पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय जवानांची निघृण हत्या करुन त्यांचा शिरच्छेद करण्याचे अमानुष, रानटी कृत्य केले, त्याबद्दल आज करिष्मा चौक, कर्वे रस्ता येथे आज सकाळी दहा वाजता महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठान आणि वसुंधरा मित्र परिवाराच्या वतीने धि:कार सभा आयोजित केली गेली होती. महात्मा गांधी, डा. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून लान्स नाईक हेमराज सिंग आणि लान्सनाईक सुधाकर सिंग यांना विनम्र श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली व पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
मी म्हणालो: पाकिस्तानचे अस्तित्व हे भारतालाच नव्हे तर जगाला घातक आहे. मध्ययुगीन रानटी कृती करणा-या देशाला कसलीही संस्कृती असू शकत नाही. पाकिस्तानचा निषेध जागतिक पातळीवर व्हायला हवा. या देशाशी युद्ध हे सर्व उपाय थकल्यानंतरचे अंतिम उत्तर असले तरी या देशाचे तीन तुकडे तरी केले गेलेच पाहिजेत तोवर देशात शांतता नांदणे व प्रगती होणे शक्य नाही. त्यासाठी असंतुष्ट पाकी प्रदेशांना योग्य ती रसद सरकारने कुटनीति वापरत पुरवलीच पाहिजे व अपेक्षित परिणाम साधला पाहिजे. एमायएमच्या ओवेसीने जे हिंसक व भडकावू वक्तव्य केले त्याबद्दल त्याला आयुष्यभरासाठी डांबून ठेवले पाहिजे. काळ्यापाण्याची शिक्षा अशा देशविघातक व हिंसक लोकांसाठी परत सुरु केली पाहिजे. त्याच्या पक्षावर बंदी घातली गेली पाहिजे. आधी हिंसा मानसिक पातळीवर अवतरते आणि ती संधी मिळाल्यावर कधी ना कधी प्रत्यक्ष कृतीत बदलते हे विसरता कामा नये. त्यामुळे प्रत्यक्ष कृती होण्याआधीच अशा विकृतांना जेरबंद केले पाहिजे. त्याच वेळीस एखाद्या जातीची कत्तल करु, त्यांच्या स्त्रीयांवर बलात्कार करू अशी अतिरेकी मते व्यक्त करणा-यांवर तसेच धार्मिक वर्चस्वतावाद गाजवणा-यांवरही तेवढीच कठोर कारवाई व्हायला पाहिजे. देशाचे नागरिक म्हणुन आम्हाला शांततेने राहण्याचा अधिकार आहे. तो आम्हालाच मिळवावा लागणार आहे. भेकड लोकच संघटना बांधतात...आणि झुंडीची अरेरावी सुरु करतात. आम्हाला अशा सर्वच देशविघातक संघटनांपासून सावध रहायला हवे.
वसुंधरा मित्र परिवाराचे अध्यक्ष धनंजय झुरंगे यांनी पाकिस्तान आणि ओवेसीवर प्रचंड हल्ला चढवला आणि त्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार श्री अरुण खोरे म्हणाले: सर्वत्र वाढणारी असहिष्णुता आणि क्रौर्याची मानसिक विकृती वाढत चालली असून ती आता कृतीतही बदलू लागली आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या या अमानवी क्रुतीचा निषेध केला गेलाच पाहिजे. त्याचवेळीस मुत्सद्दी पातळीवरून पाकिस्तानवर दडपण आणायला हवे. युद्ध हे या समस्येवरील उत्तर नाही. युद्धातून निर्माण होणा-या समस्या अधिक व्यापक असतात याचेही भान ठेवायला हवे. मी पाकिस्तानचा निषेध करतो आणि सरकार त्यांच्या कृतीबद्दल योग्य ती पावले उचलेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
पाकिस्तान व ओवेसीचा निषेध करण्यासाठी भगिनीवर्गही मोठ्या प्रमाणात आला होता.
शेवटी राष्ट्रगीत झाले व "भारत माता कि जय" च्या उत्स्फुर्त घोषणांनंतर धि:कार सभा विसर्जित करण्यात आली. या धि:कार सभेला ६०-७० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. गौतम कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आरेखन व संयोजन महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे सचीव श्री. प्रकाश खाडे यांनी केले.
मी सर्वांचा आभारी आहे.
(टीप: या धि:कार सभेला फेसबुकवरून टाईपरायटर बडवत देशप्रेमाचे उर बडवणारे अनेक मित्र वारंवारच्या आवाहनानंतर आणि अनेकांनी "येतो" असे जाहीरपणे सांगुनही काही तरी उगवतील अशी अपेक्षा होती...वारंवारच्या आवाहनानंतरही कवि संतोष देशपांडे आणि अभिराम दीक्षित वगळता कोणीही उगवले नाही. मी त्यांच्या राष्ट्रप्रेमाला शुभेच्छा देतो.)