Sunday, February 9, 2014

संस्कृतीचे मापदंड?

परंपरा म्हणजे संस्कृती असे काही लोक मानतात. त्या आधारावरच संस्कृतीचे मापदंड ठरवतात व थोर-उज्वल परंपरांचा अभिमान बाळगतात. आपल्या देशाच्या परंपरांचा अभिमान बाळगण्याची आपण तर अधिकृत प्रतिज्ञाच करत असतो. पण परंपरा म्हणजे संस्कृती नसून परंपरा सांस्कृतीक जीवनाच्या एक भाग आहेत. नवीन परंपरा निर्माण होणे, जुन्या नष्ट होणे अथवा सुसंगत दृष्ट्या बदलवने हे सातत्याने घडत असते. हे ओघ एवढे व्यामिश्र असतात कि एका विशिष्ट "क्ष" काळातील संस्कृती म्हणजे नेमके काय हेसुद्धा ठरवता येणे अशक्य होऊन जाते. काही मापदंडांवरुन कोणत्याही "क्ष" काळच्या सम्स्कृतीचे मुल्यमापन करता येत नाही ते त्यामुळेच. कारण नोंदले न जानारे बोध आणि अबोध प्रवाह तेवढेच प्रभावी ठरतात. उदा. आपल्यकडे आर्थिक इतिहास लिहिलाच न गेल्याने अर्थसंस्कृतीबद्दल तर्क करण्यापलीकडे फारसे आपल्या हाती राहत नाही. तसेच निर्माणकर्ते घटक संस्कृतीनिर्मितीत हातभार लावत असले तरी त्यांचे विश्लेशन व योगदान निश्चित करायला सामग्री सापडत नाही. हे जुन्या काळातच नव्हे तर आताही घडते. धार्मिक संस्कृती आणि राजकीय संस्कृतीबद्दलही आपल्याहाती जी सामग्री येते ती कितपत तटस्थ आहे हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे जुन्या काळाच्या संस्कृतीबद्दल बोलतांना तथ्यांपेक्षा भ्रम हाच अनेकदा त्याचा आधार असतो. त्यामुळेही संस्कृतींचे यथार्थ मूल्यमापन होत नाही...किंवा करता येत नाही. अशा भ्रमांच्या आधारावर निर्माण करु पाहणारी नव्य संस्कृती एक भ्रम बनू शकते ती यामुळेच!

शिवाय संस्कृतीच्या श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचे मापदंड तरी कोणते असतात? जी सम्स्कृती अधिकाधिक समाज-सुसंगत, हार्मोनियस, एकमय आणि प्रागतिक आहे ती संस्कृती चांगली असे फार तर म्हणता येईल...तरीही श्रेष्ठ-कनिष्ठतेचे (दु)र्गूण तिला चिकटवणे योग्य ठरणार नाही.

या पार्श्वभुमीवर भारतीय संस्कृतीकडे पाहिले तर ती कधीच हार्मोनियस आणि समाजसुसंगत नव्हती असे म्हणावे लागते. भारतात विविध भाषा व प्रादेशिक संस्कृत्या स्वतंत्रपणे अस्तित्वात असल्याने एकमयता शक्य दिसत नाही. परस्पर प्रभावांत संस्कृत्या वाढतात हे सत्य मान्य केले तरी त्याचे प्रभावक्षेत्र किती हाही प्रश्न आहेच. परंपरांचे म्हणाल तर असंख्य परंपरा कालौघात आपणच टाकून दिलेल्या आहेत. उदा. वसंतोत्सव/मदनोत्सव हे प्रेमिकांसाठी असलेले उत्सव. आज त्यांची जागा व्ह्यलेंटाईन डे घेते म्हटल्यावर तथाकथित "अ"सांस्कृतिक रक्षकांचा जळफळाट का होतो? वैदिक लोकांचा "इंद्रमह" नांवाचा एक उत्सव असे...त्याचीही परंपरा कधीच लुप्त झाली. अनेक पंथ आले आणि गेले. पांचरात्र संप्रदायाचे तर आज कोणाला नांवही आठवत नाही. आपल्या भाषा जशा मूळ रुपात होत्या तशाच त्या आता राहिलेल्या नाहीत. व्याकरणेही तीच राहिली नाहीत. त्या सातत्याने बदलत्या राहिल्या आहेत. भविष्यातील मराठी कशी असेल याचा अंदाज आपण आज बांधू शकत नाही तो त्यामुळेच!

म्हणजे परंपरा अक्षय्य असू शकत नाहीत. किंबहुना त्या तशा नसाव्यातही. कालसुसंगत नवीन परंपरा निर्माण होणे हा संस्कृती विकसनाचा अपरिहार्य भाग असतो. परिवर्तन हा संस्कृतीचा महत्वाचा निकष आहे. प्रागतिकता...अग्रगामीपणा हा संस्कृत्यांचा मुलाधार आहे. जी संस्कृती स्थितीस्थापक होते तिचा विनाश होऊन नवीन सम्स्कृत्यांनी त्यावर कब्जा करणे हे ओघाने आलेच!

सम्स्कृती धर्म-राजकीय इतिहासावर मुल्यांकित करणे हा आपला मोठा दोष आहे. अर्थसंस्कृती ही धर्म/राजकारणापेक्षा मोठा प्रभाव संस्कृती विकसनावर टाकत असते. १०२२ नंतर भारतात सुरु झालेले भिषण दु:ष्काळ, आक्रमणे व त्यामुळे ठप्प झालेल्या विदेश व देशांतर्गतच्या व्यापाराने आलेले आर्थिक दारिद्र्य यातून भारतीय सम्स्कृतीत जी उलथापालथ झाली तिला जागतिक इतिहासात तोड नाही. आजही आपण नवीन अर्थसंस्कृती निर्माण करण्यात अपेशी ठरलो असून आपली मदार बव्हंशी पाश्चात्त्य अर्थसम्स्कृतीतून उधा-या करण्यावर आहे.

त्यामुळे संस्कृतींच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेवर भाष्य न करता, गतकाळातील महान परंपरांचा अभिमान बाळगत बसण्यापेक्षा नवे सृजन जी करू शकते तीच सम्स्कृती होय...अन्यथा आपल्याला सम्स्कृती आहे अथवा होती हे म्हणण्याला काही अर्थ राहत नाही!  

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...