भारतीय समाजाची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे पराभूत मानसिकता. भारतीय माणसाकडुन अपेक्षा तर खूप ठेवायच्या पण प्रत्यक्षात कोणी काही करत असेल तर त्याला नाके मुरडायची. भारतियाचे कोणतेही सिद्धांतन अथवा संशोधन उडवुनच लावायचे. अर्थात पाश्चात्यांनी त्यावर आपली मोहर उठवली तरच मग त्याला डोक्यावर घ्यायचे. लो. टिळकांचे गीतारहस्य हा मराठीतील आजवरचा जगाला आदर्शभुत होईल असा नीतिशास्त्रावरील ग्रंथ आहे याला आपलीच मान्यता नसते. गुलामगिरी हा म. फुलेंचा वैश्विक जाणीवा/वेदना प्रकट करनारा ग्रंथ विश्ववंद्य होण्याच्या योग्यतेचा आहे यावर आपलाच विश्वास नसतो. पहिली बाब म्हनजे आपल्या जानीवाच जातीय आहेत...आणि त्यातही पराभुत! आपणही वैश्विक ज्ञानात भर घालु शकतो याचे भान आपण हरपुन बसलोत. मग भारतीय वंशांचे विदेशी लोक काही करतात त्याबद्दल मात्र येथे भान हरपुन नाचत बसतो. ही आपली आत्मवंचना आहे याचे भान कधी येणार? साहित्य-संस्क्रुती, संशोधने, तत्वज्ञान अशा सृजनशील बाबींकडे तरी मोकळ्या दृष्टीकोनातुन पहावे कि नाही? पण जातीय दृष्टीकोनातुनच मूल्यमापन करायची, शक्यतो हेटाळायची आपली सवय या देशाचा एक दिवस विनाशच घडवणार याबाबत माझ्य मनात शंका नाही.
गुलाम केले म्हणुन लोक गुलाम होतात हा एक दुर्दैवी भाग झाला. पण ज्यांना गुलामच व्हायचे आहे त्यांचे काय करनार? प्रस्थापित सिद्धांतांना आव्हाने दिल्याखेरीज नवनिर्मिती कालत्रयी होवू शकत नाही. व्यक्तिपुजक नेहमी गुलामच राहतात. पुढे जायचा प्रवास हा अडथळ्यांचाच असतो. पण एक वाट तरी बनते...नवीन ताज्या दमाचे सिद्धांतक महामार्ग बनवतात. शास्त्र-विचार-तत्वज्ञानाचा भवितव्याचा प्रवास हा असाच होत असतो. पढतमूर्ख गुलाम मात्र त्यांतील सर्वात मोठे अडथळे असतात. स्वत:च्याच कोशात अहंसिद्ध भावनांच्या जंजाळात सापडलेले मानवी प्रगतीला सर्वात मोठे अभिशाप असतात!
मला वाईट याचे वाटते कि माझ्या इंग्रजी पुस्तकांवर पाश्चात्यांनी चांगले म्हटले तेंव्हा कोठे येथील काही लोकांना त्या पुस्तकांना किमान बरे म्हनावेसे वाटले. येथील समाजाची विवेकबुद्धी आधी कोठे गेली होती? माझ्या विश्वनिर्मितीच्या सिद्धांतावर कार्ल सागान सारख्या महान शास्त्रज्ञानेही टिप्पन्नी केली होती. पण येथे जयंत नारळीकरांना मात्र वाचुन पहायलाही वेळ नसतो...ते तसे लिहुन कळवतातही...येथे नोबेल विनर का होत नाहीत याचे उत्तर या दळभद्री मानसिकतेत आहे.
बदलता आले तर बघा. सिद्धांतांकडे निखळ सिद्धांत म्हणुन बघा आणि त्याचे निरपेक्ष मूल्यमापन करा. त्यातुनच् ज्ञान पुढे जावू शकते. आईन्स्टाईन यांना स्वत:चे अनेक सिद्धांत बाद ठरवावे लागले होते म्हणुन त्यांची योग्यता कोणीही कमी करु शकत नाही. शोधलेच नाही तर सापडेल कसे...किमान एवढा तरे विचार करायला हवा!
माझे आवाहन आहे...मूक्त मनाने आपल्या कल्पनांना मूक्त द्वार द्या...सिद्धांत बनवा...त्याला बळ देनारे होता होईल तेवढे पुरावे गोळा करा...मिळाले नाहीत पुरावे तर सिद्धांत बाद करा...पुढे जा....तुम्ही सोडुन दिलेल्या सिद्धांताचे पुरावे कोणालाही नंतर तरी मिळनार नाहीत असेही नाही. सिद्धांत अगदीच वाया जातो असे नाही. एखादी सिद्धता होतच नाही हे समजणेही ज्ञानाचेच लक्षण आहे. काही बिघडत नाही. ज्ञानाचा आनंद यच्चयावत विश्वातील सर्वोच्च आनंद आहे!