धर्मांचा तत्वज्ञानाच्या आधारे विचार करणे वेगळे व समाजव्यवस्थेच्या अंगाने विचार करणे वेगळे. चातुर्वर्ण्य ही वैदिक धर्माची निर्मिती आहे. त्रैवर्णिक हे वेदाधिकारी असल्याने ते वैदिक धर्मीय असले तरी शुद्रांना धर्मबाह्य समजघटक असल्याने वैदिक अधिकार न देणे साहजिक होते. जे शुद्रांच्याही निर्माणकार्याच्या बाहेरचे वर्ग होते व ज्यांच्याशी वैदिक धर्मियांचा सांस्कृतिक/सामाजिक जीवनात विशेष संबंधही येत नव्हता त्यांना त्यांनी अस्पृश्य मानणेही साहजिक होते. शुद्रांना व अतिशुद्रांना वेदांशी देणेघेणेही नव्हते कारण त्यांच्या धार्मिक कल्पना स्वतंत्र होत्या. त्यांची दैवते भिन्न होती. कलौघात दुस-या शतकापासून राजकीय परिस्थितीमुळे जसे यज्ञ जवळपास थांबले वैदिकांना अवैदिक दैवतांचीही पौरोहित्ये स्वीकारावी लागली. असे करण्यासाठे त्यांनी सहाव्या शतकापासून एक प्रचंड उद्योग पुराणांमार्फत सुरू केला तो हा कि अवैदिक दैवतंचा धागा बादरायणी संबंध जोडत त्यांची पूजा वैदिकांनी करण्यात काही गैर नाही असे दर्शवायला सुरुवात केली. विष्णु ही ऋग्वेदातील दुय्यम देवता त्यांच्या कामी आली. शिवादि देवता तुलनेने अर्थप्राप्तीसाठी फारशा उपयुक्त नव्हत्या त्यामुळे विष्णुमाहात्म्य वाढवणे व त्याचेही मुर्तीकरण करणे आवश्यक बनले. जेथे अशक्य झाले तेथे शैवस्थाने बळकावून त्यांचे वैष्णवीकरण करण्याचा उद्योग सुरु झाला. उदा. पंढरपुर व तिरुपती बालाजी. पुरीसारखे स्थान तर बौद्धांकडुन बळकावले. ज्यांना हे जमले नाही ते शिवाला रुद्र मानत शिवाशी चिकटुन राहिले. पुर्वास्प्रुष्यांना मंदिरबंदी ही बव्हंशी वैष्णव स्थानांपुरतीच होती हाही इतिहास येथे लक्षात घ्यायला हवा. पौरोहित्यामुळे वैदिकांनी कुलदैवत ही संकल्पना शैवांकडुन उचलली. वैदिक धर्मात कुलदेवता नसते तर गोत्र असते. वैदिकांनी आपल्या धर्माची स्मृती म्हणुन गोत्र कायम ठेवली. वैदिक सम्स्कार व वैदिक अधिकार कायम ठेवले. वैदिक धर्मात क्षत्रीय व वैश्य उरलेलेच नसल्याने कलियुगात क्षत्रीय व वैश्य नाहीत (कलावाद्यंतयो स्थिती) असे सांगायला सुरुवात केली. यानेही अवैसिक समाजाला फरक पडत नसल्याने त्यांच्या द्रुष्टीने शुद्र असलेले सातवाहन ते यादव राजे बनतच राहिले व प्रदीर्घ काळ सत्ताही चालवल्या.
परंतू वैदिकतेशी त्या धर्माशी आपला संबंध नाही हे भान मध्ययुगात सर्वांचेच सुटले. त्याला सातत्याने येणारे दु:ष्काळ (सन १००० ते १६३० पर्यंत अडिचशे मोठे दुष्काळ भारतभर पडले.) त्यात इस्लामी राजवटीने सर्वच समाजाचे आत्मभान घालवले. जातीसंस्था जी पुरती सैल होती ती घट्ट बनली, बंदिस्त्व बनली आणि चातुर्वर्ण्यातील आपण तळचे व आपल्यापेक्षाही तळचे समाज आहेत असा गैरसमज उत्पन्न होत गेला. वा. सी. बेंद्र्यांनी Coronation of Shivaji the Great या ग्रंथात तत्कालीन समाजस्थिती व धर्मकल्पनांचे अत्यंत वास्तवदर्शी चित्रण केले आहे. चातुर्वर्ण्याची वैदिक संकल्पना समाजमनात कशी रुजली होती त्याचे विकराळ दर्शन आपल्याला घडते.
आता ही संकल्पना आपली नाही, आपल्या धर्माची नाही हे जर एवढे स्पष्ट असेल तर ती ज्या वैदिक धर्माची आहे ती त्यांची त्यांना परत देऊन स्वत:ला क्षत्रीय/वैश्य (जे त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नाहीत) शुद्र-अतिशुद्रादि संबोधत विषमतेचे पाप करू नये. सर्व शैव होते व आहेत. वैदिक शैव बनले असतील तर ते कसे हे मी वर सांगितलेच आहे!
-संजय सोनवणी