Thursday, May 2, 2013

सरबजितसिंगचा मृत्यू...





सरबजितसिंगचा मृत्यू दुर्दैवी आहे. याबद्दल आपण खेद व्यक्त केलाच पाहिजे. याहीपेक्षा मोठा खेद याचा असला पाहिजे कि भारत सरकार, विशेषत: RAW  सारखे गुप्तहेर खाते "आपल्या" माणसांना विदेशात संरक्षण देण्यात अपयशी ठरत असते. सरबजितसिंग हेर नव्हता हा भारताचा दावा स्वाभाविक आहे. भारत देश कधी काळी अन्य देशात हेर पाठवून घातपाती वा गुप्त माहिती मिळविण्यासाठी कारवाया करु शकतो यावर भारतियांचाच विश्वास नाही. पण तसे वास्तव नसते हे आमच्या भाबड्यांनी समजावून घ्यायला हवे.

मी आजवर ४५-४६ आंतरराष्ट्रीय थरारकथा लिहित्ल्या आहेत. पाकिस्तानच्या संदर्भातील किमान तीन तरे मला याक्षणीच आठवतात. "अंतिम युद्ध" असो कि "War Time", यांत मी भारत सरकार हेर पाठवते खरे पण त्यांना संरक्षण देण्यात कुचकामी ठरते याचे कारण म्हणजे भारताच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय भुमिका हे कारण दिले होते व त्यामुळे भारतीय हेरांची ससेहोलपट कशी होते हे त्यातुन दाखवले होते. आणि त्या काल्पनिकांनाही वास्तवाचा आधार होता. सरबजितप्रकरणाने ते २० वर्षांनंतर पुन्हा अधोरेखित केले एवढेच!

सरबजित दारुच्या नशेत वाट चुकला, सीमा ओलांडली आणि पकडला गेला व त्याच्यावर लाहोर आणि फैसलाबादच्या विस्फोटमालिकांमद्धे हात असल्याचा आरोप ठेवत त्याला सरळ एका वर्षाच्या आत फाशीची शिक्षा ठोठावली गेली हा सरबजितसिंगवर आणि म्हणुन भारतीय नागरिकांवर अन्याय आहे हे म्हणणे भारतियांसाठी योग्यच आहे. मनजितसिंगलाच सरबजितसिंग समजून मिस्टकन आयडेंटिटी घडुन येवून सरबजितसिंगलाच फाशी मिळाली असा दावाही भावनिकतेला धरून आहे. पण मग त्या कथित "मनजितसिंग"चे काय झाले, तो कोण होता, तो कधीच का पकडला गेला नाही, आणि मग आता तो कोठे आहे हे प्रश्न आम्हाला न पडणे स्वाभाविक असेच आहे.

आम्हाला आतंरराष्ट्रीय हेरविश्व कसे चालते, Infiltrators कसे घुसवले जातात, बोगस व्यक्तित्वे कशी आकारास आणली जातात, सेक्स, दाम, दबाव कसे उच्चपदस्थांवर राबवले जातात याची कल्पनाही नसते. भारतात अशा अनेक घटना उजेडात येत असतात.पाकिस्तानचे भारतातील हेर म्हणुन भलेभले अडकलेले असल्याचे दिसते. पाकिस्तानला तेवढी अक्कल आहे आणि भारताला (आणि म्हणुन भारतियांना) मुळातच नाही असे समजण्याचे कारण काय आहे?

पण भारत कमी पडतो तो येथे कि आपल्या हेरांना संरक्षण देण्यात तो अपेशी ठरतो. हेर उजेडात आला कि कानावर हात ठेवतो. त्याच्या सुटकांच्या ज्या पर्यायी व्यवस्था असायला हव्यात त्याचा पुरता अभाव असतो. राजकीय पातळीवर तर बोलायलाच नको. असे असतांनाही सरबजितची फाशी जवळपास २२ वर्ष लांबली हे पाकिस्तानी कायदे पाहता भारताचे एक यशच मानावे लागेल. अफजलला फाशीला उशीर होतो म्हणुन गळे काढणा-या भारतियांनी ही एक तुलना करुन पहावी.

सरबजितसिंगला फाशी देणे अशक्यप्राय आहे एवढा दबाव असल्याने पाकिस्तानने काढलेली सोपी युक्ती म्हणजे कैद्यांकरवीच खुनी हल्ला चढवणे. खरे तर फाशीची शिक्षा झालेले कैदी अत्यंत स्वतंत्र अशा विभागात ठेवले जातात. तेथे दुस-याला मारणे सोडा स्वत:लाही मारता येणार नाही अशी व्यवस्था असते. थोडक्यात तेथे कसल्याही प्रकारचे विघातक हत्यार वा हत्यार म्हणुन वापरता येईल अशी वस्तू उपलब्ध असू शकत नाही.

 तरीही सरबजितवर खुनी हल्ला झाला हे वास्तव आहे. त्या हल्ल्यानंतर सरबजित तरीही काही दिवस मृत्युशी संघर्ष करत जीवित राहिला हे त्याचे नशीबच म्हणायला हवे. परंतू पाकिस्तान सरकारने हा खुन होवू दिला हेही एक वास्तव आहे. सरबजितसिंग हेर होता कि नव्हता? हेर आहे हे कोणाला कळने हे हेराचे सर्वात मोठे अपयश असते. सरबजितसिंग निर्विवादपणे भारताचा हस्तक अथवा हेर होता हे सरबजितसिंगच्या जबान्यांतून बाहेर आलेले नाही, याचा अर्थ हा तरुण देशप्रेमी होता हे निर्विवादपणे म्हणता येईल.  अफजलबाबत वा कसाबबाबत पाकिस्तानीही असेच म्हणत असतील हेही वास्तव आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपला हिरो हा दुस-या देशाचा व्हिलन असतो. राष्ट्रांतील संघर्षात देशप्रेमींची आहूती पडणे क्रमप्राप्त असते एवढेच काय ते वास्तव उरते. खरोखर सागरी सीमाभंग करणारे कोळी अथवा भरकटुन चुकुन शत्रूसीमांत घुसलेले शेतकरी अथवा पशुपालक सरबजितसिंगाचे विधिलिखित भाळी वागवत नसतात.

माझा प्रश्न हा आहे कि आपल्या "माणसां"ना संरक्षण देण्यात आपली हेरसंस्था कमी पडते कि नाही? याचे उत्तर होय असेच आहे. सरबजितसिंगच्या वकीलांनी ज्या भुमिका बदलल्या अथवा वकील्याही सोडल्या तेंव्हा हेरखात्याने सर्व शक्ती पणाला लावून किमान विधीसेवा पुरवायला हव्या होत्या...पण तेही झाले नाही. याचे कारण भारताच्या जागतिकीकरणानंतर बदललेल्या आंतरराष्ट्रीय भुमिकांतही आहे हेही वास्तव पहावे लागणार आहे. सरबजितसिंगची पाकिस्तानी सीमारक्षकदलांकडुन झालेली अटक १९९० सालची आहे. त्यानंतर बदललेली भारतीय राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था यांचीही सांगड घालता येवू शकते.


सरबजितसिंग हा पक्का भारतीय होता. आम्हा कच्च्यांपेक्षा खुपच श्रेष्ठ होता. त्याचा खुन करण्यात आला आहे हे वास्तव लक्षात घ्यायला पाहिजे. खुन्यांना अटक केली आहे...पण त्यांना खरेच शिक्षा होणार आहे काय? त्याचे उत्तर संशयास्पद आहे. सरबजितच्या मृत्युसोबतच आम्ही कच्चे भारतीय आगपाखड करुन मोकळे झालेले असू आणि नंतरचे काय त्याचा पाठपुरावा करायला विसरलेले असू.



अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...