Sunday, February 2, 2014

सातवाहन: प्राकृत आणि संस्कृत! (२)


"सातवाहन आणि क्षत्रपांच्या काळात समाजाच्या उच्च थरांतील लोकांमधेही संस्कृत भाषा प्रचारात नव्हती." असे विधान करुन वा. वि. मिराशी "सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप" या ग्रंथात पुढे म्हणतात कि, "आर्य लोक भारतात आले तेंव्हा त्यांची भाषा वैदिक पद्धतीची संस्कृत होती यात संशय नाही. पण तिच्यातील क्रियापदांचे दहा प्रकार, तीन भुतकाळ, दोन भविष्यकाळ, नाम-सर्वनामांची विविध प्रकारची विभक्ति-प्रत्ययांत रुपे इत्यादि बारकावे त्यांच्याशी व्यवहारात संबंध आलेल्या आर्येतरांना पेलने शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातील संस्कृत भाषेत परिवर्तन होऊन प्राकृत भाषा अस्तित्वात आल्या. आर्यांनाही त्यांच्याशी व्यवहारात त्यांचा उपयोग करावा लागला."

मिराशींनाच नव्हे तर गेल्या शतकातील सर्वच विद्वानांनी आर्य आक्रमण अथवा स्थलांतर सिद्धांत हे केंद्रीय ग्रुहितक ग्राह्य धरलेले आहे. १९ व्या शतकापासून "आर्य" वंश संकल्पनेने अकल्पित विस्तार केला. या संकल्पनेचा जन्मदाता म्यक्समुल्लरने "आर्य हा कोणी वंश मानतो तो मोठेच पाप करतो..." असे म्हणुनही या संकल्पनेने नाझीवाद आणि फ्यसिस्ट विचारांना जन्म घातला. यामागे वंशश्रेष्ठ्त्वाची भावना होती हे उघड आहे. भारतही या विचारांपासून अलिप्त राहिला नाही. "आर्क्टिक होम इन वेदाज" हा ग्रंथ लिहून टिळकांनी त्यात भरच घातली. उत्तरेतील आर्य व आर्यभाषा व दक्षीणेतील द्राविड व द्राविडभाषा यात सांस्कृतिक व राजकीयही संघर्ष पेटला. आजही त्याचे निराकरण झालेले नाही. वंशवादी लोकांनी आजही "मुलनिवासी विरुद्ध आक्रमक युरेशियन" अशी मांडणी कायम ठेवली आहे व त्याचे प्रतिबिंब दोन्ही बाजुंच्या वैचारिक साहित्य, संशोधने व ललित लेखनांवर पडलेले आढळून येते. त्यामुळे सत्याप्रत जाण्याचे मार्ग दोन्ही बाजुंनी बंद करून ठेवले आहेत असे म्हणने क्रमप्राप्त आहे.

या वादात न शिरता जिनेव्हा (युनेस्को) येथे मानववंश शास्त्रज्ञ आणि जनुकीय शास्त्रज्ञ यांनी जुन १९५१ मद्धे एक मताने जारी केलेल्या निवेदनापासून या प्रश्नाकडे पाहुयात. संदर्भ: The Race Question in Modern Science: The Race Conceipt- Results of an Inquiry, युनेस्को प्रकाशन)

खाली या निवेदनातील मुद्दे थोडक्यात दिलेले आहेत.

१. संपुर्ण मानवजात होमो सेपियन या एकच एक मानवगटातून विकसीत झालेली आहे. एकाच गटातील माणसांचे जगभर वितरण नेमके कधी आणि कसे झाले हे मात्र सांगता येणार नाही.
२. मानवी समाजांत आज दिसनारे शारीरीक (रंग/जबड्यांची ठेवण इ,.) अनुवांशिकी घटना आणि विविध भुभागांतील पर्यावरणीय स्थानिक वैशिष्ट्यांमुळे दिसतात.
३. राष्ट्रीय, धार्मिक, भौगोलिक, भाषिक, आणि सांस्कृतिक विभेदांचा व वेगळ्या वंशाचे असण्याचा काही संबंध नाही.
४. आजवर वंशशास्त्रज्ञांनी शरीरमान/रंगाच्या आधारे कितीही गट पाडले असले वा कल्पिले असले तरी एका विशिष्ट शरीरलक्षणावरून (उदा. रंग) एक गट दुस-या गटापेक्षा वेगळा आहे असे नाही. या गटांत वांशिकी कारणावरून एक गट दुस-यापेक्षा श्रेष्ठ (Superior) आहे अशी जी सध्याची लोकप्रिय संकल्पना आहे ती निराधार आहे.
५. बहुतेक वंशशास्त्रज्ञ मानवी गटांची विभागणी करतांना बौद्धिक क्षमतेचा त्यात अंतर्भाव करत नाहीत. मानवाच्या (कोणत्याही कथित वंशाचा असला तरी) बौद्धिक क्षमता या जन्मजात व तो ज्या समाजव्यवस्थेत राहतो (मानवी पर्यावरण) त्यावर अवलंबून असतात. मानसिक क्षमतेवरून दोन गट पडत नाहीत.
६. संस्कृती आणि सांस्कृतिक उपलब्धी ही जनुकीय फरकांवर अवलंबून नसते.
७. "शुद्ध रक्ताचा वंश" ही संकल्पना सिद्ध करणारा एकही पुरावा पुढे आलेला नाही.

यानंतर आपण Center for Cellular & Molecular Biology  हैदराबाद, University of Tartu, इस्टोनिया,  Chettinad Academy of Research and Education, चेन्नई आणि बनारस हिंदू विद्यापीठाने भारतातील जनसंख्येचे जे व्यापक जनुकीय सर्वेक्षण केले त्यांच्या निष्कर्षाकडे वळुयात.

या निष्कर्षाप्रमाने गेल्या किमान साडेतीन हजार वर्षांपासून भारतात युरेशियन जनुकीय प्रवेश आढळुन येत नाही. भारतातील जनुकीय वैविध्य हे युरेशियापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. युरेशियातून आर्य अथवा आर्यभाषा बोलणारे लोक कधीकाळी आले मत हे जनुकीय पुराव्यांवर टिकत नाही.  "It is high time we re-write India's prehistory based on scientific evidence. There is no genetic evidence that Indo-Aryans invaded or migrated to India or even something such as Aryans existed". असे मत  डा. लालजी सिंग यांनी व्यक्त केले असून ते Center for Cellular & Molecular Biology  चे संचालक होते. हा अहवाल २०११ मद्धे प्रसिद्ध झाला.

वरील बाबींवरून दोन बाबी सिद्ध होतात.

१) आर्य नांवाचा वंश अस्तित्वात नव्हता, हे वंशशास्त्रज्ञांच्या व आताच्या जनुकीय संशोधनाने सिद्ध केले आहे. सध्याच्या ऋग्वेदात १०१२८ ऋचांपैकी फक्त ३४ ऋचांत आर्य हा शब्द ३६ वेळा येतो. हे आदरार्थी संबोधन असून हे संबोधन विशेषता: सुदास राजाला आणि इंद्रादि देवतांना वापरलेले आहे, वंश म्हणून नाही.
२) आर्य अथवा कोणी युरेशियन मानव गट भारतात प्रवेशला हे पारंपारिक मत कोणत्याही आधारावर टिकत नाही.

या नवीन शास्त्रशुद्ध संशोधनांनंतर टिळक, वा. वि. मिराशी ते सर्वच भारतीय विद्वानांची आर्यांविषकची मते बाद होतात हे ओघाने आले. जर आर्य अस्तित्वात नव्हते तर त्यांची संस्कृत भाषा आर्येतरांना पेलत नव्हती म्हणून अशुद्ध झाली आणि  त्यातून प्राकृत भाषा जन्माला आल्या हे मिराशींचे वरचे मतही बाद ठरते. उलट मिराशी येथे अजून एक अत्यंत मोठा विरोधाभास जन्माला घालत आहेत. तो म्हणजे "उच्च थरांमधील लोकांमद्धेही संस्कृत भाषा प्रचारात नव्हती." हे त्यांचे उपरोम्क्त ग्रंथातील विधान. येथे मिराशींना उच्च थर म्हनजे "त्रैवर्णिक" म्हणायचे आहे हे उघड आहे. मिराशी येथे हे विसरले आहेत कि वैदिक धर्मात तिन्ही वर्णांत वेद/वेदांगे/शिक्षा/व्याकरण इ. गुरुगृही जावून शिकणे अनिवार्य आहे. जर वेद संस्कृतात असतील तर स्वाभाविकपणेच या तिन्ही वर्णातील लोकांना संस्कृत येणे अनिवार्य आहे. शिवाय सातवाहन हे ब्राह्मण होते, तत्पुर्वीचे शृंग व काण्व ही राजघरानीही ब्राह्मण होती असे त्यांचेच दावे आहेत. सातवाहनांनी केलेल्या श्रौत यज्ञांचे वर्णन त्यांनी संस्कृतात लिहिण्याऐवजी प्राकृतात लिहिल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केलेले आहे. डा. अजय मित्र शास्त्री यांनी "महाराष्ट्र ग्यझेटियर: इतिहास: प्राचीन काळ" मद्धेही असेच वर्णन केले आहे. एकीकडे प्राकृत ही सामान्य जनांची भाषा होती आणि हालाच्या गाथा सप्तशतीतील गाथा ही जनसामान्यांची काव्ये होत असे विधान करतांना अगदी स. आ. जोगळेकर (गाथा सप्तशतीचे संपादक) विसरतात कि गाथा सप्तशतीतील हाल, आढ्यराज, प्रवरसेन ई. हे गाथा रचनाकार राजे व सामंत होते. जनसामान्य नव्हते.

या विवेचनाचा संक्षिप्त अर्थ एवढाच निघतो कि संस्कृतातून आर्येतरांना झेपली नाही म्हणुन प्राकृत निर्माण झाली हे मत चुकीचे आहे कारण कोणताही युरेशियन मानवगट भारतात संस्कृत वा तत्सम भाषा घेऊन आला होता हे मतच मुळात निराधार आहे. त्याला कसलेही (अगदी ऋग्वेदांतर्गतही) पुरावे उपलब्ध नाहीत.

आणि दुसरी बाब म्हनजे तथाकथित उच्च थरही प्राकृतच बोलत होता कारण अन्य भाषा अस्तित्वात नव्हती. त्रैवर्णिक जेही वेद शिकत होते ते आता आहेत त्या संस्कृत भाषेत असणे शक्य नाही कारण तसे असते तर संस्कृतचा पुरेपूर अभाव आपल्या चर्चेत असलेल्या प्रदिर्घ काळात दिसला नसता. उलट सातवाहनांच्या लेखांत ४६० वर्षांच्या कालावधीत प्राकृत संस्कृतात उत्क्रांत होत असल्याचे संकेत कसे मिळतात हे पुढील लेखात पाहु.

(क्रमश:)

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...