ताने दाद दिलीच पाहिजे. या सर्वांमुळे व प्रा. नरकेंच्या अहोरात्र कष्ट घेत केलेल्या साक्षेपी संपादनामुळे एक जागतीक दर्जाचा चित्रमय ग्रंथ प्रसिद्ध होवू शकला आहे.
बाबासाहेबांचे समग्र जीवन हा अथक संघर्षाचा एक प्रवास आहे. हा विलक्षण प्रवास छायाचित्रांच्या मदतीने क्रमा-क्रमाने उलगडला जातो. त्यांच्या जीवनातील विविधांगी प्रसंग छायाचित्रांच्या रुपाने उलगडत जातात. फार क्वचित त्यांना फुरसतीचे, हास्य-विनोदाचे क्षण लाभले आहेत. परंतु या ग्रंथात बाबासाहेबांच्या तब्बल १२ हस-या मुद्रा आहेत.हे या ग्रंथाचे अतुलनीय वैशिष्ट्य आहे. एवढी हास्यमुद्रा असणारी छायाचित्रे आजवर बाबासाहेबांवरील प्रसिद्ध झालेल्या कोनत्यही ग्रंथात नाहीत. प्रसन्नतेचा शिडकावा करणारे बाबासाहेबांचे हास्य पाहिले कि पाहणारा नकळत भावूक होवून जातो आणि त्या महामानवासमोर नतमस्तक होतो.
बाबासाहेब हे आजच्या-पुढच्या पिढ्यांसाठीचे अक्षय्य उर्जास्त्रोत आहेत. या ग्रंथमालेमुळे एक अनमोल ठेवा एकत्रीत संचित झाला आहे. प्रा. नरके यांनी बाबासाहेबांच्या या मालिकेतील अन्यही ग्रंथांचे संपादन केले असून तब्बल ९ ब्रुहत्खंड त्यांच्या कारकिर्दीत प्रकाशित झाले आहेत. राज्यभरातुन प्रा. नरकेंचे कौतुकच झाले आहे. बाबासाहेबांचे समग्र व्यक्तिमत्व पेलने हेच मुळात एक अशक्यप्राय कार्य. हितसंबंधियांचा अनवरत त्रास. शासकीय अडचणी...जागा-निधी इ. ची चणचण. अशाही स्थितीत मार्ग काढत हे जे एक अतुलनीय चित्रमय चरित्र प्रकाशित झाले आहे त्यासाठी प्रा. नरके अभिनंदनास पात्र आहेत.
प्रत्येक भारतीयाच्या संग्रही असायलाच हवे असे हे चित्रमय चरित्र. एवढेच नव्हे तर जगभरात या चित्रमय चरित्राचा प्रसार व्हायला हवा. या ग्रंथाची पुढील आवृत्ती प्रतीक्षीत आहे ती यासाठीच.
