सध्या काही मंडळीला "मोदी" तापाने पछाडले आहे असे दिसते. लोकशाहीत कोणी कोनाला पछाडावे यावर बंधन असू शकत नाही. लोकशाही मार्गाने मोदी पंतप्रधान झाले तरी कोणाची हरकत असू शकत नाही. परंतू असे करण्यासाठी वा होण्यासाठी मोदी समर्थक हिंदुत्ववादी किती खालच्या स्तरावर जावू शकतात याची प्रचिती येते आहे. खालील मजकुर शैलजा शेवडे यांनी आर्कुटवर प्रसिद्ध केला होता. हा मजकुर जसाच्या तसा माझे मित्र डा. मधुसुदन चेरेकर यांनी फ़ेसबुकवर प्रसिद्ध केला व "मोदी लाओ..देश बचाओ" अशी उद्घोषणाही केली. हा मजकुर पहा:
"शैलजा शेवडे - Oct 17
धक्कादायक.....!
आताच शेजारी रहाणा-या सेकंड इयर बी.कॊम. ला असणा-या मुलीचं फाऊंडेशन या विषयावरचा पाठ्यपुस्तकातला एक धडा पाहिला. ह्युमन राईटस विषयावरचा. त्यात बहुसंख्यांक लोकांनी अल्पसंख्यांकावर केलेल्या अत्याचाराचे वर्णन आहे. त्यांनी लिहिलं आहे, की आसाममध्ये अल्पसंख्याक ख्रिश्चनांवर हिंदू अनन्वित अत्याचार करतात.. गुजताथमध्ये मुस्लिमांवर हिंदु अत्याचार करतात. अल्पसंख्याक स्त्रियांवर हिंदु बलात्कार करतात. गुजराथमध्ये हिंदुंनी मुसलमान स्त्रियांची अब्रु लुटली. मुसलमानांच्या मशिदी फोडल्या.
कुणाला कल्पना आहे, आपल्या मुलांना हे असले शिकवले जाते. आणि आपली मुलं घोकंपट्टी करून तसच्या तसं पेपरात लिहितात. तसचं समजतात.
पाठ्यपुस्तकात दिलेल्या असल्या विधानांबद्दल आपण काय करू शकतो? कुणाला जाब विचारावा?"
वरीलप्रमाणे जर खरेच अभ्यासक्रमात असते तर ते निषेधार्ह व निंदनीय ठरले असते व विधीवत मार्गाने निषेध करत शासनाला असा भाग वगळायला भाग पाडले गेले असते. खातरजमा करुन घेण्यासाठी मी प्रत्यक्ष या अभ्यासक्रमाच्या नोट्स व मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रम बारकाईने पाहिला. तो पाहता वरील मजकूर धादांत खोटा, दिशाभुल करनारा व अकारण तेढ वाढवनारा आहे हे स्पष्ट होते. प्रत्यक्षात "मानवाधिकार" भागात तृतीय सेमीस्टरला खालील भाग शिकवले जातात....
अनुसुचित जाती/जमाती, स्त्रीया, मुले व अल्पसंखंक अशा दुर्बल घटकांबाबत होवू शकणारी मानवाधिकार उल्लंघने व तत्संबंधीचे कायदे. यात गुजरात आसामबाबत शेवडे बाई म्हणतात तशी कसलीही उदाहरणे दिलेली नाहीत. हिंदूवर असले आरोप नाहीत. परंतु केवळ हिंदुंच्या भावना भडकावून हिंदुंची मते हिंदुत्ववाद्यांकडे खेचण्याचा हा निंदनीय प्रकार आहे. हे असले हिंदुत्ववादी हिंदू धर्मावरील कलंक आहेत. आम्ही अशा खोटारड्या हिंदुत्ववाद्यांना हिंदू का मानत नाही हे आता तरी स्पष्ट होईल!
चेरेकर साहेब माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी तरी शहानिशा केल्याखेरीज अशा गोष्टी प्रसारित करु नये ही त्यांना विनंती आहे.