Thursday, November 8, 2012

एक जग:एक राष्ट्र (२)


राष्ट्र-राज्यांचे ऐतिहासिक कार्य संपले आहे.....?

स्वातंत्र्य:समता:बंधुता या महनीय तत्वांची देणगी जगाला दिली ती फ्रेंचांनी. त्याला फ्रेंच राज्यक्रांतीची व प्रबोधनकाळाचीही पार्श्वभुमी होती. धर्मसत्ता आणि राजसत्तांतील युती व संघर्षही जगाने या काळात पाहिले. पोपने धर्मसत्ताच सर्वोपरी असून पोपचे आदेश न मानल्यास राजांनाही धर्मातुन काढुन टाकण्याचा अधिकार आहे असे दावे सुरु केले आणि संघर्ष सुरू झाला. त्यात पोपच्या पदासाठीच धर्मांतर्गत संघर्ष सुरु झाल्याने पोपही कमकुवत बनला याचा फायदा युरोपियन राज्यकर्त्यांने उचलला. याच काळात सरंजामदारांचेही वर्चस्व जवळपास जगभर वाढल्याचे आपल्याला दिसते. सरंजामदारांशिवाय राज्यही करता येत नाही पण त्यांचे वर्चस्वही हटवता येत नाही अशा पेचात तत्कालीन राज्यव्यवस्था सापडल्याचे आपल्याला दिसते. सरंजामशाहीमुळे राज्यसत्ता दुर्बळ ठरु लागल्याने औद्योगिकरण व व्यापार यामुळे धनाढ्य बनलेल्या वर्गाला प्रबळ राज्यसत्तेची गरज भासू लागली होती. सरंजामशाहीच्या तसेच अनियंत्रित राजेशाहीच्या तत्वांनाही छेद देईल असे नवे तत्व या वर्गाला हवे होते.

अशा वेळीस राष्ट्रवादाचे तत्व पुढे आणले गेले. एक वंश, एक प्रदेश, एक धर्म, समान इतिहास, परंपरा आणि हितसंबंध या मुलतत्वांवर प्राथमिक राष्ट्रवाद अस्तित्वात आला. मध्ययुगाच्या अखेरीस युरोपच्या वेगवेगळ्या प्रदेशांत वरील तत्वांना सुसंगत ठरेल अशी परिस्थितीही होती. प्रादेशिक निष्ठा महत्वाच्या बनल्यामुळे मातृभुमी...पितृभुमी या उदात्त दृष्टीने आपल्या भौगोलिक प्रदेशाकडे पाहिले जावू लागले. यातुन समाजाचे अंतरंग व बहिरंगही बदलू लागले. त्यामुळे राष्ट्रवादावर उभारलेली, पण इश्वरदत्त मानली गेलेली राजसत्ता राष्ट्रनिर्मिती करण्यात यशस्वी ठरली.

यातुन पुर्वी जी सातत्याने सीमा बदलत असनारी, प्रादेशिक अभिमानाचा विशेष जोर नसणारी व्यवस्था स्थिर होत विशिष्ट भौगोलिक सीमांतर्गतचे आपले भावनिक अधिष्ठाण असनारे राष्ट्र व त्याचा अनिवार अभिमान असा राष्ट्रवाद अस्तित्वात आला. पण सर्वच राष्ट्रे (युरोप) महत्वाकांक्षी असल्याने आंतरराष्ट्रीय कलहांचे रुप बदलले. आपापल्या राष्ट्रांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी संफ़्घर्ष सुरु झाला. त्यासाठी इतर राष्ट्रांचे हितसंबंध धोक्यात आले तरी चालतील ही भावना प्रबळ झाली. परस्परांत युद्धे वाढु लागली. त्यामुळे राष्ट्रभावनाही प्रबळ होत गेल्या. युद्धात हार झाली कि सामर्थवाढीचे उद्योग व पुन्हा सुडासाठी युद्धे असा क्रमच बनला. सत्ता संपादन, रक्षण आणि प्रादेशिक विस्तार ही राज्यांची प्रमूख वैशिष्ट्ये बनली.

यातुनच प्रजेचाही राज्यव्यवस्थेत वाटा असला पाहिजे या भावनेतून राजसत्तेचे एकहाती नियंत्रण कमी करत लोकशाहीची स्थापना अपरिहार्य वाटु लागली. शासन हे प्रजेचे प्रजेतर्फे चालवले जाणारे असावे कारण राजा नव्हे तर प्रजा सार्वभौम आहे या तत्वाचा प्रभाव वाढत होता. इंग्लंडमद्धे अशा रीतीने लोकशाहीची स्थापना झाली. लोकशाहीसोबतच राज-सत्ता, हुकुमशाही सत्ता, लष्करी सत्ताही काही राष्ट्रांत होत्या वा तशा सत्ता आनण्याचे प्रयत्नही सुरु होते. उदा. नेपोलियनने फ्रांसमद्धे लष्करी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.

हे सारे होत असले तरी म्हणुन साम्राज्यवाद संपला असे नव्हे. माणसाला मानवी स्वातंत्र्याबद्दल अजून खूप शिकायचे होते. आजही शिकला आहे असे नाही. सम्राटांचा साम्राज्यवाद जावून आता राष्ट्रांचा साम्राज्यवाद सुरु झाला. औद्योगिक क्रांतीमुळे वाढणारे उत्पादन विकण्यासाठी नव्या बाजारपेठांची गरज होती तसेच आपल्या देशाला लागणारी स्वस्त साधनसामुग्रीही स्वस्तात व सातत्याने मिळवण्याची गरज होती. त्यातुन वसाहतवाद पुढे झेपावला. आफ्रिका, आशिया, अमेरिकादि खंडांवर यूरोपियनांनी कब्जा मिळवत वसाहतवादी साम्राज्ये स्थापन केली. अमेरिकेने पहिले स्वातंत्र्ययुद्ध छेडुन स्वातंत्र्य मिळवले व एक नवीनच राष्ट्र संकल्पनेचा पाया घातला. त्याबाबत आपण पुढे चर्चा करणारच आहोत त्यामुळे येथे एवढेच.

पहिले महायुद्ध हे वर्चस्ववादाच्या भावनेने गाठलेल्या टोकाचे फळ होते. या युद्द्धानंतर स्वयंनिर्णयाच्या तत्वामुळे अनेक छोटे प्रदेश अस्मितेच्या बळावर राष्ट्र म्हणुन उदयाला आले. ही छोटी राष्ट्रे आर्थिक व लश्करी दृष्ट्या कमकुवत असल्याने यूरोपातील अंतर्गत संबंध तणावाचे बनू लागले. यातुन राष्ट्रवाद सौम्य न होता टोकाचा वाढत गेला. जर्मनीत नाझी तर इटलीत फ्यसिस्ट पक्षांची सरकारे केवळ अतिरेकी राष्ट्रवादाच्या परिणती होत्या. त्यात साम्यवादी सत्तांचाही उदय रशियाच्या रुपाने झाला होताच. शासनाची पद्धत कोणतीही अस्ली तरी राष्ट्रवाद हाच त्यांच्या तत्वज्ञानाचा मुलभुत गाभा होता. त्यातुनच विनाशक दुसरे महायुद्धही घडले. जगाचा नकाशा बदलला. आजवर जागतीक घडामोडींपासून अलिप्त असनारे "स्वतंत्र जग" अमेरिका या युद्धात पडले व त्यातुनच एक बलाढ्य जागतीक सत्ता
म्हणुन उदयाला आले. या युद्धातुन नवी राष्ट्रे निर्माण झाली. बव्हंशी स्वतंत्र होवून तर इस्राएलसारखी नवनिर्मिती म्हणुन.

हा सिलसिला पुढेही चालु राहिला. साम्यवादी जग विरुद्ध भांडवलशाहीवादी जग असा नवा संघ्र्ष सुरु झाला. त्यातुनहे अनेक राष्ट्रांचे विभाजन अथवा एकत्रीकरण करत अमेरिका व रशियाने जगाचा नकाशा स्थिर राहु न देण्याचा निर्धार केला. भारतानेही ७१च्या युद्धातुन बांगलादेशाची निर्मिती घडवली. पुढे सोव्हिएट रशियाही कोलमडला व पुन्हा अनेक राष्ट्रे स्वतंत्रपणे जगाच्या नकाशावर आली....

सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वतंत्र राष्ट्र म्हणुन उदयाला येण्याची आकांक्षा असणारे, त्यासाठी संघर्ष करणारे अनेक समाजगट जगात आजही आहेत. तज्ञ म्हनतात त्याप्रमाने प्रत्येक राज्य हे राष्ट्र राज्य आहे असे नाही व त्याशी सहमत व्हावे लागते. लष्करी अथवा पोलिसी बळावर अशी स्वातंत्रे नाकारली जातात. एका अर्थाने प्रत्येक राष्ट्र हे आपल्या राज्यात समतेचे व स्वातंत्र्याचे मूलतत्व पाळतेच असा दावा करता येत नाही.

या राष्ट्रांच्या इतिहासावरुन स्पष्ट दिसते कि ब-याचशा राष्ट्राची सीमा ती राष्ट्रे म्हणुन स्थापन झाली तेंव्हापासुन तशीच राहिली आहे असे म्हणता येत नाही. भारतानेही राष्ट्र म्हणुन असलेली सीमा स्थापनेपासून दोनदा गमावली आहे. विभाजनवादी संकल्पना बाळगणारे खलिस्तानवादी असोत कि काश्मिर असो...भारतात अस्तित्वात आहेतच. त्यासाठी त्यांचा संघर्षही सुरु आहेच. जगात अनेक ठिकाणी असे घडते आहे व जगाची शांतता अधुन-मधुन ढवळुन निघते आहे. व याचीच परिणती म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधात अविश्वासाचे व असुरक्षिततेचे वातावरण वाढत आहे...आणि लष्करी शक्ती हरप्रकारे वाढवण्याच्या प्रचंड स्पर्धेत सारीच मानवजात आज पडली आहे. यातून तिसरे महायुद्ध होईल कि काय अशी भिती वारंवार व्यक्त होत असते...ती भिती अनाठायी आहे असे म्हनता येत नाही. याचे कारण म्हणजे गेल्या शतकात धार्मिक मुलतत्ववादाचा उदय आणि त्याच वेळीस बलाढ्य राष्ट्रांचा लष्करी शक्तीमुळे उदयाला आलेला सर्वाधिकारीपणा. मानवी मूल्यांची व्याख्या बलाढ्यांनीच करणे हा पुरातन नियम आजही लागू होतो आहे. आखाती देशांत निर्माण केला गेलेला संघर्ष या वर्चस्वतावादाचीच अनेकांपैकी एक परिणती होती.

अशा स्थितीत आज "राष्ट्र" या संकल्पनेची अपरिहार्यता मुळात आहे काय यावर विचार करणे आवश्यक आहे. राष्ट्रवाद म्हणजे नेमके काय व तो कोठुन येतो आणि या संकल्पनेची मानव जातीला आज उपयुक्तता आहे काय हेही समजावून घेण्याची आवश्यकता आहे. "राष्ट्र-राज्यांचे ऐतिहासिक कार्य संपले आहे..." असे काही विचारवंतांना का वाटते तेही समजावुन घ्यायला हवे.

(क्रमश:)

एस.एस. रामदास: एक शोकांतिका

  एस . एस . रामदास : एक शोकांतिका - संजय सोनवणी               शेख सुलेमान इब्राहिमची आजची पहाट घरातल्या कटकटीनेच उगवली . त्याची मनोरुग...