Sunday, August 25, 2013

साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद हा सन्मान नव्हे...जबाबदारी!- संजय सोनवणी



सासवड: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा उत्सव नसून साहित्य-संस्कृतीविषयक मुलगामी चिंतन व मंथन घडवून आणनारे शिबीर असून या संमेलनाचे अध्यक्षपद हा केवळ सन्मान नाही तर साहित्य संस्कृतीला दिशा देत मार्गदर्शक कार्यकर्त्याप्रमाणे राबण्यासाठी मराठी भाषकांनी सोपवलेले जबाबदारीचे पद आहे असे प्रतिपादन सासवड येथील नियोजित ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतील उमेदवार प्रसिद्ध साहित्यिक, कवि व संशोधक संजय सोनवणी यांनी केले. क-हा नदीपूजन आणि आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रचाराची सुरुवात करतांना त्यांनी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. संत सोपानदेवांच्या समाधीचेही त्यांनी दर्शन घेतले. या प्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. अरूण जगताप, शिवसेनेचे सासवड शहर प्रमुख श्री अभिजित जगताप आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे पदाधिकारी श्री. प्रदीप जगताप व अन्य उपस्थित होते.

"साहित्य संमेलन हे एकुणातीलच साहित्य-संस्कृतीला नव-उर्जा देणारे, प्रेरक आणि दिशादर्शक असायला हवे. आपण काय कमावले व काय गमावले यावर सखोल चिंतन संमेलनाच्या माध्यमातून अभिप्रेत आहे. तरुणांना या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सामावून घ्यावे लागणार आहे." असेही सोनवणी म्हणाले.

सोनवणी पुढे म्हणाले कि "जागतिकीकरणाच्या लाटेनंतर परंपरागत संस्कृती आणि जागतीक संस्कृतीचे प्रवेशत असणारे वेगवान प्रवाह यांतील आंतरसंघर्षामुळे आपण सारेच एकार्थाने सांस्कृतीक पडझडीच्या कालखंडात येऊन ठेपलो आहोत. आजचा तरुण वर्ग मालिकांच्या वा जाहिरातींच्या कचकड्याच्या जीवनदर्शनाला संस्कृती समजू लागल्याने व त्याच वेळीस कठोर वास्तव अनुभवास येत असल्याने अस्वस्थ आहे. त्याला सांस्कृतिक व भावनिक आधार देवू शकेल असे साहित्य क्वचितच दिसते. दुसरीकडॆ सर्व समाजांमद्धे आज शिक्षणामुळे अभिव्यक्तीचीही आस बळावत आहे...पण तिला दिशा देवू शकेल आणि त्या अभिव्यक्तीला वैश्विक साहित्याचे रूप देवू शकेल असे सकारात्मक सांस्कृतीक व सामाजिक वातावरण आपल्यात आज तरी नाही. आपल्याला संस्कृतीचीच एकुणातच फेरमांडणी करावी लागनार आहे.

"मी क-हा पूजन करीत आहे याचे कारण सर्वच जागतिक संस्कृत्या नदीकाठीच बहरल्या. नद्यांचे मानवावर अनंत उपकार आहेत. पण आज जवळपास सर्वच नद्या मानवी अतिक्रमणामुळे प्रदुषित झाल्या आहेत. त्याहीपेक्षा मोठा गंभीर धोका म्हनजे प्रदुषित झालेली आपली संस्कृती. ती कशी स्वच्छ करायची याचे आव्हान आपल्यासमोर आहे. डा. दाभोळकरांची हत्या असो कि महिला छायाचित्रकारावरील अलीकडचाच बलात्कार, आपण किती टोकाचे प्रदुषित झालो आहोत एक चिन्ह आहे व तो आपणा सर्वांना एक धोक्याचा इशारा आहे. तो समजावून घेतला नाही व त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले नाहीत तर आम्हाला साहित्य-संस्कृतीबद्दल बोलायचा अधिकार नाही.

"महात्मा फुलेंच्या स्वप्नातील एकमय समाज साकारणे हे आजही आमच्यापुढे आव्हान आहे. साहित्य हे कार्य समर्थपणे करू शकते पण त्यासाठी सर्व साहित्य प्रवाहांना एका ध्येयाच्या दिशेने नेणे व नवविचारांना प्रोत्साहन देणे ही कार्ये आम्हा सर्वांनाच करावी लागतील."

या प्रसंगी संजय सोनवणी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी जनांदोलन उभे करण्याची आवश्यकता प्रतिपादन करत शासकीय मराठी सोपी केली नाही तर ती लोकप्रिय राजभाषाही बनू शकणार नाही असेही मत प्रतिपादित केले. श्री. अरुण जगताप यांनी सोनवणींच्या परखड भुमिकेचे स्वागत केले. येते संमेलन त्यांच्या विचारांवर नक्कीच लक्ष देईल असेही ते म्हणाले. 

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...