Wednesday, January 1, 2014

सार्थ कि निरर्थ?


"जीवनाचे सार्थक झाले.", "जीवन सार्थकी लावावे" किंवा "जीवन निरर्थक आहे..." अशा स्वरुपाची वाक्ये आपण ऐकत असतो...वापरत असतो. किंबहुना तत्वज्ञानात याबद्दल बराच उहापोह झालेला आहे व त्यांच्या शाखोपशाखाही झालेल्या आहेत. सार्थकता आणि निरर्थकता या केवळ बौद्धिक मनोरंजनासाठी चर्चिल्या जाणा-या बाबी नसून त्यांचा खरेच जीवनाशी संबंध आहे काय हा खरा प्रश्न आहे.

अधिकांश लोक जीवनाला अर्थ देण्यासाठी धडपडत असतात. निरर्थवादी लोक जीवनात ठाम असा अर्थ असण्याचे नाकारत असतात. किंवा "अर्थ आहेही आणि नाहीही" अशी भूमिकाही काही घेतांना आढळतात. "अर्थ" ही एक भावनात्मक संज्ञा आहे. अर्थ म्हणजे जीवनाचे जे काही आकलन झाले आहे वा करावयाचे आहे त्यातून निर्माण होना-या सकारात्मक अथवा नकारात्मक निचोडी भावनेला "सार्थ" अथवा "निरर्थ" असे म्हणता येईल. एका बाजुने ही भावना उपयुक्ततावादाकडे झुकल्याचे आपल्याला दिसून येईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीतून काही अर्थ काढण्याचा हव्यासच मुळात का असतो या प्रश्नाचे उत्तर, कारण त्यामुळे मानसिक समाधान मिळते असे वरकरणी मिळेल. उदा. आपण मैत्रीतून, प्रेमसंबंधातून ते दैनंदिन व्यावसायिक कार्यांतुन ते धार्मिक-आध्यात्मिक कार्यांतून निर्माण होणा-या मानसिक समाधान अथवा असमाधान याच्या एकुणातील गोळाबेरजेला अनुलक्षून सार्थ अथवा निरर्थ अशी संज्ञा देतो. या संज्ञा तात्कालिकही असू शकतात तशाच जीवनाच्या गतकालातील एकुणातील अनुभवांवरही अवलंबुन असतात असेही आपल्या लक्षात येईल.

जीवनाला अर्थ असतो वा नसतो असे त्रयस्थ चिंतकाने सांगणे व तशा बाह्य तत्वज्ञानांच्या आधारे आपापली सार्थकता ठरवणे ही एक सर्वसाधारण बाब झाली. समजा ती व्यक्तीपरत्वे स्वतंत्र शोधातून आलेली भावना असे म्हटले तरीही सार्थकतेला अथवा निरर्थकतेला "स्वतंत्र" असे आस्तित्व आहे काय?

ज्या बाबींमुळे ही भावना निर्माण होते त्याच मुळी परजीवी असतात व त्यावर कोनाचेही पुरेपूर व्यक्तिगत नियंत्रण नसते. सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व्यवस्था या समूहनिर्मित असतात. परस्पर व्यक्तिघटकांच्या आपापसातील अनंत व्यवहारांतून, विचारांतून समाज नांवाचा एक अवाढव्य पण अजागळ प्राणी निर्माण होत असतो. प्राण्यअला जसे असंख्य अवयव असतात त्याप्रमाणे या अजागळ समाजघटकांतही वेगवेगळ्या विचारधारांचे, आर्थिक व सामाजिक स्तरांचे विविध अवयव असतात. ते परस्परावलंबी असले तरी त्यांचे वेगळेपण असतेच. हे अवयव परस्परांशी कधी सुसंबब्ध तर कधी कलहशील असतात. अशा समाजाय समजा क्ष बिंदुवर असलेला माणुस व त्याचे भान आणि य ठिकाणी उभ्या असलेला माणुस व त्याचे भान वेगळे असनार हे नक्कीच. अशा परिस्थितीत ज्या गोष्टी "क्ष"ला सार्थ वाटतील त्याच गोष्टी "य" ला सार्थ वाटतील असे नाही.

म्हनजे सार्थकतेचे व निरर्थकतेचे भान हे सापेक्ष आहे व ते ठरवणारी परिस्थिती "क्ष" अथवा "य" च्याही हातात नाही. असे असले तरी आहे त्या परिस्थितीला घडवण्यात त्याचा दुरान्वयाने का होईना वाटा आहेच. या दुरान्वयाच्या वाट्याचे भान त्याला असेलच असे नाही. पण तो एकुणातील परिस्थितीचा कोनत्या ना कोणत्या अर्थाने भागीदार असतोच.

शिवाय काय सार्थ आणि काय निरर्थ हे तो कसे ठरवतो?

येथे हे समजावून घेतले पाहिजे कि मुळात सार्थता मुळात अस्तित्वात नसते त्यामुळे निरर्थकताही अस्तित्वात नसते, तर ही एक कृत्रीम भावनिक संकल्पना आहे. "मी काय केले अथवा मी काय साध्य केले तर माझे जीवन सार्थ होइल?" असा प्रश्न जेंव्हा येतो तेंव्हा व्यक्ती बाह्य संस्कारांतून येणा-या वैचारिक/भावनिक मापदंडाशी आपल्या व्यक्तिगत सार्थकतेच्या भावनेशी जोडत असतो असे आपल्या लक्षात येईल. व्यक्ती बाह्य संस्कारांना आपले स्वाभाविक वैचारिक मापदंड जोडनार नाही असे नाही, पण मुळात सार्थकता अस्तित्वात असते काय?

यच्चयावत विश्वातील घटनांतून माणुस अर्थ काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्या अर्थाने विश्वात अगणित अर्थ भरलेले आहेत. पण वैश्विक घटनेत अर्थ शोधला तर मानवासाठी तो उपयुक्ततावाद असला तरी मुळात घटनांत अर्थ आहे असे मानले तर प्रत्येक घटनेत हेतुबद्धता असल्याचा आभास तयार होईल. अर्थ घटनांत नसतो तर माणुस अर्थ देतो वा द्यायचा प्रयत्न करतो म्हणून त्याच्या सापेक्षतेतून घटनांना अर्थ येईल...पुन्हा व्यक्तिपरत्वे काढलेला अर्थही वेगळा असेल!

सामाजिक जीवनपद्धती, विचारसरणी, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था ही सातत्याने बदलत असते. या बाह्य परिस्थित्या जसजशा बदलतात तसतसे जीवनमुल्यांमद्धे, जीवनादर्शांमद्धे व जीवनधेयांमधेही बदल घडत जातो. म्हणजेच सार्थतेचे मापदंदही बदलत जातात असे आपण मानवी समाजशास्त्रीय इतिहासाकडे थोडी जरी नजर टाकली तरी लक्षात येईल. उदा. भारतात जागतिकीकरण येण्यापुर्वी एकंदरीत असलेली सार्थतेची कल्पना आणि आताची कल्पना यात महदंतर पडल्याचे लक्षात येईल.

जीवनातील सार्थकता स्थायी नाही म्हणून निरर्थकताही स्थायी नाही. ती केवळ बाह्य मापदंडांनी बदलत असलेली मानवी "भावना" आहे. प्रत्यक्षात जीवन सार्थही नाही कि निरर्थही नाही.  

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...