राष्ट्रांच्या व्याख्येपारही
असते एक राष्ट्र
जे मनात नसले
ध्यानात नसले
जगण्यात नसले
तरीही असते एक राष्ट्र...
वागवत असते ते खुणा
व्यभिचारी लांडग्यांच्या
बलात्कारी पाऊलखुणा
ओरबाडल्या गेलेल्या
शरीराच्या जखमा
स्वत:च सोसत...
अंधारी मनांतून उफाळनारे
सूस्त आणि शांत उद्रेक
सुन्नपणे ऐकत...
वेदना गिळत
निमुटपणे
असेही असते एक राष्ट्र...
ते राष्ट्र मानली जाते मालकी
कोणा-ना-कोण्या वाद्याची
कधी हिंदुत्ववाद्यांची तर कधी
निरपेक्षतावाद्यांची
कधी अल्ला हो अकबरवाल्यांची
तर कधी कम्युनिस्टांची
कधी या वाद्यांच्या तर कधी त्या वाद्यांच्या
मालकीच्या अविरत गोंधळात
हरवलेले
आणि आपल्याच पुत्रांकडुन बलात्कारीत
नितनियमाने होणारे
असेही असते एक राष्ट्र...
हे राष्ट्र कोणत्याही व्याख्येत कसे बसेल?
हे राष्ट्र "राष्ट्रवाद्यां"च्या
इवल्या संकुचित डबक्यात
कसे मावेल?
राष्ट्राला विचाराल कधी...
तुझे देणे फेडणे
आहे तरी
बाकी किती?
असेही राष्ट्र असते एक
जिला प्रजा नांवाची गोष्टच नसते...
प्रजेशिवायचे राष्ट्र
अशीच तर व्याख्या जर आमची तर
राष्ट्र एकाकी
राष्ट्र एकाकी...!
असेही आहे एक राष्ट्र...
एकाकी आणि फक्त एकाकी...
जेथे आम्ही
बिनभाड्याचे अनंत काळ राहतोय
आणि तेही केवढ्या
निर्लज्जपणे बरे?
