(Brahmi Inscription on Heliodorus' pillar)
मौर्य घराण्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याची हत्या करुन त्याचा सेनापती पुष्यमित्र शृंग इसपु १८४ मद्धे सत्तेवर आला. मौर्य घराण्याचे तत्पुर्वीचे सारे लेख प्राकृतात आहेत हे आपण पाहिले. शृंग घराणे हे वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणारे मानले जाते. त्याच्याच काळात मनुस्मृती लिहिली गेली तसेच त्याने दोन अश्वमेध यज्ञ केले असे म्हटले जाते. अशोकानंतरचे मौर्य राजे हे बौद्ध धर्मीय असल्याने त्यांचे शिलालेख प्राकृतात होते असे जरी गृहित धरले तर मग वैदिक धर्माचा समर्थक आणि प्रोत्साहनकर्ता आणि बौद्ध धर्माचा विरोधक पुष्य़मित्र शृंगाने तरी संस्कृताचा आश्रय घेतला असता. पण तसे दिसत नाही.
शृंग घराण्याने इसपू १८४ ते इसपु ७३ या कालात (जवळपास १११ वर्ष) राज्य केले. सम्राट अशोकाच्या निधनानंतर अवघ्या ५० वर्षात शृग घराणे सत्तेत आले. शृंग नेमके कोणत्या वंशाचे/जातीचे/वर्णाचे याबातचा तिढा विवादास्पद असला तरी भारतीय विद्वानांचे हे घराने ब्राह्मण होते असे साधारण मत दिसते. प्रस्तूत विषयाशी अर्थात त्याचा संबंध नसल्याने या विषयात फारसे जाण्याचे हशील नाही. परंतू अशोकानंतर अवघ्या ५० वर्षांत सत्तेवर आलेले आणि बौद्धधर्म विरोधी असलेल्या शृंग घराण्याच्या कालात किमान शृंगांनी जर अस्तित्वात असती तर संस्कृत भाषेचा उपयोग केला असता हे उघड आहे, मग जनभाषा काहीही असो.
येथे एक लक्षात घ्यायला हवे कि छ. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर आपल्या नाण्यांवर संस्कृतला स्थान दिले. एवढेच नव्हे तर राज्य व्यवहार कोशही संस्कृतात बनवून घेतला. प्रस्थापित फारसीला राजकीय दृष्ट्या नाकारले. शृंग बौद्धधर्मविरोधी असल्याने व वैदिकाभिमानी असल्याने त्यांची राजभाषा वैदिक संस्कृत असायला हवी होती. पुष्यमित्र शृंगाच्या कालात नसली तरी पुढील अग्नीमित्रापासुनच्या पिढीत तरी संस्कृत अवतरायला हवी होती. पण तसा एकही पुरावा मिळत नाही.
पुष्यमित्राच्या अश्वमेधांची माहिती मिलते ती अयोध्या येथे आणि पुराणांत. त्याने कोनतीही नाणी पाडलेली दिसत नाहीत कारण बहुदा त्याने राज्याभिषेक न करता आपले मुळची "सेनापती" हीच पदवी कायम ठेवली म्हणून.
पुष्यमित्रानंतर मालविकाग्निमित्र या कालिदासाच्या प्रसिद्ध नाटकाचा नायक अग्नीमित्र सत्तेवर आला. मथुरा विभागात त्याची नाणी सापडलेली आहेत. त्याची नाणी सर्वस्वी प्राकृत भाषेत असून त्यावर "अग्गीमितासा" असे अग्नीमित्राचे मुळचे नांव पंच केलेले आहे. हेही संस्कृतचे अस्तित्व नसल्याचा पुरावा आहे. कारण भाषा कोणतीही असो...नांवात कोणी बदल करत नाही अथवा नांवाचे भिन्नभाषित रुपांतरे वापरत नाही कारण लिपी एकच आहे व ती म्हनजे ब्राम्ही. ब्राह्मीत नंतरच्या काळात संस्कृत लेखही ब्राह्मी लिपीतच लिहिले गेलेले आहेत. म्हनजे ब्राह्मी लिपी व्यक्तिनांवाचे मूळ रुप (जे आपल्याला आज संस्कृतच मुळचे वाटते) लिपीबद्ध करायला कोणतीच अडचण नव्हती.
थोडक्यात "अग्गीमित" हेच मुळचे नांव असून अग्नीमित्र हे नंतरचे संस्कृतीकरण आहे हे उघड आहे. पुष्यमित्राचेही अयोद्ध्या लेखात नांव "पुस्समित सूग" असे आहे व त्याच्या वंशाला "सुगाना" असे म्हटले गेले आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. (कनिंगह्यम : Coins of India). शृंगांच्या काळातील असंख्य शिलालेख उपलब्ध झालेले आहेत, परंतू ते सर्व प्राकृतात आहेत. काही शब्द मात्र प्राकृताकदून संस्कारित होतांना दिसतात. उदा. अधित्थावना या प्राकृत शब्दाचे रुप अधिष्ठापना. अशी अनेक अर्ध-संस्कृत ते संस्कृत शब्दरुपे या कालात भारहूत, सांची येथील शूंगांच्या अखत्यारीत असलेल्या भागांत पहायला मिलतात...परंतु लेख प्राकृतात आहेत. (Epigraphical Hybrid Sanskrit: Th Damsteegt.)
दानभूती हा शृंग वंशातील राजा मानला जातो. कनिंगह्यमच्या मते तो शृंगांचा सामंत असावा. भारहूत येथे एका दानलेखात त्याचेच नांव "वच्छीपुत दानभूती" असे कोरलेले आहे. हे प्राकृतात आहे हे उघड आहे. भारहूत येथीलच एका लेखात "सुगाना राजे" असा शृंगांचा उल्लेख आहे.
या काळात संस्कृत राजभाषेतही होती याचा एकही पुरावा नाही. उदा. ग्रीक राजदूत हेलिओडोरस हा शृंगांच्या दरबारी इसपू ११० मद्धे होता. त्याचा शॄंगांची तत्कालीन राजधानी विदिशेजवळ एक गरुडस्तंभ आहे. त्याने तो पांचरात्र संप्रदायातील तत्कालीन पूज्य देवता वासुदेवाला अर्पण करण्यासाठी उभारला. (पहा: पांचरात्र संप्रदाय) या स्तंभावर त्याने लेख कोरवला असून तो सर्वस्वी प्राकृतात आहे. एक परकीय राजदूत लेख कोरवून घेतांना प्राकृत भाषा वापरत होता ही संस्कृत भाषेची सर्वस्वी अनुपस्थिती दर्शवते.
या लेखात "गरुडध्वजो" व "देवदेवासा" हे अर्ध-संस्कृत रुपांतर सोडता अन्य मजकुर सर्वस्वी प्राकृतात आहे. म्हनजेच काही शब्द सोयीसाठी (देवदेवस्य ऐवजी देवदेवासा) संक्रमनावस्थेत होते. शृंगांच्या कालातही संस्कृत अस्तित्वात नसून ती बनत होती. शब्दांची सुलभ रुपांतरे होऊ लागली होती. अस्तित्वात असती तर अशी मिश्र रुपांतरे न मिळता शुद्ध रुपांतरे दिसली असती.
शृंग घराणे वैदिकाभिमानी असल्याने (वा तसा समज असल्याने) त्यांच्या १११ वर्षांच्या राजवटीत कोठेतरी, एकतरी शुद्ध अथवा वैदिक संस्कृतातील लेख मिळायला हवा होता. (कारण वेद मुलता:च वैदिक सम्स्कृतात लिहिले गेले असा सर्वसामान्य समज आहे म्हनून) परंतु प्रत्यक्षात शृंग कालात विकसीत होनारी...संस्कृत बनू पाहनारी प्राकृत व तीही काही शब्दरुपे मिलतात. शुद्ध सम्स्कृत म्हनता येईल असा लेख सोडा एखाद-दुसरा शब्दही मिळत नाही, ही बाब उल्लेखनीय आहे.
सर्वात महत्वाचे असे कि पुष्यमित्र शृंगाने दोन अश्वमेध केले हे प्राकृतातील लेखानेच नव्हे तर कालिदासाच्या नातकाने व पुराणांनीही सांगितले आहे. अश्वमेध यज्ञविधी यजुर्वेदांतर्गत येत असून सध्या हा वेद वैदिक सम्स्कृतात आहे. प्रश्न असा आहे कि वैदिक सम्स्कृत अस्तित्वात असल्याचा एकही पुरावा शृंग घराण्याच्या व तत्पुर्वीच्या कालातील एकाही नानक-अथवा शिलालेखात मिळत नाही तर वेद त्या काळी नेमके कोणत्या भाषेत होते?
(हेलिओडोरसचा गरुडस्तंभ "खांबबाबा" म्हणुन विशेषत: कोळ्यांकडुन पुजला गेलेला आहे.)