धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आपण परंपरेने मानत असतो. यातील धर्म हा शब्द आजकाल "रिलिजन" या अर्थाने घेतला जातो, पण ते वास्तव नाही. धर्म हा अत्यंत व्यापक शब्द असून तो पारंपारिक धर्माशी संबंधित नसून सकल मानवी समाजाच्या नैतीक जीवनधारणांशी संबंधित आहे. अनेक शब्द कालौघात नवनवे अर्थ धरण करत जात असतात. अनेकदा तर शब्दार्थांचीही उलटापालट झालेली असते. उदाहरणार्थ प्राचीन काळी "असूर" हा शब्द प्राणवान-वीर्यवान अशा चांगल्या अर्थाने घेतला जात असे. कालौघात असूर हा शब्द दुष्ट या अर्थाने वापरला जावू लागला. पुरुषार्थातील "काम" हा शब्दाचे असेच झाले असून त्याला वेगवेगळ्या अर्थकळा लाभल्या असल्या तरी मुख्यत्वे तो कामवासनेशी जोडला गेल्याने "काम" विषय आपल्या सांस्कृतीक जीवनातील चर्चेतून बाद होत गेला. तरीही भारतातच कामभावनेला (वासनेला) वाहिलेला जगातील पहिला ग्रंथ वात्स्यायनाचा "कामसूत्र" मौलिक असुनही असे व्हावे ही खरे तर शोकांतिका आहे व त्याचे अनेक सामाजिक दु:ष्परिनाम होत आलेले आहेत. असो.
काम या शब्दाचा मुलार्थ "इच्छा" असा आहे. इच्छा हा मानवी वर्तनावर मुलगामी परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक आहे. इच्छेखेरीज यच्चयावत विश्वात काहीही घडत नाही. निसर्गाच्या बाबतीतही असाच नियम लागू पडतो असे चिद्वादी विद्वानांचे मत आहे. त्याला ते यदृच्छा म्हणतात. इच्छा ही निसर्गात नैसर्गिक स्वरुपातच अस्तित्वात असते व त्यामुळेच प्रत्यक्ष कार्य घडु शकते असे चिद्वाद्यांचे मत आहे. आगमशास्त्रात काम हाच मानवी जीवन व मुक्तीचा मुख्य प्रवाह आहे हे मान्य करुन अगणित तांत्रिक ग्रंथांची निर्मिती झाली आहे. इच्छा ही मनाशी जोडली गेल्याचे आपण ऋग्वेदात "त्यानंतर प्रथम जेंव्हा मनोरुपी बीज निर्माण झाले तेंव्हा मनाच्या ठिकाणी काम (वासना, इच्छा) उत्पन्न झाला" (ॠग्वेद १०.१२९.४) असे नोंदवलेले पाहतो. अथर्ववेदातही काम अथवा इच्छा ही एक महान वैश्विक शक्ती मानलेली आहे. ग्रीक तत्वज्ञ अरिस्टाटलने आपल्या "रिपब्लिक" या ग्रंथात नमूद केले आहे कि आदर्श मानवाचे ध्येय गाठण्यासाठी इच्छांच्या पुर्तीला पुढे ढकलत राहिले पाहिजे. भगवान गौतम बुद्ध म्हणतात कि निर्वाणप्राप्तीसाठी भिक्खुंनी इच्छांचा प्रवाह पुर्णतया रोखला पाहिजे. म्हणजेच "इच्छा" अर्थातच काम याकडे पाहण्याचे तात्विक दृष्टीकोन वेगवेगळे असल्याचे लक्षात येईल.
मानसशास्त्रात "इच्छा" (Desire) या भावनेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. भावना आणि इच्छा यांत अनेक मानसशास्त्रज्ञांनी भेद केलेलाही आपल्याला दिसतो. भावना या तरल पातळीवर माणसात वावरतच असतात, परंतू प्रत्यक्ष कृती मात्र इच्छेच्या सहास्तित्वाखेरीज घडू शकत नाही असा त्यांचा अभिप्राय आहे आणि तो संयुक्तिकही आहे. धर्म, अर्थ आणि मोक्ष या तिन्ही मानवी प्रेरणा प्रत्यक्षात साध्य करायच्या असतील तर त्या इच्छेखेरीज शक्य नाही असाच या पुरुषार्थांचा अर्थ आहे.
कोणतेही उद्दिष्ट, कोणत्याही भावनेची पुर्ती (मग ती वासना का असेना) इच्छेखेरीज प्रत्यक्ष कर्मात बदलू शकत नाही हे उघड आहे. किंबहुना कर्म करण्याची इच्छा असल्याखेरीज कर्म अस्तित्वातच येवू शकत नाही. आणि कर्माखेरीज मानवी जीवनव्यवहार अशक्य आहे. अगदी "भूक" लागणे हीसुद्धा शरीराचे इच्छाप्रदर्शन असते ज्याची नोंद मानवी मेंदू घेतो आणि तिच्या पुर्ततेची इच्छा करत अन्न सेवनाचे कर्म करतो. वासनेचेही तसेच आहे. वात्स्यायन म्हणतो, "काम हे शरीरधारणेस आवश्यक असल्याने आहाराशी त्याचे साधर्म्य आहे. शिवाय धर्मार्थाचे अंतिम फळ हे कामात्मकच आहे." (कामसूत्र: १.२.४६-४७)
पण पुढे लगेच वात्स्यायन म्हणतो कि, "कामाचे दोष समजावून घ्यावेत. याचक येईल म्हणुन स्वयंपाक करण्याचे कोणी सोडत नाही अथवा जनावरे खातील म्हणुन कोणी धान्य पेरायचे थांबत नाही." कामसूत्र: १.२.४८)
वात्स्यायनाने जरी वासनेशी निगडीत अशी कामशास्त्राची मांडनी केली असली तरी "काम" या शब्दाचा अर्थ व्यापक आहे याची त्याला जाणीव होती. जीवनातील कोणतेही कार्य इच्छेखेरीज होऊ शकत नाही, त्यामुळे केवळ आगामी अनिश्चिततेचे भय आहे म्हणुन इच्छा कर्मात बदलू नयेत असे नाही असाच त्याचा अभिप्राय आहे. मिशिगन विद्यापीठाने (२००८) इच्छा आणि भय या दोन्ही मुलभूत भावना मेंदुच्या एकाच केंद्रकात सहअस्तित्वात असतात असा अभिप्रय संशोधनांती नोंदवलेला आहे. भावी परिंणामांच्या भयाने अनेक इच्छा प्रत्यक्ष कार्यरुपात येत नाहीत.
धोडक्यात "काम" हा शब्द फक्त शारिरीक वासनांशी निगडीत नाही त्यामुळे पुरुषार्थांपैकी "काम" या पुरुषार्थाचा विचार करीत असतांना कामाला फक्त शारीरवासनेशी जोडता येत नाही. शारीर वासनाही तेवढीच महत्वाची आहे...कारण पुनरुत्पादनाचे ते एकमेव साधन आहे. (आता विज्ञानाने काही पर्याय दिले आहेतच...) ते नैसर्गिक आहे आणि त्याकडेही तेवढ्याच मोकळ्या मनाने पाहिले गेले पाहिजे. खजुराहो ते गडचिरोलीच्या मार्कंडा मंदिरातील कामशिल्पे उदारपणे स्वीकारनारा समाज कामवासनेबद्दल विधी-निषेधात्मक गारुडात अडकला ही सामाजिक चुकच होती. आद्य कामशास्त्र महादेवाचा अनुचर नंदीने सांगितले अशी आख्यायिका वात्स्यायनाने नोंदवून ठेवली आहे. खजुराहो अथवा मार्कंडा ही शैव स्थानेच आहेत. परंतू अन्य धर्म/पंथांनी कामवासनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिरंजित आणि विकृत केला हे सहज दिसून येते.
इच्छांवरील नियंत्रण हा पौर्वात्य तसेच पश्चिमी विचारवंतांनी आपल्या चिंतनात महत्वाचा गाभा मानला आहे आणि ते संयुक्तिकच आहे. कारण इच्छा अनंत असतात आणि त्यांतील असंख्य इच्छांची पुर्ती ही समाजविघातक असू शकते हे जगाने वारंवार अनुभवलेले आहे. त्यामुळे धर्म या पुरुषार्थाशी कामाची सांगड घालणे अनिवार्य होवून जाते. सुरुवातीलाच स्पष्ट केल्याप्रमाने धर्म हा अखिल मानवी जीवनाच्या नैतिक धारणांशी निगडीत आहे. या नैतिक धारणा म्हणजे सर्वांच्याच ऐहिक जीवनाला सुखावह करणे या मुलभूत तत्वाशी जोडल्या गेलेल्या असतात. या नैतिक धारणांच्या आधारावरच इच्छा आणि त्या पुर्ण करण्याची साधने ठरवली जायला हवीत हे उघड आहे. गांधीजींनी "साधनशुचिता" या तत्वाला याच सर्वोच्च नैतिक पातळीवर उचलून घेतल्याचे आपल्याला अलीकडच्याच इतिहासावरुन स्पष्ट दिसते. कामवासनापुर्तीलाही नैतीकतेचे भान असलेच पाहिजे याबाबत आक्षेप घेता येणार नाही.
थोडक्यात "काम" हा शब्द फक्त शारीरीक वासनेशी निगडित नसून त्याचा अर्थ अधिक व्यापक आहे. मानवी जीवनव्यवहार काम (इच्छा) भावनेखेरीज कर्मात बदलू शकत नाहीत हे वास्तव आहे. आणि कर्माखेरीज विश्वाचा गाडा तसुभरही चालू शकत नाही. फक्त इच्छांना आणि त्यातुन उत्पन्न होणा-या कर्मांना नैतिकतेचे...म्हणजेच धर्माचे अधिष्ठान असलेच पाहिजे असा आग्रह धरणे अधिक योग्य राहील.
-संजय सोनवणी
