१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-मशिदीमधून नारा उठला...पंडितांनी इस्लाम स्विकारावा नाहीतर मरणाला तयार रहावे. (काश्मिर में अगर रेहना हैं...अल्ला हो अकबर कहना हैं! )आणि सुरु झाला एकच आकांत...शेकडो पंडित मारले गेले. काहींना जाहीरपणे फासावर लटकावले गेले. स्त्रीयांवर बलात्कार झाले आणि जवळपास साडेतीन लाख काश्मिरी पंडित एकाएकी देशातच शरणार्थी झाले. अब्रु गेली, संपत्ती गेली आणि शरणार्थी छावण्यांत त्यांना आश्रयाला धावावे लागले...जेथे साध्या मुलभूत सुविधाही नव्हत्या!
फारुक अब्दुल्लांनी, मुख्यमंत्री असून सा-या जबाबदा-या धुडकावल्या. जगमोहन नामक राज्यपालाच्या हाती सुव्यवस्थेच्या धुरा गेल्या. पण आकांत थांबायचे नांव घेत नव्हता. हुरियत आणि जम्मु-काश्मिर लिबरेशन फ्रंटने जिहाद पुकारला होता.
आता या घटनेला २४ वर्ष उलटुन गेली आहेत. म्हणजे एक पिढी गेली आहे. काश्मिर टाईम्सचे संपादक ओ. एन. कौल हे माझे मित्र होते. त्यांच्या तोंडून ऐकलेल्या अत्याचाराच्या कहान्या अंगावर काटे उभे करणा-या होत्या. आधी फारुक अब्दुल्ला आणि आता त्यांचे सुपुत्र काश्मिरची धुरा सांभाळत आहेत. पण अजुनही नि:ष्कासित झालेल्या पंडितांचा प्रश्न सुटलेला नाही. देशातच निर्वासित व्हावे लागणे याच्या वेदना कोणी नीट समजावून घेत नाही. हिंदुत्ववाद्यांना (पक्षी वैदिकवाद्यांना) लोकभावना भडकवायचे साधन मिळते यापार त्यांच्या दृष्टीने पंडितांचे अस्तित्व नाही.
त्यांना लगेच गुजरातचा नरसंहार आठवतो. आनंदाच्या उकळ्या फुटतात. पण या सा-यात "माणूस" मेला, बलात्कारीत झाला याची जाण आणि भान राहत नाही. या देशात सर्वांना आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. नरसंहाराची भूमिका असणा-यांना या व्यवस्थेत स्थान नाही...मग तो कोणीही असो.
काश्मिरी पंडितांच्या ससेहोलपटीबद्दल आमचे भान तसेच न्याय्य असले पाहिजे. आजही २४ वर्ष उलटुनही पंडितांना त्यांच्या भुमीत जायचे साहस होत नाही. त्यांनी जगायचे मार्ग शोधले असले तरी त्यांची त्या भुमीशी त्यांची नाळ जुळलेली आहे त्या भुमीतुन हाकलले गेले गेल्याचा शोक-संतप्त उद्गार अत्यंत स्वाभाविक आहे. "काश्मिरी पंडितांखेरीज काश्मिरचे सौंदर्य उणे आहे..." असे काश्मिरचे राज्यकर्ते म्हनत असतात...पण त्यातला प्रामाणिकपना किती यावरही विचार करायला हवा. काही पंडित काश्मिरला परतत आहेत हे खरे आहे...पण त्यांच्या कायमस्वरुपी संरक्षणाचे काय हा प्रश्न अनुत्तरीतच आहे!
