Thursday, January 17, 2013

या मिथ्थकांच्या व्युहांतून कसे सुटायचे?


आपल्या भारतीय समाजाची मुलभूत समस्याच ही आहे कि आपल्याला सोयिस्कर मिथ्थकांत जगायला आवडते. सत्याचा सोस आपल्याला कमीच असतो. किंबहूना सत्य समोर ढळढळीत दिसत असले तरी त्याला नाकारत आपण आपल्या मनात जपलेली भ्रामक जळमटेच आपल्याला प्रेय वाटत असतात. सत्य नाकारण्याच्या प्रवृत्तीमुळे आपण मागे मागे जात आहोत याचे भान आपल्याला येत नाही ते यामुळेच!

आणि केवळ यामुळेच आपल्या सामाजिक समस्याही अवास्तव रूप धारण करत जातात आणि आपण त्याच सत्य मानून त्यांवर उत्तरे शोधायचा प्रयत्न करतो...असा प्रयत्न वांझोटाच राहणार याबद्दल शंका बाळगायचे कारण नाही. थोडक्यात आपण एक लाकडी तलवार घेवून जग जिंकायला निघालेल्या, ढगांना शत्रुची धाड मानत त्यावर आवेशाने तुटून पडणा-या डोन क्विक्झोटसारखेच बनलेलो असतो...कारण नेमकी समस्या कोठे आणि उपाय कोठे...

ज्यासाठी संघर्ष व्हावेत, विचारकलह व्हावेत आणि समस्यांकडे डोळे उघडून पाहत त्यावर उत्तरे प्रामाणिकपणे शोधावीत अशी वृत्ती मग कोठुन येणार?

आपले सामाजिक संघर्ष हे मित्थकांबद्दल अधिक आणि वास्तव समस्यांबाबत कमी होत जातात याचे कारण आपल्याच मानसिकतेत दडलेले आहे. आपण भुतकाळातील मिथ्थकांतच जगतो असे नव्हे तर आम्ही वर्तमानातही नवनवी मिथ्थके जन्माला घालत असतो आणि ती महासत्ये मानत चालत असतो. "पन्नास वर्षांतील भिषण दु:ष्काळ यंदा पडला आहे..." असे मिथ्थक चक्क कृषिमंत्री जन्माला घालतात आणि मिडियापासून सर्व शेतकरीही त्यावर विश्वास ठेवतांना दिसतात ते यामुळेच! जैतापुरच्या अणुवीजनिर्मिती केंद्रामुळे कोकणमधील आंबा संपुष्टात येईल, तापमान वाढेल अशी मिथ्थके या विज्ञानयुगात प्रकट केली जातात आणि त्यावरही लोक विश्वास ठेवतात आणि बालिश विरोधकांच्या झुंडी पैदा होतात. पुन्हा वर वीजटंचाईबद्दलही ओरडा करण्यात आपणच आघाडीवर असतो. माधवराव गाडगीळांचा अहवाल टेकेच्या भोव-यात सापडतो कारण म्हणे त्या अहवालाची जर अंमलबजावणी केली तर पर्यावरणाचा -हास होईल व कोकण-प्रगती साधली जाणार नाही. असो. आपण वर्तमानातही मिथ्थके निर्माण करण्यात कमी पडत नाही तर मग पुरातन मित्थ्कांबद्दल काय बोलावे?

आताच्या साहित्य संमेलनातील परशुरामाचे प्रतीक म्हणुन निवडल्या जाण्याच्या घटनेकडे जरा पाहुयात. चिपळुनपुर्वी रत्नागिरीत साहित्य संमेलन भरले होते, त्यात परशुरामाचे काहीएक स्थान नव्हते. चिपळुनकरांनी मात्र हिरीरीने परशुरामाला रेटत पुढे आणले. परशुराम हे एक मिथ्थक आहे व त्याच्याही दोन बाजू आहेत हे मात्र सोयिस्करपणे विसरले गेले. उदा. परशुरामाने मात्रुहत्या केल्याची पौराणिक कथा कशासाठी रचण्यात आली? पहिले कारण म्हणजे पितृआज्ञा कोणत्याही परिस्थितीत प्रश्नचिन्ह उभे न करता तंतोतंत पाळली पाहिजे हे तत्व ठसवण्यासाठी. त्यामुळेच या कथेत रेणुकेला पुन्हा जीवंतही केले जाते...(प्रत्यक्षात ते अशक्य आहे हे सर्वांना माहितच आहे.) म्हणजेच परशुरामाने मातृहत्या केली असल्याचा संभव नाही. दुसरी (अ)बोधकथा निर्मान करण्यासाठी...कि ब्राह्मण स्त्रीने कसल्याही स्थितीत परपुरुषाची, अगदी मनोमनही, कामना करु नये म्हणुन, रेणुकेने जलविहार करणा-या गंधर्वांची कामक्रीडा पाहिली व ती उत्तेजीत झाली, ही कथा निर्माण करुन रेणुकेच्या हत्येचा घाट घातला गेला. या कोणत्या ना कोणत्या प्रकारचा संदेश देण्यासाठी निर्माण केल्या गेलेल्या मिथ्थककथा आहेत हे भान सर्वांनी सोडले. या कथा देत असलेला सूप्त संदेश आधुनिक समाज कदापि मान्य करणार नाही हे उघड आहे, पण चिपळुनकरांना ते कसे समजणार?

राहिले परशुरामाच्या पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रीय करण्याचे मिथ्थक. हे मिथ्थक का निर्माण केले गेले? या मिथ्थकामागे वैदिक धर्माच्या वर्णव्यवस्थेच्या -हासाचे गौडबंगाल आहे. वैदिक धर्मानुसार वेदाधिकार तीन उच्चवर्णीयांना होता हे तथ्य सर्वांना माहितच आहे. या तीन वर्णांपैकी ब्राह्मण वगळता दोन वर्ण वैदिक धर्माच्या प्रभावापासून दूर झाल्याने आपसूक तेही अवैदिक बनले व वेदाधिकार, उपनयनादि बाबी त्यांनी टाकून दिल्या.  अशा रितीने ते अवैदिक बनले. या कालौघात घडलेल्या घटनेचे स्पष्टीकरण पृथ्वी नि:क्षत्रियत्वाच्या मिथ्थकथेत दिले गेले.

आणि त्यामुळेच वैदिक धर्मियांनी सरसकट सर्वांना वेदोक्त नाकारले आणि ते स्वाभाविकही होते...कारण उर्वरीत प्रजा वैदिक धर्माची अनुयायीच नव्हती.  शिवाजी महाराज ते शाहू महाराज यांना वेदोक्त नाकारण्यामागे ते वैदिक धर्माचे नव्हते हे खरे कारण होते...ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा यात काही संबंध नाही. उलट अवैदिकांनी वेदोक्ताचा आग्रह धरणे ही चूक होती, पण मध्यंतरीच्या काळात वैदिक धर्म हा स्वतंत्र धर्म आहे आणि त्याशी आपला तीळमात्रही संबंध नाही याची जाणीव समाजाला राहिली नाही. राहिला तो मिथ्थकथांचा पगडा.

चिपळुनकरांनी परशुरामाला याच वेळी प्रतीक म्हणुन का पुढे आणले? त्याचे कारण आपल्याला मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड, बामसेफ इ. काही संघटनांनी ब्राह्मणांविरुद्ध चालवलेल्या विखारी प्रचारात आहे हे तथ्य नाकारता येत नाही. "तुम्ही आक्रमक आहात तर आम्हीही आक्रमक प्रतीक निवडून इशारा देवू शकतो.." ही बाब परशुराम प्रतीकरुपातुन अधोरेखित केली गेली. विरोधी गटांना परशुराम शत्रु म्हणुन नाकारणे सहज गेले, कारण त्यांनीही मिथ्थकथेचा अन्वयार्थ समजावून घेतला नाही. म्हणजे एक मित्थकथा दोन्ही बाजुंनी आपापल्या सोयिनुसार वापरली गेली. म्हणजे वर्तमानातही पुरातन मिथ्थके सामाजिक संघर्षाला कसे अकारण बळ देतात हे आपण या एका उदाहरणातून पाहू शकतो.

थोडक्यात शिवाजी महाराज विष्णु अथवा शिवाचे अवतार होते, भवानी तलवार साक्षात देवीने त्यांना दिली, सावरकर मार्सेलिसला प्रचंड अंतर पोहून गेले, भारतीय संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती आहे वगैरे असंख्य मिथ्थकांत जगायला समाजाला आवडते. कोणाचेही वस्तुनिष्ठ समिक्षण करणे, चिकित्सा करणे अशक्यप्राय होवून जाते ते केवळ यामुळेच.

त्यामुळेच समाजात संधीचा फायदा घ्यायला टपलेले तयार होतात व आपापली सामाजिक वर्णी लावण्यासाठी अथवा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ते बंडाचे झेंडे फडकावू लागतात आणि स्वार्थ साधण्याची वेळ येताच प्रस्थापितांच्या झुंडीत सामील होतात. यात सत्य उरते कोठे?

उरतात पुन्हा नवी मिथ्थके.

थोडक्यात कोणत्याही वर्चस्ववादाविरुद्ध वा मिथ्थकांविरुद्ध म्हणुन आवाज उठवणारे लोक हे बंडखोर नसून राजकीय अथवा सामाजिक-प्रतिष्ठा-स्वार्थासाठी लढणारे कुचकामी योद्ध्ये आहेत. तसेच नकळत मिथ्थकांचा उपयोग वर्चस्वतावादासाठी करू पाहतात तेही याच मांदियाळीचे बरोबरीचे हस्तक असतात. त्यांचा त्यांना स्वत:लाही उपयोग नाही कि समाजालाही. आत्मभान व आत्मनिष्ठा नसणारे लोक प्रतीकांच्या विरोधात लढले काय आणि बाजुने लढले काय, समाजाला काय उपयोग? अशा लोकांपासून बव्हंशी लोक दुरच राहतात आणि त्यांचा आवाज आपण क्वचितच ऐकलेला असतो त्यामुळे त्यांच्या संवेदना आपल्यापर्यंत पोहोचतही नसतात. पण अशा ओरडत्या लोकांपुळे ते विचलित झालेले नसतात, गोंधळलेले व संभ्रमित होत नसतात असे मात्र मुळीच नाही. तेही मिथ्थकांच्या कोणत्या ना कोणत्या बाजुने प्रभावित असल्याने त्यांची भुमिकाही महत्वाची ठरतच असते.

मला अधिक काळजी वाटते ती या समाजबांधवांची ज्यांच्यावर हा नकळत अन्याय होत असतो. त्यांना ना मिथ्थकांचा समूळ अर्थ माहित असतो ना त्यांचे मानसिकतेवर होणारे परिणाम. यातुन गोंधळयुक्त समाजाची निर्मिती होत असते आणि ती विघातक आहे एवढे नक्की.

एकुणात वर्चस्ववादी अथवा त्याविरुद्ध आवाज उठवणारे "कंपू" एनकेन प्रकारेन सामान्यांना ठकवण्याच्याच मागे असतात. कारण कोणाहीमागे किमान स्वाकलनाधारित सत्यनिष्ठता नसते. स्वार्थ हाच त्यांच्या प्रत्येक कृतीचा पाया असतो. त्यामुळे बंडाचे नाटक करणे आणि मग "जितं मया" म्हणत वर्चस्वतावाद्यांच्याच मांडीला मांडी लावून जेवणावळीत घुसणे असे चालूच राहते. अशा परिस्थितीत निरपेक्ष लोकांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. त्यांच्यातही मतभेद असू शकतात...असावेत...पण त्या मतभेदांना किमान वास्तवदर्शी चेहरा तरी असेल. सामाजिक मतभेदांकडे ते पारदर्शी नजरेने पाहत उत्तरे शोधायचा प्रयत्न तरी करू शकतील. समाजाचा निरर्थक वाया जानारा वेळ वाचवू शकतील. ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे आणि यात प्रसिद्धी सन्मानाची शक्यताही नसते...शत्रुत्वाचीच शक्यता अधिक...पण मग त्याला इलाज नाही. असे लोक का अधिक नाहीत हा प्रश्न तसा आजच्या आत्मवंचनांनी लडबडलेल्या काळात तसा निरर्थक वाटला तरी पुन्हा पुन्हा तो विचारावा लागेल.

मित्थकांच्या बाबतीत संघर्ष तेंव्हाच होतो जेंव्हा दोन परस्परविरोधी मित्थके आमने-सामने आणली जातात. येतात. तात्विक पातळीवर मी परमेश्वर, धर्म मानत नाही. या विश्वात निरपेक्ष सत्य अस्तित्वात असुही शकत नाही असेही मी मानतो आणि मीच प्रतिपादित करतो. पण समाज-मानस मात्र नेमके याविरुद्ध असते आणि एवढेच नव्हे तर समाजघटक परत्वे ते बदलतेही असते. त्यामुळे संघर्ष अपरिहार्य होवून जातात. अशा स्थितीत व्यक्तीची भुमिका काय असावी? स्व-तत्वज्ञानात निमग्न रहावे कि या संघर्षांना विझवण्याचा प्रयत्न करावा? इतिहासाचे आपले आकलन मित्थकस्वरुपात आहे, स्वच्छ मनाने इतिहास स्वीकारायची तयारी क्वचित आढळते. धर्मांचेही तेच आहे. परमेश्वर/धर्म ई. हे सारे नाकारल्याखेरीज पुढे जाता येत नाही हेही तेवढेच सत्य आहे.

पण वाद निर्माण करणा-यांना त्याचे भान नसते. सांस्कृतिक वर्चस्वतावाद फक्त आपल्या समाजात आहे असे नाही, तर तो कोणत्या ना कोणत्या रुपात जगभर आढळतो. किंबहुना आजचे सर्वच प्रकारचे दहशतवाद हे सांस्कृतिक/धार्मिक वर्चस्वतावादातुनच उभे ठाकलेले आपल्याला दिसतात. कोणत्याही वादात मनुष्य जेवढा संवेदनशील असतो त्यापेक्षा तो धर्म/जाती/संस्कृतीबाबत अति-संवेदनशील असतो हे आपल्याला याच स्थळावर झालेल्या अनेक वादांतून लक्षात येईल. वर्चस्वतावाद्यांना त्यांनी जपलेल्या मित्थकांना आव्हान मिळेणे हे घोर संकट वाटते तर पिचल्या गेलेल्यांना अशा वर्चस्वतावादाचा तिटकारा वाटतो व मग तेही प्रति-वर्चस्वतावादाचा आधार घेतात. दहशतवादाला संपवण्यासाठी प्रति-दहशतवाद अस्तित्वात येतो, तसेच हे आहे. अशा स्थितीत अशा वास्तवांना नाकारत पुढे जाणे अशक्य नसले तरी सोपे रहात नाही. त्यांची दखल तर घ्यावीच लागते. समजा व्यक्तिगत पातळीवर इतिहास नाकारला/धर्म नाकारला आणि तरीही अशा व्यक्तीवर कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वर्चस्वतवाद लादू लागला तर मग अशी नाकारणारी व्यक्ति काय करेल? तिलाही अपरिहार्यपणे अशा वादात उतरावेच लागेल. तेंव्हा सर्व समाज निरपेक्षतेकडे न्यायचा असेल तर सर्वप्रथम या संघर्षांचे कंगोरे उध्वस्त करावेच लागतील!

म्हणजेच मिथ्थके उध्वस्त करत तथ्यांकडे व्यापकपणे पहायला शिकावे लागेल. असांस्कृतिकतेकडुन सांस्कृतिकतेकडचा प्रवास तसा सोपा नाही. धर्म/संस्कृती/इतिहास यातील पुरातन वैगुण्ये, तथ्यापर्यंत जाणारी सत्ये यांचा धांडोळा घ्यावाच लागेल. त्याशिवाय आजचा वास्तव वर्तमान कसा आहे आणि तो कसा आहे असे आपण भ्रामकपणे मानतो यातील भेद लक्षात येणार नाही. थोडक्यात वर्तमानातील जपलेली, मग ती पुरातन असोत कि आताची, आम्हाला तोडावी लागतील. त्याखेरीज आमची प्रगती होणे अशक्यप्राय आहे. त्यासाठी का होईना इतिहास/संस्कृती यातील मित्थके सर्वप्रथम हटवावी लागतील. आणि नवी नवी मिथ्थके बनवण्याचा अट्टाहास सोडावा लागेल.

मला जाणीव आहे कि तुम्ही सर्वांचे मित्र तोवरच असू शकता जोवर धर्म/जाती/संस्कृती व इतिहासाचा प्रश्न उद्भवत नाही. ज्याक्षणी असे प्रश्न उद्भवतात तेंव्हा तडकाफडकी शत्रुचे मित्र आणि मित्रांचे शत्रू होतात हा अनुभव कदाचित सर्वांनीच घेतला असेल. अतिसंवेदनशीलतेची, आणि म्हणुन अज्ञानाची ही अपरिहार्य लक्षणे आहेत! कारण आपली मनेच मुळात स्वप्रिय मिथ्थकांनी एवढी गजबजलेली आहेत कि सत्याकडे पाहण्याची दृष्टी आपण हरपून बसलो आहोत. ती परत कशी मिळवायची हा आपल्यासमोरील मुख्य प्रश्न असला पाहिजे!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...