
वृत्तांत:
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : कुणाचा वैरी कुणाचा कैवारी?" हा परिसंवाद ३१ आक्टोबरला मुंबई येथे "रोखठोक" दिवाळी अंकाच्या प्रकाशनानिमित्त झाला. यात माझ्यासमवेतच माधव भंडारी, प्रमोद बापट, ज्ञानेश महाराव, प्रा, नम्रता गणेरी यांचा सहभाग होता तर चंद्रकांत वानखेडे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात गणेरी यांनी रा. स्व. वरील महिला सहभागाबद्दलच्या प्रकल्पाच्या निमित्ताने आलेले अनुभव विषद केले व रा. स्व. संघ स्त्रीयांच्या दुय्यमत्वाला प्राधान्य देतो असे नमूद केले. बापट व भंडारी यांनी रा. स्व. संघ वाढत आहे, संघाला समजावुन घ्यायचे तर संघात काही काळ तरी प्रवेश करायला हवा, संघ आदिवासी-वंचित यासाठी अविरत कार्य करतो पण प्रसिद्धीच्या मागे पडत नाही वगैरे विवेचन केले. माझ्या भाषणातील ठळक मुद्दे:
१. रा. स्व. संघ हिंदुत्ववादी नसून "वैदिकवादी" आहे. वैदिकांचा धर्म नेहमीच वेगळा होता व आहे...त्याला अवैदिक हिंदुंचा पाठिंबा मिळु शकत नाही.
२. संघ वाढला याचे कारण मुस्लिम/ख्रिस्त्यांबद्दल निर्माण केलेली काल्पनिक भिती आहे. काल्पनिक शत्रु असल्याखेरीज संघटन होत नाही हे मानसशास्त्र संघाला चांगले माहित आहे.
३. हिटलर हे संघाचे आदर्श राहिले आहे. गोळवलकर गुरुजींचे "विचारधन" संघाचे बायबल आहे. ते हिटलरला आदर्श मानतात. (We, or our Nation defined)
४. पण त्याच वेळीस गंमत म्हणजे संघाला ज्यु सुद्धा प्रिय आहेत कारण त्यांचा मुस्लिमांशी सातत्यपुर्वक चालत असलेला संघर्ष. एकीकडे हिटलरही प्रिय व दुसरीकडे ज्युही प्रिय यात संघाचा वैचारिक व्यभिचार दिसून येतो.
५. आर्य सिद्धांत संघाने सोडला नाही. आता फरक एवढाच केलाय कि आर्य भारतातुन जगभर गेले. आर्य वंशवादातुन हे बाहेर मात्र पडत नाहीत. वैदिक हेच आर्य अशी त्यांची मान्यता असल्याने वेद व संस्कृत हे त्यांचे पंचप्राण आहेत व त्यांच्या दृष्टीने तीच भारतीय संस्कृतीचा मुलाधार आहे. सरस्वती पुजनाबद्दल ते आग्रही असतात कारण वेद हे सरस्वतीकाठी लिहिले गेले अशी त्यांची मान्यता आहे.
६. सरस्वती नदी नेमकी कुठली याचा अजून तपास लागायचा आहे. वेद हे सनपूर्व आठव्या शतकापार झालेले नाहीत कारण वेदांत झरथुष्ट्रच किमान तीनदा डोकावतो. ॠग्वेदाची मुळ भाषा संस्कृत (वैदिक संस्कृत) असुच शकत नाही कारण प्राकृतातुन संस्कृत कशी क्रमशा: विकसीत झाली याचे भाषिक पुरावे सनपुर्व तिसरे शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळातील उपलब्ध आहेत. ही भाषाही विकसीत केली ती बौद्धांनी...वैदिकांनी नव्हे. तेंव्हा वेदांची मुळ भाषा ही व्रचदा सिंधी अथवा गांधारी होती एवढेच म्हणता येईल. परंतु भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या खुळातुन या कल्पना गुप्त काळात विकसीत केल्या गेल्या.
७. वैदिकजनांना पुष्यमित्र शृंगाबाबत भलतेच प्रेम असते पण प्रत्यक्ष पुरावे सांगतात कि तो आणि त्याचे वंशज प्राकृताचाच वापर करत होते.... कारण संस्कृत अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे भ्रमित लोकांनी चालवलेले भ्रमसत्र एवढेच संघाचे वर्णण करता येईल.
८. कोणतीही विचारधारा असो...खरी कि खोटी...पण तत्वज्ञान लागतेच. संघाकडे एके काळी गोळवलकर, एकात्म मानवतावाद मांडणारे दिनदयाळ उपाध्याय वगैरे लोक होते. मुखवटा केले गेलेले वाजपेयींनी समाजवादी गांधीवाद मांडला होता. दत्तोपंत ठेंगडी, बिंदुमाधव जोशी वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रांत संघ विचारांना नवे बळ देत होते. परंतु अलीकडे संघाची वैचारिक पातळी खालावली असून "आपण कोठे आहोत?" हे त्यांनाच समजत नाही हे सरसंघचालकांच्याच वक्तव्यांवरुन दिसते.
९. आम्ही संघाचे वैरी नाहीत. किंबहुना म. फुलेंची "एकमय समाज" व बाबासाहेबांची "सामाजिक लोकशाही" संकल्पना आम्हाला कोणाचेही वैरी होऊ देत नाही वा आम्ही कोणालाही वैरी मानत नाही. मनमुक्त विचारस्वातंत्र्याचे आम्ही पुजारी आहोत. शाखा आणि बौद्धिकांमुळे मुक्त विचारक समाज घडू शकत नाही....तर बौद्धिक क्लोन निर्माण होतात. आम्हाला सहप्रवासी हवेत...अनुयायी नकोत.
१०. जे संघ करतो त्याचीच फलस्रुती म्हणजे ब्राह्मणद्वेष्ट्या बामसेफ वा मराठा सेवा संघ यासारख्या संघटना उदयाला येतात. तुमची "समरसता" एक ढोंग आहे. लोकांची अस्मिता जेथे जागी नाही तेथेच घुसणे हे संघाचे सध्याचे कार्य आहे. मंडलोत्तर काळात ओबीसींना आत्मभान यायला सुरुवात झाली. तरी ओबीसी हा संघाचा मुलाधार बनवण्याचा प्रयत्न होतो. ओबीसी कधीच वौइदिक नव्हते त्यामुळे त्यांचे वैदिकीकरण करता येणे या देशात असंभाव्य आहे कारण वास्तव काय...आमचा धर्म काय याचे भान आम्हाला आले आहे.
११. संघाने आपली वैदिकवादी भुमिका बदलावी...नवेच वैश्विक तत्वज्ञान घेऊन पुढे चालावे. पण सध्या तरी संघाचा वैचारिक मृत्यू झाला आहे असेच चित्र आहे.
यानंतर ज्ञानेश महारावांचे भाषण झाले. चंद्रकांत वानखेडे यांने अत्यंत समर्पक शेवट केला. ते म्हणाले, भारतात मुस्लिमांनी सातशे वर्ष राज्य केले...त्यांना हा देश इस्लाममय करता आला नाही...इंग्रजांनी दिड-दोनशे वर्ष राज्य केले...त्यांना हा देश ख्रिस्तमय करता आला नाही...तेंव्हा इस्लामची भिती दाखवुन संघाने आम्हाला घाबरवायचे कारण नाही.