
सोशल एज्युकेशन मुव्हमेंटतर्फे आज एकदिवसीय भारतीय शिक्षण संगितीचे आयोजन करण्यात आले होते. या संगितीचे बीजभाषण मी दिले व त्यानंतर दिवसभर प्रचलित शिक्षणपद्धती व त्यातील गुणावगुणांची व समस्यांची चर्चा झाली. या संगितीत महाराष्ट्रभरातून ३२ शिक्षणतज्ञ व विचारवंत निमंत्रीत होते. माझ्या बीजभाषणातील खालील काही संक्षिप्त मुद्दे:
१. आजची शिक्षणपद्धती ही पाठांतराधारीत असून त्यात आकलनाधारीत कलप्रधानता नाही. विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक प्रतिभेला वाव देण्यासारखे तीत काहीही नाही. हुशार आणि ढ या अवैज्ञानिक संकल्पनाना वाव देणारी ही पद्धती भावी नागरिकांच्या ज्ञानपुर्ण घडणीत सर्वात मोठा अडथळा आहे. स्वतंत्र प्रतिभेचे तज्ञ घडविण्याऐवजी नोक-या मागणा-यांचे हात वाढवणारी ही शिक्षण पद्धती असून ती नाकारली पाहिजे.
२. शिक्षण हे विद्यार्थ्याला ज्ञानार्थी आणि आधुनिक बनवण्यासाठी असले पाहिजे. आधुनिक साधने असणे आणि आधुनिक अग्रगामी विचारसरणी यातील फरक लक्षात घेतला तर आजची शिक्षनपद्धती ही माणसाला आधुनिक करत नसुन जातीयवादी, प्रांतवादी, भाषावादी, परंपरावादी बनविण्यातच अग्रेसर आहे. आधुनिक विचारांच्या अभावात दिले जानारे शिक्षण कुचकामी असून भारताचा ज्ञानात्मक विकास तीमुळे होत नाही. त्यामुळे प्रचलित शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम आणि परिक्षापद्धती यात आमुलाग्र बदल घडवून आणावा लागेल.
३. शिक्षणपद्धतीत मूल्यशिक्षणाच्या अभावामुळे गेल्या दोन-तीन पिढ्यांपासून भ्रष्ट मानसिकता/अनैतिकता यांचा विस्फोट झाला आहे. मूल्यशिक्षण शिक्षणपद्धतीत अनिवार्य केले पाहिजे. शिक्षण हे मातृभाषेतच असायला हवे.
४. शिक्षिताची एकुणातील उत्पादकता (म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जाणा-या शिक्षिताची आकलनक्षमता, निर्णयक्षमता आणि प्रत्यक्ष कार्य यातील काळ-काम-वेग यात गुणात्मक वाढ) वाढली पाहिजे...परंतू ती तशी न होता घटत चालली आहे.
५. आम्ही कोणत्याही क्षेत्रात जागतीक पातळीवर दखल घेतले जाईल असे ज्ञान निर्माण न करू शकण्याचे कारण म्हणजे आम्ही मुळात शिक्षणपद्धतीच्या माध्यमातुनच ज्ञाननिर्मितीच्या क्षमता मारून टाकत आलो आहोत व ती पद्धत बदलली नाही तर पुढेही करत जाणार आहोत. ज्या विषयांत रुची नाही त्या विषयांचे मार्क आणि ज्या विषयात रुची आहे त्या विषयातील मार्क सब घोडे बारा टक्के या घाऊकतेने घेतले जात असल्याने आवडीच्या विषयांसाठी अधिक वेळ देता येणे, त्यातील तज्ञता मिळवणे शक्य होत नाही आणि येथेच विद्यार्थ्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा खून पडतो.
६. शिक्षणपद्धतीचा उपयोग सरकारे तसेच विशिष्ट विचारांचे समर्थक आपापल्या विचारांची बौद्धिके विद्यार्थ्यांवर थोपण्यासाठी करीत असतात. सत्ता बदलल्या कि अभ्यासक्रमांत ढवळाढवळी केल्या जात असतात. शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे व ती तशीच राहिली पाहिजे परंतू शिक्षणपद्धती आणि अभ्यासक्रम हे मात्र स्वायत्त मंडळाच्या हाती सोपविले पाहिजे. त्यात शासकीय अथवा कोणत्याही खाजगी अथवा संघटनांची ढवळाढवळ असता कामा नये.
७. शिक्षण ही शासनाची जबाबदारी आहे. शिक्षणाचे होत असलेले खाजगीकरण, भारतात येऊ पाहणारी विदेशी खाजगी विद्यापीठे हे सारे शासन यातुन हात काढून घेत असल्याचे लक्षण आहे. कोणत्याही स्थितीत बालवाडी/नर्सरी ते कोणत्याही प्रकारचे उच्च शिक्षण ही शासनाचीच जबाबदारी आहे. म्हणुन शिक्षणाच्या खाजगीकरणाला कडाडुन विरोध केलाच पाहिजे.
८. शिक्षक/प्राध्यापक यांचा एकुणातील दर्जा खालावत जात आहे. विद्यार्थ्यांना झापडबंद करता करता तेही झापडबंद होत चालले आहेत. त्यांच्यातही ज्ञान आणि नवनिर्मितीची आस नाही अथवा इच्छाही नाही. हे बदलण्यासाठी व्यापक प्रबोधनाच्या मोहिमेची आवश्यकता आहे.
या कार्यक्रमात विचारवंत आयु. शुद्धोदन आहेर, समीर मोहिते, प्रा. विजय मोहिते, प्रा. दीपिका खाले, प्रा. प्रवीण यादव, प्रा. साव, प्रा. अभ्यंकर ई. उपस्थित होते.