Wednesday, January 1, 2014

सार्थ कि निरर्थ?


"जीवनाचे सार्थक झाले.", "जीवन सार्थकी लावावे" किंवा "जीवन निरर्थक आहे..." अशा स्वरुपाची वाक्ये आपण ऐकत असतो...वापरत असतो. किंबहुना तत्वज्ञानात याबद्दल बराच उहापोह झालेला आहे व त्यांच्या शाखोपशाखाही झालेल्या आहेत. सार्थकता आणि निरर्थकता या केवळ बौद्धिक मनोरंजनासाठी चर्चिल्या जाणा-या बाबी नसून त्यांचा खरेच जीवनाशी संबंध आहे काय हा खरा प्रश्न आहे.

अधिकांश लोक जीवनाला अर्थ देण्यासाठी धडपडत असतात. निरर्थवादी लोक जीवनात ठाम असा अर्थ असण्याचे नाकारत असतात. किंवा "अर्थ आहेही आणि नाहीही" अशी भूमिकाही काही घेतांना आढळतात. "अर्थ" ही एक भावनात्मक संज्ञा आहे. अर्थ म्हणजे जीवनाचे जे काही आकलन झाले आहे वा करावयाचे आहे त्यातून निर्माण होना-या सकारात्मक अथवा नकारात्मक निचोडी भावनेला "सार्थ" अथवा "निरर्थ" असे म्हणता येईल. एका बाजुने ही भावना उपयुक्ततावादाकडे झुकल्याचे आपल्याला दिसून येईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीतून काही अर्थ काढण्याचा हव्यासच मुळात का असतो या प्रश्नाचे उत्तर, कारण त्यामुळे मानसिक समाधान मिळते असे वरकरणी मिळेल. उदा. आपण मैत्रीतून, प्रेमसंबंधातून ते दैनंदिन व्यावसायिक कार्यांतुन ते धार्मिक-आध्यात्मिक कार्यांतून निर्माण होणा-या मानसिक समाधान अथवा असमाधान याच्या एकुणातील गोळाबेरजेला अनुलक्षून सार्थ अथवा निरर्थ अशी संज्ञा देतो. या संज्ञा तात्कालिकही असू शकतात तशाच जीवनाच्या गतकालातील एकुणातील अनुभवांवरही अवलंबुन असतात असेही आपल्या लक्षात येईल.

जीवनाला अर्थ असतो वा नसतो असे त्रयस्थ चिंतकाने सांगणे व तशा बाह्य तत्वज्ञानांच्या आधारे आपापली सार्थकता ठरवणे ही एक सर्वसाधारण बाब झाली. समजा ती व्यक्तीपरत्वे स्वतंत्र शोधातून आलेली भावना असे म्हटले तरीही सार्थकतेला अथवा निरर्थकतेला "स्वतंत्र" असे आस्तित्व आहे काय?

ज्या बाबींमुळे ही भावना निर्माण होते त्याच मुळी परजीवी असतात व त्यावर कोनाचेही पुरेपूर व्यक्तिगत नियंत्रण नसते. सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व्यवस्था या समूहनिर्मित असतात. परस्पर व्यक्तिघटकांच्या आपापसातील अनंत व्यवहारांतून, विचारांतून समाज नांवाचा एक अवाढव्य पण अजागळ प्राणी निर्माण होत असतो. प्राण्यअला जसे असंख्य अवयव असतात त्याप्रमाणे या अजागळ समाजघटकांतही वेगवेगळ्या विचारधारांचे, आर्थिक व सामाजिक स्तरांचे विविध अवयव असतात. ते परस्परावलंबी असले तरी त्यांचे वेगळेपण असतेच. हे अवयव परस्परांशी कधी सुसंबब्ध तर कधी कलहशील असतात. अशा समाजाय समजा क्ष बिंदुवर असलेला माणुस व त्याचे भान आणि य ठिकाणी उभ्या असलेला माणुस व त्याचे भान वेगळे असनार हे नक्कीच. अशा परिस्थितीत ज्या गोष्टी "क्ष"ला सार्थ वाटतील त्याच गोष्टी "य" ला सार्थ वाटतील असे नाही.

म्हनजे सार्थकतेचे व निरर्थकतेचे भान हे सापेक्ष आहे व ते ठरवणारी परिस्थिती "क्ष" अथवा "य" च्याही हातात नाही. असे असले तरी आहे त्या परिस्थितीला घडवण्यात त्याचा दुरान्वयाने का होईना वाटा आहेच. या दुरान्वयाच्या वाट्याचे भान त्याला असेलच असे नाही. पण तो एकुणातील परिस्थितीचा कोनत्या ना कोणत्या अर्थाने भागीदार असतोच.

शिवाय काय सार्थ आणि काय निरर्थ हे तो कसे ठरवतो?

येथे हे समजावून घेतले पाहिजे कि मुळात सार्थता मुळात अस्तित्वात नसते त्यामुळे निरर्थकताही अस्तित्वात नसते, तर ही एक कृत्रीम भावनिक संकल्पना आहे. "मी काय केले अथवा मी काय साध्य केले तर माझे जीवन सार्थ होइल?" असा प्रश्न जेंव्हा येतो तेंव्हा व्यक्ती बाह्य संस्कारांतून येणा-या वैचारिक/भावनिक मापदंडाशी आपल्या व्यक्तिगत सार्थकतेच्या भावनेशी जोडत असतो असे आपल्या लक्षात येईल. व्यक्ती बाह्य संस्कारांना आपले स्वाभाविक वैचारिक मापदंड जोडनार नाही असे नाही, पण मुळात सार्थकता अस्तित्वात असते काय?

यच्चयावत विश्वातील घटनांतून माणुस अर्थ काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्या अर्थाने विश्वात अगणित अर्थ भरलेले आहेत. पण वैश्विक घटनेत अर्थ शोधला तर मानवासाठी तो उपयुक्ततावाद असला तरी मुळात घटनांत अर्थ आहे असे मानले तर प्रत्येक घटनेत हेतुबद्धता असल्याचा आभास तयार होईल. अर्थ घटनांत नसतो तर माणुस अर्थ देतो वा द्यायचा प्रयत्न करतो म्हणून त्याच्या सापेक्षतेतून घटनांना अर्थ येईल...पुन्हा व्यक्तिपरत्वे काढलेला अर्थही वेगळा असेल!

सामाजिक जीवनपद्धती, विचारसरणी, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था ही सातत्याने बदलत असते. या बाह्य परिस्थित्या जसजशा बदलतात तसतसे जीवनमुल्यांमद्धे, जीवनादर्शांमद्धे व जीवनधेयांमधेही बदल घडत जातो. म्हणजेच सार्थतेचे मापदंदही बदलत जातात असे आपण मानवी समाजशास्त्रीय इतिहासाकडे थोडी जरी नजर टाकली तरी लक्षात येईल. उदा. भारतात जागतिकीकरण येण्यापुर्वी एकंदरीत असलेली सार्थतेची कल्पना आणि आताची कल्पना यात महदंतर पडल्याचे लक्षात येईल.

जीवनातील सार्थकता स्थायी नाही म्हणून निरर्थकताही स्थायी नाही. ती केवळ बाह्य मापदंडांनी बदलत असलेली मानवी "भावना" आहे. प्रत्यक्षात जीवन सार्थही नाही कि निरर्थही नाही.  

17 comments:

  1. संजय सर ,
    प्रश्न सार्थक निरर्थक पेक्षा शास्वत आणि अशास्वत असा आहे
    आपला लेख विचार चक्राला गती देणारा आणि अंतर्मुख करणारा असा आहे
    भौतिक दृष्ट्या आपण म्हणता त्या प्रमाणे सार्थक आणि निरर्थक हे शब्द काल सापेक्ष म्हणण्यापेक्षा ज्ञानसापेक्ष आहेत असे म्हटले तर योग्य होईल का ?
    त्यालाही एक चौथी मिती आहे का ?
    कारण आत्ता या क्षणाला आपण कांद्याचे भाव किंवा एह आय व्ही किंवा ज्ञानेश्वरीतील कूट स्थळे किंवा भारत पाकिस्तान तणाव असे विषय बोलत आहोत आणि नियती हसते आहे कारण - नियतीला माहित आहे की १०० प्रकाशवर्षे दूर असलेला एक प्रचंड ग्रह तारा किंवा धूमकेतू दहा वर्षांनी पृथ्वीच्या चिंधड्या करणार आणि हे प्रश्न अत्यंत क्षणिक आहेत -
    याजागी नियती च्या ऐवजी समजुतीसाठी असे म्हणू की जगात एक सामान्य जग आहे आणि एक संशोधकांचे जग आहे आणि त्याना हे माहिती आहे पण सामान्य लोकाना हे माहित नाही की असे नजिकच्या भविष्यात घडणार आहे - तर मग ?
    मग सार्थ आणि निरर्थक याची परिमाणेच बदलतात - नाही का ?

    जसे पारमार्थिक जगात माया शब्द वापरून सगळ्या भौतिक जगाची किंमत केली जाते तसेच विश्वाचा हा प्रचंड आवाका पाहिल्यावर आपले आपणच दिग्मूढ होत जातो - शास्त्रज्ञ आणि त्यांची आकडेमोड आणि विश्वाचे वय आणि माणसाचे वय - त्याच्या संस्कृती चे वय वगैरे पाहिले की हिमयुगे,खंड उपखंड आणि त्यांची हालचाल -धूमकेतू इत्यादी सर्व पाहिले आणि एकीकडे माणसाची माणुसकी आणि सदैव आदिमानवा पासून निसर्गाशी लढायची वृत्ती पाहिली की मनात येते की जगाच्या कल्याणासाठी एडीसनने शोध लावले का स्वतःच्या समाधानासाठी-स्वार्थासाठी ?
    मग मनात येते तेनसिंग ने हिमालय चढायचाच नाही का ?
    लुई पाश्चरने लस शोधायचीच नाही का ?
    वस्तूंची देवाण घेवाण करण्याच्या व्यवस्थेपासून आपण आज नोटांच्या विनिमयात आलो आहोत
    ते कशामुळे - सगळे संत महात्मे आले आणि गेले ,सगळे शास्त्रज्ञ आले आणि गेले ,कोणाचा हातभार या मानवी संस्कृतीत किती - माणुसकीला पुढे नेणारे खरे कोण हा चर्चेचाच मुद्दा राहील
    एखादा येशु किंवा कृष्ण झालाच नसता किंवा एखादा बुद्ध किंवा कन्फ़्युशियस घडलाच नसता तर मानव जातीचे काय बिघडले असते ?
    आणि
    एखादा एडिसन किंवा चरक अथवा न्यूटन आइन्स्ताइन अथवा मादाम क्युरी जन्मलीच नसती तर ? हे विश्व समजायला कोणाची खरी मदत झाली ?
    मानवजात वाचवण्याचे श्रेय कोणाकडे जाते ?
    जगाला दुसऱ्या महायुद्धात लोटणारा आर्यपुत्र हिटलर येशुचाच अनुयायी होता ना ? आणि
    म गांधीना गोळी घालणारा तथाकथित आर्यपुत्रच होता ना ?
    हे सर्व मुद्दे विलक्षण आहेत - कारण सार्थकता आणि निरर्थकता ही आदर्श जीवनमूल्ये काय याच्याशी निगडीत आहे का मानवाच्या अस्तित्वाच्या लढ्याशी -गरजांशी निगडीत आहेत ?
    प्रश्न सार्थक निरर्थक पेक्षा शास्वत आणि अशास्वत असा आहे का ?
    शाश्वत असे काहीच नाही असे म्हणताना एकीकडे असेपण वाटू लागते की पंच महाभूते शाश्वत आहेत ,जीवन शाश्वत आहे , मग ते अमिबाच्या रुपात असेल किंवा माणसाच्या - आज लाव्हाच्या रसात सुद्धा सूक्ष्म जीवांच्या खुणा सापडत आहेत असे दिसते -
    हे पुरावे जीव तगण्याचे जिवंत पणाचे -निसर्गाचे सामर्थ्य दाखवते -
    इथे देव धर्म यांचा काहीच संबंध नाही
    -देवाला शिव्या दिल्यात तरी तो तुम्हाला क्षमा करतो ही कल्पना - फ्यांटसी अशीच एक प्रचंड अडथळा आहे -मानवी मन म्हणा किंवा बुद्धी म्हणा - देव हि कल्पना जन्माला आली हि माणसाच्या मनाची आणि मेंदूची शोकांतिका आहे असे म्हणावेसे वाटते !

    ReplyDelete
    Replies
    1. थोडक्यात उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो...

      १) सार्थ आणि निरर्थ ही जशी भावना आहे तसेच शाश्वततेच्या बाबतीत म्हणता येते...कारण यच्चयावत विश्वात काहीच स्थिर नाही...अगदी भौतिक दृष्ट्या पाहिले तर आपनही नाही...उदा. २० मैल प्रतिसेकंद वेगाने आपण पृथ्वीबरोबर स्वांग प्ररिभ्रमण करतो...त्यच वेळी सुर्याभोवती २०० किमि वेगाने सुर्यपरिक्रमा करतो आणि त्याच वेळी सुर्यासोबत सर्व ग्रहांचे हे लटांबर आकाशगंगेच्या केंद्रबिंदुभोवती अचाट वेगाने धावते. एकाच वेळीस आपल्याला तीन गती आहेत. तरी विश्व शाश्वत आहे काय?

      २. आजवरचे बुद्ध, येशु, वैदिक ऋचाकर्ते ऋषी अथवा अन्य सारे तत्वज्ञ भविष्याचा नीट वेध घेऊ शकले काय? याचे उत्तर नाही असेच आहे. "का?" या प्रश्नाचे उत्तर आपण चर्चा करुन शोधुयात!

      ३. देव आहे कि नाही? याचे ठाम उत्तर असू शकत नाही कारण शेवटी तो सध्या तरी श्रद्धेचा प्रश्न आहे. उत्तर आपल्याला मिळेल का? ...अशाश्वतता यथेच येते...कारण उत्तर मिळेही शकेल किंवा मिळनारही नाही...तो असेल अथवा असणारही नाही...

      मग काय?

      Delete
  2. सर ,
    आपले अभिनंदन करावेसे वाटते कारण आम्हालाही या चर्चेत समावेश करून घ्यावे अशी आमची इच्छा आहे कारण आम्हालाही थोडस सुचतय आणि मांडावस वाटतंय
    तुम्ही शेवटी लिहिल आहे ते बघा - जीवनमूल्ये जीवनआदर्श आणि जीवनध्येय अशी चर्चा करताना आम्हाला आगरकर आणि म फुले आठवतात त्यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले त्यांचे ध्येय तसे होते त्यांचे आदर्श तसे होते पण आज पतंगराव , कराड आणि नवलेना आपण सांगितले की ५०- १०० वर्षापूर्वी असे लोक ध्येयवाद म्हणून आपले जीवन ओवाळून टाकत असत तर त्यांचे मत काय असेल ?
    "त्यांचे फोटो लावा आणि हार घाला हवे तर , पण आम्ही तसे वागू शकत नाही !" ही आजकालच्या सामाजिक बांधिलकीच्या गप्पा मारणाऱ्या लोकांची खरी ओळख आहे -साधारणपणे समाज सुधारणा होताना जे,सामाजिक चळवळीचे आधारस्तंभ असतात त्यांच्या नंतर ती जागा धंदेवाईक लोकांनी घेतल्यामुळे आज समाजमन व्यथित झाले आहे -सध्याचे आणि पूर्वीचे सामाजिक
    जीवन पद्धती ,विचारसरणी,राजकीय परिस्थिती बदलली आहे का ? हा विचार आपण मांडला आहे तो चर्चा करण्या योग्य आहे -
    एकेक मुद्दा घेतला तर
    स्त्रीमुक्ती आणि खालच्या जाती या बाबतीत सुधारणा आणि हक्कांची जाणीव वाढली आहे हे नक्की
    जीवन् पद्धती अधिक अधिक वेगवान आणित्याचवेळी "अशक्त" होत गेली आहे
    आणि विचारसरणी म्हणाल तर विचार करण्याची सवयच समाजमनातून नष्ट होत आहे कि काय अशी भीती वाटते अशी परिस्थिती दिसते
    राजकीय परिस्थिती दोलायमान होत चालली आहे गुड गव्हर्नन्स हा प्रकार इतिहासजमा झाला आहे आणि भ्रष्टाचाराने समाज व्यवस्था किडली आहे पण एकीकडे त्याविरुद्ध आंदोलने उभी रहात आहेत केजरीवाल हे एक मिथक उभे रहात आहे
    आता जीवनाला अर्थ असतो का हा मुद्दा पाहू या
    मानवी जीवन असे म्हणूया - नाहीतर कुणीतरी आप्पा बाप्पा लगेच विनोदाने म्हणतील - कोंबडीच्या जीवनाला अर्थ असतोच कि - माणसांच्या समोर नटून बसायचे - डिशमध्ये -हाच तो अर्थ ! सोरी आप्पा बाप्पा !
    विनोदाचा भाग सोडला तर असे दिसते - मानव हा समुहाने जगणारा प्राणी मानला तर त्याच्या समाज जीवनाला अर्थ आहे - पण टारझन सारखेच जगण्याचे ठरवले तर -? त्यांचेपण नियम असतील पण ते साधे जंगलाचे कायदे झाले - माणसाचा मेंदू होता म्हणून तर टारझन हा टारझन म्हटला जातो !
    भौतिक सुख सुविधांशी समाजमन आणि स्वास्थ्य निगडीत आहे असे मानले तर सुखाचे अपचन होणारा समाज आहेच -आणि दुःख - असहिष्णू सुविधांचे वितरण याविरुद्ध उभा रहाणारा समाजवादी विचार पण आहेच
    प्रत्येक समाज घटक हा त्याच्या आवाक्याप्रमाणे उमजलेल्या शाश्वत सुखाच्या पाठीमागे धावत असतो आणि त्याची सार्थकता आणि निरर्थकता काळ च ठरवतो ! पण त्यासाठी राजकीय आणि वैचारिक स्वातन्त्र्य ही मुलभूत गरज आहे
    गुलामी वृत्ती हि समाजमनाला लागलेली कीड आहे
    एका बंद खोलीत आईने मुलाला जन्म दिला दुध दिले आसरा दिला पण भाषा नाही दिली तर ?
    एका कामगाराला दुध दिले नोकरी दिली पण हक्क नाही दिले तर ?
    एखाद्या स्त्रीने सौभाग्य जपले पण ते सौभाग्य तिच्या शीलाचे रक्षण नाही करू शकले तर ?विवेकानंदांचे , बाबा आमटे यांचे , किंवा गाडगे महाराज यांचे आयुष्य सार्थकी लागले की नाही हे कुणी ठरवायचे ?प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन करण्याचा आपला अधिकारच आपण राजकारण आणि राजकीय व्यवस्थेच्या आधीन केला तर हाहाःकार माजेल - तो माजलाच आहे -
    साहित्य संमेलन असो वा गणपती उत्सव ,कुस्त्यांचा आखाडा असो वा बैलांची शर्यत , सामुहिक लग्ने असोत वा सामुहिक आरोग्य शिबिरे असोत - राजकीय व्यक्ती शक्ती आणि भक्ती शिवाय आपले पान हलत नाही - हि अवस्था फार गंभीर आहे - आणि देशाला निरोगी विचारांपासून दूर नेणारी आहे !
    अजून यावर खूप चर्चा होऊ शकते -पण लक्षात कोण घेतो ?
    गोरख

    ReplyDelete
    Replies
    1. Gorakh Bhau, uttav vichar karayala lavanyasarakhe vichar...yavar savistar charcha karuyat!

      Delete
  3. सर
    आपल्या ब्लोग वरच्या प्रतिक्रिया एकदम परिपक्व झाल्यासारखे वाटत आहे हि चर्चा करताना एक थोडीशी आग्रही विचार करण्याची उर्मी मनात येउन जाते
    जीवनाची सार्थकता आणि निरर्थकता ठरविण्याचा अट्टाहास कुणी लादला आहे का ?
    आपल्या परंपरांनी ?संस्कृतीने ? का शिक्षणाने?
    जीवनाची सार्थकता ठरवणे हा आपल्या शिक्षणाचा आणि संस्कारांचा सर्वोच्च आणि अंतिम सोहळा आहे का ?गृहस्थाश्रमानन्तरच्या वानप्रस्थाश्रमाची सुरवातच या प्रश्न चिन्हाने व्हावी का ?
    तू काय घेऊन आला होतास तेंव्हा ते गमावण्याचा इतका शोक करत आहेस हाच जर भग्वतगीतेचा सारांश असेल तर सार्थकता आणि निरर्थकतेची गणिते कोणत्या फुटपट्टीने मोजायची ?
    हा आढावा घेण्याचा अट्टाहास कशासाठी ?
    एखाद्या लाटेवर स्वार झाल्यासारखे जीवनावर स्वार होऊन जीवन जगताना त्या जीवना बद्दल प्रचंड प्रेमच निर्माण होते - भीती तर नाहीच आणि आसक्तीही नाही -आलेला क्षण सदासर्वदा कुठल्यातरी आणि कुणीतरी ठरवलेल्या व्याख्येत बसवून जगण्यात त्या निसर्गाचाच आपण एक प्रकारे अपमान नाही का करत ?
    का बळीचा बोकड शेवटी मरण ओळखल्यावर जसा निपचित उभा राहतो - अगदी निःस्तब्द - तसे आपण जन्मभर वावरायचे आणि जगायचे ?
    जीवन समजून न घेता जगणे हे पाप आहे आणि जीवन काय आहे ते समजल्यावर ते पूर्णार्थाने न जगणे हेहि तितकेच पाप आहे !

    ReplyDelete
    Replies
    1. सार्थकता लेखात म्हटल्याप्रमाणे मूळ बाह्य प्रेरना आहे, सामाजिक संदर्भातून निर्माण झाली आहे. खरे तर फक्त मनसोक्त जगत जावे...मूल्यमापनाच्या भानगडीत पडू नये...

      Delete
  4. ज्याची सुरवात आपल्या हातात नाही आणि शेवट माहित नाही असे एक गीत गायला आपण बसलो आहोत असा विचार केला तर मग त्या गाण्यात अर्थ शोधण्यापेक्षा ते समजून घेऊन गाणे जास्त रोमांचकारी असेल - नाही का ?-
    त्या गाण्याला भाषा आणि शब्दांच्या भिंती नसतील ,विकार आणि अहंकाराची मांडणी नसेल -वात्सल्य आणि मानवता यातून आलेल्या उत्स्फूर्त नादातून हे गीत फुलेल आणि कोटी कोटी निष्पाप जीवांना या विश्वाचे कोडे उलगडत हे गीत उमलत जाईल- बहरत जाईल
    त्याची सार्थकता आणि निरर्थकता ठरवणारे आपण कोण ?
    आपण तर फक्त निमित्तमात्र !

    ReplyDelete
  5. सर,
    पसायदान किंवा तुकोबांचे "हेचि दान देगा देवा" हे काय आहे
    हे सार्थकतेतूनच सुचलेले - देवाकडे मागितलेले मागणे - साकडे आहे का ?
    पसायदान हे अन्तः प्रेरणेतून आलेले नाही असे म्हणायचे का मग ?
    ज्ञानेश्वरांची किंवा तुकोबांची सार्थकता त्यांच्या शेवटच्या मागण्या तून प्रकट होते
    ज्ञानेश्वरी किंवा गाथा हा चिंतनाचा उघड आविष्कार आहे आपणच आपणासी केलेला संवाद आहे
    ज्याना जीवन कळले अशी ही थोर मंडळी जीवनाचे सार्थक झाले आता समाधी घेणे हेच योग्य असे जाहीर करून जीवन संपवतात आणि देवाकडे मागणे मागतात समाजजीवन आणि समाज् रूढी यांच्या जगण्याच्या आड येत नाहीत
    प्रत्यक्षात जीवन सार्थ आणि निरर्थक हि नाही असे कसे होऊ शकते ?
    आपणसामाजिक जीवनपद्धती, विचारसरणी, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था हीलिहिले आहे - " सातत्याने बदलत असते. या बाह्य परिस्थित्या जसजशा बदलतात तसतसे जीवनमुल्यांमद्धे, जीवनादर्शांमद्धे व जीवनधेयांमधेही बदल घडत जातो. म्हणजेच सार्थतेचे मापदंदही बदलत जातात असे आपण मानवी समाजशास्त्रीय इतिहासाकडे थोडी जरी नजर टाकली तरी लक्षात येईल.- "

    आता या संतांचे मापदंड कसे बदलणार ?त्यांनी विचारांची आणि चिंतनाची सर्वोच्च पातळी गाठली असेलआणि ते आत्मानंदात मग्न असतील तर गाथा बुडवली काय किंवा इंद्रायणीत तून वर आली काय त्याना सारखेच - सामाजिक जीवनपद्धती आणि मुल्ये याचे त्यांच्या सार्थकतेशी काहीच नाते नव्हते -पण हीच सार्थकता ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज किंवा संपूर्ण जीवन त्यात झोकून ,कैलास लेणे खोदणारा एखादा मूर्तिकार किंवा संगीत सम्राट तानसेन यांच्या बाबतीत बदलते हे खरे आहे

    ReplyDelete
    Replies
    1. एखाद्या सार्थक क्षणाशी जीवन संपते असेही नाही...सार्थतेची परिमाने बदलत जातात. म्हणजेच सार्थता आणि निरर्थकता दोन्हीही एका बिंदुवर लोप पावतात व उरते ते फक्त जगणे. मन:पुत जगणे मला जास्त महत्वाचे वाटते...सामाजिक संदर्भात बंदिस्त जीवन हे सार्थ-निरर्थाच्या मायाजालात फसवत राहील एवढेच. तुम्ही जी उदाहरणे दिलीत ती तुमची (म्हणजे बाह्य निरिक्षकांची) मते आहेत...प्रत्यक्षात त्या व्यक्तीला...उदा. ज्ञानेश्वर/बाजी प्रभु इ. त्याक्षणी नेमके काय वातत होते हे आपल्याला माहित होण्याची शक्यताही नसते.

      Delete
  6. सर्व प्रतिसाद देणाऱ्या लोकाना सांगावेसे वाटते
    की
    सध्या सासवड येथे साहित्य संमेलन चालू असल्यामुळे काही लोकांचे प्रतिसाद देणे थोडे थंडावले आहे
    लोकांनी अक्षर दिंडी किंवा शब्द पालखी इत्यादी प्रकारात भाग घ्यावा
    साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ मु शिंदे आपल्या भाषणात प्रसिद्ध दिवंगत लेखक आणि सर्वांचे लाडके,पुरोगामी चळवळ पुढे नेणारे नरेंद्र दाभोळकर याना श्रद्धांजली वाहण्यास विसरले असा गैरसमज करून घेऊ नये - महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकरी आणि कामकरी कुटुंबात आज रोज त्यांचे नाव घेतले जाते आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याची प्रतिज्ञा केली जाते
    फ मु शिंदे हे काही सनातनी नाहीत किंवा प्रोफेसरही नाहीत किंवा ब्राह्मणही नाहीत त्यामुळे तर ते अशी चूक करणेच शक्य नाही - ते हाडाचे शेतकरी आहेत . शेतकरी अशा चुका करत नाहीत
    शेतकरी नुसतेच शेत नांगरून बी पेरायचे विसरून पिकाला पाणी देईल का ?
    दिवंगत नेते दाभोळकरांचे नाव चुकून लिहायचे राहिले असेल किंवा त्याचा कच्चा मसुदा करताना कारकून ( जो नक्कीच सनातनी असणार ) किंवा
    त्यांचा सहाय्यक लिपिक ( जो नक्की ब्राह्मणच असणार ) त्यानेच ही मखलाशी केली असणार
    आपण त्या सर्वांचा निषेध करुया !
    मला आज प्रचंड मराठी प्रेम आले आहे पण विचार सुचत नाहीत आणि वाचायचा कंटाळा , भाषणाना
    बसायचा कंटाळा - आणि कुणाचे ऐकून घेण्याची सवयच नाही - मी पुस्तक प्रदर्शनात खूप पुस्तके घेणार आहे - मला सात वारांच्या कहाण्या वाचायला फार आवडतात मी संपूर्ण चातुर्मास घेणार आहे , तसेच स्वयंपाकघरातील चमत्कार असे संजय सोनावणी यांचे पुस्तक निघाले आहे आणि त्यांनी सिद्ध केले आहे - की चुलीचा शोध प्रथम मोहोन्जोदारो येथेच लागला - त्याना नुकतीच ४५०० वर्षा पूर्वीची करपलेली भाकरी सापडली आहे ती त्यांनी सासवड ला नेली आहे - आपल्या भाषणात ते ती सर्वाना दाखवणार आहेत - आणि जमल्यास शारद्जीना देणार आहेत -
    चला तर सास्वद्चा तो सोहळा बघायला !
    फाकरुद्दीन जमादार
    आलेक्झेंडर गायकवाड
    झुबेन

    ReplyDelete
    Replies
    1. ही भाकरी शैव पद्धतीने बनविली आहे की वैदिक पद्धतीने याविषयी सखोल संशोधन होणे गरजेचे आहे.

      Delete
  7. सर
    आपण लिहिले आहे "येथे हे समजावून घेतले पाहिजे कि मुळात सार्थता मुळात अस्तित्वात नसते - त्यामुळे निरर्थकताही अस्तित्वात नसते, तर ही एक कृत्रीम भावनिक संकल्पना आहे"हि कागदावर कल्पना आकर्षक असली तरी ती माणूस घडवायला फार घातक आहे -आणि देश बांधताना सुद्धा !
    सर -मला हे अजिबात पटत नाही
    तोफांचे आवाज आल्यानंतरच बाजीप्रभूने जीवन सार्थकी लागले असे समजून देह ठेवला -बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणाऱ्या दत्ताजी शिंदेची जीवनमूल्ये काय समजायची ?- दर ऑलिम्पिक ला जिवाचे रान करणारे खेळाडू - त्यांच्या निष्ठा आणि जिद्द कृत्रिम म्हणजे मग नैसर्गिक काहीच नाही का ?दहा दहा वर्ष सराव केल्यावर एखाद्या लढाईत जेंव्हा सैनिकाचा सराव त्याच्या उपयोगी पडतो आणि आपण लढाई जिंकतो -एखादा न्यूटन पडते सफरचंद बघतो आणि त्याच्या डोक्यात चक्र सुरु होते ते क्षण सार्थकी लागण्याचेच असतात !
    मायामोह आणि षड्रीपुवर विजय मिळवण्याचे भारतीय तत्व् ज्ञान आपल्याला एका विचित्र कोंडीत जखडून ठेवते आणि एक प्रकारचा मानसिक आणि सामाजिक सासुरवास सुरु होतो .सतत जीवनाची निरर्थकता मनावर बिम्बल्यामुळे भौतिक आव्हाने स्वीकारणे आपण गुन्हा समजतो - कारण सगळे नश्वर आहे !इहलोकात जगताना परलोकाची काळजी करत जगण्याची विकृती आपणात निर्माण होत रहाते -आणि त्रात्येक ऑफिसात गुरुवारला दत्त , मंगल्वाराला गणपती आणि सोमवारला शंकर असे चाळे अधिकृत ठरू लागतात -
    जीवन उत्तम जगण्यात जीवाची सार्थकता आहे -सिंहिणीने जर तिच्या छाव्याना "जीवनात काहीच सार्थक आणि निरर्थक नसते "असे सांगायला सुरवात केली तर ते नैसर्गिक ठरेल का ?
    "जे जे उत्तम उद्दात्त उन्नत महन मधुर ते ते "- जीवन सार्थकी लावणारेच असते आणि हीच निष्ठा जीवन आणि राष्ट्र घडवते .

    ReplyDelete
    Replies
    1. सार्थता निरर्थक नाही असेच तुम्हाला सुचवायचे आहे. माझा मुद्दा वेगळा आहे. सार्थता वाटणे हा मानवी भावनेचा भाग आहे. शिवाय त्याचे निश्चित असे मापदंड नाहीत. एकाला ज्यात सार्थ वाटते त्यात दुस-याला वाटेल असे नाही, या अर्थाने माझे विवेचन आहे. शिवाय एखाद्या सार्थक क्षणाशी जीवन संपते असेही नाही...सार्थतेची परिमाने बदलत जातात. म्हणजेच सार्थता आणि निरर्थकता दोन्हीही एका बिंदुवर लोप पावतात व उरते ते फक्त जगणे. मन:पुत जगणे मला जास्त महत्वाचे वाटते...सामाजिक संदर्भात बंदिस्त जीवन हे सार्थ-निरर्थाच्या मायाजालात फसवत राहील एवढेच. तुम्ही जी उदाहरणे दिलीत ती तुमची (म्हणजे बाह्य निरिक्षकांची) मते आहेत...प्रत्यक्षात त्या व्यक्तीला...उदा. ज्ञानेश्वर/बाजी प्रभु इ. त्याक्षणी नेमके काय वातत होते हे आपल्याला माहित होण्याची शक्यताही नसते.

      Delete
  8. एखाद्या कॅमे-याच्या zoom मधून बघण्यासारखे आहे. वर वर बघता एक निरर्थक उलाढाल वाटते. परंतू त्यांतील ताणतणावाचे अनुभव मग ते मानव समुहांचे वैयक्तिक असो वा सामुदायिक असो ते निसर्गातील गतिशिलतेची लक्षणे वाटतात. सार्थ /निरर्थ वाटणे हे मानवाच्या त्या त्या वेळच्या मन:स्थितीवर अवलंबून आहे. व्यक्तीसापेक्ष/किंवा समुह सापेक्षतेवरही अवलंबून आहे.ते चिरंतन आहेच असे नाही.ते परंपरा इतिहास,भीती अभिमान यांच्या व इतर माध्यमातूनही मानवी समुहांवर ठसविण्याचा प्रयत्न केला जातो. पण बाल/लहान वयातही बऱ्याच गोष्टी नित्य व्यवहारातून मग तो सामाजिक, आध्यात्मिक, आिार्थ्क ,सेवा करण्याच्या प्रवृत्तीतून असो वा जातीय अभिनिवेष पेरण्याचा असो अशी बरीच बाहय कारके तेच मानवी मनातील स्व:ची धारणा अशा बऱ्याच गोष्टीची सरमिसळ आहे. काही नाही. अभ्यास करावा शहाणे होण्याचा प्रयत्न करत रहावा. अनुभवाने परिपक्व होत रहावे बाकी काय. अभय वांद्रे,मुंबई.

    ReplyDelete
  9. संजय सोनवणी सर ,
    जीवनाचे सार्थक झाले असे आपण कधी म्हणतो ?फारच संकुचित मर्यादित अर्थाने आपण हा शब्द हल्ली वापरत असतो !
    मुलीचे चांगल्या ठिकाणी लग्न ठरले की वधुपिता म्हणतो - सार्थक झाले जन्माचे -
    मुलाने किंवा मुलीने चांगले मार्क मिळवले की आई वडील म्हणतात - देव पावला -
    रिटायर होतानाच्या निरोप समारंभात किंवा साठीशांत - सहस्त्र चंद्र दर्शनाच्या वेळी अशी वाक्ये कानावर येतात- आपल्याकडे अशा वाक्यांची आणि समारंभांची रेलचेल आहे
    बरेच वेळा सफल आणि सार्थक याचा गोंधळ होत असतो कारण फलाची अपेक्षा करत जगलेल्या जीवनात जीवन सफल झाले असे म्हणताना आपण जीवनाचे सार्थक झाले असे म्हणत असतो
    "जीवनात कर्म करत रहा पण फलाची अपेक्षा ठेवू नकोस -" हे वाक्य तर कुणीतरी
    भांडवलदाराने रचल्यासारखे वाटते -असो -

    लाखात एखादा असा असतो की त्याचे मापदंड वेगळे असतात - त्याच्या वेदना आणि आनंद वेगळे असतात त्याची जगण्याची व्याख्याच वेगळी असते अशांच्या जीवनाला सार्थकता येते ती लोकोत्तर कर्म केल्याने !-आपले जगणे आपण हवे तसे जगलो - यात काहीच कौतुक करण्यासारखे नाही ,आपण आई वडीलांनी पढवलेल्या मार्गावर निमुटपणे चालत रिटायर झालो - त्यातही विशेष काही नाही -पण आपण समाजासाठी मळलेली वाट सोडून जेंव्हा काहीतरी भरीव करत असताना काही प्रसंगी असे म्हणतो की जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते आहे - त्यावेळचा आनंद अगदी आयुष्य भरभरून जगल्याचा असतो
    पण हे वाक्य् पण सभा संमेलनात बोलायचे वाक्य वाटते कारण ,
    खरेतर आपण पूर्ण ताकतीने सर्व आयुष्य जगतच नाही - माणूस विशेषतः भारतीय किंवा आशियाई म्हणा ,वेळेचा फारच अपव्यय करत असतो. त्याच्या विचारात सातत्य नसते -आपली करमणूक ,आपले चिंतन,समस्या आणि चर्चा ,आवडीनिवडी अतिशय ठरीव आहेत -त्यामुळे आपण जीवनातच जर अर्थ भरायची टाळाटाळ करत जीवन जगत असलो तर संध्या समयाला आपण कसे म्हणू शकतो की जीवनाचे सार्थक झाले ?
    भारतीय तत्वज्ञानात आपल्या जगण्यालाच - जीवनालाच -पुरेसा मान दिलेला नाही ,कायम हा देह आणि हे जग क्षणभंगुर आहे असे सांगितले गेले तरी आपला जगण्याचा मोह कधी कमी होत नाही - आणि तो तसा होऊही नये - ते समाजाच्या आरोग्याला हितावह नाही पण या भौतिक जीवनाची ओढ बाळगणे हेच पाप असते असे काहीसे शिक्षण जर सांस्कृतिक संदर्भाने दिले गेले तर ?आपला तरुण आणि पुढची पिढी ही निरोगी मनाची आणि शरीराची असली पाहिजे ,पण आज सर्व प्रकारच्या विकृतीतून निर्माण होणारी कचकड्याची आयुष्ये आपल्या वाट्याला देण्याचा चंगच जणू आजच्या परिस्थितीने आपल्यावर लादला आहे
    त्याला जबाबदार कोण हा मुद्दा वादाचा आणि चर्चेचा असू शकतो हे पण तितकेच खरे आहे - ते तसे नेहमीच असते .- कारण चर्चा परंपरांच्या मुळापाशी येउन थांबते त्यावेळेस असे होणे अपरिहार्य असते .
    आपण निर्मळपणे ( आपली संस्कृती थोर आणि एकमेव आहे हा विचार तात्पुरता बाजूला ठेवत जर युरोपियन आणि अतिपूर्व देशांकडे नजर टाकली तर )असे दिसेल की सामाजिक मूल्ये ,आरोग्याच्या जाणीवा , राजकीय शिस्त याबाबत आपण अतिशय मागासलेले आहोत असेच खेदाने म्हणावे लागते .आणि त्यात बदल करण्याची आपल्यात इच्छाच नाही - त्यामुळे कोणत्याही प्रकारचा जिवंतपणा आपल्या समाजात नाही - कधीतरी दिसणारी आणि प्रसारमाध्यमांनी घडवून आणलेली खळबळ ही अल्पजीवी असते हे आपण नुकतेच पाहिले आहे
    शिक्षण खेळ आरोग्य , सामाजिक स्वच्छता या बाबतीत आज अतिशय निराशाजनक चित्र आहे- याला जबाबदार मागची पिढी असेल तर त्याना जीवन सार्थकी लागले असे म्हणण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही - जे काही लढे त्यांनी दिले असतील ते फक्त पगार वाढीसाठी होते , समाज परिवर्तनासाठी नव्हते - हेच आज मागची पिढी मूकपणे मान्य करत आहे ! त्यांचे आयुष्य देश घडवण्याच्या अर्थाने निरर्थक गेले असेच म्हटले पाहिजे !

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...