Tuesday, July 16, 2013

कामाचे दोष समजावून घ्यावेत...

 
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आपण परंपरेने मानत असतो. यातील धर्म हा शब्द आजकाल "रिलिजन" या अर्थाने घेतला जातो, पण ते वास्तव नाही. धर्म हा अत्यंत व्यापक शब्द असून तो पारंपारिक धर्माशी संबंधित नसून सकल मानवी समाजाच्या नैतीक जीवनधारणांशी संबंधित आहे. अनेक शब्द कालौघात नवनवे अर्थ धरण करत जात असतात. अनेकदा तर शब्दार्थांचीही उलटापालट झालेली असते. उदाहरणार्थ प्राचीन काळी "असूर" हा शब्द प्राणवान-वीर्यवान अशा चांगल्या अर्थाने घेतला जात असे. कालौघात असूर हा शब्द दुष्ट या अर्थाने वापरला जावू लागला. पुरुषार्थातील "काम" हा शब्दाचे असेच झाले असून त्याला वेगवेगळ्या अर्थकळा लाभल्या असल्या तरी मुख्यत्वे तो कामवासनेशी जोडला गेल्याने "काम" विषय आपल्या सांस्कृतीक जीवनातील चर्चेतून बाद होत गेला. तरीही भारतातच कामभावनेला (वासनेला) वाहिलेला जगातील पहिला ग्रंथ वात्स्यायनाचा "कामसूत्र" मौलिक असुनही असे व्हावे ही खरे तर शोकांतिका आहे व त्याचे अनेक सामाजिक दु:ष्परिनाम होत आलेले आहेत. असो.

काम या शब्दाचा मुलार्थ "इच्छा" असा आहे. इच्छा हा मानवी वर्तनावर मुलगामी परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक आहे. इच्छेखेरीज यच्चयावत विश्वात काहीही घडत नाही. निसर्गाच्या बाबतीतही असाच नियम लागू पडतो असे चिद्वादी विद्वानांचे मत आहे. त्याला ते यदृच्छा म्हणतात. इच्छा ही निसर्गात नैसर्गिक स्वरुपातच अस्तित्वात असते व त्यामुळेच प्रत्यक्ष कार्य घडु शकते असे चिद्वाद्यांचे मत आहे. आगमशास्त्रात काम हाच मानवी जीवन व मुक्तीचा मुख्य प्रवाह आहे हे मान्य करुन अगणित तांत्रिक ग्रंथांची निर्मिती झाली आहे. इच्छा ही मनाशी जोडली गेल्याचे आपण ऋग्वेदात "त्यानंतर प्रथम जेंव्हा मनोरुपी बीज निर्माण झाले तेंव्हा मनाच्या ठिकाणी काम (वासना, इच्छा) उत्पन्न झाला" (ॠग्वेद १०.१२९.४) असे नोंदवलेले पाहतो.  अथर्ववेदातही काम अथवा इच्छा ही एक महान वैश्विक शक्ती मानलेली आहे. ग्रीक तत्वज्ञ अरिस्टाटलने आपल्या "रिपब्लिक" या ग्रंथात नमूद केले आहे कि आदर्श मानवाचे ध्येय गाठण्यासाठी इच्छांच्या पुर्तीला पुढे ढकलत राहिले पाहिजे. भगवान गौतम बुद्ध म्हणतात कि निर्वाणप्राप्तीसाठी भिक्खुंनी इच्छांचा प्रवाह पुर्णतया रोखला पाहिजे. म्हणजेच "इच्छा" अर्थातच काम याकडे पाहण्याचे तात्विक दृष्टीकोन वेगवेगळे असल्याचे लक्षात येईल. 

मानसशास्त्रात "इच्छा" (Desire) या भावनेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. भावना आणि इच्छा यांत अनेक मानसशास्त्रज्ञांनी भेद केलेलाही आपल्याला दिसतो. भावना या तरल पातळीवर माणसात वावरतच असतात, परंतू प्रत्यक्ष कृती मात्र इच्छेच्या सहास्तित्वाखेरीज घडू शकत नाही असा त्यांचा अभिप्राय आहे आणि तो संयुक्तिकही आहे. धर्म, अर्थ आणि मोक्ष या तिन्ही मानवी प्रेरणा प्रत्यक्षात साध्य करायच्या असतील तर त्या इच्छेखेरीज शक्य नाही असाच या पुरुषार्थांचा अर्थ आहे. 

कोणतेही उद्दिष्ट, कोणत्याही भावनेची पुर्ती (मग ती वासना का असेना) इच्छेखेरीज प्रत्यक्ष कर्मात बदलू शकत नाही हे उघड आहे. किंबहुना कर्म करण्याची इच्छा असल्याखेरीज कर्म अस्तित्वातच येवू शकत नाही. आणि कर्माखेरीज मानवी जीवनव्यवहार अशक्य आहे. अगदी "भूक" लागणे हीसुद्धा शरीराचे इच्छाप्रदर्शन असते ज्याची नोंद मानवी मेंदू घेतो आणि तिच्या पुर्ततेची इच्छा करत अन्न सेवनाचे कर्म करतो. वासनेचेही तसेच आहे. वात्स्यायन म्हणतो, "काम हे शरीरधारणेस आवश्यक असल्याने आहाराशी त्याचे साधर्म्य आहे. शिवाय धर्मार्थाचे अंतिम फळ हे कामात्मकच आहे." (कामसूत्र: १.२.४६-४७)

पण पुढे लगेच वात्स्यायन म्हणतो कि, "कामाचे दोष समजावून घ्यावेत. याचक येईल म्हणुन स्वयंपाक करण्याचे कोणी सोडत नाही अथवा जनावरे खातील म्हणुन कोणी धान्य पेरायचे थांबत नाही." कामसूत्र: १.२.४८) 

वात्स्यायनाने जरी वासनेशी निगडीत अशी कामशास्त्राची मांडनी केली असली तरी "काम" या शब्दाचा अर्थ व्यापक आहे याची त्याला जाणीव होती. जीवनातील कोणतेही कार्य इच्छेखेरीज होऊ शकत नाही, त्यामुळे केवळ आगामी अनिश्चिततेचे भय आहे म्हणुन इच्छा कर्मात बदलू नयेत असे नाही असाच त्याचा अभिप्राय आहे. मिशिगन विद्यापीठाने (२००८) इच्छा आणि भय या दोन्ही मुलभूत भावना मेंदुच्या एकाच केंद्रकात सहअस्तित्वात असतात असा अभिप्रय संशोधनांती नोंदवलेला आहे. भावी परिंणामांच्या भयाने अनेक इच्छा प्रत्यक्ष कार्यरुपात येत नाहीत.   
   
धोडक्यात "काम" हा शब्द फक्त शारिरीक वासनांशी निगडीत नाही त्यामुळे पुरुषार्थांपैकी "काम" या पुरुषार्थाचा विचार करीत असतांना कामाला फक्त शारीरवासनेशी जोडता येत नाही. शारीर वासनाही तेवढीच महत्वाची आहे...कारण पुनरुत्पादनाचे ते एकमेव साधन आहे. (आता विज्ञानाने काही पर्याय दिले आहेतच...) ते नैसर्गिक आहे आणि त्याकडेही तेवढ्याच मोकळ्या मनाने पाहिले गेले पाहिजे. खजुराहो ते गडचिरोलीच्या मार्कंडा मंदिरातील कामशिल्पे उदारपणे स्वीकारनारा समाज कामवासनेबद्दल विधी-निषेधात्मक गारुडात अडकला ही सामाजिक चुकच होती. आद्य कामशास्त्र महादेवाचा अनुचर नंदीने सांगितले अशी आख्यायिका वात्स्यायनाने नोंदवून ठेवली आहे.  खजुराहो अथवा मार्कंडा ही शैव स्थानेच आहेत. परंतू अन्य धर्म/पंथांनी कामवासनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिरंजित आणि विकृत केला हे सहज दिसून येते.

इच्छांवरील नियंत्रण हा पौर्वात्य तसेच पश्चिमी विचारवंतांनी आपल्या चिंतनात महत्वाचा गाभा मानला आहे आणि ते संयुक्तिकच आहे. कारण इच्छा अनंत असतात आणि त्यांतील असंख्य इच्छांची पुर्ती ही समाजविघातक असू शकते हे जगाने वारंवार अनुभवलेले आहे. त्यामुळे धर्म या पुरुषार्थाशी कामाची सांगड घालणे अनिवार्य होवून जाते. सुरुवातीलाच स्पष्ट केल्याप्रमाने धर्म हा अखिल मानवी जीवनाच्या नैतिक धारणांशी निगडीत आहे. या नैतिक धारणा म्हणजे सर्वांच्याच ऐहिक जीवनाला सुखावह करणे या मुलभूत तत्वाशी जोडल्या गेलेल्या असतात. या नैतिक धारणांच्या आधारावरच इच्छा आणि त्या पुर्ण करण्याची साधने ठरवली जायला हवीत हे उघड आहे. गांधीजींनी "साधनशुचिता" या तत्वाला याच सर्वोच्च नैतिक पातळीवर उचलून घेतल्याचे आपल्याला अलीकडच्याच इतिहासावरुन स्पष्ट दिसते. कामवासनापुर्तीलाही नैतीकतेचे भान असलेच पाहिजे याबाबत आक्षेप घेता येणार नाही. 

थोडक्यात "काम" हा शब्द फक्त शारीरीक वासनेशी निगडित नसून त्याचा अर्थ अधिक व्यापक आहे. मानवी जीवनव्यवहार काम (इच्छा) भावनेखेरीज कर्मात बदलू शकत नाहीत हे वास्तव आहे. आणि कर्माखेरीज विश्वाचा गाडा तसुभरही चालू शकत नाही. फक्त इच्छांना आणि त्यातुन उत्पन्न होणा-या कर्मांना नैतिकतेचे...म्हणजेच धर्माचे अधिष्ठान असलेच पाहिजे असा आग्रह धरणे अधिक योग्य राहील. 

-संजय सोनवणी

8 comments:

  1. -आप्पा - अहो बाप्पा , जरा लवकर लवकर पाय उचला !

    बाप्पा - काय इतकं वाघ पाठीमागे लागल्या सारख ?

    आप्पा - आपल्या संजय ने नवीनच विषय काढलाय - आत्ता पर्यन्त दुष्काळ झाला ,शेतकरी झाला , शैव - वैष्णव झालं -शिवाजी दादोजी झालं -विहिरी झाल्या ,पानिपत ,अहिल्याबाई ,वैदिक अवैदिक आणि बरच काय काय झालं -

    बाप्पा - तेच तेच काय सांगतो आहेस ,आपल्या संजय चा आवाका आहेच प्रचंड !

    आप्पा - तेच तर सांगतोय ! आता नवीन काय - विचार ना ?

    बाप्पा - क्रिकेट असेल

    आप्पा - चूक - दहा पैकी शून्य !

    बाप्पा - अहो आप्पा - पक्के कोकणस्थी बोलताय - अहो मार्कात तरी जरा शंभर पैकी म्हणा न - हे काय आपल दहा आणि वीस करताय ! म्हणा न जरा शंभर पैकी शून्य -जरा भरघोस !

    आप्पा -अहो आपल झालय वय - पण एक सांगा - संजय ने हा जो या लेखात वर फोटो टाकलाय तो कसा आहे ? भडक - स्वार गेट एस टी च्या स्थानकावर असली पुस्तके असतात - तसलच वाटतंय हे काहीतरी ! तुम्ही वाचल का ?

    बाप्पा - हो हो - ते म्हणताय का ?- तुम्हाला कळलच नाही म्हणजे ! पूर्ण वाचल का ?

    आप्पा - नाही -

    बाप्पा - म्हणूनच - आधी संजय ला सॉरी म्हणा आणि त्याचे अभिनंदन करा !

    आप्पा - काय सांगता काय ?

    बाप्पा - अप्रतीम - आणि एक सांगून ठेवतो - त्याला यापुढे अद्वा तद्वा आणि ऊठ सुठ टाकून बोलू नका - अहो त्या चित्रातली एखादी सुंदरी जर एकदम जिवंत होऊन तुमच्या समोर आली तर - वहिनी लाटण घेऊन तुमच्या मागे लागतील ! आणि आम्ही फुकटचे बदनाम !संगती संगदोषाणाम

    आप्पा - पण ते आहे कशाबद्दल ?

    बाप्पा - आपल्या संस्कृती बद्दल !

    आप्पा - शैव का वैष्णव ?

    बाप्पा -अहो किती प्रश्न विचारताय ? हा वेगळाच विषय आहे -

    आप्पा - हिरवट नाही ना ?- इकडे बारबाला झाल्याच आहेत मोकळ्या - सगळे म्हणतातच आहेत - भाद्रपद जवळ आला म्हणून - !

    बाप्पा - अहो , तुमच्या तोंडाला काही हाड ! हा विषय आहे आपल्या जगण्याशी निगडीत !

    धर्म म्हणजे काय - वगैरे -

    आप्पा - तेंव्हा गेला होता कुठे राधासुता तुझा धर्म - तोच ना ?

    बाप्पा - वा वा - छानच ! तोच तो -धर्म म्हणजे काय - कर्म म्हणजे काय - सगळ आलय या लेखात ! धर्म अर्थ काम आणि मोक्ष - त्यातील काम या विषयावर लिहिलंय - बुद्धाचा वृत्तीनिरोध आणि संयम - अथर्व वेद - ऋग्वेदातील मांडले अगदी नम्बरासकट दिली आहेत - बर वाटलं -

    आप्पा - पण संजय तर ऋग्वेदाला विरोध करतो ना ?

    बाप्पा - कोण म्हणतो ? तुम्ही परत परत तीच चूक करताय ! अहो नित वाचाल तर असे वाग्मय लिहिणे येरा गबाळ्याचे काम नाही हे सनजयलाहॆ मान्य आहे ! पण त्याचा पोटभरू उपयोग करत सगळ्या चाव्या आपल्याकडे ठेवायच्या ब्रह्म वृन्दांच्या प्रवृत्तीवर संजय हल्ला करत असतो ! त्यातील वर्गभेदावर आणि पाखंडी मतांवर तो हल्ला करतो !

    आप्पा - संजयराव , आमचा परममित्र म्हणतोय म्हणजे नक्कीच लेख तकतॆचा असणार ! अभिनंदन आणि मनापासून सॉरी - !असेच लिहित रहा ! हि विनंती -

    ReplyDelete
  2. भक्तजन आणि साधुजनाना

    दिंड्या पताका नाचवण्यात धन्य वाटते

    असे लेख वाचण्यात नाही असे दिसते

    कारण कुणीच काही प्रतिक्रिया देत नाहीये -

    एक ते म्हातारे रिकामटेकडे सोडले तर !

    संजयराव तुम्हारा चुक्याच !- निदान टायमिंग तरी -

    आता पुढच्या एकादशीला काळजी घ्या !

    ReplyDelete
  3. छान

    आपण सर्वानी संजय सरांचे कौतुक केले पाहिजे

    इतका गहन विषय त्यांनी सहज सोपा करून सांगितला आहे


    विचार करण्याची प्रक्रिया किती गहन आहे ते समजते

    भावना आणि विचार यात काय फरक ?

    इच्छा आणि कर्म हे एकमेकांचे हात धरून चालतात - कर्म करायला प्रवृत्त करते ती इच्छाच !


    अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने मांडला आहे हा विषय - अभिनन्दन.



    नादब्रह्म हा एक वेगळाच अनुभव आहे- त्यात वारकरी डुंबून निघत आहेत -

    वारकरी पंथाचा अभ्यास केला तर असे दिसते की त्यांच्या गुरूच्या शब्दाच्या बाहेर ते नसतात ,क्रांतीकारी म्हणून त्यांच्याकडून एक चळवळ उभी राहिली , पण ती पण कालौघात नियम आणि उपनियामांच्या आणि कर्म कांडाच्या विळख्यात अडकली !

    म्हणजेच आजच्या घडीला वारकरी स्वयंभू विचार करायचे पसंत करत नाही

    तीच कथा इतर पंथांची आहे - म्हणजे एखादा स्वच्छ ताजा विचार मांडायची ताकद या पंथांमध्ये नाही -बलात्कार , चोरी , अशा गुन्ह्यांबद्दल त्यांच्याकडे उत्तर नाही भ्रष्टाचार आणि धर्मांधता यावर त्यांच्याकडे उपाय नाही


    आपणसुद्धा धर्म या कल्पनेला पुसटसा स्पर्श केलेला दिसतो ,

    अर्थ या विषयावर लिहिता येईल - अर्थार्जन करताना धर्माचे पालन करणे हे पण एक बंधन असणारच ! (धर्म याचा अर्थ आपणास जो अपेक्षित आहे तोच धरून )

    धर्म आणि नितीमत्ता यांची तटबंदी कोणासाठी ?

    मोक्ष - त्याबद्दल बोलताना जपून बोलावे लागेल - कारण ज्यांना या जन्मात मोक्ष साधला नाही त्यांचे पुढे काय ?- म्हणजेच पुनर्जन्म अपरिहार्य मानायचा का ?मग पाप पुण्याचा हिशोब आला का ?म्हणजेच स्वर्ग नरक आले का - अशी ती अखंड मालिका सुरु होते -

    कला या सर्वश्रेष्ठ का - तर त्यांना तथाकथीत नीती नियमांचे बंधन नाही - नसावे -

    कलेच्या मांडणीत विचार आणि भावना यांचा प्रमाणशीर मिलाफ असतो - गायक असो मूर्तिकार असो वा चित्रकार - त्यांच्या निर्मितीत नितीमत्तेचा प्रश्न येत नाही - असो तो वेगळा विषय आहे !त्या निर्मितीत वैचारिक आणि भावनिक असे संमिश्र आनंद असतात असे फार तर म्हणता येईल - काम - वासना यांचा कुटुंब व्यवस्था या संस्थेशी संघर्ष असण्याची शक्यता असल्यामुळे आणि समाज हा कुटुंब संस्थेने बांधला गेला असल्याने या विषयावर लोक जपूनच मत प्रदर्शन करतील असे दिसते !

    धर्म अर्थ आणि मोक्ष हे विषय तसे मत प्रदर्शनाला " रिस्की " वाटत नाहीत !

    ReplyDelete
  4. हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!

    +हिंदू नावाचा कोणताही धर्म जगात अस्तित्वात नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म अस्तित्वात आहे+ असे विधान मी काही पोस्टमध्ये केल्यानंतर हिंदूत्ववादाचा बुरखा पांघरणारया ब्राह्मणवाद्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ब्राह्मणी विकाराने रोगग्रस्त झालेल्या काही लोकांनी माझ्यावर टीकेचा भडीमार सुरू केला. तीच तीच वाक्ये अनेकांगानी लिहून टीकेचा आकार हे लोक वाढवित आहेत. माझे विधान कसे सत्य आहे, हे मी आज सूज्ञ वाचकांस सांगणार आहे.
    धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही
    हिंदू म्हणविणारयांच्या धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे.
    ब्राह्मणांची राक्षसी महत्वाकांक्षा
    समस्त भारतवर्षात स्वत:ला वैदिक म्हणवणारया ब्राह्मणांची संख्या दीड ते साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. +कृण्वंतो विश्वम आर्यम+ अशी प्रतिज्ञा ब्राह्मणी वाङ्मयात आहे. प्राचीन काळी +अष्टपूत्र सौभाग्यवती भव+ असा आशीर्वाद ब्राह्मणी धर्मात दिला जात असे. स्त्रीने किमान ८ मुलांना जन्म द्यायलाच हवा, असा दंडकही होता. संख्यावाढ करून संपूर्ण विश्वात आपला वंश वाढविण्याचा विचार यामागे आहे. बेडकाने कितीही पोट फुगवले तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही. याच न्यायाने वैदिक ब्राह्मणांनी रात्रंदिवस घाम गाळला असता तरी त्यांची लोकसंख्या विश्वाला व्यापू शकली नसती. त्यामुळे कालांतराने वैदिकांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली. लोकसंख्या वाढविण्याऐवजी ब्राह्मणी विचार पसरवून विश्वाला आर्यमय करण्याची व्यूहरचना त्यांनी केली. +आब्रह्म ब्राह्मणो ब्रह्मवर्चसि जायताम् + असे नवे मंत्र त्यातून निर्माण केले गेले. सर्व विश्वात ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण झाले पाहिजे, अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा त्यातून दिसून येते.
    वैदिक धर्म समूळ नष्ट झाला
    ब्राह्मणांची ही राक्षसी महत्त्वाकांक्षाही पूर्ण होऊ शकली नाही. मुळात वैदिक ब्राह्मणी विचार रानटी असल्यामुळे इथला मूळ भारतीय समाज त्याकडे आकृष्ट होऊ शकला नाही. तसेच कालांतराने भगवान श्रीकृष्ण, भगवान गौतम बौद्ध आणि भगवान महावीर यांनी आपापल्या पद्धतीने वैदिक धर्मावर हल्ले केले. भगवान श्रीकृष्णांचा वैदिक धर्मविरोध हा थोडासा सौम्य स्वरूपाचा होता. (या तिन्ही थोर पुरुषांविषयीचे माझे लेख जिज्ञासूंनी वैदिक धर्मविषयक माझ्या लेख मालेत जरूर वाचावेत.) भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी मात्र उघडपणे वेदप्रामाण्य नाकारले. त्यांनी पशुहत्येला पापाच्या कक्षेत नेऊन बसवले. पशुहत्या हा तर वैदिक धर्माचा मूळ पाया होता. त्यामुळे भारतभूमीतून वैदिक धर्म समूळ नष्ट झाला. या काळात ब्राह्मणांनी एक हुशारी केली. आपले वाङ्मय नष्ट होऊ दिले नाही. ते त्यांनी दडवून ठेवून टिकवले. लोकहितवादींनी वैदिकांना आपले वाङ्मय का दडवून ठेवावे लागले, याचे वर्णन अनेक ठिकाणी केले आहे. वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. आज हिंदू लोक मानतात त्या रामकृष्णादी देवता वेदांत नाहीत. CONT...........

    ReplyDelete
  5. शंकराचार्याचे कुटिल कारस्थान
    कालांतराने कुमारिल भट्ट, आद्य शंकराचार्य आदी ब्राह्मणवादी वैदिकांचा उदय झाला. त्यांनी छळ कपटाचा अवलंब करून बौद्ध आणि जैन विचारांतून चोरी करून आपल्या धर्माची नवी मांडणी केली. प्राचीन काळापासूनचे महादेवाचे उपासक शैव आणि विष्णूचे उपासक वैष्णव, नाथपंथी, चैतन्यपंथी व इतर अनेक अहिंसावादी धर्मही शंकराचार्य प्रणित धर्माने गिळले. सनातन धर्म या संज्ञेखाली त्यांना एकत्रित केले गेले. पंढरपूरचे पांडुरंग हे खरे म्हणजे लोकदैवत. पण त्याला वैदिक करून शंकराचार्यांनी संस्कृतमध्ये पांडुरंगाष्टक लिहिले. वारकरयांचे सर्व वाङ्मय प्राकृत मराठीत असताना एवढे एकच पांडुरंगाष्टक संस्कृतात आहे. आज हिंदू धर्माचे जे स्वरूप आहे, ते अशा प्रकारे वैदिकांनी केलेल्या चोरयांमारयांमधून आकाराला आले आहे. बौद्ध आणि जैनांनी ब्राह्मणांचे सर्व विशेषाधिकार काढून घेतले होते. शंकराचार्यांनी ब्राह्मणांना पुन्हा धर्माच्या सर्वोच्च स्थानी बसविले. त्यासाठी नवे ग्रंथ रचले गेले. भागवतादी पुराणांची रचना याच काळात केली गेली.
    अठरा पगड जाती फक्त ब्राह्मणांच्या सेवेसाठी
    पारंपरिक वैदिक धर्मातील वर्णाश्रम व्यवस्थेने शूद्र वगळता क्षत्रिय आणि वैश्यांना कर्तव्याच्या पाशांत बांधून काही अधिकार दिले होते. शंकराचार्यांनी तेही काढून घेतले. कलियुगात ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण आहेत, असा नवा सिद्धांत मांडला गेला. याचाच दुसरा अर्थ असा झाला की, ब्राह्मण वगळता इतर सर्व जातींना कोणताही वैध धार्मिक अधिकार राहिला नाही. ९७ टक्के समाजाने ३ टक्के ब्राह्मणांची सेवा करावी. ब्राह्मणांना दान द्यावे. ब्राह्मण भोजने घालावी. कोणताही धार्मिक विधी बाह्मणाच्या हस्तेच करावा, अशी बंधने समाजावर लादण्यात आली. ठराविक लोकांना फुकटच्या लाभाची मक्तेदारी देणारा हा जगातील एकमेव धर्म आहे. याला ब्राह्मणी धर्म म्हणू नये तर काय?
    अकबराची ब्राह्मण नवरत्ने
    कालांतराने या देशात इस्लामचे आगमन झाले. एतद्देशीय क्षत्रियांच्या हातातील सत्ता मुस्लिम राज्यकरत्यांच्या हातात गेली. त्यामुळे नव्याने तयार होणारया ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करण्याच्या स्थितीत क्षत्रिय नव्हते. कोणतीही परकीय सत्ता एतद्देशियांच्या सहाय्याशिवाय राज्य चालवू शकत नाही. समाजावर हुकुमत असलेल्या एखाद्या स्थानिक गटाची मदत राज्यकर्त्यांना लागत असते. इस्लामी राज्यकत्र्यांनाही अशी मदत हवी होती. ती तत्कालीन ब्राह्मणांनी पूर्ण केली. इस्लामी राज्यकत्र्यांच्या पदरी ब्राह्मण मंत्री असत. अफजलखानाचा मंत्री कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा सर्वांना माहीतच आहे. अकबराच्या दरबारात ९ रत्ने होती असे म्हणतात. बिरबल, तानसेन यांच्यासकट ही नऊच्या नऊ रत्ने ब्राह्मण होती. ही सगळे रत्ने कालांतराने मुसलमान झाली. तानसेनाचे मूळ नाव तन्ना मिश्रा होते. तो मुसलमान झाल्यानंतर मियाँ तानसेन नावाने ओळखला जाऊ लागला. तानसेनाने तयार केलेल्या सर्व रागांच्या आधी मियाँ लावण्याची प्रथा आजही कायम आहेत. उदा. मियाँ मल्हार. भारतीय शास्त्रीय संगीतात मुस्लिम गायक वादकांचा वरचष्मा आहे. त्याचे कारणच हे आहे. तानसेन आणि इस्लाम धर्म स्वीकारणारया इतर गायकांचे हे सगळे वंशज आहेत. या गायकीत इस्लाम नाही. सर्व चीजा भारतीय देवी देवतांचे गुणवर्णन करतात. अगदी पाकिस्तानी शास्त्रीय गायकही भारतीय देवी देवतांचे महिमा वर्णन असलेल्या चीजा गातात. या काळात ब्राह्मणांची धर्मावरील पकड आणखी मजबूत झाली. CONT..........

    ReplyDelete
  6. इंग्रजी राजवटीतही तेच
    ब्राह्मणांच्या मदतीची ही परंपरा पुढे इंग्रजी राजवटीपर्यंत कायम होती. इंग्रजी राजवटीतील ९९.९९ टक्के एतद्देशीय सरकारी अधिकारी आणि कर्मचारी ब्राह्मण होते. या संपूर्ण काळात ब्राह्मणी व्यवस्था मजबूत होण्यासाठी आवश्यक ती रसद राज्यसत्तेकडून अशा प्रकारे मिळत गेली. त्यातून या देशात ब्राह्मणी धर्म अधिकाधिक मजबूत झाला.
    हिंदू ही धार्मिक नव्हे राजकीय संज्ञा
    प्राचीन काळी ग्रीक व इतर पाश्चात्य लोक सिंधूपलीकडील लोकांना हिंदू म्हणत असा एक सिद्धांत सर्वांना माहीतच आहे. पण त्यात फारसे तथ्य आहे, असे दिसत नाही. सम्राट अलेक्झांडर द ग्रेटने भारतावर स्वारी केली हे सर्र्वाना माहीतच आहे. पण अलेक्झांडरच्या आधी आणि नंतरसुद्धा मध्य आशियातून हूण, यूची, शक आदी टोळ्यांची आक्रमणे होतच राहिली. या पाश्र्वभूमीवर ग्रीक किंवा इतर पाश्चात्य वाङ्मयात कुठे ना कुठे हिंदू हा शब्द यायला हवा होता. पण ग्रीकांच्या कोणत्याही वाङ्मयात हिंदू शब्द सापडत नाही. उलट या काळात भारतात बौद्ध धर्माचा बोलबाला होता असे पुरावे सांगतात. शकांचा एक वकील मिनँडर आणि बौद्ध पंडीत नागसेन याचा संवाद प्रसिद्धच आहे. त्यातून मिनँडरने एक ग्रंथ सिद्ध केला. +मिलिंद पन्हो+ असे या ग्रंथाचे नाव. मिलिंद हे मिनँडरचे पाली रूप आहे. या संवादाच्या स्मृतीरूपाने डॉ. आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाच्या परीसराला नागसेनवन असे नाव आहे.
    हिंदू हा शब्द इस्लामची देण
    लिखित स्वरूपात हिंदू शब्द पहिल्यांदा येतो शीखांचे आद्य गुरू गुरूनानक यांच्या लिखाणात. हिंदू धर्मातील भेद आणि विशेषाधिकार दूर करण्यासाठी नानकदेवांनी स्वतंत्र धर्मच स्थापन केल्याचे सर्वविदित आहेच. गुरूनानकांचा काळ हा इस्लामी आगमनाचा काळ होय. त्यावरून हिंदू हा शब्द इस्लामी राजवटीतच रुढ झाला, असे दिसते. भारतातील हजारो जातींची नावे, लक्षात ठेवणे नव्या इस्लामी राज्यकत्र्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्र्वासाठी सरसकट एक संज्ञा रुढ केली. भारतात हजारो जाती असल्या तरी इस्लामी राज्यकत्र्यांच्या दृष्टीने मुस्लिम लोक आणि एतद्देशीय बिगर मुस्लिम भारतीय असे दोनच भेद होते. त्यामुळे त्यांनी एतद्देशियांसाठी हिंदू ही संकल्पना रूढ केली. या काळात हिंदू शब्दाचा आणि विशिष्ट धार्मिक विचारधारेचा कोणताही संबंध नव्हता. एतद्देशीय लोकांसाठी वापरली जाणारी ती समूहवाचक संज्ञा होती. हिंदू ही पूर्णत: राजकीय होती, धार्मिक नव्हे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आजच्या काळाचे उदाहरण घेऊ या. आपल्या राज्यकत्र्यांनी ठराविक जाती समूहांचे गट करून एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा संज्ञा तयार केल्या आहेत. या संज्ञांना धार्मिक अधिष्ठान नाही. या सर्व संज्ञा राजकीय आहेत. तसाच हिंदू हा शब्द आहे. इस्लामी राजवटीच्या प्रारंभकाळी वापरात आला. त्यातून धर्म नव्हे, तर राजकीय अर्थ स्पष्ट होतो.
    इंग्रजी राजवटीत हिंदू शब्दाचे धार्मिकीकरण
    पुढे हजारभर वर्षे हिंदू हा शब्द हेटाळणीच्या स्वरूपातच वापरला जात होता. इंग्रजी राजवटीत इस्लाम आणि हिंदू हे समूह घटक प्रकर्षाने समोर आले. इंग्रजी राजवटीत या देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे धर्माची अधिकृत नोंद करणे अनिवार्य ठरले. तेव्हा हिंदू हा शब्द अधिकृतरित्या धर्म म्हणून कागदोपत्री नोंद होऊ लागला. शीख, जैन धर्मांनी आपल्याला हिंदू म्हणवून घेण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. तसे ते आधीपासूनच होते. जगभरात पसरलेला बौद्ध धर्मही आधीपासूनच स्वतंत्र होता. परंतु त्याचे अस्तित्व लेह-लदाख, आणि इशान्यभारतापुरते मर्यादित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह धर्मांतर केल्यानंतर बौद्ध धर्माचा टक्का वाढला. CONT...........

    ReplyDelete
  7. हिंदूत्ववादी धार्मिक नाहीत,
    धार्मिक लोक हिंदूत्ववादी नाहीत!
    आज हिंदूत्व ही संज्ञाही राजकीय संज्ञा आहे. हिंदू हा धर्म नाही, हे सिद्ध करण्यास हाही एक मुद्दा सहाय्यक ठरतो. ख्रिश्चन, इस्लाम बौद्ध, जैन qकवा जगातील इतर कोणत्याही धर्माची अशी राजकीय संज्ञा अस्तित्वात नाही. युरोपात चर्च आणि राजकारण या दोन गोष्टी भिन्न आहेत. इस्लामी देशात धर्म आणि राजसत्ता हातात हात घालून चालतात, हे खरे मात्र; राजकारणासाठी इस्लामियत असे कोणतेही तत्वज्ञान किंवा संज्ञा अस्तित्वात नाही. इस्लामच्या नावे राजकारण करणारे लोक धार्मिक दृष्ट्याही कडवट इस्लामी असतात. औरंगजेबाने इस्लामच्या आधारे राज्य केले. तो इस्लामची सर्व तत्त्वे आयुष्यभर पाळित होता. त्याने कधी दारूला स्पर्श केला नाही. वैयक्तिक उदरभरणासाठी तो टोप्या बनवून विकीत असे. मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबरही दारू पित नव्हता. आज सौदी व इतर इस्लामी देशात इस्लामचा कडक अंमल आहे. हिंदूत्ववादी नेते असे कडवट हिंदू आहेत का? एकही हिंदूत्ववादी नेता, हिंदू धर्माचे कसोशीने पालन करीत नाही. प्रचलित मान्यतेनुसार हिंदूंना मद्यमांस वर्ज्य आहे. देशातील सर्वांत मोठे हिंदूत्ववादी नेते बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत आपण बिअर घेतो, असे सांगितले होते. हिंदूत्वाच्या संकल्पनेला जन्म देणारया सावरकरांनी इंग्लंडात असताना गोमांस खाल्ले होते. हिंदूत्वाच्या लाटेवर आरुढ होऊन पंतप्रधान झालेले अटलबिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, +मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नव्हे.+ आता गंमत पाहा, अविवाहित असताना स्त्रीसंग करणे, हिंदू म्हणविणारया लोकांच्या दृष्टीने पापाचरण आहे. अशा पापाचरणास व्याभिचार असे म्हणतात. अशा व्यक्तीला पुराणांत विविध प्रकारच्या मरणोत्तर शिक्षा सांगितलेल्या आहेत. वाजपेयी रामाला आपला आदर्श मानतात आणि राम हा एकपत्नी होता. महात्मा गांधी मात्र खरया अर्थाने रूढ हिंदू तत्त्वांचे पालनकर्ते होते. पण ते हिंदूत्ववादी नव्हते. अशा वेळी येथे अगदी विपरीत परिस्थिती निर्माण होते. हिंदू म्हटल्या जाणारया लोकांत मान्य असलेली तत्वे हिंदूत्ववादी पाळीत नाहीत. उलट हिंदूत्वादी ज्यांच्यावर हिंदूविरोधी म्हणून टीका करतात ते महात्मा गांधी मात्र या तत्त्वांचे प्राणपणाने पालन करतात. हा विरोभास विचित्र आहे.
    गांधी आणि नथुराम दोघांच्याही हाती गीता!
    ख्रिश्चनांचा मुख्य धर्मग्रंथ बायबल आहे. मुस्लिमांचा कुराण, तर शिखांचा गुरूग्रंथसाहिब आहे. हिंदू हा धर्म असेल, तर त्याचा धर्मग्रंथ कोणता? काही लोक म्हणतात की, गीता हा हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ आहे. चैतन्य, वैष्णवादी परंपरा गीतेला आपला मुख्य आधार मानतात. जसे- महाराष्ट्रातील वारकरी पंथाचा मुख्य आधार असलेली गीता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणली. गीतेला हिंदूंचा मुख्य ग्रंथ मानल्यास आपली फसगत थांबत नाही. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर गीता हाती घेऊन राजकारण, समाजकारण केले. गांधींच्या पुतळ्यांच्या हातातही गीता आहे. काव्यगत न्याय कसा असतो बघा, नथुराम गोडसे याने गीता हातात घेऊनच गांधीजींना गोळ्या घातल्या. गीतेला जर हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ मानायचे असेल, कोणाची गीता स्वीकारायची नथुरामची की गांधींची हा मोठा प्रश्न आहे. END.

    अनिता पाटील, औरंगाबाद

    ReplyDelete
  8. खूपच सुंदर विवेचन ... शेअर करतोय वॉट्स ॲप वगैरेंवर !

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...