मल्हाररावांनी जनकोजी शिंद्यांना दिलेला "धोतरबडवी सल्ला" इतिहासात फार गाजलेला आहे.
"सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचें चरित्र" या १८९३ साली प्रकाशित झालेल्या मुरलीधर मल्हार अत्रे लिखित ग्रंथाची नवी आवृत्ती १७ मार्च रोजी प्रकाशित होत आहे. सदर ग्रंथाला माझी प्रस्तावना असून त्यातील धोतरबडवी प्रकरणाबद्दल विश्लेशन करणारा हा काही अंश...
मल्हाररावांबाबतचा दुसरा आक्षेप म्हणजे मल्हाररावांचा जनकोजी व दत्ताजी शिंदे यांना दिलेला "धोतरबडवी सल्ला". हे प्रकरण जरा मुळातुन तपासून पाहिले पाहिजे. सर्वप्रथम ही बाब लक्षात घ्यायला हवी कि याबाबतची माहिती फक्त "भाउसाहेबांची बखर" मद्धे येते. जनकोजी व मल्हाररावांची भेट १० आगष्ट १७५८ रोजी राजपुतान्यात झाली. या भेटीचे बखरीतील वर्णन असे:
"...ते समयी जनकोजी शिंदे यांनी अर्ज केला कीं, "सुभेदार, तुम्ही आम्हांस वडील आहां, तुम्ही अटकेपावेतों मुलूख काबीज केला. आम्हास मोहिमेस असुदें (स्वतंत्र) कोणते?" तेंव्हा मल्हारराव यांनी उत्तर केले की, "तुम्हांस एक आहे. भागीरथीस पूल बांधुन अयोद्येवर जावे. सुजाउद्दौला यास तंबी पोंचवून पाहिजे ते रुपये मिळतील. रान असुदें आहे." जनकोजी यांनी उत्तर केलें की, "भागीरथीस पूल बांधने कसें घडेल?" तेंव्हा मल्हारराव यांनी सांगितले की, "नजीबखान रोहिला यास हाती धरून त्याचे हातून हे काम करुन घ्यावे." हे वचन ऐकतांच जनकोजी यांनी जाबसाल केला कीं, "नजीबखान रोहिला मात्रागमनी जन्मस्थानी लघुशंका करणार. गाजुदीखान याचे येथें वाढला त्याचें सार्थक केलें ! हें तुम्ही जाणतच आहां. त्यांत कार्यातुर होऊन काळावर नजर द्यावी तरी खावंदांचा द्रोहीं. त्यांनी आम्हांस मोहीम नजीबखान याजवरील नेमून दिली आहे, असें असता हें कर्म केलीयास श्रेष्ठ स्वामीद्रोही व्हावें. त्यांत आम्हांकडे केवळ शिलेदारी कर्म नाहीं. आम्ही सरकारचे पागेचे बारगीर असें आहे. आम्हांकडून हा विचार घडू नये. " असें म्हणताच मल्हारराव यांनी उत्तर केलें की, " बाबा, तुमचा मुल स्वभाव. अटकेपासून रामेश्वरपर्यंत एकछत्री राज्य जाहाले. हिंदुस्थानात एक नजीबखान मात्र मूळ राहीले आहे. त्याचे पारिपत्य केलिया पेशवे अटकेपासून जासुदा हातून पैसा आणवतील. मग तुम्ही आम्ही सहजच निर्माल्यवत जाहलों. मग कोणी पुसणार नाहीं. यास्तव एवढे खूळ रक्षून जें करणे तें करावें."
आता हीच बखर पुढे काय सांगते हे पाहुयात. जनकोजीनंतर मल्हारराव व दत्ताजीची भेट उज्जैन येथे झाली. या भेटीचा बखरीतील हा वृत्तांत:
'..................उपरांतिक दत्ताजी शिंदे यांनी मल्हारराव यांस प्रश्न केला कीं, " सुभेदार तुम्ही अटकेपावेतो मुलुख काबीज केला. आतां आम्हांस मोहिमेस असूदे रान कोणते आहे ?" तेव्हां मल्हारराव यांनी सांगितले कीं, " यावीशी सूचना जनकोजी शिंदे यांस सांगितली आहे आणि तुम्हांसही सांगतो कीं, नजीबखान रोहिला यास हाती धरून भागीरथीस पूल बांधोन पुलापलीकडे अयोध्या व ढाका व बंगाला व काऊर देश पावेतो मोहीम करावी. रानही असूदे आहे. पैसा पाहिजे तितका मिळेल. आणि सुजाउद्दौला यांस तंबी पोंचवून भागीरथी पलीकडील अर्धा मुलुख घ्यावा. त्यांत दहा - पांच किल्ले भारी असतील त्यांत ठाणी घालावी. म्हणजे चित्तास येईल तेव्हां श्वेतबंधासारिखे ( सेतूबंध ) जावयास यावयास येईल. हें न करिता तुम्ही नजीबखान याचे पारिपत्य कराल. तर तुम्हांस पेशवे धोत्रे बडवावयास लावतील. "
सरदार विंचुरकरांशीही दत्ताजीचा वरीलप्रमाणेच संवाद झाला असेसुद्धा ही बखर सांगते.
आता जनकोजी व दत्ताजीशी झालेल्या संवादात किरकोळ फरक सोडले तर आशय एकच आहे. या संवादावरुन पेशवे आणि होळकरांत संशयाचे वातावरण होते असे नि:ष्कर्ष इतिहासकार अत्यंत आनंदाने काढतात व होळकरांच्या स्वार्थबुद्धीपायी दत्ताजी शुक्रतालावर अडकला आणि बळी गेला असेही म्हणतात.
निर्माण होणारे प्रश्न असे कि, उत्तरेत हयात घालवलेले दत्ताजी व जनकोजी एवढे मुर्ख होते काय कि स्वतंत्र मोहीम कोठे करावी हे त्यांना समजत नव्हते? परत वर एकीकडे हेच इतिहासकार सांगतात कि शिंदे व होळकरांत बेबनाव होता. मग याच इतिहासकारांना हा प्रश्न पडला नाही काय कि दत्ताजी व जनकोजी होळकरांचा सल्ला ऐकून कसे कोनतीही स्वतंत्र मोहीम ठरवतील? आणि एकाच आशयाच्या चर्चा जनकोजी, दत्ताजीशी कशा होतील? मग विंचुरकरांनीही तसाच सल्ला दिला असेही ही बखर म्हणते...त्यांचे काय? थोडक्यात ही "धोतरबडवी" मसलत साफ बनावट आहे. ती मल्हाररावांचा, विंचुरकरांचा व शिंदेंचाही साफ अवमान करणारी आहे.
खरे तर भाऊची बखर किती अविश्वासार्ह आहे हेच यातून साबीत होते. पानीपत युद्धानंतर सर्व पापे मल्हाररावांच्या माथी मारून टाकायच्या कटाचा हा भाग दिसतो. यावरुन धोतर बडवी मसलत बनावट आहे हे तर सिद्ध होतेच.
मग शिंदेंनी सुजावरची मोहीम हाती का घेतली?
या प्रकरणाचा खरा सुत्रधार आहे नानासाहेब पेशवा. पेशव्याने अटखस्वारीच्या दरम्यान दादासाहेबास पत्र लिहिले कि, "तुम्ही आहा तेथे पैसा मिळण्यास जागा राहिलेली नाही, सबब बाजदबरसात पूर्वेकडे जावून पटणे प्रांत जरुर घ्यावा."
नानासाहेब पेशव्यांनी २ मे १७५९ रोजी दत्ताजीला पाठवलेल्या पत्रात दिलेला आदेश पहा: "... कदाचित तो करारात वाकडा वर्तत असला तर मात्र मातबर लाभ पुर्ता दृष्टीस पडला तरच सुजातद्दवलास हाती धरावे. परंतु काशी, प्रयाग हरतजविजेने साधावी. विशेष काय लिहिणे. कर्जाची चिंता दतबास असेलच. जाणिजे. लेखनसीमा." ( संदर्भ :- मराठ्यांचा इतिहास : साधन परिचय = संपादक - अ.रा.कुलकर्णी )
राघोबादादा शहाणे होते, त्यांनी पेशव्याचे ऐकले नाही. ते पुण्याला निघून आले. पण दत्ताजी शिंदेंना मात्र सरकारच्या कर्जनिवारणाची चिंता होती, म्हणुन पुर्वेकडील कामगिरी त्यांनी पेशव्यांच्या इच्छेनुसार स्वीकारली. याशी मल्हाररावांचा काय संबंध?
दुसरे म्हणजे शुक्रताल येथे दत्ताजी शिंदे अडकून पडला असता मल्हाररावांनी तुकोजी होळकरांना सैन्यासह त्याच्या दिमतीला पाठवलेले होतेच. त्यामुळे होळकरांचा सल्ला ऐकून दत्ताजी फसला आणि त्याने पुर्वेकडची कामगिरी हाती घेतली म्हणुन त्याचा मृत्यू ओढवला या आरोपात काहीएक तथ्य नसल्याचे दिसून येईल.
Also read:
http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_20.html
http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_20.html